amol shinde over Pitch important part of cricket sport  sakal
सप्तरंग

आयुष्य ठरवणारी खेळपट्टी

क्रिकेटमध्ये खेळपट्टी हे अत्यंत महत्त्वाचं अंग. सामन्याचा निकाल, खेळाडूंची कामगिरी अशा अनेक गोष्टी या खेळपट्टीशी थेट संबंधित असतात

अमोल शिंदे

क्रिकेटमध्ये खेळपट्टी हे अत्यंत महत्त्वाचं अंग. सामन्याचा निकाल, खेळाडूंची कामगिरी अशा अनेक गोष्टी या खेळपट्टीशी थेट संबंधित असतात, त्यामुळेच क्रिकेटमध्ये जितकं महत्त्व तुमच्या बेसिक्सना आणि स्किल्सना असतं, तितकंच महत्त्व खेळापट्टीलाही द्यावं लागतं. ही विकेटच (खेळपट्टीच) ठरवते कोणाची ‘विकेट’ पडेल ते!

सामना जिंकल्यावर अमुक एखाद्या खेळाडूवर कौतुकाचा वर्षाव होतो; पण त्याचवेळी या खेळपट्टीचं कौतुक फार कमी होतं. पण, पराभव झाला रे झाला की, खेळाडूंच्या कामगिरीबरोबरच खेळपट्टी त्या पराभवाला कशी जबाबदार होती, हे अधोरेखित केलं जातं. विशेष म्हणजे जो संघ सामना जिंकतो, त्याच्या दृष्टीने मात्र हीच खेळपट्टी वंदनीय असते.

फलंदाज किंवा गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरवणाऱ्या ह्या जादुई खेळपट्ट्या बनवणारा किमयागार म्हणजे ‘पिच क्युरेटर’. मैदानात धावांचा पाऊस पाडायचा की फलंदाजांची रांग लावायची, हे त्याच्या हातात असतं. म्हणून क्रिकेटमध्ये नाणेफेक जिंकण्यालाही खूप महत्त्व आहे.

नाणेफेक जिंकणारा कर्णधार, कोणत्या संघाने प्रथम फलंदाजी करावी याचा निर्णय घेताना सामन्यादरम्यान खेळपट्टीमध्ये होणाऱ्या बदलांना लक्षात घेतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. अर्थात, हा अंदाजही कधी कधी चुकतोच. खेळपट्टीने अपेक्षेपेक्षा वेगळे रंग दाखविल्यावर मात्र कर्णधाराचा नाणेफेक जिंकून घेतलेला निर्णयही अंगलट येतो आणि आपल्या हातानं समोरच्या संघाला तो सामना बहाल करतो.

क्रिकेट पिच बनवण्याचंही एक शास्त्र आहे. पिचमधले तीन मुख्य घटक म्हणजे माती, गवत आणि पाणी. खेळपट्टीसाठी कोणती माती वापरायची, त्यावर गवत किती ठेवायचं आणि त्यासाठी किती पाणी वापरायचं, या गोष्टींवर सर्व काही अवलंबून असतं. त्यावरूनच ठरतं की पिचमध्ये किती ‘पाणी’ आहे आणि सामन्यात कोण कोणाला पाणी पाजणार ते!

मॅच कोणत्या प्रदेशात आहे, तिथलं हवामान उष्ण, दमट आहे की थंड; जमीन भुसभुशीत, खडकाळ आहे की मुरमाड, यावरही ठरतं की खेळपट्टी काय करामत दाखवेल ते !

खेळपट्टीमधील महत्त्वाचे घटक

माती : काळी माती आणि लाल माती हे मातीचे मुख्यतः दोन प्रकार असतात. काळी माती जमिनीला घट्ट धरून ठेवते, त्यात लाल मातीपेक्षा क्ले कंटेंट जास्त असतो, त्यामुळे ती जास्त पाणी शोषते. काळ्या मातीपासून बनवलेली खेळपट्टी लवकर खराब होत नाही.

एकाच खेळपट्टीवर जास्त सामने होणार असतील, तर काळी माती केव्हाही फायदेशीर ठरते. लाल मातीमध्ये क्ले कंटेंट तुलनेनं कमी असतो. जमिनीला धरून ठेवण्याची तिची क्षमता काळ्या मातीच्या तुलनेत खूपच कमी असते.

जसजसा दिवस पुढे सरकतो, तसतसं ही खेळपट्टी खराब होण्यास सुरुवात होते. त्यावर धूळ, फूटमार्क आणि क्रॅक्स तयार होतात, त्यामुळे स्पिनर्सला गोलंदाजी करताना मदत होते. दुसरीकडे यावर फलंदाजी करणं अधिक कठीण होत जातं आणि त्यामुळे धावसंख्या सरासरीपेक्षा काही प्रमाणात कमी होते.

गवत : पिच बनवताना वेगवेगळ्या प्रकारच्या गवतांचा वापर केला जातो. समशीतोष्ण देशांमध्ये सामान्यतः खेळपट्ट्यांवर राईग्रास हे गवत वापरलं जातं. उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये बर्म्युडा गवताच्या जाती (सायनोडॉन, सोउच, क्विक) क्रिकेट खेळपट्ट्यांसाठी वापरल्या जातात.

ज्या खेळपट्टीवर नेहमीपेक्षा मोठं गवत असेल किंवा ती जास्त ओलसर असेल, त्या खेळपट्टीचं वर्णन हिरवी खेळपट्टी किंवा ग्रीन सीमर म्हणून केलं जातं. खेळपट्टीवर गवत जास्त असलं, तर त्या खेळपट्टीवर चेंडू विचित्र प्रकारे उसळी घेतो आणि स्विंग होतो. त्यात फलंदाजांचा अंदाज व टायमिंग चुकतं. त्यामुळे खेळपट्टीवरील गवत हे गोलंदाजांना साथ देतं.

यावर फलंदाजी करताना खेळाडूची खरी परीक्षा असते. साधारणपणे कसोटी सामन्यांमध्ये याचा वापर केला जातो; पण जर खेळपट्टी ड्राय असेल, त्यावर खूप रोलिंग केलेलं असल्यास अशा खेळपट्टीवर चेंडू फारसा वळत नाही, तो सरळ बॅटवर येतो. फलंदाज चांगला टायमिंग साधून चौकार, छक्क्यांची बरसात करतात, त्यामुळे धावांचे डोंगर उभे राहतात. गोलंदाजांसाठी विशेष मदत नसल्यामुळे या खेळपट्टीला निर्जीव किंवा पाटा खेळपट्टी म्हणतात.

पाणी : खेळपट्टी बनवताना आणि वापरण्यापूर्वी प्रत्येक टप्प्यावर पाण्याची भूमिका महत्त्वाची असते. कोरड्या खेळपट्टीसाठी कमी, तर ओलसर खेळपट्टीसाठी जास्त पाणी लागतं. चेंडू अनपेक्षित उसळी घेणं, चेंडू खाली राहील की वर येईल याचा नेमका अंदाज न येणं हा पाण्याचा आणि पर्यायाने गवताचा प्रताप!

आर्द्रता : आर्द्रतेमुळे खेळपट्टीमधील एकसंधपणा कमी होतो आणि खेळपट्टी कमकुवत होते. उदाहरणार्थ - फक्त ३०-३५ टक्के चिकणमाती असलेली खेळपट्टी पाऊस पडल्यावर कमी एकसंध बनते, जी स्विंग आणि सीम गोलंदाजांना अनुकूल असते.

याउलट, ४० टक्क्यांहून अधिक चिकणमाती असलेली खेळपट्टी कडक उन्हात सुकून मजबूत बनते, त्यावर चेंडू अधिक उसळी घेत असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना ती अनुकूल असते. ओलाव्यामुळे पायाची आणि जमिनीची पकडही कमी होते आणि त्यामुळे फलंदाजी करताना (फूटवर्क) खूप मेहनत घ्यावी लागते.

कोरड्या हवामानात फलंदाजाला चौकार किंवा षटकार मारण्यासाठी इतका संघर्ष करावा लागत नाही; पण त्याचवेळी ओलाव्यामुळे चेंडू ओला असल्यामुळे फिरकी गोलंदाजांना तो ग्रीप करण्यास कठीण जातो. चेंडू आणि खेळपट्टी दोन्ही ओलसर असल्यामुळे चेंडू स्पिन न होता फक्त स्कीड होतो.

क्रॅकिंग : खेळपट्टी सुकल्यावर त्यावर भेगा पडतात. कसोटीत साधारणतः तिसऱ्या दिवसानंतर क्रॅक्स उघडण्यास सुरुवात होते. यामुळे खेळपट्टीचा वेग आणि बाउन्स कमी होतो. चेंडू नेमका किती उसळी घेईल याचा अंदाज घेणं कठीण होतं.

चार किंवा पाच दिवसीय सामन्यात खेळपट्टीला चरे पडत जातात, त्यामुळे खेळपट्टी खराब आणि धूलिमय होत जाते. अशा प्रकारच्या खेळपट्टीला ‘डस्ट बाऊल’ किंवा ‘माइनफिल्ड’ असं म्हटलं जातं. अशी खेळपट्टीही गोलंदाजांना आणि त्यातही फिरकी गोलंदाजांना मदत करते, कारण क्रॅक्समुळे फिरकी गोलंदाजांचा चेंडू वळण्यास मदत होते.

ड्रेनेज : मैदानात उत्तम ड्रेनेजसाठी खेळपट्टीच्या पृष्ठभागावरील प्रवाह (सरफेस रनऑफ) ही अतिरिक्त पाण्यापासून मुक्त होण्याची मुख्य यंत्रणा असते. खेळपट्टीचा पृष्ठभाग हा साधारणतः लेव्हल्ड असावा; पण पाणी वाहून जाण्यासाठी त्यावर किंचित क्रॉस फॉल असावा. खेळपट्टीच्या दोन्ही टोकांना गोलंदाजांच्या पायांचे फूटमार्क्स, रफ पॅचेस इ. दुरुस्त करण्यासाठी वारंवार टॉप-ड्रेसिंग केल्यामुळे उद्‍भवणारी सॅडलबॅक समस्या टाळणं आवश्यक असतं, अन्यथा त्यामुळे खेळपट्टीच्या मध्यभागी पाणी जमा होतं.

(लेखक क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक असून एका माध्यमसंस्थेचे संचालक आहेत. )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT