अभी न जाओ छोडकर... sakal
सप्तरंग

अभी न जाओ छोडकर...

चोरून-लपून होणाऱ्या प्रेमिकांच्या गाठी-भेटी हा अनंतकाळापासून चालत आलेला विषय मोठा गमतीदार आहे. सांप्रतकाळी कम्युनिकेशनच्या आधुनिक साधनांमुळे या गाठी-भेटींना कदाचित वेगळा काही पैलू मिळालाही असेल.

सकाळ वृत्तसेवा

भँवरे की गुंजन...

डॉ. कैलास कमोद,kailaskamod1@gmail.com

अभी न जाओ छोडकर

के दिल अभी भरा नही

चोरून-लपून होणाऱ्या प्रेमिकांच्या गाठी-भेटी हा अनंतकाळापासून चालत आलेला विषय मोठा गमतीदार आहे. सांप्रतकाळी कम्युनिकेशनच्या आधुनिक साधनांमुळे या गाठी-भेटींना कदाचित वेगळा काही पैलू मिळालाही असेल. त्या काहीशा सुलभ झाल्या असतील. तरीही, तशा गाठी-भेटींतली गंमत कधीही कमी होणारी नाही. भेटीची वेळ ठरवणं, स्थळ ठरवणं ही पहिली पायरीच किती अवघड असायची. कधी सिनेमागृह किंवा एखाद्या बगिचातलं कमी वर्दळीचं हे ठिकाण असायचं. भेटीची सांकेतिक वेळ जसजशी जवळ यायला लागायची तसतशी उरात होणारी हलकीशी धडधड...मग ‘शाळेला जाते’, ‘क्लासला जाते’, ‘मैत्रिणीकडं जाते’ आणि कधी कधी तर ‘मंदिरात जाऊन येते’ असे एक ना अनेक बहाणे घरी सांगून ‘ती’ बाहेर पडायची.

मै तुझ से मिलने आई, मंदिर जाने के बहाने

बाबुल से झूठ बोली, सखियों से झूठ बोली

असं आशा पारेखचं एक गीतसुद्धा आहे. सांकेतिक स्थळी बहुतेकदा ‘तो’ आधी पोहोचलेला असायचा. काही येणारे-जाणारे परिचित ‘काय रे, कुणाची वाट बघतोस?’ असं म्हणून कधी तरी हटकायचेसुद्धा. ‘नाही, नाही...कुणाची नाही’ असं काहीबाही उत्तर देताना त्याला ओशाळल्यागत व्हायचं. हा हटकणारा आता घरी कुणाला तरी आपली चुगली तर सांगणार नाही ना अशी धास्तीही मनात असायची.

असंच हे एक प्रेमी युगुल. चहाच्या मळ्यातलं एक रम्य ठिकाण त्यांनी भेटीसाठी निश्चित केलंय. कितीतरी उशीर झालाय तरी ‘ती’ अद्याप येत नाही म्हणून वाट पाहून पाहून ‘तो’ वैतागलाय. झाडाखाली बसून आहे कधीपासून. नेकटायची गुंडाळी करून त्यानं ती हाताच्या बोटांमध्ये धरली आहे. अखेर तिची जवळच चाहूल लागली तेव्हा काहीशा रागानंच तो उठून जवळच्या दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसला. त्याचा लटका राग म्हणजे उसनं अवसान आहे हे पक्कं ठाऊक असल्यानं तिनं स्मितहास्य करत त्याला खुणावलं, तरी खाली मान घालून हा फुगूनच बसलेला. आज मात्र त्याची कळी खुलवायला तिनं वेगळंच काही मनात बेतलं होतं. तिनं चक्क त्याची आवडती सिगारेट स्वत:च्या पर्समधून काढून त्याच्या ओठांत ठेवली. तरीही तो बधला नाही. मग मंद मंद स्वरात संगीताची टिंगटिंग त्याच्या कानावर आली. तशी नजर वर करून त्यानं पाहिलं तर तिच्या हातात सिगारेट पेटवण्याचा लायटर होता. तिनं पुन्हा लायटर पेटवला. त्यातून तशीच कान सुखावणारी टिंगटिंग ऐकायला आली. त्यानं लायटर हातात घेत न्याहाळून पाहत तो पेटवला. पुन्हा तशीच कर्णमधुर धून. ‘हा लायटर माझ्यासाठीच आहे का’ असं मान हलवत खुणेनंच त्यानं तिला विचारलं. तिनंही ‘होय’ अशी होकारार्थी मान डोलावली. मग लायटर पुनःपुन्हा पेटवत-विझवत तो हवीहवीशी वाटणारी संगीताची ती टिंगटिंग ऐकत राहिला आणि त्यांचा सुखसंवाद सुरू झाला. बराच वेळ निघून गेला. डोळे मिटून झाडाखाली तो पहुडला आहे. असं पाहून ती गुपचूप उठून जाऊ लागली तेव्हा तिच्या गळ्यात टायची फीत टाकून त्यानं तिला अडवलं आणि तो गाऊ लागला ‘अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही...’

प्रेमिकांची अशी भेट घडते तेव्हा गुजगोष्टी करण्यात वेळ कशी सरत जाते ते लक्षात येत नाही. आणखी थोडा वेळ सोबत घालवावा... सहवासाचा आनंद आणखी लुटावा...मनसोक्त गप्पागोष्टी कराव्यात अशीच इच्छा होत राहते.

आतासुद्धा ती निघाली तशी तो आर्जव करतो आहे.

अभी अभी तो आई हो

बहार बन के छाई हो

हवा जरा महक तो ले

नजर जरा बहक तो ले

ये शाम ढल तो ले जरा

ये दिल सॅंभल तो ले जरा

मै थोडी देर जी तो लूँ

नशे के घॅुँट पी तो लूँ

अभी तो कुछ कहा नही

अभी तो कुछ सुना नही

तिच्या येण्यानं आसमंतातला माहोल कसा सुगंधित, उत्साहित झाला आहे...चित्तवृत्ती कशा प्रफुल्लित झाल्या आहेत. वातावरणाला कशी धुंदी चढली आहे. त्या धुंदीची नशा जरा आणखी चाखू दे...आणखी थोडा काळ अशा आनंदातच जगू दे असं तो म्हणतोय. खरंच, अशीच धुंदी चढते अशा भेटी-गाठींतून! नाही का? त्या भेटीतल्या त्याच्या मनोवस्थेचं किती रोमॅंटिक वर्णन केलंय कवी-गीतकार साहिर लुधियानवी यांनी. ती मात्र आपली व्यावहारिक अडचण सांगत्येय...

सितारे झिलमिला उठे

चराग जगमगा उठे

बस अब न मुझ को टोकना

न बढ के राह रोकना

गर मैं रुक गई अभी

तो जा न पाऊँगी कभी

यही कहोगे तुम सदा

के दिल अभी नही भरा

जो खत्म हो किसी जगा

ये ऐसा सिलसिला नही

'दिवेलागण झाली आहे. चांदण्यापण लखलखू लागल्यात. जास्त रात्र झाली तर माझं घरी जाणं अशक्य होईल’ असं सांगत ती निघण्याचा हट्टच करते. तेव्हा, ‘रोज जर तू अशी अर्ध्यावरच निघून जाऊ लागलीस तर पुढं हे प्रेम आपण कसं निभावून नेणार’ असं तो लडिवाळपणे विचारतो. ‘हे माझं गाऱ्हाणं नसून प्रेमळ सांगणं आहे,’ असंही तो सांगतो.

...के जिंदगी की राह में

जवाँ दिलों की चाह में

कई मकाम आएँगे

जो हम को आजमाएँगे

बुरा ना मानो बात का

ये प्यार है, गिला नही

तिन्ही कडव्यांतली प्रत्येक ओळ हळुवार, प्रणयभावनेनं ओथंबलेली अशी लिहून साहिर यांनी या प्रणयगीतातून जणू प्रत्येक प्रेमिकांच्या मनातल्या तरल भावनांनाच हात घातला आहे.

साठ-सत्तरच्या दशकातल्या तरुण-तरुणींचं भावविश्व व्यापून टाकणाऱ्या या काव्यातला गोडवा आजही तितकाच ताजातवाना वाटतो.

एकापाठोपाठ एक अशी वाक्यांची फेक करत महंमद रफी यांनी हे गीत त्यातल्या काव्याला न्याय मिळेल अशा स्वरात गायिलं आहे. प्रेमातला लाडीकपणा, प्रेमासाठी केलेलं आर्जव असं सगळं काही त्यांच्या स्वरातच ऐकलं पाहिजे. ‘...नशे के घॅुँट पी तो लूँ’ या पंक्तीला त्यांनी जीभ जड झाल्यासारखे केलेले उच्चार लाजवाब.

आशा भोसले यांनीही रफी यांना संपूर्ण गाण्यात तितक्याच ताकदीनं साथ दिली आहे.

या दोघांच्या स्वराबरोबरच आणखी एक तिसरा स्वर या गाण्याची लज्जत वाढवतो. तो आहे लायटरमधल्या संगीताची हलकीशी टिंगटिंग. गाणं सुरू होताना, संपताना आणि इंटरल्यूडला वाजणारी ती टिंगटिंग सतत कानात रुंजी घालत राहते. यमन रागाचा गोडवा गाण्याच्या चालीत आहे; पण समर्पक असं हलकंसं संगीत योजून संगीतकार जयदेव यांनी गाणं फार श्रवणीय केलं आहे.

चहाच्या मळ्यात झाडाखाली रुसून बसलेला देव आनंद हळूहळू आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलत जातो आणि ‘अभी न जाओ..’ म्हणताना मान तिरकी करत आपलं ‘ते’ सुपरिचित सुहास्य फेकतो तेव्हा त्याचे चाहते त्याच्यात स्वत:ला पाहतात. पूर्ण बाह्यांचा शर्ट इन केलेला, कॅालरजवळचं शर्टचं बटण लावलेलं आणि डोईवर केसांचा उंच कोंबडा असलेली त्याची स्टाईल तरुणांची ‘फॅशन आयकॉन’ बनली होती. तरुणींसाठी तर तो ‘प्रेमपुजारी’ होताच. मग साधनासारखी शालीन सौंदर्यपरी त्याच्या प्रेमात न पडती तरच नवल. किती निरागस दिसते साधना. ‘बस अब न मुझ को टोकना’ असं म्हणताना ती त्याच्या ओठांवर आपल्या उजव्या हाताचं बोट ठेवते. तशीच पुढं दोन्ही हातांच्या ओंजळीत त्याचा चेहरा धरते. या अशा अभिनयातून तीसुद्धा प्रेमातली आपली उत्कटता व्यक्त करत त्याच्या आर्जवाला प्रतिसाद देते. फार छान अभिनय केलाय साधनानं.

इतक्या सुंदर गाण्याचं इतकं सुंदर टेकिंग कुणी अमरजित नावाचा दिग्दर्शक करू शकतो ‘ये बात हजम नही होती’! गाण्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये चित्रपटाचा कथालेखक विजय आनंद दिसतो. देव आनंदच्या आतली रोमॅंटिक अदाकारी बाहेर काढून प्रेक्षकांना दिमाखदारपणे सादर करणारा तोच एक दिग्दर्शक होता.

सचिनदेव बर्मन यांचे सहायक असलेले जयदेव यांनी संगीत दिलेला हा पहिलाच चित्रपट. या संपूर्ण चित्रपटात लायटरमधल्या त्या संगीताला त्यांनी प्राधान्य दिलं होतं. ‘मै जिंदगी का निभाता चला गया’ या आणखी एका गाण्यात त्यांनी लायटरची तीच सांगीतिक धून वापरली आहे. साठच्या दशकात काडीपेटीतल्या काडीनंच विडी शिलगावणाऱ्यांची संख्या फार मोठी होती. सामान्यांसाठी तर सिगारेट हेच एक अप्रूप होतं. लायटर तर फारच दूर होता. त्यातही हा ‘म्युझिकल लायटर’ तर अप्राप्यच! पण १९६१ च्या ‘हम दोनो’ या सिनेमानं, सिगारेटचा लायटर म्हणजे काय, हे लोकांना दाखवलं खरं.

प्रेमिकांच्या भावविश्वातलं हे एक अजरामर गाणं आहे.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT