क्रिकेट हा खेळ खेळण्यासाठी बॅट आणि बॉल या दोन प्रमुख गोष्टी आहेत. त्यांच्याशिवाय क्रिकेट खेळलंच जाऊ शकत नाही. आपण बालपणी क्रिकेट खेळायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा प्लॅस्टिकची बॅट आणि बॉल हातात येतो. आपण गल्ली क्रिकेटचीही सुरुवात प्लॅस्टिक बॉलने करतो. त्यानंतर रबरी स्टंपर बॉल, टेनिस बॉल असा बदल होत जातो. आपण सर्वांनी आयुष्यात एकदा तरी बॅट म्हणून कपडे धुण्याच्या थापीचा वापर केला असेल.
मोठे झाल्यावर मात्र लाकडी फळी, शाळेतली पॅड, क्रिकेट बॅट असा त्यात बदल होत जातो. आपल्या गल्ली क्रिकेटमध्ये आपल्या खेळात बॅट आणि बॉल मध्ये जसा बदल होत जातो, तसाच बदल व्यावसायिक क्रिकेट खेळातही होत गेला. ज्यात वेगवेगळ्या आकार प्रकारच्या बॅट खेळाडूंनी वापरल्या आहेत. आजपर्यंत क्रिकेटमध्ये अनेक प्रकारचे बॅट्स आणि बॉल्स वापरले गेले. त्यातील काही चर्चेचा, तर काही वादाचा विषय बनले होते.
आपण सुरुवातीला जागतिक क्रिकेटमध्ये बॅटच्या वापरात कसे बदल होत गेले ते पाहूया. १७५० च्या सुमारास बॅटचा आकार हा हॉकी स्टिकसारखा होता. ती बॅट चपटी आणि धारदार होती. ती बॅट लांब हँडलची होती. १७७०च्या दशकात सध्याच्या बॅटशी साम्य असलेली बॅट वापरात आली. मात्र तिच्या खालच्या भागाची रुंदी जास्त होती. त्यामुळे स्टंप्स पूर्णपणे झाकले जात होते.
पण तेव्हा एका घटनेने क्रिकेट बॅटच्या नियमात बदल घडवून आणला. चेर्सेई आणि हॅमबल्डन यांच्यातील सामन्यात थोमास व्हाईट हा एकदम रुंद बॅट घेऊन खेळण्यास उतरला. त्याच्या बॅटने स्टंप्स पूर्णपणे झाकले जात होते, त्यामुळे तो आउट होण्याचा प्रश्नच निर्माण होत नव्हता. त्यावर हॅमबल्डन संघाने रुंद फळीच्या वापराचा निषेध करत याचिका दाखल केली. नंतर बॅटची कमाल रुंदी चार चतुर्थांश इतकी ठरवण्यात आली.
क्रिकेटमध्ये अनेकदा खेळाडू आपल्या विचित्र हरकतींसाठी लक्षात राहतात. कोणाची हेअर स्टाईल, कोणाची कपड्यांची पद्धत. याचबरोबर काही खेळाडू आपल्या क्रिकेट साधनांसाठी देखील प्रसिद्ध झाले. त्यातीलच एक म्हणजे ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज डेनिस लिली. १९७९ मध्ये इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता.
पहिली कसोटी पर्थच्या वाका मैदानावर होती. दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला आणि पहिल्या दिवशीचे नाबाद फलंदाज डेनिस लिली व डायमॉक हे मैदानात उतरले. अचानक सर्वांचे लक्ष डेनिस लिली यांच्या बॅटकडे गेले. ती बॅट चमकत होती. कारण ती पारंपरिक लाकडाची बॅट नसून ॲल्युमिनियमपासून बनलेली होती.
मैदानावर इंग्लंडचे कर्णधार माइक ब्रेअर्ली यांनी पंचांकडे तक्रार केली की, या ॲल्युमिनियम बॅटने चेंडूचा आकार बदलू शकतो. त्यानंतर बरेच वाद होऊन आयसीसीने त्या बॅटवर अखेर बंदी आणली. खरंतर, लिली यांचा मित्र ग्रॅम मोनाघन याने शाळकरी मुलांसाठी अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या ॲल्युमिनियमच्या बॅटी बनवल्या होत्या.
त्याच्याच एका जाहिरातीचा भाग म्हणून लिली यांनी ही बॅट कसोटी सामन्यात वापरली. या प्रकारानंतर ॲल्युमिनियम बॅटच्या खपात प्रचंड वाढ झाली होती. त्यावेळी क्रिकेट सामन्यात बॅटचा आकार, वजन इत्यादी कसलीही प्रमाणे नव्हती. या प्रकारानंतर क्रिकेटमध्ये फक्त लाकडाचीच बॅट वापरता येईल असा नियम आला.
२००५ मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग याने पृष्ठभागावर कार्बन असलेली बॅट खेळात आणली होती. या बॅटच्या पृष्ठभागावर कार्बन ग्राफाईटचा एक पातळ थर असायचा. यामुळे बॅटरला शॉट मारताना अधिक बळ मिळते, असे टीकाकारांचे म्हणणे होते. याच बॅटने खेळत रिकी पॉँटिंग याने २००४-०५ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात द्विशतक केले होते. त्यावेळी त्याचे संघातील डेमियन मार्टिन, जस्टिन लँगर हे खेळाडू, सनथ जयसूर्या हे देखील या बॅटचा वापर करत होते.
आपण क्रिकेटर्सने दोन्ही पायात वेगवेगळ्या रंगाचे निऑन कलरचे शूज घातलेले पाहिले होते. पण २०१५ मध्ये वेस्ट इंडीजचा क्रिस गेल याने बिगबॅश लीग मध्ये सोनेरी रंगाची बॅट वापरली होती. त्याच्याच संघातील आंद्रे रसेल याने बिग बॅश लीगमध्ये काळ्या रंगाची बॅट वापरली होती.
त्या बॅटने शॉट खेळल्यामुळे तेव्हा बॉलवर काळे डाग पडत असल्याची तक्रार प्रतिस्पर्धी संघाने केली होती. आणि फलंदाजाने क्रिजवर दीर्घकाळ राहून जर या बॅटने बॅटिंग केली, तर बॉलचा रंग अजून काळा होईल, असे सांगण्यात आले. त्या गोष्टीत तथ्य असल्यामुळे अशा रंगीत बॅट वापरण्यावर निर्बंध घालण्यात आला.
ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅथ्यू हेडन याने आयपीएल मध्ये चेन्नई संघाकडून खेळताना मुंगूस बॅट वापरली होती. ह्या बॅटचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमीच्या बॅटपेक्षा हिच्या हँडलची लांबी अधिक व ब्लेडची लांबी कमी होती. त्या बॅटमुळे शॉट खेळताना बॅट स्विंग वेगात होत असे. टी-२० मध्ये फटकेबाजी करण्यासाठी ही बॅट चांगलीच उपयुक्त होती.
पण तिची रचना पाहता तिच्यामुळे फलंदाजाचे नुकसानही व्हायचे. स्वतः मॅथ्यू हेडन त्या आयपीएलमध्ये ही बॅट वापरताना कनेक्शन नीट न झाल्यामुळे बाद झाला होता. त्यामुळे ही बॅट जास्त काळ टिकली नाही आणि लगेचच व्यावसायिक क्रिकेट मधून नाहीशी झाली. पण आजही गल्ली क्रिकेटमध्ये ही बॅट हमखास पाहायला मिळते.
मेरीलेबोन क्रिकेट क्लबने १८३५ मध्ये पहिल्यांदा क्रिकेट बॅटची लांबी निश्चित केली. क्रिकेट बॅटची लांबी ३८ इंच किंवा ९६५.२ मिमी निश्चित करण्यात आली. हा नियम अजूनही कायम आहे. क्रिकेटच्या नियमांचा नियम ५ असे सांगतो की बॅटची रुंदी ४.२५ इंचेस (१०८ मिमी) पेक्षा जास्त नको व बॅटची एकूण खोली २.६४ इंचेस (६७ मिमी) पेक्षा जास्त नको. तसेच बॅटचे काठ १.५६ इंचेस (४ सेमी) पेक्षा जास्त नको.
क्रिकेटच्या बॅट्स सामान्यपणे इंग्लंडमधील विलोच्या झाडाच्या लाकडापासून बनवल्या जातात. त्यानंतर जगभरात क्रिकेटचा प्रसार झाल्याने स्थानिक पातळीवरही बॅट बनवल्या जाऊ लागल्या. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही इंग्लंडची विलोची झाडे वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले. ब्रिटिशांमुळे, विलो काश्मीरमध्ये पोहोचले आणि १९व्या शतकानंतर, काश्मिरी विलो बॅट्सदेखील बनवल्या गेल्या, ज्यादेखील खूप प्रसिद्ध झाल्या.
क्रिकेटमध्ये बॅट प्रमाणे बॉल मध्ये ही बदल होत गेले. क्रिकेट खेळ जेव्हापासून सुरु झाला, तेव्हापासून वन-डे आणि टी-२० युग सुरु होण्यापर्यंत केवळ टेस्ट मॅचेस खेळवल्या जायच्या आणि त्यात लाल रंगाच्या बॉलचा वापर व्हायचा. १७६० ते १८४१ मधील वर्षांमध्ये, प्रथम उत्पादित क्रिकेट बॉल्स ड्यूक कुटुंबाच्या पिढ्यांनी बनवले होते, असे मानले जाते.
ड्यूक कुटुंबीय त्या काळात केंटमधील पेनशर्स्ट येथील रेडलीफ हिल येथे कॉटेज व्यवसाय चालवत होते. १७७५ मध्ये, ड्यूक यांनी त्यांच्या क्रिकेट चेंडूंसाठी किंग जॉर्ज चौथा याच्याकडून रॉयल पेटंट मिळवले. १७८० क्रिकेट हंगामात वापरला गेलेला पहिला-वहिला सिक्स सीम क्रिकेट बॉल त्यांनी तयार केला होता.
दुसऱ्या महायुद्धानंतर ऑस्ट्रेलियात थॉम्पसन कुटुंबाच्या मालकीच्या असलेल्या कुकाबुराने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून करार केला. आज ते जगभरातील क्रिकेट बॉलचे सर्वात मोठे उत्पादक देखील आहेत. जेव्हा वन-डे क्रिकेटची संकल्पना अस्तित्वात आली, तेव्हा देखील पहिल्यांदा लाल रंगाच्या बॉलचाच वापर करण्यात येऊ लागला.
परंतु वन-डे मॅच जेव्हा रात्रीच्या देखील खेळवल्या जाऊ लागल्या, तेव्हा मात्र लाल रंगाचा बॉल रात्रीच्या वेळी पिवळ्या प्रकाशाच्या प्रखर लाईट्समध्ये दिसून येण्यात अडचणी येऊ लागल्या. पिवळ्या प्रखर लाईट्स मध्ये लाल रंगाचा बॉल राखाडी रंगाचा दिसायचा, आणि हाच राखाडी रंग खेळपट्टीवरील मातीसारखा भासायचा.
हीच समस्या दूर करण्यासाठी रात्रीच्या वेळी खेळवल्या जाणाऱ्या वन-डे मॅच मध्ये पांढऱ्या रंगाचा बॉल वापरण्याची सुरुवात झाली. पुढे दिवसाही खेळल्या जाणाऱ्या वन-डे मॅचमध्ये देखील पांढराच बॉल वापरण्यात येऊ लागला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आधी १९७७ मध्ये केरी पॅकर यांनी स्थापन केलेल्या ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड सीरिज क्रिकेटमध्ये प्रथमच पांढऱ्या रंगाचे क्रिकेट बॉल वापरले गेले होते. त्यानंतर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात वापरले जाऊ लागले. लाल बॉलच्या तुलनेत पांढरे क्रिकेट बॉल त्यांचा कडकपणा लवकर गमावतात आणि खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटसाठी (कसोटीसाठी) योग्य नसतात.
आज देखील सर्वच वन-डे मॅचेस मध्ये पांढऱ्या रंगाच्या बॉलने खेळले जात असल्याचे आपल्याला आढळून येते. मध्यंतरीच्या काळात क्रिकेटला अधिक चालना देण्यासाठी एक नवीन क्रिकेट प्रकार तयार करण्यात आला. तो म्हणजे डे-नाईट टेस्ट क्रिकेट मॅच! या मॅचेस मध्ये देखील बॉल न दिसण्याची समस्या उद्भवणार होती आणि त्यावर उपाय म्हणून गुलाबी रंगाचा बॉल निवडण्यात आला.
पांढरा बॉल हा रात्रीच्या वेळी अधिक स्पष्ट दिसत असला तरी कसोटीत तो बॉल रात्रीच्या वेळी वापरू शकत नाही. कारण पांढऱ्या रंगाचा बॉल हा काही वेळाने खराब होतो, म्हणजे त्यावर माती वगैरे लागते, तो जसाच्या तसा पांढरा राहत नाही. सध्याच्या वन-डे क्रिकेटमध्ये प्रत्येक इनिंगला वेगवेगळा पांढरा बॉल वापरण्यात येतो, त्यामुळे म्हणावी तितकी समस्या उद्भवत नाही.
पण जेव्हा तुम्ही डे-नाईट टेस्ट क्रिकेट खेळता तेव्हा मात्र सारखा सारखा बॉल बदलून चालत नाही. गुलाबी रंगाचा बॉल हा पांढऱ्या रंगाच्या बॉल पेक्षा कमी खराब होतो. त्यामुळे लवकर बॉल बदलण्याची गरज भासत नाही, म्हणूनच डे-नाईट टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये गुलाबी रंगाच्या बॉलचा वापर होतो.
पाकिस्तानात टेप बॉलने क्रिकेट खेळले जाते. भारतात टेनिस बॉलचा वापर होतो. आंतरराष्ट्रीय लेदर बॉल क्रिकेट यापेक्षा जरी वेगळे असले तरी अनेक टेप बॉल किंवा टेनिस बॉल खेळाडू हे पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू बनले आहेत. ज्यामध्ये भारताच्या केदार जाधव पासून ते पाकिस्तानच्या वसीम अक्रम, वकार युनूस असे अनेक खेळाडू आहेत.
खेळात बॅट, बॉल, पोशाखाचे किंवा इतर नियम बदलत राहतील, खेळ खेळायची पद्धत बदलत राहील, पण आंतरराष्ट्रीय स्टार क्रिकेटर असो की भारतीय टेनिस क्रिकेट संघाचा कर्णधार कृष्णा सातपुते असो, त्यांचा खूपच कष्टप्रद, जिद्दीने भरलेला प्रवास हा जास्त महत्वाचा व प्रेरणादायी असतो.
(लेखक क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक असून एका माध्यमसंस्थेचे संचालक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.