दीनदयाळजींच्या पुण्यतिथीनिमित्त ११ फेब्रुवारीच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दीनदयाळ यांचे एकात्म मानवतावादाचे तत्त्वज्ञान ही कल्पना फक्त मानवासाठी होती. म्हणूनच, जिथे जिथे मानवतेच्या सेवेचा प्रश्न असेल, मानवतेच्या हिताची बाब असेल, त्या ठिकाणी दीनदयाळजींचे एकात्म मानवतावादाचे तत्त्वज्ञान आजही उपयोगी पडत आहे, यात शंका नाही. दीनदयाळजी यांना आपल्या विचारांच्या माध्यमातून देशाची अर्थात समाजाची पुनर्बांधणी करायची होती. भारताकडे भारतीयतेच्या दृष्टिकोनातून पाहत असताना आपल्या सर्व व्यवस्थांचे भारतीयीकरण व्हावे हे त्यांचे उद्दिष्ट होते.
डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली तेव्हा ध्येय खूप मोठे होते, परंतु तिथं साधनसामग्री आणि कार्यकर्त्यांचा अभाव होता. त्यांच्या संकल्पना खूपच चांगल्या होत्या आणि देशाच्या पुनर्बांधणीचा संकल्प ठाम होता. व्यक्तीचे शरीर, मन आणि आत्मा विकसित व्हावा हा विचार दीनदयाळजींच्या चिंतनातून व्यक्त होत होता. मानवाची (व्यक्तिची) सर्व भूक भागविण्याची एक व्यवस्था आहे. परंतु हे लक्षात ठेवले गेले होते की, एका भुकेला मिटवण्याच्या प्रयत्नात, दुसरी उपासमार निर्माण करू नका आणि भूक भागविणारे दुसरे मार्ग थांबवू नका, असे त्यांचे सांगणे होते.
आज आपण जनसंघाच्या स्थापनेपासूनचा (२१ ऑक्टोबर १९५१) वैचारिक प्रवास पाहत आहोत आणि दीनदयाळजींच्या विचारांचा मागोवा घेण्याचा घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला देश आज ज्या ध्येय धोरणांवर मार्गक्रमण करत आहे, जी आव्हाने देशासमोर आहेत, त्यांची नोंद घेतली तर असे लक्षात येते की, स्वातंत्र्यानंतरच दीनदयाळजींनी त्याला ठळकपणे अधोरेखित केले होते, हे स्पष्ट दिसत आहे. परंतु त्यावेळी सरकारने नवनिर्मितीवर ठाम मत ठेवून भारताची मूलभूत व्यवस्था बळकट करण्याचे काम केले नाही. दीनदयाळजींनी सर्वसामान्यांच्या सबलीकरणावर (आत्मनिर्भयतेवर) जोर दिला, कोणीही व्यक्ती कोणावर अवलंबून राहू नये, हा त्यामागचा उद्देश होता. सामाजिक जीवनातील मागासलेपणा दूर व्हावा, अशी तीव्र भावना त्यांच्या मनात खोलवर रुजली होती. त्यांनी मनापासून दारिद्रनारायणांची सेवा केली. समाजाच्या शेवटच्या रांगेत उभी असलेली व्यक्ती पूर्णपणे विकसित होत नाही, तोपर्यंत राष्ट्राची पुनर्बांधणी करण्याचे स्वप्न अपूर्ण आहे, असा त्यांचा दृढ विश्वास होता. २०१४ पासून केंद्रात असलेले नरेंद्र मोदी यांचे सरकार अंत्योदयच्या मंत्रावर वेगाने पुढे जात असून समाजाच्या शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीचे जीवनमान बदलण्यासाठी धोरणे आखली जात आहेत, ही बाब आज आनंददायी आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
समाजातील सर्वांत खालच्या स्तरातील घटक मग ती पंचायत असो किंवा समाजातील शेवटच्या व्यक्ती असो त्याला सक्षम बनवायचे आहे, या दिशेने मोदी सरकार अभूतपूर्व काम करत आहे. परिणामी, देशाचा मूलभूत पाया आणखी मजबूत झाला आहे. खरंतर देशाच्या स्वातंत्र्यानंतरच हे काम सुरू व्हायला हवे होते. दुर्दैवाने कॉंग्रेसच्या धोरणांनुसार चालणारी सरकारं गरिबी हटावच्या घोषणा करत राहिली परंतु ती हटविण्याच्या दिशेने त्यांच्या सरकारने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत, गरिबी हटावच्या फक्त घोषणाच दिल्या. २०१४ नंतर देशात एक वेगळे वातावरण तयार झाले.
सरकार सातत्याने काळानुसार सुधारणा करीत आहे, ज्यामुळे समाजाच्या शेवटच्या स्तरावर असलेल्या व्यक्तीचे आयुष्य सोपे आणि सुलभ झाले आहे.
आपण पाहिले तर उज्ज्वला योजनेतून आतापर्यंत आठ कोटीहून अधिक महिलांना विनाशुल्क गॅस जोडणी दिली गेली आहे. या महिलांची धुरापासून मुक्तता केली आहे. गरिबांसाठी दोन कोटीहून अधिक घरे बांधली आहेत. दीनदयाळजींचा असा विश्वास होता की, सरकारने गरिबांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आज आयुष्मान भारत योजना या दिशेने सर्वांत प्रभावी योजना आहे. जन धन योजनेच्या माध्यमातून ४१ कोटी नागरिकांची बँक खाती उघडत आर्थिक प्रक्रियेतील त्यांचा सहभाग वाढवला आहे. सरकारने गरिबांबरोबर थेट संपर्क साधला आहे. या सर्व योजना दीनदयाळजींचे अंत्योदय स्वप्न साकार करत आहेत. गरिबांच्या सक्षमीकरणामुळेच देश प्रगती करू शकतो.
जनसंघाची स्थापना झाली तेव्हा सर्वांत मोठा संघर्ष विचारसरणीचा होता. भारताच्या भूतकाळात कॉंग्रेसला सर्व काही वाईट दिसत होते, ते नष्ट करण्याचा कॉंग्रेसचा हेतू होता आणि याउलट जनसंघाचे असे प्रभावी मत होते की, आपला भूतकाळ, सुवर्णकाळ आहे, तो सर्वोच्च होता, त्या आधारे देश विश्वगुरू झाला होता. काळाच्या ओघात त्यात उणिवा निर्माण झाल्या. जनसंघ त्यातील उणिवा अधोरेखित करून देशाच्या पुनर्बांधणीविषयी बोलत असे. भारतीय जनसंघ स्थापनेनंतर दीनदयाळजींनी भारतीय जनसंघ चालवण्याची कल्पनाच दिली नाही तर त्यासाठी कार्यपद्धती विकसित करण्यातही मोठे योगदान दिले. त्यांच्या व्यापक दृष्टीने समाजाला नवी दिशा मिळाली. दीनदयाळजींचे राजकारणाच्या उद्दिष्टांबाबत स्पष्ट मत होते की, एखाद्या राजकीय पक्षाचा हेतू केवळ निवडणुका जिंकणे नव्हे. समाज बदलण्याची जबाबदारीही त्याने घ्यायला हवी. हेच त्यांचे मूलभूत उद्दिष्ट होते.
राजसत्ता अर्थात सरकार समाजाला बदलण्यात अडथळा ठरत असेल तर ते सरकार बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जनसंघ केवळ कॉंग्रेसला विरोध करण्यासाठी नाही. त्याचे ध्येय व्यापक, मोठे आहे, हे त्यांनी सांगितले. दीनदयाळजी म्हणायचे की जनसंघ फक्त सत्तेसाठी नव्हे तर तत्त्वासाठी लढत आहे. भारत संपूर्ण जगात स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करेल असे ते म्हणत असत अर्थात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचेही तेच म्हणणे होते. आपल्या राष्ट्रीय महत्त्वाच्या आधारे, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने आपली ध्येय धोरण ठरवली पाहिजेत, जेणेकरून भारताच्या परराष्ट्र धोरणाला गती मिळू शकेल.
जागतिक स्तरावर आपल्याला असलेली ओळख ही केवळ आपल्या संस्कृतीमुळेच आहे, असे दीनदयाळजी मानत असत. आज आपण पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भारतीय संस्कृतीच्या जोरावर आपल्या हितसंबंधांना प्राधान्य देऊन जागतिक पातळीवर भारताबद्दलचा सन्मान, अभिमान वाढवत आहेत. योग ही भारताची संस्कृती आहे, त्याला जागतिक मान्यता मिळविणे हा याच प्रयत्नांचा सुखद परिणाम आहे. विशेष म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर वसाहतीवादी मानसिकतेची सावली अनेक दशके राहिली. दीनदयाळजी स्वातंत्र्यानंतर लवकरच या वसाहतवादापासून मुक्तीचा मार्ग सुचवत राहिले. त्यांनी वारंवार भारताच्या सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे पुढे जाण्याविषयी आग्रह धरला.
अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत चर्चिल सिगार सहाय्यकाची कथा सांगितली, हे वसाहतवादी विचारांचे एक रोचक उदाहरण आहे. तथापि, भारताच्या स्वातंत्र्यानंतरही ती मानसिकता, त्या व्यवस्थेने आपल्यावर आपले वर्चस्व ठेवले. भारताला समृद्धशाली बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या संकल्पना, सूत्राची आवश्यकता आहे, ते विचार, सूत्र पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आपल्या विचारांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्याचे कार्य केले. दीनदयाळजी भारताचे ऐक्य अबाधित ठेवण्याच्या बाजूने होते. दीनदयाळजी म्हणाले होते की, आपल्याला भारताचा आत्मा समजून घ्यायचा असेल तर तो सांस्कृतिक दृष्टिकोनातून पहावा लागेल, राजकारणाच्या किंवा अर्थशास्त्राच्या प्रिझममधून नव्हे. भारतीयतेची अभिव्यक्ती केवळ राजकारणाद्वारेच होणार नाही तर त्याच्या संस्कृतीतूनही होईल. या संदर्भात आज भारतीय दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. राष्ट्रसेवकाच्या भूमिकेतून त्यांची विधाने प्रेरणा देणारी आहेत. ते म्हणतात की आपल्याकडून देवाची खरी उपासना तेव्हाच होईल जेव्हा देशातील प्रत्येक मूल राष्ट्राची उपासना भारतीय म्हणून करेल. दीनदयाळजींचे असे अनेक सामाजिक विचार लाखो नागरिकांना प्रेरणा देत आहेत.
(सदराचे लेखक ‘डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशन’ चे संचालक आहेत. )
( अनुवाद : आशिष तागडे )
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.