Deccan College Pune sakal
सप्तरंग

देखणं, शैलीदार डेक्कन कॉलेज!

पुण्याचा उल्लेख ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ असा केला जातो. सांस्कृतिक क्षेत्रात वर्चस्व असणाऱ्या पुण्यातील ज्ञानदान करणाऱ्या संस्थांचा पसारा दिवसेंदिवस वाढतंच आहे.

सकाळ वृत्तसेवा

- अंजली कलमदानी, anjali.kalamdani10@gmail.com

पुण्याचा उल्लेख ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ असा केला जातो. सांस्कृतिक क्षेत्रात वर्चस्व असणाऱ्या पुण्यातील ज्ञानदान करणाऱ्या संस्थांचा पसारा दिवसेंदिवस वाढतंच आहे; पण, त्याबरोबरच जुन्या संस्थाही दिमाखात कार्यरत आहेत. अशा जुन्या संस्थांपैकी सगळ्यांत जुनी संस्था म्हणजे डेक्कन कॉलेज! किती जुनी? तर, तब्बल दोनशे वर्षं!

भारतातील तिसऱ्या क्रमांकाची जुनी संस्था येरवड्याच्या १०० एकराच्या शांत परिसरात आजही कार्यरत आहे. जुन्या इमारतींचा चेहरामोहरा ऑक्सफर्ड किंवा केंब्रिजमधल्या विद्यालयांच्या इमारतींशी मिळताजुळता आहे.

मराठा सरदार खंडेराव दाभाडे यांनी दक्षिणा फंडाच्या स्वरूपात सुरू केलेल्या, ‘शिक्षण’ एवढ्याच उद्देशाला पेशव्यांनी सहकार्य केलं. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या हस्ते ६ ऑक्टोबर १८२१ विजयादशमीच्या मुहूर्तावर हिंदू कॉलेजची स्थापना झाली. १८४२ मध्ये कॉलेजला इंग्रजी शाळेची जोड मिळाली.

सात जून १८५१ मध्ये इंग्रजी शाळा व हिंदू कॉलेज यांच्या एकत्रीकरणानं पूना कॉलेज उदयाला आलं. यातील विद्यालयांची सुरुवात मात्र, विश्रामबागवाड्यात झाली होती. वानवडी आणि नंतर सध्याच्या येरवड्याच्या जागेत कॉलेजचं स्थलांतर झालं. १५ ऑक्टोबर १८६४ ला जागेचं भूमिपूजन झालं. कॉलेजची व्याप्ती वाढली आणि नावही डेक्कन कॉलेज झालं.

निओगॉथिक शैलीत उभारलेल्या भव्य इमारतीच्या बांधणीसाठी दानशूर जमशेटजी जीजीभॉय यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली. तो काळ असा होता, की शिक्षणाचं महत्त्व वाढत चाललं होतं आणि त्याच्या पायाभरणीसाठी दानशूरांचे हातही लागत होते. २३ मार्च १८६८ मध्ये नव्या वास्तूतून कॉलेजमध्ये विद्यादान सुरू झालं. त्यानंतर उच्च शिक्षण आणि संशोधनात हे कॉलेज अव्वल दर्जाचं म्हणून गणलं जाऊ लागलं आणि इथं उच्चविद्याविभूषित असे एक-एक हिरे घडत गेले.

प्राच्यविद्या संशोधक सर आर. जी. भांडारकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, तत्त्वज्ञ गुरुदेव आर. डी. रानडे, समाजसुधारक जी. जी. आगरकर, इतिहासकार वि. के. राजवाडे, चीनमध्ये आरोग्यसुविधा देणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस, न. चिं. केळकर, संगीतकार विष्णू नारायण भातखंडे, सेनापती बापट, इरावती कर्वे, शिरीन रत्नाकर आणि कितीतरी...ही यादी वाढतच जाणारी आहे.

सुरुवातीच्या काळात डेक्कन कॉलेजमध्ये अध्यापन करणारे प्राध्यापक ब्रिटिश होते. गणित आणि इतिहास सोपे करून शिकवण्यासाठी त्याचं मराठीत भाषांतर करण्याच्या कामाचं श्रेय मेजर कँडी यांच्याकडे जातं. संस्कृत पाठशाला विश्रामबागवाड्यात सुरू झाली; तरी तिचा पसारा मात्र, डेक्कन कॉलेजमध्ये बराच वाढला. ही जागा अशी आहे, जिथं शिक्षण क्षेत्रात पाश्चिमात्य आणि पुण्याच्या स्थानिक पंडितांचा ज्ञानयोग समृद्ध होत गेला. डेक्कन कॉलेजच्या इमारतीच्या वरती मोठा टॉवर होता, तो आता नाही.

