Remains of a monastery at Nalanda sakal
सप्तरंग

मध्ययुगीन भारत आणि इंडोनेशिया

गेल्या काही लेखांतून आपण कम्बोडिया, इंडोनेशिया इत्यादी देशांतून भारतीय संस्कृती ही मंदिरं, विहार, मूर्ती, शिलालेख यांतून कशा प्रकारे दिसून येते ते बघितलं.

सकाळ वृत्तसेवा

गेल्या काही लेखांतून आपण कम्बोडिया, इंडोनेशिया इत्यादी देशांतून भारतीय संस्कृती ही मंदिरं, विहार, मूर्ती, शिलालेख यांतून कशा प्रकारे दिसून येते ते बघितलं.

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

गेल्या काही लेखांतून आपण कम्बोडिया, इंडोनेशिया इत्यादी देशांतून भारतीय संस्कृती ही मंदिरं, विहार, मूर्ती, शिलालेख यांतून कशा प्रकारे दिसून येते ते बघितलं. आता, इंडोनेशियातील राजे आणि भारतीय राजे यांच्यात कशा प्रकारे राजनैतिक संबंध होते, हे या लेखातून पाहणार आहोत.

श्रीविजयसाम्राज्य

इंडोनेशियातील श्रीविजयसाम्राज्य इसवीसनाचं सातवं शतक ते इसवीसनाचं बारावं शतक या काळात अस्तित्वात होतं. या राज्याचा विस्तार सुमात्रा बेटाच्या पलीकडे मलेशिया आणि थायलंड या देशांच्या काही भागांत झाला होता. इंडोनेशियाच्या संदर्भात काही शिलालेखांत, तसंच ताम्रपटांत येणारं ‘सुवर्णद्वीप’ हे नाव सुमात्रा या बेटासाठी वापरलं असावं, तर शिलालेखांतील ‘यवभूमी’ हा उल्लेख जावा बेटाचा असावा, असं या प्रदेशाच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचं मत आहे.

नालंदा इथला पुरावा

इसवीसनाच्या नवव्या शतकात (आजपासून अकराशे वर्षांपूर्वी) भारतातील सध्याच्या बिहार, बंगाल या राज्यांच्या प्रदेशात पाल घराण्यातील देवपाल नावाचा राजा राज्य करत होता. याच काळात इंडोनेशियातील श्रीविजयसाम्राज्यात बालपुत्रदेव नावाचा राजा राज्य करत होता.

या बालपुत्रदेव राजानं इंडोनेशियातून आपला दूत पाठवून सध्याच्या बिहारमधील नालंदा इथं एक विहार बांधून घेतला होता. विहार म्हणजे बौद्ध भिक्षूंची निवासाची इमारत. त्या वेळी नालंदा हे गाव पाल घराण्याच्या राज्यात येत होतं. बालपुत्रदेवानं पाल घराण्यातील देवपाल राजाला या नवीन बांधलेल्या विहाराच्या देखभालीसाठी पाच गावं दान देण्याची विनंती केली होती. श्रीविजयसाम्राज्याच्या राजाच्या विनंतीला मान देऊन देवपाल राजानं पूर्व भारतातील पाच गावांचं दान या विहाराला दिलं होतं. नालंदा इथं सापडलेल्या एका ताम्रपटावरील लेखातून, म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेल्या दानलेखातून, ही माहिती आपल्याला समजते.

यावरून अकराशे वर्षांपूर्वी इंडोनेशियातील राजे आणि पूर्व भारतातील राजे यांच्यातील राजनैतिक संबंधांवर प्रकाश पडतो, तसंच त्या वेळी बिहारमधील नालंदा महाविहाराची इंडोनेशियापर्यंत असलेली प्रसिद्धीही लक्षात येते. अर्थातच भारत आणि आग्नेय आशियातील वेगवेगळ्या राज्यांत सुरू असलेल्या व्यापारामुळेच हा संपर्क येत होता.

चोल राजे आणि श्रीविजयसाम्राज्य

इसवीसनाच्या नवव्या शतकापासून दक्षिण भारतात चोल घराण्याचं प्राबल्य वाढू लागलं होतं. सुरुवातीला सध्याच्या तामिळनाडू राज्याच्या प्रदेशात राज्य असणाऱ्या चोल राजांनी दक्षिण भारतात आपला राज्यविस्तार केला. राजराजा (पहिला), राजेंद्र आणि राजाधिराज या तीन चोल राजांच्या राज्यकाळात त्यांनी दक्षिण भारतातील आपलं राज्य बळकट केलं.

इसवीसनाच्या अकराव्या शतकात, म्हणजे आजपासून नऊशे वर्षांपूर्वी, आशियातील समुद्रमार्गानं होणाऱ्या व्यापाराची उलाढाल वाढू लागली होती. त्या काळातील चिनी सम्राटाचं बदललेलंं आर्थिक धोरण, इंडोनेशियातील श्रीविजयसाम्राज्यानं मलेशिया आणि इंडोनेशिया या भागांतील सामुद्रधुनीतून होणाऱ्या व्यापारावर मिळवलेलं नियंत्रण आणि दक्षिण भारतातील चोल घराण्याच्या राजांची बळकट झालेली सत्ता यामुळे हा समुद्रमार्गानं चालणारा व्यापार वाढीस लागला होता.

एकीकडे इराण, पश्चिम आशियातील राज्ये आणि दुसरीकडे चिनी साम्राज्य यांच्यात होणारा हा व्यापार महत्त्वाचा होता. इराणहून चीनकडे जाणारी आणि चीनकडून इराणकडे जाणारी जहाजं चोलांच्या आणि श्रीविजयसाम्राज्याच्या हद्दीतील बंदरांतून जात असत. या जहाजांतील मालावर आपापल्या बंदरांत कर आकारून; शिवाय इराण, तसंच चीनच्या बाजारपेठेत मागणी असणारा स्थानिक माल पाठवून भारतीय आणि इंडोनेशियातील राजे मोठ्या प्रमाणात महसूल मिळवत होते.

राजराजा चोल

दक्षिण भारतातील राजराजा (पहिला) या चोल राजानं श्रीलंकेच्या उत्तर भागात, तसेच मालदीवपर्यंत आपलं राज्य वाढवलं. नऊशे वर्षांपूर्वी राजराजाच्या काळात चोलांचे श्रीविजयसाम्राज्यातील राजांशी चांगले व्यापारीसंबंध आणि राजनैतिक संबंध होते. त्यामुळे खुद्द राजराजा चोलानं श्रीविजयसाम्राज्यावर नाविक हल्ले केले होते का याबद्दल अभ्यासकांत एकमत नाही.

राजराजा चोल याच्या राज्यकाळात इंडोनेशियातील श्रीविजयसाम्राज्याचा राजा मारविजयोत्तुंगवर्मन यानं आपल्या वडिलांच्या स्मृतीसाठी ‘शैलेंद्र चुडामणिवर्म विहार’ नावाचा विहार बांधल्याचा उल्लेख शिलालेखांतून मिळतो. विशेष म्हणजे, हा बौद्ध विहार मारविजयोत्तुंगवर्मन राजानं इंडोनेशियात नव्हे तर, दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये बांधला होता.

याशिवाय, तामिळनाडू राज्यातील नागपट्टिनम् या गावी असलेल्या कायारोहणस्वामी-मंदिरात असलेल्या अंदाजे इसवीसन १००६ मध्ये लिहिलेल्या एका शिलालेखात श्रीविजयसाम्राज्याच्या राजाच्या प्रतिनिधीनं दिलेलं दान नमूद केलेलं आहे.

राजेंद्र चोल

राजराजा चोल याच्यानंतर इसवीसन १०१४ मध्ये राज्यावर आलेल्या राजेंद्र या चोल राजानं भारतात बिहारच्या आणि बंगालच्या प्रदेशात आपलं राज्य वाढवलं, तसंच त्यानं आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सध्याची अंदमान, निकोबार, लक्षद्वीप इत्यादी बेटं ताब्यात घेतली. चीनपर्यंतच्या संपूर्ण समुद्रीमार्गावर, म्हणजे इंडोनेशियाच्या पलीकडे सध्याच्या दक्षिण चिनी समुद्रातील व्यापारावरदेखील, आपला ताबा असावा, याकरता त्यानं श्रीविजयसाम्राज्यावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानं इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील आणि मलेशियाच्या प्रदेशातील श्रीविजयसाम्राज्याच्या नगरांवर आणि बंदरांवर हल्ले करण्यास सुरुवात केली.

आजपासून हजार वर्षांपूर्वी अंदाजे इसवीसन १०१७ आणि इसवीसन १०२५ मध्ये राजेंद्र चोल राजानं इंडोनेशियात श्रीविजयसाम्राज्यावर हल्ले केले होते; परंतु त्यानं इंडोनेशियात आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला नाही. राज्यविस्तारापेक्षा चोलांचा मुख्य उद्देश चीनपर्यंतचा सागरी व्यापारीमार्ग ताब्यात घेण्याचा होता. याबद्दल आपण पुढील एका लेखात थोडंं विस्तारानं बघणार आहोत. चोलांच्या या हल्ल्यांमुळे मात्र इंडोनेशियातील श्रीविजयसाम्राज्य खिळखिळं झालं आणि त्यानंतर जेमतेम शंभर वर्षं अस्तित्वात राहिलं. हळूहळू इंडोनेशियातील मजपहित नावाच्या राज्याच्या राजांनी श्रीविजयसाम्राज्याचा प्रदेश काबीज केला.

भारतातील पाल आणि चोल घराण्यातील राजांचे श्रीविजयसाम्राज्याच्या राजांशी राजनैतिक संबंध होते. हजार वर्षांपूर्वी तामिळनाडूतील चोल राजे दक्षिण आशियातील बेटांवर आपली सत्ता प्रस्थापित करतात...सध्याच्या इंडोनेशिया, मलेशिया या देशांपर्यंत आपलं आरमार घेऊन जाऊन तिथं हल्ले करतात... आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे त्या काळातील भारतीय संस्कृती आग्नेय आशियातील अनेक राज्यांमध्ये पोहोचते...या सर्व मुद्द्यांना असणारे अनेक पैलू एका लेखात मांडता येणार नाहीत. त्या काळातील केवळ काही घटनांची ओळख करून घेण्याचा आपण प्रयत्न केला.

या चोल राजांच्या काळात भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही ठिकाणी वास्तव्य केलेल्या एका व्यक्तीबद्दल आपण पुढील लेखात जाणून घेऊ या.

(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT