Tal Chhapar Wildlife Sanctuary Deer Sakal
सप्तरंग

पक्षिवेड्यांचं माहेरघर : ताल छापर

राजस्थानमधील अशाच एका अप्रतिम जंगलाची माहिती आज आपण घेणार आहोत. मरूउद्यानाचं मर्मस्थळ असणाऱ्या थार वाळवंटाच्या सीमेवर असलेलं हे जंगल म्हणजे पक्षिप्रेमींसाठी खास आकर्षण आहे.

अनुज खरे informanuj@gmail.com

निसर्गरत्नांची खाण असलेल्या आपल्या देशात असलेली निसर्गसंपन्नता आपण गेल्या अनेक लेखांमधून पहिली आहे. देशाच्या कुठल्याही भागात गेलो तरी आपल्याला खुणावणारा आणि सुखावणारा निसर्ग पाहणं ही खरंतर पर्वणीच असते.

निसर्गरत्नांची खाण असलेल्या आपल्या देशात असलेली निसर्गसंपन्नता आपण गेल्या अनेक लेखांमधून पहिली आहे. देशाच्या कुठल्याही भागात गेलो तरी आपल्याला खुणावणारा आणि सुखावणारा निसर्ग पाहणं ही खरंतर पर्वणीच असते. दक्षिण भारतातली घनदाट अरण्यं असोत किंवा मध्य भारतातील गवताळ कुरणांनी भरलेली पानगळी जंगलं असोत; ईशान्य भारतातली बर्फाचा शेजार लाभलेली जंगलं असोत, किंवा उत्तर भारतातली तराईच्या क्षेत्रात असणारी अरण्यं असोत, नानाप्रकारची जैवविविधता आपल्याला या जंगलांमध्ये पाहायला मिळते. याला पश्चिम भारतातली ओसाड माळरानं असलेली गुजरात, राजस्थानमधली जंगलंही अपवाद नाहीत. गुजरात राज्यातील काटेरी वनांमध्ये गीरच्या जंगलात तर आशियाई सिंहांचं एकमेव आणि शेवटचं आश्रयस्थान आहे. त्याची माहिती आपण याअगोदर घेतलीच आहे. कच्छच्या रणात असलेलं पक्ष्यांचं नंदनवनही आपण पाहिलं. राजस्थानातील रणथंबोर या वाघांच्या जंगलाचीही माहिती घेतली. तसंच, वाळवंटात असणाऱ्या सुंदर अशा राष्ट्रीय मरूउद्यानाविषयीही जाणून घेतलं. सांगण्याचा उद्देश एवढाच, की भारतातल्या अगदी ओसाड वाळवंटासारख्या भागांनाही निसर्गानं भरभरून दिलं आहे. या जंगलांचा आस्वाद घेण्यासाठी आणि तिथलं अद्भुत निसर्गविश्व पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य निसर्गवेडे या जंगलांना भेट देतात.

राजस्थानमधील अशाच एका अप्रतिम जंगलाची माहिती आज आपण घेणार आहोत. मरूउद्यानाचं मर्मस्थळ असणाऱ्या थार वाळवंटाच्या सीमेवर असलेलं हे जंगल म्हणजे पक्षिप्रेमींसाठी खास आकर्षण आहे. राजस्थानमधील चुरू या जिल्ह्यातील हे अभयारण्य म्हणजे ‘ताल छापर’ वन्यजीव अभयारण्य. पक्ष्यांसाठी अनोखं जंगल असणाऱ्या या जंगलानं आणखी एक वैशिष्ट्य जपलं आहे. १९६६ मध्ये या जंगलाला अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात आली, ती एका विशिष्ट प्राण्याच्या संरक्षणासाठी. हाच प्राणी या अभयारण्याचं वैशिष्ट्य आहे. तो प्राणी म्हणजे ‘काळवीट’. सुमारे २० चौरस किलोमीटर भागात हे अभयारण्य पसरलेलं आहे. अभयारण्याला ताल छापर हे नाव दोन गोष्टींमुळं मिळालं आहे. छापर हे या अभयारण्याच्या सर्वात जवळ असलेलं गाव. ताल म्हणजे तळं. या अभयारण्यात एक अनोखी परिसंस्था आहे. खारट जमीन आणि त्यावर आधारित परिसंस्था आपल्याला या अभयारण्यात पाहायला मिळते. इथं काही खाऱ्या पाण्याचे तलावदेखील आहेत. ताल छापर हा त्यातीलच एक खाऱ्या पाण्याचा तलाव. पूर्वी येथील खाऱ्या पाण्यातून मीठ बनवण्याचा उद्योग प्रसिद्ध होता.

अभयारण्याच्या एकूण भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं, की थार वाळवंटाचा प्रभाव येथील भौगोलिक स्थितीवर आहे. वाळू आणि खडकांच्या अनेक छोट्या-मोठ्या टेकड्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. मान्सूनच्या काळात या टेकड्यांवर पडणारा पाऊस हा अभयारण्यातील पाण्याचा मुख्य स्रोत आहे. टेकड्यांवर पडणारं पावसाचं पाणी अनेक ओढ्यांद्वारे आसपासच्या तलावांत जमा होतं. खाऱ्या जमिनीत असणारे हे गोड्या पाण्याचे तलावच येथील जीवसृष्टीला आपल्याकडं आकर्षित करतात आणि जंगलाचं ‘जंगलपण’ जपून ठेवतात. मान्सूनच्या काळात या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पूर्वी या भागात होणाऱ्या पावसामुळं संपूर्ण जंगलात पूरसदृश स्थिती निर्माण होत असे. मात्र मिठासाठी मोठ्या प्रमाणावर झालेल्या खोदाईमुळं सध्या फार कमी प्रमाणावर पाणी टेकड्यांवरून तलावांपर्यंत पोहोचतं. प्रामुख्याने काटेरी वन असणाऱ्या या जंगलात बाभळीची झाडं मोठ्या प्रमाणावर आहेत, तसंच शबरी किंवा शमीची झाडंही मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.

ताल छापर अभयारण्य हे पक्ष्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. माळरानांच्या अस्तित्वामुळं शिकारी पक्ष्यांची विविधताही आपल्याला इथं पाहायला मिळते. अनेक पक्षी देशविदेशांतून स्थलांतर करून या अभयारण्यात येतात. काही महिने इथं वास्तव्य करतात आणि पुढच्या प्रवासाला निघतात. हे स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक पक्षिप्रेमी ताल छापर अभयारण्यात अगदी देशविदेशांतून येतात. काळवीट अर्थात कृष्णमृग या खास हरीणवर्गाच्या प्राण्यानं ताल छापर अभयारण्याला खास ओळख दिली आहे. हा प्राणी भारतातील अगदी सर्वसामान्य माणसांना माहीत झाला तो एका सिनेनटाच्या जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणामुळे.

काळविटाला कृष्णमृग असंही म्हणतात. काळवीट किंवा कृष्णमृग हा एक देखणा प्राणी आहे. काळवीट कळपानं राहणारा प्राणी असून, एका कळपात साधारण १० ते ३० काळवीट असतात. गवताळ व खुरटी झुडपं असलेल्या क्षेत्रात प्रामुख्यानं काळविटांचं अस्तित्व आढळतं. काळवीट घनदाट तसंच डोंगराळ जंगलात राहण्याचं टाळतात. प्रौढ नराच्या पाठीचा रंग राखाडी किंवा पूर्ण काळा आणि पोटाकडील भाग पांढरा असतो. मादी नरापेक्षा लहान असतात आणि त्यांना शिंगं नसतात. त्यांच्या पाठीचा रंग पिवळसर बदामी आणि पोटाचा भाग नराप्रमाणे पांढरट असतो. नरांना पीळदार शिंगं असतात. काळवीट हा वेगानं धावणारा प्राणी असून तो ताशी सुमारे ८० कि.मी. वेगानं धावू शकतो. काळविटांचं आयुष्यमान अंदाजे १२ ते १५ वर्षं असतं.

काळवीट हा हरणांच्या कुरंग वर्गाचा प्राणी आहे. हरणांमध्ये सारंग आणि कुरंग ही दोन उपकुळं आपल्याला पाहायला मिळतात. या उपकुळांत काळवीट, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा इ. प्रजातींच्या हरणांचा समावेश होतो. कुरंग हरणांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शिंगं. ही शिंगं सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा पूर्णत: वेगळी असतात, ती पोकळ असून हाडांच्या सांगाड्याचा एक भाग असतात. ही शिंगं कधीही गळून पडत नाहीत. याउलट सारंग प्रजातींच्या हरणांची शिंगं दरवर्षी गळून पडतात आणि नव्यानं येतात. कुरंग जातीच्या हरणांच्या शिंगाला एकच टोक असतं. शिंगाचं आकारमान सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा बरंच लहान असतं.

काळवीट हा भारतीय संस्कृतीत फार फार वर्षांपासून असणारा प्राणी आहे. अगदी इसवी सन पूर्व काळातही दगडावर केलेल्या रंगकामातही काळविटाचं चित्र पाहायला मिळतं. एकेकाळी भारतीय उपखंडात मोठ्या संख्येनं दिसणारा प्राणी अवैध आणि मोठ्या प्रमाणावर केलेल्या शिकारीमुळं कमी होत चालला आहे. १९७२ साली झालेल्या एका अभ्यासानुसार भारतीय उपखंडात या प्राण्यांची संख्या ४ दशलक्षच्या आसपास होती. १९८२ मध्ये रणजित सिंग यांनी केलेल्या अभ्यासानुसार भारतात २२५०० ते २४५०० इतकी काळविटांची संख्या होती. राजस्थानातील बिष्णोई जमातीच्या लोकांच्या जीवनामध्ये एकूणच जंगलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांनी संख्येनं कमी होत चाललेल्या या काळवीट प्राण्याच्या संरक्षणाचा प्रण केलेला आहे.

ताल छापर अभयारण्यात एक विशिष्ट प्रकारचं गवत सापडतं. स्थानिक भाषेत या गवताला ‘मोठीया’ म्हणतात. ह्या गवताचं बीज हे तंतोतंत मोत्याच्या आकारासारखं दिसतं. यावरून या गवताला ‘मोठीया’ हे नाव मिळालं आहे. या बीजाची चव गोड असते. स्थानिक लोक हे बीज आवडीनं खातात. काळवीट आणि काही पक्षीही हे बीज आवडीनं खातात. मात्र प्रत्येक मोसमात हे गवत कमी प्रमाणात उगवतं. त्यामुळं या गवताचं संवर्धन करण्याची अधिक गरज आहे. येथूनच जवळ ‘जोर्बीर’ हे गिधाडांसाठी असलेलं संरक्षित क्षेत्र आहे.

ताल छापर या अभयारण्याचं काळवीट आणि माळरानावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व लक्षात घेतलं तर इथं असलेल्या एकूण भौगोलिक स्थितीवरून कोणीही या जंगलाला रूक्ष, ओसाड म्हणणार नाही. नानाविध शिकारी प्रजातींच्या पक्ष्यांसाठी असलेला हा स्वर्ग दरवर्षी निसर्गप्रेमींना आणि पक्षिनिरीक्षकांना आपल्याकडं आकर्षित करतो. अप्रतिम निसर्ग विविधतेमुळं आपण या जंगलाच्या प्रेमात पडतो. शुष्क माळरानावर असलेलं निसर्गाचं नंदनवन प्रत्येकाने किमान एकदा तरी पहावंच. निसर्गाच्या या असाधारण आणि अद्भुत चमत्काराला आपण एकदा भेट दिली, की आपली इथला निसर्ग पाहण्याची तहान शमत नाही. आपण वारंवार या अभयारण्याला भेट देतो आणि इथला निसर्ग मनसोक्त पिऊ लागतो.

कसं जाल?

पुणे/मुंबई-जयपूर- ताल छापर

भेट देण्यास उत्तम हंगाम

नोव्हेंबर ते फेब्रुवारी

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी : वाळवंटी खोकड, वाळवंटी मांजर, चिंकारा, काळवीट इ.

पक्षी : भाट तीतर, राखी तित्तीर, ठिपकेवाला तीतर, ब्लॅक-बेलीड सँडग्रुज, साईक्स नाइटजार, चातक, करकरा क्रौंच, सामान्य क्रौंच, माळढोक, मॅक्वीनस् बस्टर्ड, कुदळ्या, युरेशियन करवानक, संघचारी टिटवी, क्रीम कलर्ड कोर्सर, धाविक, मधुबाज, भुरे गिधाड, काळं गिधाड, राजगिधाड, नेपाळी गरुड, लाँग लेग्ड बझर्ड, विविध प्रजातींचे ससाणे, घारी, सापमार गरुड, पिंगट गरुड, इस्टर्न इम्पेरियल ईगल, कंठी होला, तपकिरी होला इ.

सरपटणारे प्राणी : स्पाइनी-टेल्ड लिझार्ड, घोरपड, फुरसं, घोणस, मण्यार इ.

(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार बापट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT