Yamai devi sakal
सप्तरंग

साखरगडनिवासिनी यमाई देवी

घटस्थापनेला तेज आणि शक्तीचं लेणं ल्यायलेली आदिमाता निरनिराळ्या रूपात भक्तांना भेटायला येते. उत्साह, ऊर्जेचा स्त्रोत जागवत भक्तांना नवनिर्मिती करण्यासाठी नवसंजीवनीचा आशीर्वाद घेऊन येते.

सकाळ वृत्तसेवा

- अंजली कलमदानी, anjali.kalamdani10@gmail.com

घटस्थापनेला तेज आणि शक्तीचं लेणं ल्यायलेली आदिमाता निरनिराळ्या रूपात भक्तांना भेटायला येते. उत्साह, ऊर्जेचा स्त्रोत जागवत भक्तांना नवनिर्मिती करण्यासाठी नवसंजीवनीचा आशीर्वाद घेऊन येते. अशाच भक्तांना जोडणाऱ्या यमाई देवीचं जागृत देवस्थान आहे किन्हई गावातील डोंगरावर!

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात किन्हई नावाचं टुमदार गाव आहे. गावाच्या ईशान्येला साखरगड डोंगरावर रम्य परिसरात साखरगडनिवासिनी यमाई देवीचं मंदिर आहे. पावणेतीनशे वर्षं जुन्या असलेल्या मंदिराचं काळाच्या ओघात पुनरुज्जीवन करण्याची गरज निर्माण झाली.

डोंगरावर अहोरात्र वाहणारा वारा, ऊन, पाऊस यामुळे मंदिर व परिसरात झालेल्या पडझडीला जीर्णोद्धार आवश्यक होता. किन्हईकर कुलकर्णी भावंडांनी आपल्या कुलदेवतेसाठी शास्त्रशुद्ध जतन-संवर्धनाचा विडा उचलला. मूळ शैलीला धरून शास्त्रीयरीत्या केलेल्या जतन-संवर्धनाच्या कामाची दखल थेट ‘युनेस्को’नं घेऊन त्याला २०१४ चं ‘युनेस्को एशिया पॅसिफिक ॲवॉर्ड ऑफ मेरिट’ बहाल केलं.

आडगावात स्थानिक लोकांचं श्रद्धास्थान, स्थानिक दंतकथानी जागृत असलेलं आणि स्थानिक कलाकारांनी मूळ शैलीत उभारलेल्या मंदिराचं गतरूप मूळ सामग्री व शैलीचा मान राखून पूर्ववत केल्याची ही जागतिक पावती आहे. सध्या पर्यटनामुळं देवस्थानांना रांगा लावणाऱ्या भक्तांची संख्या वाढत आहे.

दानपेटीत पडणाऱ्या वाढीव चलनामुळे, भक्तांच्या आकर्षक देण्यामुळे देवस्थानांचा जीर्णोद्धार व विस्तार घाईघाईत होत आहे. परंतु, घाईत जीर्णोद्धार करताना व देणगीदारांचं मन राखताना मूळ वास्तूची शैली, सामग्री, ऐतिहासिक महत्त्व यांना महत्त्व न देता करण्यात येणाऱ्या आधुनिक पद्धतीच्या जीर्णोद्धारांत नूतनीकरण होतं; पण ‘वारसा’ मात्र हरवत जातो.

‘युनेस्को’नं साखरगडनिवासिनी मंदिराची निवड करताना वास्तूचं मूळ स्वरूप, मूळ शैली, मूळ सामग्रीमध्ये जतन-संवर्धन करण्याच्या शास्त्रीय पद्धतीला आंतरराष्ट्रीय निकषांवर विश्लेषण करून पुरस्कार दिला आहे. ‘एशिया पॅसिफिक रिजन’मधील १९ देशांतून आलेल्या ४६ प्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांना पुरस्कार देण्यात आला.

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, थायलंड, सिंगापूर व भारतातील साखरगडनिवासिनी मंदिर यांचा त्यात समावेश होता. आपला वारसा मूळ स्वरूपात पुढील पिढीकडं सुपूर्द करण्याचं महत्त्व जाणून, त्याबद्दल समाजात जनजागृती व्हावी, या हेतूनं पुरस्काराचं वितरण केलं जातं. निरनिराळ्या नऊ देशांतील तज्ज्ञांनी प्रकल्पाचं विश्लेषण करून पुरस्काराची निवड केली.

किन्हईचे कुलकर्णी पार्वतीदेवीचे भक्त. बारा वर्षं औंधच्या देवीची मनोभावे भक्ती केल्यावर कृष्णाजीपंत कुलकर्णींना देवी स्वप्नात येऊन प्रसन्न झाली. त्यावेळी यमाई देवीनं किन्हईला येऊन वास करण्याचं वचन त्यांना दिलं. परंतु, औंधहून किन्हईकडे जात असताना मागं वळून न बघण्याची अट त्यांना घातली.

थकलेल्या कृष्णाजीपंतांनी अनवधानानं वळून पाहिलं आणि देवी मराठमोळ्या स्त्रीचं रूप घेऊन माघारी फिरली. त्याचवेळी एक व्यापारी बैलगाडीतून साखरेची पोती घेऊन चालला होता. विषण्ण देवीनं पोत्यांत काय आहे, असं विचारताच व्यापाऱ्यानं मीठ आहे, असं सांगितलं. व्यापारी घरी गेला असता पोती मिठानं भरलेली आढळली.

पश्चातापदग्ध कृष्णाजीपंतांनी औंधचा मार्ग धरला. व्यापाऱ्याची गोष्ट ऐकल्यावर त्यांची खात्री झाली, की ती मराठमोळी स्त्री यमाई देवीच होती. जिथं पंतांनी वळून पाहिलं त्या जागी येऊन देवीची प्रार्थना केली. व्यापाऱ्यानं माफी मागितली. मिठाची पोती परत साखरेची झाली. कृष्णाजीपंतांनी ओळखलं, की देवी इथंच आहे. त्या खडकावर देवीचं मंदिर बांधलं. साखरगड असं त्याला संबोधलं व आजन्मसेवा केली.

साखरगडावरील अशा संदिग्ध खडकावर देवीनं वास्तव्य ठेवलं, जिथं औंधच्या यमाई देवीची बहीण साखरगडनिवासिनी असं नाव पडलं. या दंतकथेला जोड देणारा कुठलाही कागदोपत्री पुरावा नाही. परंतु, साखरगडावरील निसर्गाच्या रम्य कोंदणात यमाई देवीला वास्तव्य करण्याचा मोह झाला असणार हे निश्चित!

डोंगरावरील यमाई देवी मंदिर परिसरात आल्हाददायक वारा वाहत असतो. हा वारा बोचरा नसून, त्यातील प्रसन्न ऊर्जेची स्पंदनं भक्तांना इथं खेळवून ठेवतात. १७४५ मध्ये उभारलेल्या मंदिर परिसराला गडासारखी तटबंदी आहे. यादव शैलीत बांधलेल्या मंदिरावर बहामनी शैलीच्या घटकांचा प्रभाव दिसून येतो. सहा बुरुज असलेल्या तटबंदीच्या प्रवेशद्वाराला प्रमाणबद्ध नगारखाना आहे. नगारखान्याच्या शैलीतही सरमिसळ दिसून येते. हिंदू कमानीवर बहामनी मिनार विसावले आहेत.

चुन्यातील नाजूक कलाकुसर (स्टको वर्क) नगारखान्याच्या सौंदर्यात भर घालतात. दख्खनच्या पठारावरील काळ्या दगडांमधील आकाशात झेपावणाऱ्या दीपमाळा या मंदिर परिसराचा सौंदर्यखणी ऐवज आहेत. दीपमाळेवर दिवा ठेवण्यासाठी काळ्या दगडात कोरलेले ऐटदार मोर आहेत.

मंदिर परिसराच्या बुरुजाची भिंत तीन फूट रुंद घडीव काळ्या पाषाणात बांधली आहे. त्यावर वीटकाम चढवलं असून, रुंद दगडकामात मंदिराच्या बाजूनं सभोवती छोट्या खाचांत देवतांच्या घडवलेल्या निरनिराळ्या प्रतिमा आहेत. उत्तराभिमुख मंडप आणि काही प्रमाणात ओवऱ्या यांत यादव शैलीचा ठसा असून, मंदिरापुढील सभामंडप पेशवेकाळात उभारलेला आहे.

मंदिराच्या शिखराच्या जडणघडणीत हिंदू आणि बहामनी शैलीचा संगम प्रमाणबद्धता, आकारमान आणि कलाकुसरीतून प्रतित होतो. हिंदू शैलीत क्रमाक्रमानं चढणाऱ्या कळसाला मध्येच मिनारांची जोड दिली आहे. कळसावरील प्रतिमांमध्ये श्री गणेश, दुर्गा, विष्णू यांची निरनिराळी रूपं आहेत. प्रतिमांची शिल्पकला साधताना नाजूक उत्कृष्ट चित्रकलाही नजरेस पडते. गर्भगृहांमधील मंद प्रकाशातील देवीची सोज्वळ मूर्ती अंतःकरणाला जणू स्पर्श करते. विलक्षण अशी अंतर्मुख करणारी शांतता इथं नांदते.

मंदिर परिसरात असलेले पाच शिलालेख मंदिर उभारण्याचं कालमान, व्यक्तींचे संदर्भ दर्शवतात. जीर्णोद्धाराचा कालखंड साधारणपणे १८६९ च्या सुमारासचा आहे. मंदिराचा दैनंदिन कारभार डॉ. आयाचित मोठ्या श्रद्धेनं सांभाळतात. उत्कृष्ट वास्तुशिल्पं, चित्रकला या सर्वांच्या जतन-संवर्धनाची गरज व त्यांच्या मूळ स्वरूपातील कारागिरीचं मूल्य किन्हईकर कुलकर्णी कुटुंबीयांनी जाणलं आणि आजवर आपल्यावर कृपाहस्त धरलेल्या यमाई देवीच्या सेवेची ही आगळीवेगळी संधी ओळखून मंदिर व परिसराच्या शास्त्रोक्त जतन-संवर्धनाचा निर्धार केला.

सतीश, श्रीरंग व मुकुंद कुलकर्णी आणि उमा सामंत या भावंडांनी आपले स्वर्गीय आई-वडील, काका यांच्या स्मरणार्थ आर्थिक निधीची तरतूद करून ‘किमया’च्या सल्ल्यानं कामाला सुरुवात केली. दुरुस्त्यांची, जतन-संवर्धनाची प्रणाली तयार झाली. श्री. साखरगडनिवासिनी ट्रस्टची परवानगी घेण्यात आली. शहरापासून दूर काम करण्यास कंत्राटदार व कारागीर तयार होईनात. शेवटी शहरांत जतन-संवर्धनाची कामे लीलया पेलवणाऱ्या सवानी बंधूंनी कामाची जबाबदारी स्वीकारली.

जसजसे तैलरंगांचे थर काळजीपूर्वक उतरवले जाऊ लागले, दगडांची स्वच्छता होऊ लागली तसं मूळ कारागिरीचं सौंदर्य स्पष्ट होऊ लागलं. कळसावरील मूर्त्यांची झालेली झीज उतरवून कारागीरांनी चुन्यामध्ये मूर्ती जागेवर घडवल्या, काही दुरुस्त केल्या. ओबडधोबड केलेले बदल काळजीपूर्वक उतरवून गरजेनुसार सुबकतेनं नव्यानं बदल करण्यात आले. दीपमाळेचेही मोडलेले दगड क्रमांकानुसार उतरवून त्यांची पुनर्बांधणी करण्यात आली.

ज्या काळात वास्तूनिर्मितीच्या कलाकारांनी काही उद्दिष्टे समोर ठेवून निर्मिती केली; तिचं मूल्य जाणून तिला जास्तीत जास्त शास्त्रीयरीत्या मूळ स्वरूपात जतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न जतन-संवर्धनाच्या कामात केला आहे. हे करताना ज्यांचा रोजच्या रोज वावर आहे अशा व्यक्ती, जीर्णोद्धाराचा आर्थिक भार उचलणारे भक्त, प्रत्यक्षात जागेवर काम करणारे कंत्राटदार आणि कारागीर यांचा कामातील बारकावे जाणून घेऊन दिलेला सक्रिय सहभाग महत्त्वाचा असतो.

अशी सकारात्मक मूठ वळली, तरच प्रत्यक्षात होणारा कामाचा दर्जा सांभाळला जातो व ‘वारसा’ म्हणून वास्तूच्या मूळ मूल्यांचं संक्रमण पुढच्या पिढीकडं होतं. यात विद्युतवाहिन्या, जलवाहिन्या, सांडपाणी व्यवस्था अशा आजच्या काळातील सुविधा कल्पकतेने जुन्याशी मिळत्याजुळत्या करून बसवाव्या लागतात.

काळाच्या ओघात चढलेली पुटं उतरवल्यावर आतल्या सौंदर्याचे काही वेळा आश्चर्यकारक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे नमुने सापडतात. त्यांच्या मूळ अंशाचं प्रयोगशाळेत विश्लेषण करून मूळ घटकांशी मिळतीजुळती सामग्री व तंत्रज्ञान वापरावं लागतं. साखरगडनिवासिनी यमाई देवीच्या कृपेनं मंदिराचं मूळ सौंदर्य भक्तांसाठी सुस्थितीत जपलं जात आहे.

तंत्रज्ञानाचा एक नवीन टप्पा जतन-संवर्धनकारांना गाठता आला. त्याची दखल ‘युनेस्को’नं घेऊन, त्याला सन्मानाचं पदक बहाल केलं. गावागावांतून असा वारसा पुनरुज्जीवनाची आस बाळगून आहे. मात्र, याबाबतचा आपला दृष्टिकोन बदलला, तर जतन-संवर्धनाची किमया जनमानसात रुजण्यास मदत होईल. 

(लेखिका वास्तुविशारद व नगरविन्यासकार असून, जतन-संवर्धनक्षेत्रात कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT