भारतीय क्रिकेट संघ हा जागतिक क्रिकेटमधील एक पॉवरहाउस आहे, हे भारतीय संघाने आपल्या कामगिरीद्वारे अनेक वेळा सिद्ध केलं आहे. विराट कोहली असो की रोहित शर्मा, भारतीय संघ अनेक सुपरस्टार खेळाडूंनी भरला आहे. भारताच्या राष्ट्रीय संघातील सध्याच्या अनेक स्टार्सनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात देशांतर्गत क्रिकेटमध्ये केली.
इथं ते त्यांची प्रतिभा दाखवू शकले आणि पुढे राष्ट्रीय संघासाठी त्यांची निवड झाली. भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या यशात देशांतर्गत क्रिकेटचा महत्त्वाचा वाटा आहे. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळल्यामुळे नवोदित खेळाडूंना त्यांची कौशल्यं वाढवता येतात आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी स्वतःला तयार करता येतं.
या प्रणालीमुळे निवड समितीला देशभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करणं सोपं जातं. युवा खेळाडू विविध परिस्थितींचा सामना करण्यास पुरेशा प्रमाणात तयार आहेत का, याची खात्री करणंही निवड समितीला यामुळे शक्य होतं.
क्रिकेट हा खेळ भारतीयांच्या मनात वसतो. आंतरराष्ट्रीय सामान्यांप्रमाणे भारतात राष्ट्रीय स्तरावर विविध वयोगटांतील क्रिकेट सामने, प्रथम श्रेणी क्रिकेट, लिस्ट-ए-क्रिकेट व टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळवल्या जातात.
भारतात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी, दुलिप ट्रॉफी, इराणी ट्रॉफी या स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. तसंच लिस्ट-ए-क्रिकेटमध्ये विजय हजारे ट्रॉफी, विमेन्स सीनियर वन डे ट्रॉफी, देवधर ट्रॉफी या स्पर्धा; तर सय्यद मुश्ताक अली, विमेन्स सीनियर टी-२० ट्रॉफी या टी-२० स्पर्धांचं आयोजन दरवर्षी केलं जातं.
विविध वयोगटांतील खेळाडूंसाठी सी. के. नायडू ट्रॉफी व विनू मंकड ट्रॉफीचं, तसंच आंतरविद्यापीठ पातळीवर रोहिंग्टन बारिआ आणि विझी करंडकाचं आयोजन केलं जातं. या प्रत्येक स्पर्धेला एक इतिहास व भारतीय क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.कूचबिहार ट्रॉफी : कूचबिहार ट्रॉफी ही भारताची १९ वर्षांखालील खेळाडूंची राष्ट्रीय चार दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे.
१९४५-४६ या हंगामापासून ही स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे दरवर्षी आयोजित केली जाते. १९४५-४६ ते १९८६-८७ पर्यंत कूचबिहार ट्रॉफी ही एक शालेय स्पर्धा होती. पण, त्यानंतर ही ट्रॉफी भारतातील अंडर-१९ क्रिकेट स्पर्धा म्हणून खेळवली जाऊ लागली. यात चार दिवसांचे सामने खेळवले जातात. रेल्वे आणि सर्व्हिसेसचे संघ वगळता इतर सर्व रणजी संघ यात सहभागी होतात.
यातील सहभागी संघ चार गटांमध्ये विभागले जातात. यात प्रथम ग्रुप स्टेजमध्ये राउंड-रॉबिन पद्धतीने सामने खेळवले जातात व त्यानंतर उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचं आयोजन केलं जातं. बुधी कुंदरन, मोहिंदर अमरनाथ, करसन घवरी, सचिन तेंडुलकर व युवराज सिंहसारखे अनेक सुपरस्टार खेळाडू आधी या स्पर्धेत चमकले व पुढे जाऊन भारतीय संघाकडून खेळले.
विनू मांकड ट्रॉफी : ही भारताची १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या स्पर्धेचं आयोजन करतं. यामध्ये बीसीसीआयशी संलग्न असलेल्या राज्य क्रिकेट संघटनांचे ज्युनिअर संघ सहभागी होतात. या स्पर्धेचं नाव माजी भारतीय क्रिकेटपटू विनू मांकड यांच्या नावावरून ठेवलं आहे.
रोहिंग्टन बारिया : रोहिंग्टन बारिया ट्रॉफी ही भारताची प्रमुख आंतर-विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा आहे. १९३५-३६ पासून दरवर्षी ही स्पर्धा खेळविली जाते. १९३५ मध्ये बॉम्बेतील अर्देशीर दादाभॉय बारिया यांनी त्यांचा मुलगा रोहिंग्टन याच्या स्मरणार्थ भारतीय विद्यापीठांमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठी ही ट्रॉफी दान केली होती.
स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या या स्पर्धेला फार मोठा इतिहास आहे. या स्पर्धेद्वारे भविष्यातील अनेक भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणारे व प्रथम श्रेणी खेळाडू घडले. १९४०-४१ च्या विजेत्या बॉम्बे विद्यापीठ संघाने भविष्यात भारताला हेमू अधिकारी, सदू शिंदे, चंद्रा सरवटे आणि रंगा सोहोनी असे तब्बल चार खेळाडू दिले.
बॉम्बे विद्यापीठाच्याच १९५८-५९ च्या विजेत्या संघातील अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई, अरविंद आपटे, फारोख इंजिनिअर व रमाकांत देसाई हे पाच खेळाडू पुढे जाऊन भारतासाठी खेळले. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे, भारताबरोबरच भविष्यातील पाकिस्तान क्रिकेट संघासाठीही या स्पर्धेने खेळाडू घडविले.
१९४५-४६ च्या पंजाब विद्यापीठ संघातील नझर मोहम्मद, इम्तियाज अहमद, मकसूद अहमद, अब्दुल हफीज कारदार, फजल महमूद, खान मोहम्मद आणि शुजाउद्दीन बट या सात खेळाडूंनी १९५० च्या दशकात पाकिस्तानच्या कसोटी यशात महत्त्वाची भूमिका बजावली.
विझी करंडक : ही एक आंतर-विद्यापीठ स्तरावरील स्पर्धा आहे. भारतातील सर्व झोनमधील संघांमध्ये ही स्पर्धा खेळविण्यात येते. या स्पर्धेचं नाव ‘सर विजय आनंद गजपती राजू’ यांच्या नावावर ठेवण्यात आलं होतं. त्यांना ‘विझियानगरमचे महाराज कुमार’ म्हणून ओळखलं जायचं. ते पूर्व भारतीय खेळाडू होते. त्यांनी १९५४-५७ मध्ये बीसीसीआयचं अध्यक्षपद भूषविलं होतं.
कर्नल सी. के. नायडू ट्रॉफी : ही भारतामध्ये विविध राज्य आणि प्रादेशिक क्रिकेट संघटनांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या २५ वर्षांखालील संघांमध्ये बीसीसीआयद्वारे खेळवली जाणारी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आहे. यात चार दिवसांचे सामने खेळवले जातात. सुरुवातीला १९७३-७४ मध्ये २२ वर्षांखालील खेळाडूंसाठी ही स्पर्धा खेळविण्यात आली.
भारताचे पहिले कसोटी क्रिकेट कर्णधार सी. के. नायडू यांच्या स्मृती चिरंतन करण्यासाठी जमा केलेल्या निधीतून बॉम्बे क्रिकेट असोसिएशनने ही ट्रॉफी दान केली होती. २०१४-१५ च्या हंगामापासून, बीसीसीआयने स्पर्धेची वयोमर्यादा २५ वरून २३ वर आणली व या स्पर्धेतील संघात खेळू शकणाऱ्या रणजी करंडक क्रिकेटपटूंची संख्या फक्त तीनपर्यंत मर्यादित केली.
बीसीसीआयने २०२१-२२ च्या हंगामापासून याची वयोमर्यादा पुन्हा २५ वर्षांवर आणली. या स्पर्धेचा सध्याचा चॅम्पियन गुजरातचा संघ आहे. त्यांनी फायनलमध्ये मुंबईचा पराभव केला होता. त्याआधी २०२१-२२ मध्ये मुंबई व २०१९-२० मध्ये विदर्भाच्या संघाने ही स्पर्धा जिंकली आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील संघांचा गेल्या काही वर्षांत या स्पर्धेत दबदबा राहिला आहे.
रणजी ट्रॉफी : भारतात राष्ट्रीय स्तरावरील प्रथम श्रेणी चॅम्पियनशिप घेण्याची संकल्पना बीसीसीआयचे संस्थापक ए. एस. डिमेलो यांनी मांडली. जुलै १९३४ मधील शिमला येथील बीसीसीआयच्या बैठकीनंतर ही स्पर्धा सुरू करण्यात आली. सुरुवातीला या स्पर्धेचं नाव ‘भारतीय क्रिकेट चॅम्पियनशिप’ असं ठेवण्यात आलं, नंतर तिचं नाव बदलण्यात आलं.
४ नोव्हेंबर १९३४ रोजी या स्पर्धेचा पहिला सामना मद्रास व म्हैसूर या संघांमध्ये चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. १९३५ मध्ये पटीयालाचे महाराज भूपिंदर सिंह यांनी सर रणजितसिंहजी विभाजी जडेजा यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला रणजी हे नाव दिलं. सर रणजितसिंहजी विभाजी जडेजा यांनी १९०७ ते १९३३ या काळात नवानगर संस्थानचे महाराजा जाम साहेब म्हणून कारभार पाहिला.
पण, या काळापूर्वी त्यांनी परदेशात एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून नावलौकिक कमावलेला होता. इंग्लंडच्या बाजूने खेळून आपली क्रिकेट कारकीर्द सुरू करणारे रणजितसिंह हे पहिले भारतीय खेळाडू होते. तेव्हा त्यांच्या रूपाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगाला पहिल्यांदाच एका भारतीय खेळाडूने आपली दखल घ्यायला भाग पाडलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रणजितसिंह यांचं प्रदर्शन वाखाणण्याजोगं होतं. त्यांनी तब्बल ३०७ सामने खेळताना ५६ च्या सरासरीने एकूण २४,६९२ धावा आपल्या नावावर जमा केल्या. त्यात तब्बल ७२ शतकं आणि १०९ अर्धशतकांचा समावेश आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धेत राउंड-रॉबिन सामने चार दिवसांचे असतात; तर बाद फेरीचे (नॉक-आउट) सामने पाच दिवस खेळवले जातात. रणजी करंडक नॉक-आउट सामन्यात कोणताही स्पष्ट निकाल न लागल्यास, पहिल्या डावानंतर आघाडी घेणाऱ्या संघास विजेता म्हणून घोषित केलं जातं. आजवर विक्रमी ४१ वेळा ही स्पर्धा जिंकून मुंबई क्रिकेट संघ या स्पर्धेतील आजवरचा सर्वांत यशस्वी संघ ठरला आहे.
या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा विक्रम वसीम जाफरच्या (१२,०३८) नावावर आहे, तर सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम राजेंदर गोयल (६४०) यांच्या नावावर आहे. गेल्या वर्षी सौराष्ट्र संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. सध्या एकूण ३८ संघ या स्पर्धेत सहभागी होतात.
दुलिप ट्रॉफी : दुलिप करंडक ही भारतात खेळली जाणारी प्रथम श्रेणी दर्जाची क्रिकेट स्पर्धा आहे. कुमार श्री. दुलिपसिंहजी यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला दुलिप करंडक असं नाव देण्यात आलं आहे. सर रणजितसिंहजी विभाजी जडेजा हे दुलिपसिंहजी यांचे काका. आपल्या काकांप्रमाणेच दुलिपसिंह यांनी कौंटी आणि कसोटी अशा दोन्ही पातळ्यांवर उल्लेखनीय कामगिरी केलेली होती. त्यांच्या फलंदाजीचं कौतुक त्या वेळी दिग्गज क्रिकेटर्सनीही केलं होतं.
दुलिप ट्रॉफी या स्पर्धेचा ढाचा हा रणजी स्पर्धेपेक्षा वेगळा आहे. रणजी स्पर्धेत प्रत्येक राज्याचे अथवा शहरांचे संघ असतात, तर दुलिप करंडक स्पर्धेत नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट, सेन्ट्रल आणि नॉर्थ-ईस्ट असे झोन केलेले असतात. हे झोन्सचे संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळतात. दुलिप ट्रॉफी स्पर्धेला १९६१-६२ मध्ये सुरुवात झाली होती.
या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात पश्चिम विभागाने दक्षिण विभागावर १० गडी राखून मात करत स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आजवर सातत्याने या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. आतापर्यंत पश्चिम विभागाने सर्वाधिक वेळा हा करंडक जिंकला आहे. या स्पर्धेतही सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वसीम जाफरच्या (२५४५) नावावर आहे, तर नरेंद्र हिरवाणीने (१२६) या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतले आहेत.
इराणी ट्रॉफी : ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयोजित केलेली प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा प्रत्येक वर्षीच्या रणजी करंडक विजेता संघ व शेष भारतीय संघात खेळली जाते. शेष भारतीय संघात विविध राज्यांच्या रणजी संघातील खेळाडूंचा समावेश होतो.
रणजी ट्रॉफी चॅम्पियनशिपला २५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १९५९-६० च्या हंगामात या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती आणि बीसीसीआयचे दिवंगत अध्यक्ष झाल आर. इराणी यांच्या नावावर या स्पर्धेचं नाव ठेवण्यात आलं होतं. या स्पर्धेतही सर्वाधिक धावांचा विक्रम वसीम जाफरच्या (१२९४) नावावर आहे, तर पद्माकर शिवलकर यांनी सर्वाधिक (५१) बळी घेतले आहेत.
मोहम्मद निसार ट्रॉफी : २००६ मध्ये सुरुवात झालेली ही चार दिवसांची स्पर्धा दरवर्षी सप्टेंबरमध्ये खेळवली जात असे. भारतातील रणजी चषक विजेता संघ व पाकिस्तानातील कायद-ए-आझम ट्रॉफी विजेत्यांमध्ये ही स्पर्धा खेळवली जात असे. या स्पर्धेस भारतीय क्रिकेट खेळाडू मोहम्मद निसार यांचं नाव दिलेलं होतं.
या स्पर्धेत उत्तर प्रदेशने धर्मशाला इथं पाकिस्तानच्या सियालकोटचा पराभव करून पहिल्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं, तर मुंबईने पुढील हंगामात कराचीमध्ये कराची अर्बनचा पराभव केला आणि पहिल्या डावातील आघाडीवर आधारित ट्रॉफी पुन्हा भारताला मिळवून दिली.
२००८ मध्ये सामना अनिर्णीत राहिल्यानंतर सुई नॉर्दर्न गॅस पाइपलाइन्स लिमिटेडने दिल्लीवर पहिल्या डावातील आघाडीवर मात केली आणि ट्रॉफी जिंकणारा पहिला पाकिस्तानी संघ बनला. भारतावर पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानशी क्रिकेट संबंध तोडल्यावर ही स्पर्धा बंद झाली.
विजय हजारे ट्रॉफी : ही मर्यादित षटकांची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आहे. विसाव्या शतकातील महान भारतीय क्रिकेटपटू विजय हजारे यांच्या नावावरून तिचं नाव देण्यात आलं होतं. रणजी ट्रॉफीमधील संघांचा यात समावेश होतो.
बीसीसीआयने २००२-०३ मध्ये ही स्पर्धा सुरू केली. त्यापूर्वी १९९३-९४ ते २००१-०२ च्या हंगामापर्यंत नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट आणि सेंट्रल विभागांचे संघ हे राउंड रॉबिन पद्धतीने सामने खेळत असत. त्यातून प्रत्येक विभागातून एक संघ विजेता होत असे; पण त्या विजेत्या संघांमध्ये कोणतीही अंतिम फेरी आयोजित केली जात नसे आणि त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर कोणताच एक संघ विजेता होत नसे.
पण, २००२-०३ पासून प्रत्येक विभागातील अव्वल संघांमध्ये सामने खेळवले जाऊन एक विजेता संघ निवडला जाऊ लागला. गेल्या वर्षी एकूण ३८ संघ यात सहभागी झाले होते. त्यांना ए, बी, सी, डी आणि ई अशा पाच गटांत विभागलं गेलं होतं. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या संघाला पराभूत करून सौराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावलं होतं. आजपर्यंत तमिळनाडू संघाने सर्वाधिक पाच वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
देवधर करंडक : भारतीय क्रिकेटचे महर्षी म्हणून ओळखले जाणारे देवधर आक्रमक फलंदाजी करायचे. देवधर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने १९३९-४० च्या मोसमात पहिल्यांदाच रणजी करंडक विजेतेपद पटकावलं होतं. देवधर हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य होते.
भारतात १९७३ पासून त्यांच्या नावाने देवधर करंडक ही मर्यादित षटकांची आंतरविभागीय स्पर्धा आयोजित केली जाऊ लागली. पुढे या स्पर्धेचं स्वरूप बदलून २०१५-१६ ते २०१७-१८ या काळात विजय हजारे ट्रॉफीचे विजेते, भारत अ आणि भारत ब हे संघ राउंड-रॉबिन स्वरूपात एकमेकांशी खेळायचे. त्यातील अव्वल दोन संघ अंतिम सामना खेळायचे.
२०१८-१९ पासून भारत अ, भारत ब आणि भारत क हे तीन संघ राउंड-रॉबिन स्वरूपात एकमेकांशी खेळतात. त्यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतात. गेल्या वेळी भारत ब (इंडिया बी) संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं.
विमेन्स सीनियर वन डे ट्रॉफी : भारतातील महिला क्रिकेट आज सुवर्णकाळातून जात आहे; पण महिला क्रिकेटने या टप्प्यावर पोहोचण्यासाठी खूप खडतर काळातून प्रवास केला आहे. देशांतर्गत महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी २००६-०७ पासून भारतात या स्पर्धेचं आयोजन केलं जाऊ लागलं. सुरुवातीला २४ संघ यात सहभागी व्हायचे.
गेल्या हंगामात ३७ संघ यात सहभागी झाले होते. या स्पर्धेत सुरुवातीपासूनच रेल्वेज या संघाचा दबदबा राहिला आहे. त्यांनी एकूण १६ पैकी तब्बल १४ वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आजवर मिताली राज, पूनम यादव, पूनम राऊत, स्नेह राणा, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंघसारखे अनेक गुणी खेळाडू या संघातून भारताला मिळाले आहेत.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : ही दरवर्षी भारतामध्ये बीसीसीआयद्वारे आयोजित केली जाणारी देशांतर्गत टी-२० स्पर्धा आहे. पूर्व भारतीय खेळाडू सय्यद मुश्ताक अली यांच्या नावावरून या स्पर्धेला नाव देण्यात आलं होतं. रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळणारे संघ या स्पर्धेत सहभागी होतात. २००६-०७ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचं पहिलं अजिंक्यपद दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली तमिळनाडू या संघाने पटकावलं. गेल्या वर्षी मुंबई संघाने ही स्पर्धा जिंकली होती. आजवर तमिळनाडू या संघाने सर्वाधिक तीन वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
विमेन्स सीनियर टी-२० ट्रॉफी : भारतामध्ये दरवर्षी महिलांसाठी या देशांतर्गत टी-२० स्पर्धेचं आयोजन २००८-०९ पासून बीसीसीआयद्वारे केलं जातं. सुरुवातीला २८ संघांनी यात सहभाग घेतला होता. गेल्या हंगामात ३७ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेतही सुरुवातीपासूनच रेल्वेज या संघाचाच दबदबा राहिला आहे. त्यांनी एकूण १३ पैकी तब्बल ११ वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
आपल्याला भारतीय क्रिकेट म्हटलं की फक्त विराट, रोहित, राहुल, सूर्या, जडेजा, आश्विन, गिल इ. हेच आंतरराष्ट्रीय खेळाडू डोळ्यांसमोर येतात. पण, भारतात क्रिकेटचं विशाल जाळं पसरलं आहे. यात अनेक संघर्षाच्या कहाण्या आहेत, अनेक खेळाडूंचे थक्क करणारे प्रेरणादायी प्रवास आहेत. पण बऱ्याचदा गल्ली, क्लब, डिस्ट्रिक्टपासून सुरू झालेला एखाद्या गुणी खेळाडूचा प्रवास हा प्रथम श्रेणी किंवा लिस्ट-ए-क्रिकेटपर्यंत येऊन स्थिरावतो.
कारण १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात फक्त ११ लोकच भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करू शकतात. रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या राजेंदर गोयल (६४०) यांना आयुष्यात कधीच भारतीय संघात स्थान मिळत नाही. त्यामुळे ही स्पर्धा किती कठीण व भयंकर आहे याचा अंदाज येऊ शकतो.
(लेखक क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक असून, एका माध्यमसंस्थेचे संचालक आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.