दगड-विटांमध्ये बांधलेल्या दुमजली मुख्य इमारतीची व्याप्ती ३५ हजार चौरस फूट इतकी आहे. मधला मजला लाकडी जॉइस्टच्यावर फरश्यांचं आच्छादन घालून बनवलेला आहे. खरंतर बऱ्याच तत्कालीन इमारतींमध्ये लोखंडी जॉइस्ट दिसून येतात; पण, इथं लाकडी जॉइस्ट वापरलेले आहेत आणि ते अजूनही मजबूत आहेत. छतासाठी लोखंडी व लाकडी ट्रसेसचा उपयोग केलेला आहे.

बाह्यभागातील खिडक्या व दरवाजांवर कास्ट, त्यावर कोरोगेटेड किंवा नाळीचे पत्रे यांचे छज्जे आहेत. ही रचना वैशिष्ट्यपूर्ण असून, ती करताना ब्रिटिशांच्या काळात ‘पावसापासून संरक्षण’ हा विचार केलेला दिसून येतो, जो इतर काही इमारतींमध्ये अभावानं आढळतो. इमारतींच्या संकल्पनेत व्हेनिसच्या ‘डोजेस् पॅलेस’च्या काही भागांचे तपशील साकारताना ‘ब्रिजेस ऑफ सायस्’ची प्रतिकृती साकारली आहे.

इंडोसारासायनिक कमानींचा प्रभावही आवर्जून साकारलेला दिसून येतो. इंडोसारासायनिक म्हणजे, स्थानिक आणि पाश्चिमात्य यांची सरमिसळ केलेले स्वरूप. इमारतींच्या कडेचे दगड फक्त घडीव स्वरूपात वापरून मध्यभागी दगडांच्या नैसर्गिक आकारातील रचना केली आहे. त्यामुळे इमारतीला वेगळाच उठावदारपणा येतो.

भक्कम दगडी इमारतीचे प्रशस्त व्हरांडे, झोकदार कमानी, दगडी खांब, त्यावरील पानाफुलांचे ब्रॅकेट्स अशा ऐटबाज इमारतीत शिक्षण घेताना शिक्षणाचाही भारदस्त ठसा विद्यार्थ्यांवर उमटला नाही तरच नवल! ही इमारत बांधताना तिच्या बारीकसारीक तपशिलांचा विचार जाणीवपूर्वकपणे केलेला दिसून येतो. चुना व दगडाबरोबरच कास्टआयर्न यांचा उपयोग करताना व्हिक्टोरियन काळातील रचनेचं गॉथिकपद्धतीनं झालेलं पुनरुज्जीवन दिसून येतं.

इंग्रजी ‘सी’ आकारातील लांबलचक इमारतीत ठरावीक अंतरावर उंच मनोऱ्याची जोड दिल्यामुळे व छताच्या उंचीमध्ये फरक केल्यामुळे इमारतीचं सौंदर्य वाढतं. इमारतीच्या आतल्या बाजूनं लांबलचक व्हरांड्याच्या मध्ये छोटी सज्जासारखी जागा तयार झालेली दिसून येते. इमारतीच्या आकारमानाचा प्रभाव पाहता, त्यात बोजडपणा कमी करण्यासाठी नाजूक कलाकुसरीच्या घटकांचा उपयोग विचारपूर्वक केला आहे.

छताच्या टोकाशी लाकडी फेशिया बोर्ड, छताच्या वरती कास्टआयर्नची नाजूक लेसवजा जाळी, दगडातील साकारलेल्या पानाफुलांच्या रचना, प्राण्यांच्या आकाराचं दगडाचं गारगॉइल, कमानींच्या आकारातील विविधता इमारतीच्या पूर्णतेत मोलाची भर घालतात. अध्ययनकक्षांची भव्यता ही अनुभवण्याची गोष्ट आहे. छतांना तीव्र स्वरूपाचे उतार आहेत.

खरंतर पुण्यात बर्फ पडत नाही किंवा कडाक्याची थंडीही नाही; पण, छताचे उतार पाश्चिमात्य इमारतींची प्रतिकृती दर्शवतात. बर्फाचं वजन छतावर न राहता, बर्फ सहज घसरून पडण्यासाठी तीव्र उतार असतात; पण, एखाद्या शैलीचं अवलंबन करताना ती पूर्णपणे अंगीकारणं, हा ब्रिटिश बाणा!

इमारत बांधली त्यावेळी आजूबाजूला अजिबात झाडं नव्हती. या वैराण जागेतून थोडासा विसावा मिळवण्यासाठी विद्यार्थी संध्याकाळी बंडगार्डन परिसरात जात असतं. १८७२-७३ मध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी झाडं लावण्यासाठी फंड उभा केला आणि त्यातून पुढं बागेची निर्मिती झाली. मुख्य इमारतीच्या सभोवतीच्या इमारतींत अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज्, भाषाशास्त्र इमारत, मुलांचं वसतिगृह आणि मराठा संग्रहालय या इमारती आहेत.

विद्यार्थी घडवताना, उच्च शिक्षण प्रदान करताना डेक्कन कॉलेजनं अनेक क्षेत्रांत संशोधन करून संस्थेला जागतिक दर्जा प्राप्त करून दिला आहे. डेक्कन कॉलेजनं अथक परिश्रमानं केलेलं विद्याज्ञान आणि संशोधन याची दखल मनुष्यबळ विकास मंत्रालयानं घेऊन भारत सरकारनं त्यांना ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’चा दर्जा ५ मार्च १९९० ला दिला. एवढ्या महत्त्वाच्या संस्थेची सगळ्यांत महत्त्वाची जागा म्हणजे प्रशस्त ग्रंथालय. हे ग्रंथालय मौल्यवान ग्रंथसंपदा, वाचनकक्ष, जुने ग्रंथ, संदर्भकक्ष यांनी परिपूर्ण आहे.

‘किमया’ वास्तुविशारदांनी इमारतींची पूर्ण रेखाचित्रं तयार केली आहेत. मुख्य इमारतीच्या मधल्या मनोऱ्याची गॅलरी वीज पडून मोडली होती आणि हा विभाग धोकादायक झाला होता. ‘किमया’नं पारंपरिक सामग्री व शैली वापरून गॅलरीचं जतन-संवर्धन करून ती पूर्ववत केली आहे. तसंच, मुलांच्या वसतिगृहाची डागडुजी केली आहे. लवकरच आवारातील कुलगुरुंच्या बंगल्याच्या जतन-संवर्धनाचं काम सुरू होत आहे.

बैठ्या, दणकट इमारतीकडे दुर्लक्ष होऊन त्याचा वापर फायलींचे गठ्ठे ठेवण्यासाठी होऊ लागला होता; पण, आता लवकरच इमारत कात टाकेल आणि कुलगुरू पुन्हा इथं येतील. इथं ‘हेरिटेज गॅलरी’ही तयार होत आहे. तसंच, इमारतीच्या आजूबाजूच्या बगीच्याचंही संवर्धन होणार आहे.

मुख्य इमारतीच्या पश्चिमेचा भाग पूर्वी वसतिगृहांसाठी वापरला जायचा. त्यावेळी लोकमान्य टिळक यातील एका खोलीत राहत होते. त्यांच्यातील व आगरकरांमधील तात्त्विक चर्चा, वादविवाद याच वास्तूत झाले. टिळकांना गणितातील अवघडातील अवघड प्रमेय सोडवण्याचा व्यासंगही इथंच जडला. तसंच जोर-बैठका काढून शरीर कमावण्याच्या प्रयोगही त्यांनी इथंच सिद्धीस नेला.

‘किमया’नं नियोजित मास्टरप्लॅन तयार करून त्यात अस्तित्वात असणाऱ्या इमारती व उर्वरित जागांचं नियोजन कसं असावं, हे दाखवलं आहे. शंभर एकर जागेपैकी इमारतीची व्याप्ती फक्त सात टक्के जागेतच आहे. इथं चाललेलं महत्त्वाचं संशोधन, ऐतिहासिक तसंच भाषेशी निगडित कार्यं यांची सर्वसामान्यांना माहिती व्हावी, या हेतूनं मोकळ्या जागेतलं संग्रहालय शहरवासीयांसाठी खुलं करण्याची संकल्पनाही मांडली आहे.

इथं एक शांतता नांदत असते. विद्येची देवाण-घेवाण करताना ती अंतरंगात झिरपण्यासाठी, आत्ममग्न होण्यासाठी इथला निसर्ग, वास्तू आणि त्यात सामावलेली शांतता यात साक्षात विद्यादेवी सरस्वतीचा वास असल्याची अनुभूती येते.

(लेखिका वास्तुविशारद व नगरविन्यासकार असून, जतन-संवर्धनक्षेत्रात कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT