Actor sakal
सप्तरंग

क्रिकेटचं आणि चित्रपटांचं जुनं नातं

भारतात कधी कधी क्रिकेटपटू मैदान सोडून अभिनयक्षेत्रातही स्वतःची कला अजमावून पाहताना दिसतात, तर कधी अभिनेतेही क्रिकेटच्या मैदानात आपली आवड जोपासताना दिसून येतात.

अमोल शिंदे

क्रिकेट आणि चित्रपटक्षेत्र अर्थात् बॉलिवूड. दोहोंमध्ये मनोरंजन, पैसा, रोमांच... दोहोंमध्ये ग्लॅमर, अंगभूत कलागुणांना मिळणारा वाव... आणि, दोहोंमध्ये प्रशंसकांची आणि टीकाकारांची कोट्यावधींची संख्या... त्यामुळे ही दोन्ही क्षेत्रं वेगवेगळी असली तरी त्यांच्यात खूप साम्यही आहे. भारतात क्रिकेटचं आणि बॉलिवूडचं लव्हकनेक्शन जुनं आहे. क्रिकेटपटूंशी लग्न केलेल्या अनेक अभिनेत्री आहेत.

भारतात कधी कधी क्रिकेटपटू मैदान सोडून अभिनयक्षेत्रातही स्वतःची कला अजमावून पाहताना दिसतात, तर कधी अभिनेतेही क्रिकेटच्या मैदानात आपली आवड जोपासताना दिसून येतात. कधी क्रिकेटच्या सामन्यांना चित्रपटकलाकार हजेरी लावतात, तर कधी चित्रपटांच्या मुहूर्ताला क्रिकेटपटू हजेरी लावतात.

भारताचं क्रिकेटप्रेम किंवा क्रिकेटवेड सर्वश्रुत आहे. त्यामुळे अनेकांनी क्रिकेट आणि बॉलिवूड यांची सांगड घालून चित्रपटनिर्मिती करून पैसा कमावण्याचा प्रयत्न केला; पण क्रिकेटचं आणि बॉलिवूडचं नातं हे केवळ क्रिकेटवर आधारित चित्रपटांपुरतंच मर्यादित नाही.

आपण २०११ पासून सुरू झालेल्या ‘सेलिब्रिटी क्रिकेट लीग’मध्ये बॉलिवूडच्या नामवंतांना क्रिकेट खेळताना पाहतो. या लीगमध्ये बॉलिवूडमधील अनेक मोठे चेहरे मैदानात आपलं कौशल्य दाखवतात. सुनील शेट्टी, बॉबी देओल, रितेश देशमुख, सोनू सूद, रविकिशन असे अनेक अभिनेते दरवर्षी क्रिकेट खेळताना दिसतात; पण अभिनेते क्रिकेटच्या मैदानात उतरण्याची ही पहिली वेळ नक्कीच नाही.

सन १९६२ मध्ये दिलीपकुमार आणि राज कपूर यांच्या संघांमध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना खेळवण्यात आला होता. हा सामना फक्त खेळ म्हणून नव्हे तर, एका सामाजिक भावनेच्या हेतूनं आयोजिला गेला होता. चित्रपटकामगारांसाठी निधी जमा करण्याचा उद्देश त्यामागं होता. शम्मी कपूर, शशी कपूर, जॉय मुखर्जी, प्रेमनाथ, महमूद असे अनेक कलाकार त्या सामन्यात खेळले होते.

याउलट आजच्या घडीला बॉलिवूडमध्ये असेही काही अभिनेते आहेत, जे कधीकाळी व्यावसायिक क्रिकेटपटू होते. अभिनेता अंगद बेदी हा विख्यात गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचा मुलगा. अंगदला वडिलांप्रमाणे क्रिकेटपटूच व्हायचं होतं. वडिलांकडून प्रशिक्षण घेऊन तो क्रिकेटमध्ये योग्य पावलं टाकत होता. सोळा वर्षांच्या आतील व एकोणीस वर्षांच्या आतील संघाकडून तो दिल्लीत खेळला आहे.

त्याची दिल्लीच्या रणजी संघातही एकदा निवड झाली होती; पण तो तेव्हा सामना खेळला नाही. हा प्रवास चालू असतानाच त्यानं मध्येच क्रिकेट थांबवून बॉलिवूडचा मार्ग निवडला. त्याला लहानपणापासून अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांनी मोहिनी घातली होती. अंगदनं आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

हार्डी संधू हा लोकप्रिय गायक आणि अभिनेता. त्यानं अनेक गाणी गायिली आहेत व त्यातली अनेक लोकप्रियही आहेत. हार्डीनं ‘८३’ या चित्रपटात पडद्यावर मदनलाल यांची भूमिका साकारली होती; पण खऱ्या आयुष्यातही हार्डी हा क्रिकेटपटू होता. तो मध्यमगती वेगवान गोलंदाज होता.

हार्डी हा शिखर धवनसोबत ‘टीम इंडिया’च्या एकोणीस वर्षांच्या आतील संघाकडून इंग्लंडच्या त्याच गटातल्या संघाविरुद्ध खेळला आहे. ते दोघं रूममेट होते. याशिवाय, तो भारतीय क्रिकेट संघातील चेतेश्वर पुजारा, रॉबिन उथप्पा, मनोज तिवारी आणि इशांत शर्माबरोबरही क्रिकेट खेळला आहे. याशिवाय, पंजाब संघकडून रणजी ट्रॉफीतही तो खेळला आहे.

त्यानं २००५-०६ मध्ये पंजाबकडून खेळताना हैदराबाद, उत्तर प्रदेश व बडोदा या संघांविरुद्ध प्रथम श्रेणीच्या तीन सामन्यांत १२ बळी मिळवले होते; पण उमेदीच्या काळात त्याच्या हाताच्या कोपराला मोठी दुखापत झाली आणि त्याला क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. यानंतर तो उपचारांसाठी ऑस्ट्रेलियाला गेला.

ऑस्ट्रेलियात राहण्यासाठी व दैनंदिन खर्चासाठी त्यानं ११ महिनं कॅब-ड्रायव्हर म्हणून काम केलं. दरम्यान, आयपीएलची स्पर्धा सुरू झाली होती आणि त्याच्यापेक्षा जे ज्युनिअर खेळाडू होते त्यांची निवड होत होती हे पाहून त्याला वाईट वाटलं. आपल्यात आयपीएलमध्ये खेळण्याची क्षमता आहे हे तो जाणून होता. त्यानं हार न मानता पुन्हा नव्यानं उभं राहायचं ठरवलं. पुन्हा प्रशिक्षण सुरू केलं आणि पुन्हा एकदा रणजी ट्रॉफीमध्ये संधी मिळवली.

मात्र, सामन्याच्या तीन दिवस आधी त्याला पुन्हा त्याच ठिकाणी दुखापत झाली. हा अपघात त्याच्यासाठी भावनात्मकदृष्ट्या खूपच त्रासदायक होता. यानंतर तो बरेच दिवस नैराश्यात होता. मात्र, पुढं हार्डीनं अभिनयाचं आणि गायनाचं क्षेत्र निवडलं. तो अतिशय लोकप्रिय झाला; पण भारतासाठी खेळता न आल्याची त्याला अजूनही खंत वाटत राहते.

करण वाही यानंही छोट्या पडद्यासह अनेक चित्रपटांमध्ये आपली छाप उमटवली. ‘दिल मिल गए’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ अशा अनेक मालिकांमध्ये त्यानं भूमिका साकारल्या व त्या लोकप्रियही ठरल्या. त्यानंतर त्यानं ‘दावत-ए-इश्क’ आणि ‘हेट स्टोरी ४’ या चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. पंजाबच्या मोहालीमध्ये जन्मलेला करण दिल्लीत लहानाचा मोठा झाला. अभिनेता होण्याआधी तो क्रिकेटपटू होता.

तो दिल्लीच्या एकोणीस वर्षांच्या आतील संघाकडून खेळला आहे. एकेकाळी विराट कोहली आणि शिखर धवन या दिग्गज खेळाडूंसोबत क्रिकेट खेळलेल्या करणचंही भारतासाठी क्रिकेट खेळायचं स्वप्न होतं; पण दुखापत झाल्यानं ते पूर्ण होऊ शकलं नाही. त्यानं क्रिकेटपासून फारकत घेतली आणि तो अभिनयक्षेत्रात गेला.

सलील अंकोला यानं क्रिकेटपटू म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. तो वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघाकडून एकदिवसीय २० सामने व एक कसोटी सामना खेळला आहे. विशेष म्हणजे, सलीलनं सचिन तेंडुलकर आणि वकार युनूससोबत १९८९ ला कराचीत झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान या कसोटीतून पदार्पण केलं होतं.

मात्र, त्या दोघांप्रमाणे त्याला क्रिकेटमध्ये गरुडझेप घेता आली नाही. क्रिकेटनंतर सलीलनं अभिनयाची वाट चोखाळली. त्यानं ‘कोरा कागज’, ‘करम अपना अपना’ यांसारख्या मालिकांमध्ये, तर ‘कुरुक्षेत्र’ या चित्रपटात काम केलं.

छोट्या पडद्यावरील मालिका ‘मैत्री’आणि ‘उडारिया’ यांच्या माध्यमांतून समर्थ जुरेल हा घराघरात पोहोचला. समर्थनं क्रिकेटमध्ये राज्यस्तरापर्यंत मजल मारली होती; पण तो फक्त त्याच्या वडिलांच्या इच्छेमुळेच क्रिकेट खेळत होता. त्यामुळे राज्यस्तरापर्यंत खेळूनही त्यानं पुढं त्याच्या आवडीच्या अभिनयक्षेत्राकडेच मोर्चा वळवला.

अभिनेता साकिब सलीमनं ‘८३’ या चित्रपटात मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे, साकिब हा दिल्ली संघाचा माजी खेळाडू आहे. तो जम्मू-काश्मीर संघाकडूनही खेळला आहे. १२ वर्षांचा असताना तो आणि विराट कोहली दिल्लीत एकत्र क्रिकेट खेळले आहेत.

पुढं साकिबनं मॉडेलिंग आणि अभिनयक्षेत्राची वाट निवडली. त्यनं ‘मुझ से फ्रेंडशिप करोगे?’या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘मेरे डॅड की मारुती’,‘बॉम्बे वेल्वेट’, ‘हवाहवाई’, ‘ढिश्यूम’, ‘रेस ३’ यांसारख्या चित्रपटांत त्यानं अभिनय केला. त्याची ही यशस्वी वाटचाल सुरूच आहे.

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं नातं हे असं अतूट आहे. ‘जब तक हिंदुस्थान में क्रिकेट है...बायोपिक बनतेही रहेंगे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT