Elephant Sakal
सप्तरंग

मदुमलाई : रानवेड्यांचं आरण्यक

दक्षिण भारतातली जंगलं अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेली आहेत. या जंगलांनी मला लहानपणापासूनच वेड लावलं आहे. इथला निसर्ग, झाडं, वेली, पशू-पक्षी यांचं निरीक्षण करताना आपण त्यात गुंगून जातो.

अनुज खरे informanuj@gmail.com

दक्षिण भारतातली जंगलं अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेली आहेत. या जंगलांनी मला लहानपणापासूनच वेड लावलं आहे. इथला निसर्ग, झाडं, वेली, पशू-पक्षी यांचं निरीक्षण करताना आपण त्यात गुंगून जातो. इथल्या जंगलांमध्ये आल्यावर ‘निसर्गवेडा’ याशिवाय दुसरं आपल्याला काही बनताच येत नाही. म्हणजे निदान मला तरी या जंगलांनी चक्क निसर्गवेडाच बनवलं. निसर्गासारखा सखा, सवंगडी मला इथल्या जंगलांनी मिळवून दिला. ज्यामुळे मला वेगवेगळ्या बऱ्या-वाईट अनुभवांनी खूप काही शिकवलंच पण त्याचबरोबर माझं आयुष्यही समृद्ध झालं. मला आठवतंय माझ्या आयुष्यात जे काही चढ-उतार आले त्यात मला निसर्गानेच सावरलं. आपल्याला फक्त निसर्गच कळतो आणि आपल्याला पुढे हेच करता येऊ शकेल याची जाणीव मला ज्या ज्या जंगलांमध्ये गेल्यावर झाली त्यात दक्षिण भारतातल्या काही जंगलांचा समावेश आहे.

या सगळ्यात एका जंगलाला माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात विशिष्ट स्थान आहे. अफाट पडणारा नव्हे कोसळणारा पाऊस आणि त्यानंतर शरीराला लगडणाऱ्या असंख्य जळवा यांची तमा न बाळगता मी या जंगलात मनसोक्त भटकलो. ज्येष्ठ निसर्गतज्ञ डॉ. मिलिंद वाटवे यांनी या जंगलाला पुस्तकरूप दिलं आहे. त्यांच्या ‘आरण्यकातून’ मला माझ्या तरुणपणी वेळोवेळी भुरळ घालणारं हे जंगल माझ्या एका अवलिया मित्राच्या रानवेडाच्या शोधयात्रेची परिपूर्ती करणारं ठरलं. मिलिंद वाटवे यांच्या ‘आरण्यक’ आणि कृष्णमेघ कुंटे याच्या ‘एका रानवेड्याची शोधयात्रा’ या अप्रतिम पुस्तकातून आपल्या सर्वांनाच निसर्गभक्त बनवणारं हे जंगल म्हणजे ‘मदुमलाई व्याघ्र प्रकल्प’.

मदुमलाई जंगलाचं वैशिष्ट्य म्हणजे हे एक सलग जंगल आहे. तीन राज्यांमध्ये पसरलेल्या भल्या मोठ्या अरण्याचा हा एक हिस्सा आहे. तामिळनाडू राज्यातील या जंगलाला लागून आनईकट्टी, सिंगारा आणि सिगूर ही राखीव जंगलं आहेत. उटीच्या आजूबाजूला छोटी जंगलं जागोजागी पसरलेली आहेत. इथल्या मनुष्यवस्तीमुळे सलग जंगलात थोडासा खंड पडतो. पण तिथून पुढे थेट केरळमधल्या सायलेंट व्हॅलीपर्यंत सलग जंगल आहे. मदुमलाई जंगलाची एकंदर भौगोलिक परिस्थिती पाहिल्यावर या जंगलाचं जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून असलेलं अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येईल.

मदुमलाईच्या दुसऱ्या बाजूला कर्नाटकची सीमा ओलांडली की बंदीपूर व्याघ्र आहे. बंदीपूर जंगलातून सरळ पुढे गेल्यावर नागरहोळे जंगल सुरू होतं. मदुमलाईच्या डावीकडे नागरहोळेच्या थोडं खाली दोन्ही जंगलांना लागूनच केरळमधील वायनाड अभयारण्य आहे. पश्चिम घाटाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असणाऱ्या भारतातील पहिल्या बायोस्फियरचा अर्थात निलगिरी बायोस्फियरचा ही सगळी जंगलं भाग आहेत. अनेक छोट्या मोठ्या जंगलांनी बनलेलं आणि सुमारे ६ हजार चौरस किलोमीटर एवढ्या प्रचंड भागात पसरलेलं हे बायोस्फियर हत्ती, वाघ, निलगिरी वानर, सिंहपुच्छ माकड, नानाविध प्रकारचे दुर्मीळ पक्षी, किंग कोब्रासारखे सरपटणारे प्राणी अशा अनेक दुर्मीळ जीवांची मोठी आशा आहे. बायोस्फियर म्हणजे जिथे निसर्गातील इतर घटकांबरोबर मनुष्याचे अस्तित्व मान्य आहे. मनुष्याला निसर्गाचाच घटक मानलेले आहे.

या सगळ्यामुळेच मदुमलाईचे महत्त्व अधोरेखित होते. १९१४ मध्ये सिगूर जंगलाच्या भागाला राखीव जंगलं म्हणून मान्यता देण्यात आली. पुढे १९४० मध्ये सुमारे ६० चौरस किलोमीटर जंगलभागाला मदुमलाई राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले. १९७७ मध्ये आजूबाजूच्या जंगलभागाचाही मदुमलाई राष्ट्रीय उद्यानात समावेश करण्यात आला. तर पुढे १९८६ मध्ये या अभयारण्याचा समावेश निलगिरी बायोस्फियर मध्ये करण्यात आला. वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने या जंगलाचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन एप्रिल २००७ मध्ये या जंगलाला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली. जंगलाच्या आतील भागात राहणाऱ्या ३५० कुटुंबांचे जंगलाबाहेर पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे मानवाचा जंगलात असलेला हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर कमी झाला. आणि हळूहळू वाघांची संख्या वाढायला लागली.

२०१८ च्या सर्वेक्षणानुसार सुमारे १६२ वाघ मदुमलाई व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलभागाचा वापर करत होते. यापैकी सुमारे १०३ वाघ या जंगलात वास्तव्याला होते. म्हणजे या १०३ वाघांची संपूर्ण हद्द मदुमलाई जंगलात होती. मदुमलाई व्याघ्र प्रकल्प हा नागरहोळे-बंदीपूर-वायनाड-मदुमलाई-सत्यमंगलम-बिलगिरी रंगनाथा टेंपल व्याघ्र प्रकल्प ब्लॉकचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या संपूर्ण जंगलभागात मोठ्या प्रमाणात वाघांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच व्याघ्र संरक्षण आणि पर्यायाने इतर जैवविविधतेचे संरक्षण यांच्या दृष्टीकोनातून मदुमलाई जंगल महत्त्वाची भूमिका बजावते. सुमारे ३२१ चौ.किमी.चा कोअर भाग आणि सुमारे ३६७.५९ चौ.किमी.चा बफर भाग मिळून सुमारे ६८८.५९ चौरस किलोमीटर एवढ्या मोठ्या प्रदेशात मदुमलाईचे जंगल पसरलेले आहे.

दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस आणि त्यामुळे बघाल तिथे सापडणाऱ्या जळवा हे मदुमलाईचे आणखी एक वैशिष्ट्य. मोयार नदी ही या जंगलाची जीवनवाहिनी. याशिवाय ओंबेट्टा तळं, हंबट्टा तोडू ओढा, गेम हटचं तळं आणि ओढा, सँड रोडचा ओढा या आणखी काही पाण्याच्या जागा जंगलात आहेत. यातल्या बऱ्याच ओढ्यांना वर्षभर पाणी असतं. उन्हाळ्यात हे ओढे वाहते नसले तरी ठराविक जागी पाणी साठलेलं आढळून येतं. निमसदाहरीत, ओलसर पानझडी, शुष्क पानझडी आणि झुडपी या सर्व वनप्रकारांचा मिश्रण असलेल्या या जंगलात आपल्याला कमालीची जैवविविधता पाहायला मिळते. इंबरळ्ळाच्या दलदलीच्या जागा, मोठे गवताळ कुरणांचे प्रदेशही आपल्याला या जंगलात बघायला मिळतात.

वीरप्पनच्या चंदनतस्करीच्या घटनांमुळे या जंगलाला काही काळ काळा डाग लागला होता. पुढे त्याने हस्तीदंतासाठी हत्तींची मोठ्या प्रमाणावर केलेली कत्तल या डागाला अधिक गडद रूप देऊन गेली. काही डझनभर लोकांच्या केलेल्या हत्या आणि प्रसिद्ध नट डॉ. राजकुमार यांचं केलेलं अपहरण आणि १०८ दिवसांनी त्यांची केलेली सुटका यामुळे वीरप्पनची दहशत मदुमलाई जंगलाच्या आसपासच्या भागात प्रचंड प्रमाणात होती. या दहशतीच्या छायेखाली मदुमलाई जंगलात असलेले आदिवासी, वनविभागाचे कर्मचारी या जंगलाचं जमेल तसं संरक्षण करत होते. वीरप्पनला पकडण्यासाठी तयार केलेल्या पथकाचे आधारस्तंभ असणारे वनअधिकारी पी. श्रीनिवास यांची वीरप्पनने निर्घृण हत्या केली होती, त्यामुळे काही काळ मदुमलाईचं वातावरण ढवळून निघालं होतं. पण या लोकांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. पुढे २००४ मध्ये १८ ऑक्टोबरला एका कारवाईत वीरप्पनचा अंत झाला आणि मदुमलाईने मोकळा श्वास घेतला.

मदुमलाईचं विश्व काही औरच आहे. इथे आलेल्या प्रत्येक निसर्गप्रेमीला ते जंगलाचं वेड लावतं. इथल्या पानापानातून, झाडाझुडपातून, विस्तीर्ण गवताळ प्रदेशातून बहरलेला निसर्ग आपल्याला साद घालतो. या सादेला ओ दिल्यावर त्याने उधळलेल्या रंगात आपण रंगून जातो. मदुमलाईने आपल्या आयुष्यात पखरण केलेल्या आनंदाचा आस्वाद घेताना आपण कधी निसर्गमय होऊन जातो हे आपल्यालाही कळत नाही.

कसे जाल?

पुणे/मुंबई-बंगळूरू-म्हैसूर महामार्ग-मदुमलाई

भेट देण्यास उत्तम हंगाम

नोव्हेंबर ते एप्रिल

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी

वाघ, बिबट्या, गवे, चितळ, सांबर, भेकर, रानडुक्कर, वानर, मुंगुस, अस्वल, रानकुत्रे, पिसोरी, कोल्हा, खोकड, मुंगुस, ससा, रानमांजर, हत्ती, शेकरू, इ.

पक्षी

मोर, राखी रानकोंबडा, भृंगराज, मधुबाज, शिळकरी, मलाबारचा कवड्या धनेश, बेडूक तोंड्या, बहिरी ससाणा, काळा सुतार, निलगिरी रानपारवा, सातभाई, कोतवाल, डोंगरी मैना, निलगिरी फ्लायकॅचर, खाटिक, घुबडांचे अनेक प्रकार, रुंद शेपटीचा गवती वटवट्या , मलबारी ट्रोगॉन इ.

सरपटणारे प्राणी

सुमारे १२० प्रजाती - मण्यार, नाग, घोणस, धामण, अजगर, फ्लाइंग लिझर्ड/ड्रेको, घोरपड, इ.

फुलपाखरे

कॉमन रोझ, क्रीम्सन रोझ, कॉमन जे, लाईम बटरफ्लाय, मलाबार रेवन, कॉमन मॉर्मॉन, रेड हेलन, ब्लू मॉर्मॉन, सदर्न बर्डविंग, कॉमन वॉंडरर, मॉटल्ड इमिग्रंट, कॉमन ग्रास येलो, स्पॉटेड ग्रास येलो, स्पॉटलेस ग्रास येलो, वन स्पॉट ग्रास येलो, निलगिरी क्लाऊडेड येलो, कॉमन जेझेबल, इ.

(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार पांडुरंग बापट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT