Liberty Garden School  esakal
सप्तरंग

शिक्षक अन् मित्र-मैत्रिणींनी दिला संस्काराचा धडा!

Liberty Garden School : शाळेतल्या (School) शिक्षकांकडून मला अपार प्रेम मिळालं.

सकाळ डिजिटल टीम

‘गटी बोर्जेस’ ही आमच्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या त्यातल्या त्यात सुस्थितील मुलगी. तिच्या अंगावर सोन्याचे दागिने असत. ती आम्हा इतर विद्यार्थ्यांपेक्षा धडधाकट आणि उंच. शिवाय स्वभावाने अत्यंत मोकळी-ढाकळी अन् खट्याळ. ती आमचीच नाही, तर शिक्षकांचीही फिरकी घेत असे. कोणाही विद्यार्थ्याला ती सहज जोरदार चापट लावून देत असे, त्यामुळे आम्ही विद्यार्थी तिला वचकूनच असू. ती माझ्या तक्रारी करायला माझ्या घरी येई तेव्हा आईची मात्र खास मैत्रीण असल्यासारखी वागत असे.

विवेक पंडित

शाळेत मला नवीन मित्र भेटला तो विजय पै. विजय पै हा आमच्या वसाहतीपासून दूर हाऊसिंग बोर्डाच्या चाळीमध्ये राहायचा. आमच्यापेक्षाही गरिबीत वाढत होता. त्याची आई डाळवडे करून विकत असे अन् त्यावर आपला संसार चालवत असे. विजय एका टोपलीमध्ये छोटे छोटे डाळवडे घरातूनच घेऊन निघायचा आणि रस्त्यात विकत विकत शाळेत यायचा. डाळवडे हे त्याचं जगण्याचं साधन होतं. मला डाळवडा आवडायचा. म्हणून एक डाळवडा तो लपवून माझ्यासाठी ठेवायचा आणि मी आल्यानंतर पहिल्यांदा माझ्या हातात तो द्यायचा. विजय, अत्यंत हुशार मुलगा. त्याचं वाचन चौफेर होतं. तो हे सगळं कुठून वाचायचा? हे कायम आम्हाला कोडं होते.

शाळेतल्या (School) शिक्षकांकडून मला अपार प्रेम मिळालं. ‘लिबर्टी गार्डन’ शाळेतील (Liberty Garden School) वर्गशिक्षिका हेमलता नाईकही त्यातल्याच. भाईंना सांगून त्यांनी माझं टॉन्सिल्सचं ऑपरेशन करून घेतलं. त्यानंतर चार दिवस त्या आपल्या घरी मला विश्रांतीसाठी घेऊन गेल्या. अक्षरशः आपल्या मुलासारखं त्यांनी मला वागवलं. मुख्याध्यापक सदानंद गाडगीळ म्हणजे चैतन्याचा वाहता झराच... संस्कृतचे फाटक सर आमच्यातील दोष हसत हसत आम्हाला दाखवत. शाळेतील मित्र विजय पै आणि खट्याळ असलेली गटी बोर्जेस यांनीही आम्हाला नकळत जगण्याचा मूलमंत्र दिला.

शिक्षक अन् मित्र-मैत्रिणींनी दिला संस्काराचा धडा!

शाळेतल्या शिक्षकांकडून मला अपार प्रेम मिळालं. ‘लिबर्टी गार्डन’ शाळेतील वर्गशिक्षिका हेमलता नाईकही त्यातल्याच. अक्षरशः आपल्या मुलासारखं त्यांनी मला वागवलं. शाळेत भेटलेला नवीन मित्र विजय पै आणि स्वभावाने अत्यंत मोकळी-ढाकळी अन् खट्याळ असलेली गटी बोर्जेस यांनीही आम्हाला नकळत जगण्याचा मूलमंत्र शिकवला.

लवणी टाऊनशिप शाळेत सातवी झाल्यानंतर आठवीला मला घरापासून सुमारे चार-साडेचार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) ‘लिबर्टी गार्डन’ शाळेत दाखल करण्यात आलं. आमच्या वर्गातील बरीचशी मुलं या शाळेत होती. आमच्या टाऊनशिप शाळेपेक्षा ही शाळा खूपच वेगळी होती. इथे छान इमारत होती. बाजूला बगिचा होता. इथलं वातावरण छान होतं. विशेष म्हणजे, शौचालयाची व्यवस्था चांगली होती.

या शाळेत आठवीला दाखल झाल्यानंतर आम्हाला वर्गशिक्षिका होत्या, हेमलता नाईक. शाळेतल्या शिक्षकांकडून मला अपार प्रेम मिळालं. नाईक बाईही त्यातल्या एक. माझ्या आवाजावरून मला टॉन्सिल्स असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी माझ्या वडिलांसाठी माझ्याकडे एक चिठ्ठी दिली. चिठ्ठी वाचून एक दिवस भाई नाईक बाईंना भेटायला शाळेत आले. नाईक बाईंनी भाईंना अनेक प्रश्न विचारले. त्यावर ‘मला मधून मधून ताप येतो, खोकला होतो’ हे भाईंनी त्यांना सांगितलं. ‘माझी उंची वाढत नाही, याचं कारण टॉन्सिल्स असावेत, याला तपासून घ्या. याचं टॉन्सिल्सचं ऑपरेशन करून घ्या’ असा सल्लाही त्यांनी भाईंना दिला.

मग मुंबई महापालिकेच्या व्ही. टी. स्टेशननजीकच्या ई.एन.टी. हॉस्पिटलमध्ये भाई मला घेऊन गेले आणि नाईक बाईंच्या सल्ल्यानुसार माझं टॉन्सिल्सचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर भाई सांताक्रूझला उतरले तेव्हा मी त्यांना विचारलं, ‘‘भाई, आपण सांताक्रूझला का उतरलो?’’ भाई म्हणाले, ‘‘अरे, तुझ्या बाईंनी मला सक्त ताकीद दिली आहे. ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी तुला आपल्या घरी चार दिवस विश्रांतीसाठी बोलावलंय.’’ मी कारण विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘आपल्या घरी फ्रीज नाहीये आणि चार दिवस तुला दुसरं काही खाता येणार नाही. तुला आईस्क्रीमसारखं काही थंड खावं लागेल. ती सोय आपल्याकडे नसल्याने बाईंनी त्यांच्या घरी तुला राहायला सांगितलंय.’’ मला याचं आश्चर्य वाटलं, की बाईंनी परस्पर भाईंना सांगून माझ्या राहण्याची व्यवस्था त्यांच्याकडे केली होती.

भाई मला वाकोल्याला त्यांच्या घरी घेऊन गेले. अशा प्रशस्त घरात मी पहिल्यांदाच प्रवेश केला होता. ऑफिसर असलेले नाईक बाईंचे पती व नाईक बाई दोघांनी भाईंना सन्मानाने बसवलं. त्यांची विचारपूस केली आणि त्यांना सांगितलं, की ‘‘तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मुलाची काळजी आम्ही आमच्या मुलासारखी घेऊ.’’ भाई निघताना मी भाईंना घट्ट मिठी मारली आणि रडू लागलो. नाईक बाईंनी मला भाईंकडून सोडवून जवळ घेतलं अन् मायेने सांगितलं, ‘‘विवेक, तू माझा मुलगा आहेस. चार दिवसांकरिता तू माझ्याकडे माझा पाहुणा आला आहेस. मी काळजी घेईन तुझी.’’ बाईंच्या मायेने, आस्थेने मी फार अवघडून गेलो होतो. भाईंना मी जड अंतःकरणाने निरोप दिला. नाईक बाईंनी मला त्यांच्या घरातील स्वतंत्र खोली दिली. वाचायला काही पुस्तकं आणून दिली. त्या चार दिवसांत त्या माझ्याशी अनेक विषयांवर बोलल्या. स्वतः जाऊन निरनिराळ्या प्रकारची आईस्क्रीम्स आणून मला खाऊ घातली.

नुकतीच ओळख झालेला मी एक साधा विद्यार्थी अन् त्या सुस्थित घरातून आलेल्या उच्च शिक्षित माध्यमिक शिक्षिका. त्यांनी मला आपल्या घरी बोलवावं, माझी सेवा करावी हे माझ्या मनाला कुठेतरी खात होतं, की मी असं बाईंसाठी काय केलं आहे? पण तरीही बाई माझ्यासाठी करतात. त्या चार दिवसांत बाईंनी माझं खूप कौतुक केलं. चार-पाच दिवसांत मी नेहमीसारखं खाऊ लागलो अन् माझा तापही कमी झाला. मग बाई स्वतः मला शाळेत घेऊन आल्या. भाई मला घेण्यासाठी शाळेत आले. भाईंनी हात जोडून बाईंचे आभार मानले, की ‘‘तुम्ही माझ्या मुलाची इतकी काळजी घेतली. मी तुमचे हे ऋण जन्मभर विसरणार नाही.’’ बाईंनी मला जवळ घेऊन सांगितलं, ‘‘मला सर्व विद्यार्थी माझ्या मुलांसारखेच आहेत. माझ्या एखाद्या मुलाला आजार असेल तर मी त्याची काळजी घ्यायची नाही तर कुणी? मी माझं कर्तव्य केलं.’’

शाळेत वार्षिक संमेलन व्हायचं. या वार्षिक कार्यक्रमाकरिता बाईंनी नाटक बसवून घेतलं. एकांकिका होती, धर्मवीर राजे संभाजी... छत्रपती संभाजी राजेंच्या अखेरच्या छळाची कथा. मुख्यतः औरंगजेब आणि संभाजी यांचे प्रखर संवाद असणारी. संभाजी राजे प्रखर, राष्ट्राभिमानी, धर्माभिमानी व्यक्तिमत्त्व... बाईंनी मला संभाजींची भूमिका करण्यास सांगितलं. संभाजींच्या तोंडी असणारे संवाद, बरीचशी स्वगतं मी पाठ केली. आमच्या सतत तालमी झाल्या. त्या वार्षिक कार्यक्रमात ‘धर्मवीर राजा संभाजी’ या आमच्या एकांकिकेला प्रथम पुरस्कार मिळाला.

Liberty Garden School

दौलत शिक्षण संस्था ही एका वर्षापूर्वीच मालवणी टाऊनशिप शाळेत सुरू झाली होती. त्याची तात्पुरती शाळा मी जिथे शाळेत शिकलो त्या चाळीमध्येच होती. दौलत शिक्षण संस्थेला आम्ही राहत होतो. त्याच्यावरच खारोडीला एका डोंगरावर दगडांच्या खाणी असलेल्या भागात शाळेसाठी एक जागा मिळाली होती. तिथे शाळा बांधण्याचं काम सुरू होतं. त्या शाळेचे शिक्षक मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करीत. अनंत वामन ठाकूर आणि त्यांची पत्नी या दोघांनी मिळून दौलत शिक्षण संस्था सुरू केली होती. दौलत हे त्यावेळचे शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांचं नाव... त्या शाळेचे मुख्याध्यापक सदानंद गाडगीळ होते. ते आमच्या महापालिकेच्या वसाहतीत मुलांना शाळेत आणण्यासाठी फिरत. माझ्या बरोबरीच्या मित्रांच्या घरीही ते गेले आणि भाईंना त्यांनी समजावलं, की ‘‘ही शाळा जवळ आहे. आम्ही सारे शिक्षकही चांगले आहोत. तुमच्या मुलाला इथे दाखल करा.’’ भाईंनीही त्याला होकार दिला. अखेर मी दौलत शिक्षण संस्थेच्या शाळेत दाखल झालो.

या शाळेची नवी इमारत खारोडीला उभी राहत होती. त्याच्या बांधकामासाठी आम्ही विद्यार्थ्यांनी दगड उचलून आणणं, रेती वाहणं ही सगळी श्रमाची कामं आनंदाने केली. शाळेला निधी जमा करण्याकरितासुद्धा आम्ही विद्यार्थी वणवण फिरलो. शाळेच्या निधी उभारणीसाठी सुलोचना चव्हाण यांचा खास लावण्यांचा कार्यक्रमसुद्धा मालवणीच्या शाळेजवळ आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाची तिकीटविक्रीसुद्धा आम्ही मुलांनी आनंदाने केली आणि अखेर आमची शाळा उभी राहिली. आम्ही त्या शाळेत जाऊ लागलो. नववी ते अकरावी मी दौलत शिक्षण संस्थेच्या या शाळेत शिकलो. शाळा नवीन होती; पण साधी होती; मात्र शिक्षक अव्वल दर्जाचे होते. काही निवृत्त शिक्षकही होते. तेसुद्धा त्यांच्या प्रकृतीला पेलत नसतानाही आम्हा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान देण्यासाठी झटत होते.

मुख्याध्यापक सदानंद गाडगीळ म्हणजे चैतन्याचा वाहता झराच... ते शांत क्वचितच दिसत. सतत इथून तिथे फेऱ्या मारणं आणि उजव्या हाताचं एक बोट वर करून त्यांच्या नवनवीन कल्पना इतरांना सांगणं, हे त्यांचं नित्याचं! अनेकविध कल्पनांचं भांडार होतं त्यांच्याकडे. ते हिंदीचे विशारद. हिंदी भाषेवर त्यांचं प्रभुत्व. मराठी आणि संस्कृत विषयही ते तितक्याच तन्मयतेने शिकवत. ते खूप मनमिळावू आणि विद्यार्थिप्रिय होते. त्यांचे हिंदीतील कार्यक्रम आकाशवाणीवर होत. त्या वेळेस ते मला त्यांचा विद्यार्थी म्हणून आकाशवाणीवर घेऊन जात. माझी तयारी करून घेत. त्यांनी जे नभोनाट्य लिहिलेलं ते आकाशवाणीवर कसं वाचायचं ते शिकवत. समोर फक्त माईक. दुसरं कुणी ऐकणारं नाही; परंतु आपल्या आवाजातून अभिनय कसा करायचा, याचं कौशल्य मला त्यांनी शिकवलं आणि हिंदीचे अनेक पाठ जे शाळांसाठी प्रसारित होत, त्यात त्यांनी मला सहभागी करून घेतलं. गाडगीळ सरांनी मला आवाजाच्या चढ-उतारातून अभिनय कसा करायचा, याचं शिक्षण दिलं.

आमच्या शाळेत विज्ञान शिकवायला निवृत्त झालेले फाटक सर होते. वजनाने अत्यंत स्थूल. अतिशय संथ गतीने पावलं टाकणारे. तोंडात सतत पानाचा तोबरा भरलेला. वर्गामध्ये ते क्वचितच उभे राहत. ते खुर्चीवर बसत आणि उजव्या-डाव्या दोन्ही हातांनी मागे असलेल्या फळ्यावर लिहीत. आम्हाला याचं आश्चर्य वाटे, की सर पुढे बघून मागच्या फळ्यावर दोन्ही हातांनी कसं बरं लिहीत असतील? आणि तेही सुवाच्य! पस्तीस मिनिटांपैकी वीस मिनिटांत विज्ञानाचा धडा जितका आवश्यक असेल तेवढाच ते शिकवत आणि राहिलेल्या दहा-पंधरा मिनिटांत ते आम्हा मुलांना विचारत, ‘‘आता तुम्हाला कोणत्याही विषयात दुसरं काय विचारायचं असेल तर विचारा. कोणत्याही विषयी... आपण विज्ञान वीस मिनिटं करूया. उरलेली दहा-पंधरा मिनिटं अवांतर विचारा, मी त्या विषयावर माहिती देतो.’’ मग आम्ही कोणत्याही विषयाची माहिती त्यांना विचारत असू आणि ते तितक्याच तत्परतेने आम्हाला ती देत असत.

संस्कृतच्या सुभाषितांमध्ये नसलेले अनेक श्लोक, अनेक सुभाषितं फाटक सरांनी आम्हाला शिकवली. त्यातलं एक मला आजही आठवतं. त्यांनी संस्कृतमध्ये एक कोडं घातलं होतं आम्हाला. आम्हाला त्याचं उत्तर काही केल्या आलं नाही.

कोडं असं होतं-

‘उच्छिष्टम्, शिव निर्माल्यम्, वमनम्, शव कर्पटः

काकविष्ठा समुत्पन्ना पंचयतेती पवित्रकः’

आम्हाला उत्तर न आल्याने फाटक सरांनीच याचं उत्तर समजावून सांगितलं, ‘‘धर्मामध्ये पाच गोष्टी पवित्र मानल्या जातात. वमन म्हणजे उलटी... उच्छिष्ट म्हणजे उष्टं... शिवनिर्माल्य म्हणजे शंकराच्या डोक्यावरचं निर्माल्य... शव कर्पटः म्हणजे शवाच्या भोवती गुंडाळलेलं वस्त्र म्हणजे कफन, काकविष्ठा म्हणजे कावळ्याच्या विष्ठेतून उत्पन्न झालेलं. या पाच गोष्टी हिंदू धर्मात पवित्र आहेत...’ मग वर्गातल्या कुणी तरी विचारलं, ‘‘सर, हे तर अपवित्र समजले जातात, मग हे पवित्र कसं?’’ त्यावर त्यांनी आम्हाला समजावून दिलं, ‘‘गायीचं दूध काढण्यापूर्वी वासराला पाजलं जातं, त्यामुळे दूध उष्टं होतं; पण दूध तर पवित्र आहे. शंकराच्या डोक्यावरचं निर्माल्य म्हणजे गंगा; पण गंगा तर पवित्र आहे. मधमाशी मध जमा करताना उलटी करते, त्यातून मध तयार होतं; परंतु मध पवित्र आहे. रेशमाचा किडा मेल्याशिवाय रेशीम येत नाही; पण रेशीम पवित्र आहे. वड-पिंपळ लावण्यापेक्षा कावळ्याच्या विष्ठेतूनच ही झाडं निर्माण होतात, ती पवित्र आहेत.’’ अशा पद्धतीचे संस्कृतमधले अनेक दाखले फाटक सर आम्हाला देत. ते आमच्यातील दोष हसत हसत आम्हाला दाखवत. वर्गावरचा तास संपला आणि दुसऱ्या वर्गावर तास नसला, की शिक्षकांच्या खोलीमध्ये फाटक सर बसल्या बसल्या झोप काढत, त्यांना कोणी त्यात बाधा आणलेली आवडत नसे.

या शाळेत मला नवीन मित्र भेटला तो विजय पै. विजय पै हा आमच्या वसाहतीपासून दूर हाऊसिंग बोर्डाच्या चाळीमध्ये राहायचा. आमच्यापेक्षाही गरिबीत वाढत होता. त्याची आई डाळवडे करून विकत असे अन् त्यावर आपला संसार चालवत असे. विजय एका टोपलीमध्ये छोटे छोटे डाळवडे घरातूनच घेऊन निघायचा आणि रस्त्यात विकत विकत शाळेत यायचा. कुटुंबाला त्याचा तेवढाच हातभार. डाळवडे हे त्याचं जगण्याचं साधन होतं. मला डाळवडा आवडायचा. म्हणून एक डाळवडा तो लपवून माझ्यासाठी ठेवायचा आणि मी आल्यानंतर पहिल्यांदा माझ्या हातात तो द्यायचा. विजय, अत्यंत हुशार मुलगा. त्याचं वाचन चौफेर होतं. तो हे सगळं कुठून वाचायचा? हे कायम आम्हाला कोडं होते. त्याचं मराठी व्याकरणही सर्वोत्तम होतं. त्यामुळे वर्गावर येताना शिक्षक, ‘‘आता विजय काय विचारणार?’’ या धास्तीनेच येत. विजयचे प्रश्न ठरलेलेच असत. आमच्या मित्रांमध्ये विजय हा एक चतुरस्र विद्यार्थी आहे, याचं आम्हा सर्वांनाच कौतुक वाटत असे.

‘गटी बोर्जेस’ ही आमच्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या त्यातल्या त्यात सुस्थितील मुलगी. तिच्या अंगावर सोन्याचे दागिने असत. ती आम्हा इतर विद्यार्थ्यांपेक्षा धडधाकट आणि उंच. शिवाय स्वभावाने अत्यंत मोकळी-ढाकळी अन् खट्याळ. ती आमचीच नाही, तर शिक्षकांचीही फिरकी घेत असे. कोणाही विद्यार्थ्याला ती सहज जोरदार चापट लावून देत असे, त्यामुळे आम्ही विद्यार्थी तिला वचकूनच असू. ती माझ्या तक्रारी करायला माझ्या घरी येई तेव्हा आईची मात्र खास मैत्रीण असल्यासारखी वागत असे. तिच्या रोजच्या माराला कंटाळून एकदा वर्गावर कोणी शिक्षक नसताना आम्ही विद्यार्थ्यांनी तिच्या पाठीवर चार फटके दिले. तिला त्याचा राग आला आणि धक्काही बसला. कारण आम्ही इतकी हिंमत करू, असे तिच्या ध्यानीमनीही नव्हते. तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. अंगावरचे सगळे दागिने काढून गटीने टेबलावर ठेवले. वर्गाच्या मागे असलेल्या खिडकीकडे धावत गेली. शाळेच्या मागे शाळेच्या बांधकामाचं काम सुरू होतं. तिथल्या मोठ्या खिडकीला गज नव्हते.

त्या खिडकीवर चढून ती आम्हाला म्हणाली, ‘‘मी चालले आता मरायला...’’ आणि धावत सुटली. शाळेच्या मागे बंद पडलेल्या दगडाच्या खाणी होत्या. त्यात पाणी साचून त्याचे तलाव झाले होते. त्यापैकी एका तलावाजवळ उभं राहून, ‘‘आता तुम्ही मजा करा, मी जीव देणार...’’ असं म्हणत तिने तलावात उडी घेतली. आमची पाचावरच धारण बसली. आमच्यापैकी काही जण भीत-भीत शिक्षकांना सांगण्यास गेले, तर आम्ही मुलं तलावाच्या दिशेने पळालो. ती पाण्यात पडल्याचा आवाज आल्याने इतर वर्गातली मुलं खिडकीतून तलावाकडे धावली. तलावाजवळ पोहोचलो, तर गटी तलावाच्या पाण्यात निवांत बसली होती... त्या तलावात कंबरभरसुद्धा पाणी नव्हतं. (क्रमशः)

(लेखक सामाजिक कार्यकर्ते आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT