नोकरी करण्यास पतीचा विरोध
माझे लग्न होऊन दोन वर्षे झाली आहेत. मला एक वर्षाचा मुलगा आहे. मी उच्च पदवीधर आहे. परंतु लग्नाच्या वेळेस माझ्या पतीने मला नोकरी करणारी मुलगी नको आहे, असे सांगितले होते. आपल्याला मूल झाल्यानंतर त्याला तू पूर्ण वेळ द्यावा, अशी त्याची इच्छा होती. मलाही तेव्हा नोकरी करण्याची इच्छा नव्हती. आता मला एका नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे. माझ्या सासरची मंडळी याबाबत मला प्रोत्साहन देत आहेत. परंतु माझ्या पतीची याला तयारी नाही. नोकरीची एवढी चांगली संधी मी गमावली तर मला पुढे करिअर करणे अवघड होऊन जाणार आहे. म्हणूनच माझे सासरचे सर्व मला मदत करण्यास तयार आहेत. परंतु मी ही नोकरी मिळवली तर माझ्या पतीचा विश्वास गमवल्यासारखे होईल. मी नक्की काय करावे हे मला समजत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न करायचे नाही, असे बऱ्याच मुलांचे म्हणणे असते. कारण नोकरी करणारी मुलगी घरामध्ये लक्ष देत नाही, मुलांकडे तिचे लक्ष नसते, असा त्यांचा समज असतो. परंतु नोकरी आणि करिअर करणाऱ्या मुलीही व्यवस्थित संसार करू शकतात आणि चांगला समतोल ठेवू शकतात, ही उदाहरणे त्यांनी पाहिलेली नसतील. परिस्थितीनुसार आपल्याला आपल्या विचारांमध्ये बदल करावा लागतो. तुला आता चांगल्या पगाराची नोकरी मिळणार असेल आणि तुझ्या सासरचे सर्व लोक तुला सहकार्य करायला तयार असतील तर या बाबतीत विचार करायला हरकत नाही. यासाठी तुझ्या पतीशी मोकळेपणाने बोल. तुझ्या इतर कर्तव्यात कोणतीही कसूर होणार नाही, याबाबत त्याला विश्वास दे. संसार दोघांचा आहे. आपल्याला दोघांनाही मुलाला वेळ द्यायला पाहिजे, हे त्याला सांग. अर्थात वेळ देणे म्हणजे केवळ मुलांच्या सोबत असणे नव्हे तर मुलांना गुणात्मक वेळ देणे महत्त्वाचे असते. यासाठी दोघांनीही नोकरीवरून आल्यानंतर आणि सुटीच्या दिवशी मुलाला जास्तीत जास्त गुणात्मक वेळ देण्याचे ठरवले तर मुलावर योग्य संस्कार करणे तुम्हाला शक्य होईल. कोणताही निर्णय घेताना एकमेकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या आणि सर्व परिस्थितीचा केवळ भावनात्मक विचार न करता प्रॅक्टिकल होऊन निर्णय घ्या.
संसार मोडतोय...
मी ३४ वर्षांचा उच्चशिक्षित आहे. माझा विवाह चार वर्षांपूर्वी मॅट्रिमोनिअल साईटवरून ठरवून पद्धतीने झाला. माझी बायकोसुद्धा उच्चशिक्षित असून, गेली दोन वर्षे ती नोकरी करत नाही. माझा स्वभाव शांत व सयंमी आहे. उलटपक्षी माझ्या बायकोचा स्वभाव अतिशय तापट व अस्थिर आहे. आम्ही दोघेहो लग्न झाल्यापासून वेगळे राहतो. लग्नानंतर काही दिवसांतच क्षुल्लक कारणांवरून वाद होऊ लागले. त्यामुळे आम्ही दोघेही गेली तीन वर्षे एकाच घरात दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपतो. या कालावधीत मी तिला समुपदेशनासाठी येण्याची विनंती केली. परंतु, तिने मला नकार दिला. ती नोकरी करत नसल्यामुळे आम्हा दोघांचा खर्च मी पाहत होतो. तरीसुद्धा माझ्याकडे ती सतत ज्यादा पैशांची मागणी करत असे आणि त्याबद्दल विचारणा केल्यावर वाद घालत असे. चार महिन्यांपूर्वी काही किरकोळ कारणांवरून आमच्यात वाद झाले. त्यानंतर लगेचच तिने मला तिच्या वकिलांमार्फत परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याविषयी नोटीस पाठवली. माझ्या घरच्यांनीसुद्धा घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला. तिच्या आई-वडिलांनीसुद्धा यामध्ये कोणतेही सहकार्य आम्हाला केले नाही. तिने माझ्याकडून एकरकमी पोटगीची मागणी केली व मी ती देण्यास तयार झालो. पुढील सहा महिन्यांची कोर्टाने मुदत दिली असली तरीसुद्धा परिस्थितीमध्ये काही बदल होतील, याची आशा कमी वाटत आहे. वरील सगळ्या गोष्टींमधून मला खूप मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास होत आहे. या सर्व त्रासांमधून मी बाहेर कसा बाहेर पडू शकेन याबद्दल मार्गदर्शन करावे.
जोड्या विजोड असतात, असे म्हटले जाते. त्यामुळेच नवऱ्याच्या आणि बायकोच्या स्वभावातील आणि विचारातील तफावत आपण खूप ठिकाणी बघतो. हे मतभेद खूप टोकाला गेले तर वेळीच त्याच्यावर उपचार करणे गरजेचे असते. या उपचारांसाठी दुसरी व्यक्ती तयारच नसेल तर तिला कोणतीही जबरदस्ती आपण करू शकत नाही. कारण मुळात आपला प्रश्न मिटला पाहिजे हे स्वतः ठरवले तर त्यातून मार्ग निघू शकतो. नाहीतर कोणतेही मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक याच्यावर उपचार करू शकणार नाहीत. तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न केले होते, परंतु तिची समुपदेशन उपचार करून घेण्याची तयारी नव्हती हे दिसून येते. आता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून आयुष्याची नव्याने सुरुवात करणे हे तुमच्यासाठी योग्य ठरेल. लग्न मोडायला कोणालाच आवडत नाही, परंतु दोघांमधील मतभेद विकोपाला गेलेले असतील आणि ते सुधारण्याच्या कोणत्याही शक्यता नसतील तर नाते ताणून धरणे योग्य होणार नाही. न्यायालयामधील समुपदेशनाचा उपयोग होतो का, हेही एकदा पडताळून बघा. कदाचित तिचा निर्णय बदलू शकतो. तिथेही तुमच्या पत्नीने एकत्र राहण्याबाबत नकार दिला तर तिला तिच्या मार्गाने जाऊ द्या आणि तुम्ही तुमचा मार्ग निवडा. आपण चालत आहोत तो रस्ता खाचखळग्याचा आणि त्रासदायक असेल तर दुसरा रस्ता शोधून काढणे शहाणपणाचे ठरते, याची मानसिक तयारी करा. तुमचे इतर त्रास आपोआप थांबतील.
सुख न दिलेल्या पत्नीच्या सेवेची वेळ
माझे वय ७१ आहे. मी बँकेतून निवृत्त झालो आहे. माझे ३७ वर्षांपूर्वी नात्यातल्या मुलीशी लग्न झाले. बायको माझ्या प्रपंचात किंवा आमच्या घरात कधीच एकरूप झाली नाही. तिच्या विचित्र वागण्याने मला सुरवातीपासूनच घटस्फोट घेऊन वेगळे व्हावेसे वाटत होते. पण ती माझा राग शांत करीत असे. मी पण त्यावर विश्वास ठेवून सोडून देत होतो. मात्र तिचे वागणे सुधारले नाही. आजही तिचा त्रास चालू आहे. या बाईने ना कधी शारीरिक सुख दिले, ना कधी मानसिक सुख दिले, माझा प्रपंच असा झालाच नाही. आम्हाला मूल झाले नाही. गेल्या तीन वर्षांपासून ती पार्किन्सन्स या मेंदूच्या विकाराने आजारी आहे. त्यामुळे बायकोची सर्व सेवा मलाच करावी लागते. हे सर्व करताना मला शारीरिक कष्टाबरोबर मानसिक कष्ट होतात. ज्या बाईने आपल्याला संसारात कधीच सुख दिले नाही तिची सेवा करण्याची पाळी आपल्यावर आली याचे खूप वाईट वाटते. तिचा आजार बरा होणे नाही. मग मी असेच आयुष्य रडतरडत जगायचे का? माझी प्रकृती चांगली आहे. या बाईच्या सेवेत आयुष्य बरबाद करण्याची इच्छा नाही. दुसरे लग्न करून उर्वरित आयुष्य घालवावे, असे वाटते. पण हिला घटस्फोट कसा देऊ आणि अशा असह्य अवस्थेत तिची सोय कशी करू, मार्गदर्शन करावे.
‘मनासारखा मिळे सवंगडी, खेळाया मग अविट गोडी’ असे म्हटले जाते. आपल्या मनासारखा आयुष्याचा साथीदार मिळाला तर संसार उत्तम होतो. परंतु तो मनासारखा मिळाला नाही तर आयुष्यभर मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागतो, अशी अनेक उदाहरणे आहेत. सुरुवातीला त्या व्यक्तीतले चांगले गुण आपल्याला दिसले तरीही नंतर ते चांगले गुण आयुष्यभर राहतील असेही नाही. आता या वयात आणि या परिस्थितीत तुम्हाला तुमच्या पत्नीला सोडून देता येणे अवघड आहे. हा विचार तुम्ही फार आधी करायला हवा होता. झालेल्या गोष्टी आपल्याला बदलता येत नाहीत, त्यामुळे आता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करणे, हेच गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या पत्नीची सेवा करण्यात अडचणी असतील तर नर्सिंगची व्यवस्था तुम्ही करू शकता. तिच्यामध्ये अडकून राहण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला तुमचे छंद जोपासता येतील. समवयस्क मित्र-मैत्रिणींमध्ये रमता येईल. तुमचा आनंद तुम्हाला शोधता येईल. परंतु तिच्या या काळात तिला साथ देणे हे महत्त्वाचे आहे. आपले काही देणे असते ते देऊनच जावे लागते. जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही त्या परिस्थितीला सामोरे जाणे फार महत्त्वाचे असते. नाहीतर ती परिस्थिती स्वीकारताना खूप त्रास, मनस्ताप होतो, चिडचिड वाढते आणि मानसिक त्रास व्हायला सुरुवात होते. त्यामुळे परिस्थितीचा स्वीकार करा आणि स्वतःचा आनंद स्वतः शोधायला सुरुवात करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.