कोणत्याही जंगलाचा अनुभव घेणं ही खरं तर माझ्यासाठी पर्वणीच. एखाद्या जंगलाचा पुरेपूर आस्वाद घेईपर्यंत ते जंगल अनुभवलं असं मी म्हणत नाही. जंगलात वारंवार जाऊन जंगल पालथं घातल्याशिवाय मला समाधान मिळत नाही. प्रत्येक जंगलात वेगवेगळे अनुभव येतात. प्रत्येक जंगलातली निरीक्षणं वेगळी. वेगवेगळ्या कशाला अगदी एका जंगलात तुम्ही कधीही जा, तुम्हाला रोज ते जंगल नव्याने अनुभवायला मिळेल. त्यामुळे कोणताही अरण्यानुभव हा माझ्या दृष्टीने खासच. एकदा ते जंगल आपल्या अंगवळणी पडलं, ते जंगल अंगात भिनवलं की त्या जंगलातली मजा कळायला लागते. त्यात दक्षिण भारतातल्या जंगलांची मौज काही औरच आहे. दक्षिण भारतातली जंगलं आपल्याला अंतर्मुख करतात. इथला निसर्ग बघताना आपल्याला आपला शोध लागतो. आपण आणि निसर्ग एकाच मार्गावरचे पांथस्थ बनतो. त्याच्या जोडीने चालताना, त्याच्याकडून नवनवीन गोष्टी शिकताना आलेला अनुभव आपलं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करतो. दक्षिण भारतातली जंगलं ही अशी आहेत. निखळ आनंद देणारी. सौंदर्याचं वरदान लाभलेली.
जगात सर्वांत लांब वाढणारा विषारी साप अशी ख्याती असणारा एक साप भारतात आढळतो. तो म्हणजे नागराज. या नागराजाच्या अस्तित्वासाठी प्रसिद्ध असणारं कर्नाटकातील अभयारण्य म्हणजे सोमेश्वर वन्यजीव अभयारण्य. उडुपी जिल्ह्यातील कार्कल आणि कुंदापूर तालुक्यात असणाऱ्या या अभयारण्याची स्थापना १९७९ मध्ये १२ ऑक्टोबरला झाली.
यावेळी अभयारण्याचा प्रदेश सुमारे ८८.४ चौरस किलोमीटर एवढा होता. काही वर्षांपूर्वी अभयारण्याच्या क्षेत्राचा विस्तार करण्यात आला. आता सुमारे ३१४.२५ चौरस किलोमीटर एवढ्या मोठ्या प्रदेशात पसरलेले हे जंगल म्हणजे निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे. जंगल भागात शंकराचे मंदिर आहे. हे मंदिर सोमेश्वर या नावाने ओळखले जाते. याच मंदिरावरून जंगलाला सोमेश्वर अभयारण्य असे नाव मिळाले आहे. जंगलाच्या दक्षिणेला कुद्रेमुख वन्यजीव अभयारण्य हे आणखी एक सुंदर अभयारण्य आहे. शरावती, मुकांबिका, सोमेश्वर, कुद्रेमुख ही सुंदर जंगलं एकमेकांपासून जवळ आहेत. एखाद्या निसर्गमाळेसारखी.
दक्षिण भारताचे चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असणारे अगुंबे हे ठिकाण याच जंगलात आहे. या ठिकाणी सुमारे ८ हजार मिलिमीटर एवढा प्रचंड पाऊस पडतो. अगुंबे आणि आसपासचा परिसर कमालीच्या सुंदर वर्षावनासाठी प्रसिद्ध आहे. नागराज अर्थात किंग कोब्रा, नाकाड्या चापडा अर्थात हंप नोझ्ड पिट वायपर असे दुर्मीळ साप, सिंहपुच्छ माकडासारखे दुर्मीळ सस्तन प्राणी आणि नानाविध प्रकारचे पक्षी यासाठी सोमेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे. जंगलात कुठेही जिप्सी सफारी नाही. पण प्रशिक्षित मार्गदर्शकाला सोबत घेऊन आपल्याला ट्रेक करता येतात आणि जंगल बघता येतं. जंगलातून सीता ही मुख्य नदी वाहते. येथे सीतानंदी नेचर कँप आहे. अगुंबे-जोगी गुंडी धबधबा, ओनके अब्बी धबधबा, बरकाना धबधबा, कोडलू तीर्थ धबधबा अशी अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
सोमेश्वर अभयारण्यात सापडणारा नागराज अर्थात किंग कोब्रा हा साप नावाप्रमाणे नागांचा राजा वाटावा असा असतो. सुमारे १० ते १५ फूट लांब वाढणारा हा विषारी साप. अंडी घालण्याच्या वेळी मादी आपल्या शेपटीने पालापाचोळा, गवत गोळा करून त्याला घरट्यासदृश्य आकार देते. एकावेळेस १५ ते ३० अंडी घातली जातात. पिल्लं अंड्यातून बाहेर येईपर्यंत मादी पिल्लांचे रक्षण करते. या घरट्यावर ती वेटोळे घालून बसते. अशाप्रकारे पिल्लांसाठी घरटे बनवणारा आणि त्यांचे रक्षण करणारा नागराज हा जगातील एकमेव साप आहे. इतर साप हे अन्न असणाऱ्या या नागराजाचे विष नागाच्या विषाच्या तुलनेत कमी जहाल असते. पण चावल्यावर विष सोडण्याची मात्रा जास्त असते. त्यामुळे अत्यंत धोकादायक असणारा हा साप चावल्यावर अतिशय कमी वेळात हे विष मज्जासंस्थेवर आणि हृदयावर परिणाम करते.
त्वचेचा रंग ऑलिव्ह फळाप्रमाणे हिरवा, काळसर तपकिरी किंवा काळा असतो. शरीरावर फिकट पिवळ्या रंगाचे आडवे पट्टे असतात. पोट फिकट पिवळे पांढरे, खवले मऊ एकसारखे असतात. इतर सापाप्रमाणे नागराजाची जीभ दुभंगलेली असते. साप नेहमी जीभ बाहेर काढतो. जिभेच्या टोकावर आलेल्या गंध कणांचे ज्ञान सापाला टाळूवर असलेल्या जॅकॉबसन अवयवामुळे होते. भक्ष्याचे नेमके स्थान आणि मीलनाकाळात मादीचा मीलन गंध ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. प्रख्यात सर्पतज्ञ रोम्युलस व्हिटेकर यांनी नागराजावर येथे मोठा अभ्यास केला आहे. अगुंबे येथे त्यांची ‘अगुंबे वर्षावन अभ्यास केंद्र’ नावाने संस्था आहे जी या नागराजावर काम करते.
सोमेश्वर अभयारण्यात इतर जैवविविधताही तितकीच विलक्षण आहे. वाघासारख्या मोठ्या शिकाऱ्यापासून ते पोट तट्ट भरेस्तोवर मनसोक्त रक्त पिणाऱ्या जळवांपर्यंत आपल्याला नानाविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, झाडे, कीटक, सरपटणारे प्राणी दिसतात. जंगलाची जीवनवाहिनी असणाऱ्या सीतानंदी नदीत महासीर मासे, ऑटर्स पाहायला मिळतात.
सदाहरित आणि निमसदाहरित जंगलप्रकारामुळे जंगलाचा बराचसा भाग वर्षभर हिरवाईने नटलेला असतो. काही भाग तर इतका घनदाट आहे की सूर्यप्रकाशालाही जमिनीवर पोहोचण्यासाठी कष्टच पडावेत. अगुंबे भागात एक सनसेट पॉईंट आहे जिथून अस्ताला जाणाऱ्या रवीकराचं रूप विलोभनीय दिसतं.
अद्भुत वर्षावनाच्या या जंगलात आल्यावर निसर्गाने केलेल्या आनंदवर्षावात चिंब भिजल्याचं समाधान आपल्याला लाभतं. नागराजच्या अस्तित्वाची साक्ष देणारं हे जंगल मनसोक्त अनुभवल्यावर आपलं मन तृप्त होतं. या जंगलात फिरणं तसं सोपं नाही. जंगलभ्रमंतीची नशा लागलेल्या निसर्गवेड्याचाही इथे कस लागतो. इथल्या काटेरी झुडुपांनी दिलेला प्रसाद घेऊन बूट फाटेस्तोवर, पाय दुखेस्तोवर आणि घामाने अंग थबथबेपर्यंत जंगल तुडवण्यात आणि एखाद्या उंच डोंगरावर जाऊन पश्चिम घाटातून वाहणारा वारा अंगाला लावून घेण्यात जो स्वर्गीय आनंद मिळतो तो या जगात कितीही पैसे मोजलेत तरी विकत घेता येणार नाही. इथल्या शिवशंकराच्या साक्षीने निसर्ग वाचण्याचा आणि वाचवण्याच्या वसा घेतलात तर आपला पांथस्थ बनलेला निसर्गच आपलं बोट धरून आपल्याला समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाईल.
कसे जाल? -
पुणे/मुंबई-बंगळुरू-शिमोगा-तीर्थहल्ली-अगुंबे-सोमेश्वर
भेट देण्यास उत्तम हंगाम -
नोव्हेंबर ते एप्रिल
काय पाहू शकाल?
सस्तन प्राणी
गवा, सिंहापुच्छ माकड, वाघ, बिबट्या, रानकुत्रे, कोल्हा, माकड, वानर, लाजवंती, अस्वल, चितळ, सांबर, भेकर, शेकरू, इ.
पक्षी
मलबार ट्रोगॉन , पर्वत कस्तुर, मलबारचा राखी धनेश, मलबारचा कवड्या धनेश, राज धनेश, पिवळ्या भुवईचा बुलबुल, नारंगी गोमेट , छोटा गोमेट , भृंगराज, बाकचोच सातभाई , राखी रानकोंबडा, मत्स्य घुबड, बेडूकतोंडया, नारिंगी डोक्याचा कस्तुर, सुर्यपक्षी, चष्मेवाला, हरियाल , हळद्या, इ.
सरपटणारे प्राणी
नागराज, नाग, हंप नोझ्ड पीट वायपर, फुरसे, मण्यार, घोणस, धामण, नानेटी, चापडा, घोरपड, मगर, इ.
(सदराचे लेखक ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. )
( शब्दांकन : ओंकार बापट )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.