tulshibaug rammandir sakal
सप्तरंग

तुळशीबाग राममंदिर

पुणे आणि तुळशीबाग यांचं काही अनामिक नातं आहे. विश्रामबागवाड्याच्या पूर्वेला काही पावलांवरच तुळशीबागवाले यांच्या राममंदिराचा परिसर आहे. दरवर्षी रामजन्माचा उत्सव मंदिरात होतो.

सकाळ वृत्तसेवा

पुणे आणि तुळशीबाग यांचं काही अनामिक नातं आहे. विश्रामबागवाड्याच्या पूर्वेला काही पावलांवरच तुळशीबागवाले यांच्या राममंदिराचा परिसर आहे. दरवर्षी रामजन्माचा उत्सव मंदिरात होतो.

- अंजली कलमदानी, anjali.kalamdani10@gmail.com

पुणे आणि तुळशीबाग यांचं काही अनामिक नातं आहे. विश्रामबागवाड्याच्या पूर्वेला काही पावलांवरच तुळशीबागवाले यांच्या राममंदिराचा परिसर आहे. दरवर्षी रामजन्माचा उत्सव मंदिरात होतो. एरवी माफक गर्दीचा हा परिसर रामजन्मोत्सवाच्या वेळी माणसांनी फुलून जातो. सन १७७८ मध्ये बांधलेलं हे पेशवेकालीन राममंदिर म्हणजे भव्य मंडप आणि कलाकुसरीनं परिपूर्ण असं सर्वात उंच शिखर लाभलेला वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

पेशव्यांचे प्रमुख नगररचनाकार नारो अप्पाजी खिरे तुळशीबागवाले यांनी या राममंदिराची उभारणी केली. कौलारू उतरत्या छताचं आणि अद्वितीय अशा कळसाचं राममंदिर हा तुळशीबागेचा आणि गावठाण परिसराचा केंद्रबिंदू आहे.

भरपूर रहदारी असलेल्या लक्ष्मी रस्त्यापासून जवळच असूनही मंदिराचा परिसर शांत आणि निर्मळ आहे. दुर्मिळ अशा मुचकुंद वृक्षाचं अस्तित्व हे या परिसराचं आगळंवेगळं वैशिष्ट्य.

नारो अप्पाजी यांचा जन्म साताऱ्याजवळील पाडळीचा. छत्रपती शाहूमहाराजांच्या दरबारी त्यांनी १७१९ ते १७३२ अशी सेवा केली. १७५० च्या सुमारास नानासाहेब पेशव्यांनी नारो अप्पाजींना पुण्याचं सुभेदारपद बहाल केलं. त्यानंतर निम्मं अठरावं शतक त्यांनी पुण्याचं सुभेदारपद सांभाळलं. राममंदिराचा उंबरा १७६३ मध्ये बांधला गेला, तर १७६५ मध्ये उमाजीबाबा पंढरपूर यांनी राम-सीता-लक्ष्मण यांच्या सुबक मूर्ती घडवल्या. सन १७६७ मध्ये मूर्तींची स्थापना झाली व छोट्या मंदिराचं काम टप्प्याटप्प्यानं १७९५ मध्ये सुमारे १,३६,६६७ रुपये खर्च करून झालं.

सन १७६३ मध्ये निजामानं पुण्यावर केलेल्या विध्वंसक हल्ल्यांमध्ये निजामाला पेशव्यांच्या वतीनं मोठी खंडणी देऊन नारो अप्पाजींनी पुणं वाचवलं. धार्मिक वृत्तीच्या नारो अप्पाजींनी लिंबेगावला कोटेश्वराचं मंदिर, वडूजला शकुंतेश्वरमंदिर, पाडळीला मारुतीमंदिर उभारलं.

सन १८१४ मध्ये तुळशीबाग राममंदिराच्या उत्तरेला त्यांनी दुमजली नगारखाना बांधला. ‘खरड्याच्या संग्रामात यश प्राप्त झाले तर तुझ्या दारात चौघडा सुरू करीन’ या सवाई माधवरावांनी दिलेल्या वचनाची पूर्तता झाली. भोर संस्थानचे राजे पंतसचिव यांनी १८५५ मध्ये राममंदिराच्या गाभाऱ्याला चांदीच्या मुलाम्याचा पितळी पत्रा चढवला. नंदरामजी नाईक यांनी १८८४ मध्ये - सध्या आपल्याला दिसतं त्या - भव्य शिखराची उभारणी तीस हजार रुपये खर्चून केली. सन १८९४ मध्ये राममंदिराच्या परिसरात दत्तमंदिर बांधण्यात आलं. ता. १९ नोव्हेंबर १९९८ रोजी मंदिरपरिसराची महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रांच्या वारसायादीत नोंद झाली आहे.

उत्कृष्ट सागवानी लाकूडकामातील मंडपावर नजर खिळून राहील अशी इथली कलाकुसर आहे. मंडपापासून नजर उंचावली तर मंदिराच्या प्रांगणातील इमारतीवर गेरूच्या रंगातील चितारलेली पुरातन चित्रंही दिसतात.

चुन्यामध्ये नक्षीदार, सुबक काम केलेल्या ७५ फूट उंचीच्या कळसावर ८० घडीव मूर्ती आहेत. पितळेच्या १८५ छोट्या कळसांनी परिपूर्ण असलेल्या शिखरावर निरनिराळ्या भागांत वीस वानरमूर्ती आहेत. मंदिरपरिसरात असलेली शेषशायी भगवानाची आगळीवेगळी मूर्ती, मारुतीचं व दत्ताचं सुबक, उठावदार मंदिर आणि सतीचं मंदिर हे इथल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेचे महत्त्वाचे भाग आहेत. एका कालखंडाचं प्रतिनिधित्व करणारं ऐश्वर्य मंदिराच्या रूपानं उभं आहे.

या मंदिराची काळानुरूप झीज झाली होती. त्यामुळे जतन-संवर्धनाची निकड ओळखून विश्वस्तांनी आणि कुटुंबीयांनी जीर्णोद्धार करायचं ठरवलं. मंदिरपरिसरातील दगडी फरशी झिजून तिचे सांधे व दगड ओबडधोबड झाले होते. ते सर्व टप्प्याटप्प्यानं बाजूला करून त्याखाली पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी वाहिन्यांची व्यवस्था झाल्यावर मूळ व नवीन दगड घडवून योग्य दरजांसह, उतारासह दगड पुन्हा बसवण्यात आले. इतर जुन्या वास्तूंप्रमाणेच मंदिराच्या सौंदर्यपूर्ण लाकूडकामावर तऱ्हेतऱ्हेचे रंग चढले होते. ते सर्व उतरवल्यावर मूळ एकसंध २५ फुटी भक्कम लाकडी खांब व त्याच्या कमानी मूळ रंगात झळकू लागल्या. रंगकाम उतरवत असताना (कै) बाबासाहेब तुळशीबागवाले यांनी लाकडी खांबाला पडलेली भेग दाखवल्यावर तीत अभियंता रवी रानडे यांनी खोचलेली टेप खोलवर जाऊ लागली.

प्रथमदर्शनी सुबक, डौलदार दिसणाऱ्या लाकडी खांबाचं तळाखालील दगडी बांधकाम उघडं केल्यावर लाकडी खांबांचे तळ वाळवीनं मोठ्या प्रमाणात खाल्लेले दिसून आले. गावठाण हे नदी किनाऱ्यापासून जवळ असल्यानं तिथल्या भूगर्भातील पाण्याची पातळी जास्त आहे. त्यामुळे वाळवीनं कुजलेला तळ मंडपाचा वरचा डोलारा सांभाळून बदलण्यासाठीची प्रक्रिया आव्हानात्मक होती. अस्तित्वातील खांब हे विशिष्ट जॅक लावून तोलून धरून व खालील बांधकाम नव्यानं पूर्ववत् करून, तसंच खांबाचा कुजलेला भाग काढून त्याखाली दगडी तळखडे घडवून सरकवायचे व त्यावर तोललेले खांब परत जागेवर ठेवायचे असं विचारान्ती ठरलं. हे काम जिकिरीचं, धाडसाचं व वेळखाऊ होतं; पण ते यशस्वीरीत्या राबवलं गेलं. दगडी तळखड्यांमुळे ३५ लाकडी खांब व मंडपही सुरक्षित झाला.

जतन-संवर्धनाच्या कामासाठी ठोस प्रमाणप्रणाली नाही. कल्पकता, अनुभव, अभियांत्रिकी सल्ला यांच्या जोरावर प्रयोगशीलता राबवावी लागते; तीसुद्धा जनतेच्या लेखी संवेदनशील असलेल्या वास्तूंबाबत. आज कुणी राममंदिरात गेलं तर मंडपामागची ही रंजक जतन-संवर्धनाची पुसटशी कल्पनाही संबंधितांना येणार नाही. त्यासाठी लवकरच एक माहितीपूर्ण दालन तयार करण्याची संकल्पना आहे. मंदिराचा कळस व मंडपाचं छत यांमध्ये बाहेरून कधीही न दिसणारी सपाट जागा आहे. तीमध्ये गाभाऱ्याकडे एक झरोका असून रामनवमीला श्रीरामांच्या पायाशी किरणोत्सव होतो. ही किमया पाहता, बांधकाम साकारणाऱ्या अनामिक कारागिरांचं कौतुक वाटतं.

मंडपाचं छत व खालून दिसणारं सौंदर्यपूर्ण नक्षीकामाचं छत यांच्या पोकळीमधून या भागात जाता येतं. छताच्या स्थैर्यासाठी जुनी खराब लाकडं बदलून जुना दणकट सांगाडा तसाच ठेवून छताची दुरुस्ती करण्यात आली. नंतर त्यावर दोन थरांतील एकमेकांत वैशिष्ट्यपूर्ण रीतीनं गुंफलेली अर्धकौलं - जी विशिष्ट कारागिरांकडून विशिष्ट मोसमात तयार करून घेण्यात आली आहेत - बसवण्यात आली. दर पावसाळ्यात त्यांच्यावर शेवाळ जमतं आणि त्याचं ते तसं रूप पारंपरिक आहे. मंदिराच्या आवारातील गणपतीमंदिर व शिवमंदिर यांचं जतन झालं; परंतु इतर मंदिरांचं काम बाकी आहे.

मंदिराच्या उत्तरेकडील भागाला चौसोपी म्हणतात. चौसोपीतून तळघराला जाणारा जिना आहे. जिन्यातून खाली गेल्यावर दोन खणांचं रुंद तळघर आहे. मुठा नदीच्या जवळील सर्व भागांमध्ये भूगर्भाखालील पाण्याची पातळी जास्त असून कात्रजकडून शनिवारवाड्याकडे येणाऱ्या इतिहासकालीन खापरी बंद जलवाहिन्यांच्या काही वाहिन्यांचे काही उच्छ्वास मंदिराजवळील भागांमध्ये आहेत. हे तळघर पावसाळ्यात वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीला सामावून घेण्यासाठी केलेलं असणार. पावसाळा ओसरला की इथल्या पाण्याची पातळी ओसरते. स्थापत्यशास्त्रातील ही एक मोठी सोय जाणीवपूर्वक केल्याचं दिसून येतं. मंदिराच्या मागं शेषशायी भगवानाचं छोटेखानी मंदिर जमिनीलगत होतं.

त्याची उंची वाढवून, आकारमान वाढवून दगडांमध्ये त्याची फेररचना करण्यात आली आहे. मंडपाला लाकडी नक्षीकाम असलेलं, नैसर्गिक रंगातील पाना-फुलांच्या रचनेचं सौंदर्यपूर्ण छत आहे. अनेक प्रयोगान्ती लवकरच अशा छताचं वैशिष्ट्यपूर्ण जतन-संवर्धन तज्ज्ञ कारागिरांकडून शास्त्रीयरीत्या केलं जाणार आहे. महत्त्वपूर्ण अशा शिखराचं संवर्धन सरतेशेवटी केलं जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT