Indian Bison Sakal
सप्तरंग

दाजीपूर : गव्यांच्या साम्राज्यात

करवीरनगरीला पश्चिम घाटाचा शेजार लाभल्यानं अप्रतिम निसर्गसौंदर्याबरोबरच नानाविध जाती-प्रजातींचे प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक तिथं आढळून येतात.

अनुज खरे informanuj@gmail.com

करवीरनगरीला पश्चिम घाटाचा शेजार लाभल्यानं अप्रतिम निसर्गसौंदर्याबरोबरच नानाविध जाती-प्रजातींचे प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक तिथं आढळून येतात. कोकण किनारपट्टीकडून रांगडा सह्याद्री चढून घाटावर आलं की हा जैवविविधतेचा खजिना सापडतो. याच खजिन्यात एक असं रत्न आहे, ज्यानं आपल्या महाकाय काळ्याभोर शरीरानं या खजिन्याच्या सुंदरतेमध्ये भर टाकली आहे. हीच रत्नं असंख्य प्रमाणावर सापडणाऱ्या क्षेत्राची सफर आज आपण करू या. होय...तुम्ही बरोबर ओळखलंत! दाजीपूर वन्यजीव अभयारण्य...अजस्र शरीराच्या आणि अफाट ताकदीच्या गव्यांसाठी प्रसिद्ध असलेलं दाजीपूर.

स्वातंत्र्यपूर्वकाळात हे जंगल शिकारीसाठी राखून ठेवलेलं होतं. पुढं भारत स्वतंत्र झाल्यावर आणि कोल्हापूर संस्थान महाराष्ट्रात विलीन झाल्यावरही काही वर्षं या जंगलाचा शिकारक्षेत्राचा दर्जा कायम होता. पुढं महाराष्ट्र शासनातर्फे इथल्या शिकारीवर बंदी आणली गेली आणि १९५८ मध्ये दाजीपूरला संरक्षित अभयारण्याचा दर्जा मिळाला. गव्यांसाठी संरक्षित केलं गेलेलं हे अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वात जुनं अभयारण्य आहे. पुढं १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी या धरणांच्या आसपासचा प्रदेश या अभयारण्याच्या हद्दीला जोडण्यात आला आणि या सर्व भागाचं नामकरण करण्यात आलं ‘राधानागरी वन्यजीव अभयारण्य.’ दक्षिण आणि उत्तर या पश्चिम घाटांच्या भागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा संवेदनशील पट्टा अशी बिरुदावली मिरवणाऱ्या या ३५१ चौरस किलोमीटरच्या अभयारण्यात ‘दाजीपूर’ आजही स्वतःची वेगळी ओळख टिकवून आहे. निमसदाहरित जंगल या प्रकारात मोडणाऱ्या या दाजीपूर अभयारण्यात उत्तम पर्जन्यमानामुळे उभयचर प्राण्यांची संख्या लक्षणीय आहे.

बेडकांच्या विविध प्रजाती दाजीपूरमध्ये आढळतात. अगदी बोटाच्या पेरापासून ते मोठ्या आकारापर्यंत इथं बेडूक आहेत. ‘देवगांडूळ’ हा इथला अजून एक खास उभयचर रहिवासी. निसर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा प्राणी त्यामानानं दुर्लक्षितच राहिला आहे. सापांच्याही अनेक प्रजाती दाजीपूरमध्ये आढळतात. नाग, फुरसे, मण्यार, घोणस या चार विषारी सापांबरोबरच बिनविषारी सापांचीही संख्या इथं जास्त आहे. पायवाटांवरून चालताना बाजूच्या एखाद्या झाडावर आपल्या खास ‘शैली’त बसलेला ‘बांबू पिट वायपर’ अर्थात ‘चापडा’ दिसू शकतो. विषारी सापांच्या वर्गाचा हा सदस्य हिरव्या तुकतुकीत रंगामुळे हिरव्या पानांमध्ये इतक्या बेमालूमपणे मिसळून गेलेला असतो की त्याला ओळखायला जरा कष्टच पडावेत. ‘वाइन स्नेक’ अर्थात् ‘हरणटोळ’ हा इथला अजून एक हिरवा सदस्य. बारीक लांबलचक शरीर आणि निमुळतं नाजूक तोंड असलेलं डोकं अशी ठेवण असणारा हा इथला निमविषारी रहिवासी एखाद्या झाडावर आढळू शकतो. रुका सर्प, एरिक्स व्हिटेकरी, खापरखवल्या अशा जातींच्या सापांची नोंदही इथं झालेली आहे. इतर सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्याही इथं मोठ्या प्रमाणावर आहे. एका नव्या प्रजातीच्या पालीचा शोध ‘बीएनएचएस’च्या संशोधकांनी याच परिसरात लावला. या पालीला Cenmaspis kolhapurensis असं नाव दिलं गेलं.

फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती इथं आहेत. निसर्गाच्या पुनर्निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा घटक इथं मोठ्या संख्येनं आढळतो. परागीभवनाच्या माध्यमातून बीजप्रसार होण्यात फुलपाखरांचा महत्त्वाचा वाटा आहे. याशिवाय, फुलपाखरांची संख्या हा अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा घटक आहे. ‘सदर्न बर्डविंग’ हे भारतातील सर्वात मोठं फुलपाखरू आणि ‘ग्रास ज्युवेल’ हे भारतातील सर्वात लहान फुलपाखरू. ही दोन्ही फुलपाखरं इथं बघायला मिळतात.

भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या दाजीपूरनं आणखी एक वैशिष्ट्य जपलंय व ते म्हणजे इथलं वनस्पतीवैभव. बराचशा भूभागावर ‘निमसदाहरित’ आणि काही भागात वर्षअखेर पानं गळणारं ‘पानगळी’ असं दोन्ही प्रकारांचं मिश्रण असलेल्या या जंगलात अनेक प्रजातींची झाडं आढळतात. सह्याद्री या भूभागाला लागूनच असल्यामुळे डोंगराळ भाग इथं मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे डोंगराळ भागात घनदाट अरण्य आहे. याशिवाय गवताळ कुरणं, विस्तीर्ण सडेही असल्यामुळे नानाविध जातींचे वृक्ष, वेली, झुडपं, ऑर्किड, फुलं, नेचे, बुरशी अशी विविधता इथं दिसते. झुडपं आणि वेलीही इथं मोठ्या प्रमाणावर आहेत. कारवीदेखील बऱ्याच प्रमाणावर आढळून येते. धरणीनं गर्द निळी शाल पांघरलेली वाटावी असा नयनरम्य देखावा कारवीला फुलं आल्यानंतर दिसू शकतो. कारवीला साधारणतः सात वर्षांतून एकदा फुलं येतात.

पक्ष्यांच्या बाबतीतही दाजीपूर ‘सधन’ आहे! मुबलक खाद्य आणि सुयोग्य निवारा यामुळे पक्ष्यांची संख्या इथं विपुल. निसर्गात होणाऱ्या बदलांचे सूचक असणारे हे पक्षी मोठ्या प्रमाणावर असणं हेच जंगलाच्या सुदृढतेचं लक्षण मानलं जातं. आजपर्यंत दाजीपूर इथं सुमारे २३५ प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातीची आणि सुमारे ३० ते ३२ प्रजातींच्या सस्तन प्राण्यांची नोंद झालेली आहे. अतिशय दुर्मिळ असं ‘पिसोरी’ हरण दाजीपूरमध्ये आढळलं आहे. ‘सह्याद्री व्याघ्रप्रकल्पा’च्या सीमा जवळ असल्यामुळे पट्टेरी वाघाचा वावरही दाजीपूरमध्ये आहे. सस्तन प्राण्यांच्या बाबतीत ‘श्रीमंत’ असणाऱ्या दाजीपूरचं खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गवा. गव्यांसाठी राखीव असणाऱ्या या अभयारण्यात गव्यांची संख्या साहजिकच मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

भारतात बहुतेक भागांमध्ये आढळणारा गवा हा तृणभक्ष्यी वन्यप्राणी. इंग्लिशमध्ये या प्राण्याला Indian Gaur म्हणतात. अनेक लोक चुकीनं या प्राण्याला Bison असंही म्हणतात; पण Bison भारतात आढळत नाही.

नरगव्याचा रंग काळाकुट्ट, तर मादीगव्याचा रंग तपकिरी असतो. पिल्लांचा रंग सोनेरी पिवळा असतो. नराची खांद्यानजीक उंची १७५ ते १८० सेंटिमीटर, तर शिंगांची व्याप्ती साधारणतः ८५ सेंटिमीटर. कळपानं वावरणारा हा प्राणी निशाचर असून तो समपादांगुलीय कुळात मोडतो. गव्याचं घ्राणेंद्रिय फार तीक्ष्ण असतं; पण श्रवणशक्ती व नजर मात्र कमजोर असते. महाकाय शरीर, अजस्र ताकद आणि वास ओळखण्याची कला ही त्याची वैशिष्ट्यं. पूर्ण वाढ झालेल्या नराचं वजन एक टन म्हणजे एक हजार किलोग्रॅमपर्यंत असू शकतं! गवत, झाडपाला, झाडाची साल हे मुख्य खाद्य असणाऱ्या या प्राण्याला दाजीपूरमध्ये मुबलक संख्येनं आढळणारी कारवी अतिशय प्रिय आहे. शरीरातील मिठाचं प्रमाण कमी झालं की गवे इतर प्राण्यांप्रमाणेच क्षार आणि खनिजयुक्त माती चाटतात. हा प्राणी बुजरा आहे. शीळ घालून गवे एकमेकांशी संवाद साधतात, तर धोक्याच्या प्रसंगी मोठ्यानं फुत्कार सोडतात.

मी दाजीपूरला पायी फिरलो, मोटारसायकलनं फिरलो आणि गाडीनंही फिरलो. दाजीपूरच्या त्या अनवट वाटा तुडवताना वेगळाच आनंद प्रत्येक वेळी मला मिळत गेला. घनदाट जंगल, नैसर्गिक पाण्याची ठिकाणं, लांबलचक सडे, मुबलक खाद्य या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर असलेले विविध पशू-पक्षी, उभयचर, सरीसृप या सगळ्यांनी मला भुरळ घातली आहे. जंगलाची तटबंदी असणारा सह्याद्री चढून वर आल्यावर घामानं थबथबलेल्या अंगाला गार वारा लागला की जे सुख मिळतं त्याची तुलना कशाशीही होऊ शकणार नाही. इतक्या उंचीवर आलो की निसर्गाचं निराळंच रूप नजरेसमोर येतं. समोरची खोल दरी, वळसा घालत जाणारे ते सह्यकडे, आपण येताना पाठीमागं राहिलेलं आणि समोरच्या कड्यांवर असलेलं घनदाट अरण्य पाहिलं की माणसाच्या खुजेपणाची जाणीव व्हायला लागते. अध्यात्माशिवायच आपलं मन निसर्गाशी तादात्म्य पावतं आणि मग एकमेकांचे असे हृदयस्थ झाल्यावर, नकळत आपणच आखून घेतलेली लक्ष्मणरेषा पुसली जाते आणि निसर्गाच्या वाटेवरचा खरा प्रवास सुरू होतो. तो गुरू आणि आपण शिष्य हे नातं मनात पक्क होतं आणि मग त्याचं बोट धरून चालताना आपण आपलं माणूसपण पुन्हा शिकत जातो.

कसे जाल? : पुणे/मुंबई-कोल्हापूर-गगनबावडा-दाजीपूर

भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते जून

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी : गवा, सांबर, भेकर, चौशिंगा, रानडुक्कर, साळिंदर, खवलेमांजर, शेकरू, वानर, रानकुत्रा, बिबट्या, वाघ इत्यादी.

पक्षी : रानभाई, भांगपाडी मैना, लालबुड्या बुलबुल, नारदबुलबुल, कोतवाल, करियल, रानकस्तुर, शामा, मलबारी पोपट, पंचरंगी पोपट, सर्पगरुड, तुरेवाला सर्पगरुड, शिक्रा, मलबारधनेश, मुंगीखाऊ सुतार, पगडीवाला सुतार, चष्मेवाला, नाचरा, स्वर्गीय नर्तक इत्यादी.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार पांडुरंग बापट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT