शत्रू Sakal
सप्तरंग

संस्कृत सुभाषिते : क्रोधो हि शत्रुः प्रथमो

क्रोध, राग हा माणसाचा सर्वात पहिला आणि मुख्य शत्रू आहे. ज्याप्रमाणे लाकडामध्ये असलेला अग्नी ते लाकूडच जाळून टाकतो त्याप्रमाणे हा क्रोध ज्या देहात राहतो त्याचाच नाश करतो. बाह्य शत्रूंपेक्षा आपल्याच अंतरातले शत्रू जास्त धोकादायक, हानिकारक असतात.

सकाळ वृत्तसेवा

- मंजिरी धामणकर

क्रोधो हि शत्रुः प्रथमो

नराणां देहस्थितो देहविनाशनाय।

यथा स्थितः काष्ठगतो हि वन्हिः

स एव वन्हिर्दहते शरीरम्।।

अनुवाद : क्रोधचि शत्रू प्रथम नराचा

देही राहुन विनाशकारी

जसा अग्नि काष्ठातिल तेची

काष्ठ जाळुनी राख करी

अर्थ : क्रोध, राग हा माणसाचा सर्वात पहिला आणि मुख्य शत्रू आहे. ज्याप्रमाणे लाकडामध्ये असलेला अग्नी ते लाकूडच जाळून टाकतो त्याप्रमाणे हा क्रोध ज्या देहात राहतो त्याचाच नाश करतो. बाह्य शत्रूंपेक्षा आपल्याच अंतरातले शत्रू जास्त धोकादायक, हानिकारक असतात. बाहेरच्या शत्रूंचा नायनाट करणं एकवेळ सोपं असेल; पण आतल्या शत्रूचं उच्चाटन करणं कर्मकठीण. संत तुकाराममहाराजसुद्धा जेव्हा म्हणतात ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग’ तेव्हा त्यांना अंतःशत्रूच अपेक्षित आहेत.

उपेक्षितः क्षीणबलोऽपि

शत्रुः प्रमाददोषात्पुरुषैर्मदान्धैः ।

साध्योऽपि भूत्वा प्रथमं

ततोऽसावसाध्यतां व्याधिरिव प्रयाति।।

अनुवाद : दुर्बल समजुनि शत्रू

उपेक्षा गर्वे करणे प्रमाद तो

दुर्बल समजुनि रोग

उपेक्षा करण्याने तो बळावतो

अर्थ : शरीरात असणारा एखादा रोग क्षुल्लक समजून त्याच्याकडं दुर्लक्ष केलं तर तो रोग जसा बळावतो, त्याचप्रमाणे अहंकारानं धुंद होऊन, शत्रूला दुर्बळ समजून त्याची उपेक्षा केली तर, त्याच्याकडं दुर्लक्ष केलं तर तो शत्रूदेखील बळावतो आणि आपलाच नाश करतो. म्हणून सुभाषितकार म्हणतो की, शत्रूला कमकुवत समजून दुर्लक्ष करणं ही मोठी चूक आहे. याच अर्थाचं हे पुढचं सुभाषित -

उत्तिष्ठामानस्तु परो

नोपेक्ष्यः पथ्यमिच्छता।

समौ हि शिष्टैराम्नातौ

वर्स्त्यन्तावामयः स च।।

अनुवाद : बळावणारा रोग नि शत्रू

समान दोन्ही म्हणति जाणते

आरोग्य नि कल्याण हवे जर,

ना कधि दुर्लक्षावे त्यांते

अर्थ : ज्याला आरोग्य आणि कल्याण हवं असेल, त्यानं प्रबळ होणारा शत्रू आणि वाढणारा रोग यांची उपेक्षा करून त्यांच्याकडं कधीही दुर्लक्ष करू नये. जाणत्या लोकांनी रोग आणि शत्रू यांना सारखंच (हानिकारक) मानलं आहे.

शत्रूमुन्मूलयेत्प्राज्ञस्तीक्ष्णं

तीक्ष्णेन शत्रुणा।

व्यथाकरं सुखार्थाय

कण्टकेनैव कण्टकम्।।

अनुवाद : प्रबळ शत्रु शहाण्याने,

दुसऱ्या तशाच शत्रूने उखडावा

दूर कराया पीडा,

जैसा काट्याने काटा काढावा

अर्थ : शहाण्या माणसानं प्रबळ शत्रूला दुसऱ्या तशाच बलवान शत्रूकडून उखडून टाकावं. वेदना दूर करण्यासाठी पायात रुतलेला तीक्ष्ण काटा दुसऱ्या तितक्याच तीक्ष्ण काट्यानं काढावा. पहिल्या सुभाषितात क्रोधाला ‘पहिला शत्रू’ असं का म्हटलं आहे तर -

क्रोधो मूलमनर्थानां

क्रोधः संसारबन्धनम् ।

धर्मक्षयकरः क्रोधस्तस्मात्

क्रोधं विवर्जयेत् ।।

अनुवाद : क्रोध अनर्थाचे कारण,

संसारी बंधन क्रोधचि तो

धर्मवृत्तीला क्षीण करितसे

म्हणुनी वर्ज्य करावा तो

अर्थ : क्रोध म्हणजे सर्व अनार्थांचं मूळ. क्रोधामुळं मनुष्य संसारबंधनात अडकतो (संसार म्हणजे जन्म-मृत्यूचा फेरा). क्रोधामुळं आपल्या धर्माचा, म्हणजेच कर्तव्याचा, विसर पडतो म्हणून क्रोध टाळावा. चौथ्या सुभाषितात म्हटल्यानुसार, क्रोध हा शत्रुरूपी काटा कोणत्या काट्यानं काढावा? तर -

आपदां कथितं पन्थाः

इन्द्रियाणां असंयमम्।

तद्जयः संपदां मार्गः

येनेष्टं तेन गम्यताम्।। (चाणक्यनीती)

अनुवाद : ना आवरणे इंद्रियांसि

हा मार्ग असे आपत्तीचा

विजय मिळविणे परी

त्यांवरी मार्ग असे संपत्तीचा

अर्थ : इंद्रियांवर संयम न ठेवणं म्हणजे संकटाच्या, आपत्तीच्या दिशेनं जाणं आणि त्यांवर विजय मिळवणं हा (दैवी) संपत्तीचा मार्ग. तुम्हाला जो मार्ग इष्ट वाटेल त्या मार्गानं तुम्ही जावं असं आर्य चाणक्य सांगतात. गीतेत म्हटल्यानुसार, इंद्रिये विषयांकडं ओढ घेतात. विषयसुख मिळालं नाही की क्रोध निर्माण होतो.

(सङ्गात् सञ्जायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते). त्यामुळे इंद्रियांवर विजय मिळवणं म्हणजेच क्रोधावर विजय मिळवणं. म्हणून, इंद्रियविजयाच्या काट्यानं क्रोधाचा काटा काढता येतो. अशी अर्थगर्भ सुभाषितं रचणाऱ्या सुभाषितकारांना विनोदही वर्ज्य नाही. काही गमतीशीर सुभाषितं बघू या पुढच्या भागात.

(लेखिका ह्या भाषांतरकार, भाषाप्रशिक्षक, निवेदिका, तसंच एकपात्री कलावंत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT