जयवंत दळवी यांनी संपादीत केलेलं `पुलं एक साठवण` पुलंच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करायचं ठरलं होतं. या निमित्ताने एक मोठी संगीत मैफल व्हावी असा प्रयत्न होता साऱ्यांचा. पण पुलंनी साफ विरोध केला त्याला. वाढदिवसाचा इतका मोठा घाट घालायचा नाही असं सांगून. मुळात असं पुस्तक काढायलाही त्यांचा विरोधच होता. जयवंत दळवींनी आपलं लेखन सोडून (त्यावेळी त्यांचं ठणठणपाळ कमालीचं गाजत होतं) इतका काळ केवळ संपादनात घालवावा हेच त्यांना पटत नव्हतं. पण जेव्हा ते पुस्तक पूर्ण झालं तेव्हा मात्र त्यांनी दळवी आणि वसंत सरवटे यांचे मुक्तकंठाने कौतुकही केलं. अर्थात, पुस्तकही झालंच होतं कौतुक करण्यासारखं.
पुलंचे अनेक अप्रकाशित पैलु या साठवणीत दिसले. पण त्यांनी मात्र `मैफिलीत सोबतीला थिरकवाँ आणि गोविंदराव टेंबे असतील तर मैफल रंगणारच` असं म्हणत या उत्तम पुस्तकाचं श्रेय या दोघांनाच दिलं होतं.
आत्मचरित्र लिहायचं नाही असं ठरवूनच टाकलं होतं त्यांनी. त्यामुळे त्यांचं समग्र आयुष्य एका नजरेत पहाण्याची संधी नाही. (नाही म्हणायला, अपुर्वाई, पुर्वरंग, जावे त्यांच्या देशा ही त्यांची प्रवासवर्णनं अंशतः आत्मचरित्रं म्हणायला हवीत, कारण ही पुस्तकं जेव्हा आली, तेव्हा ते स्वतःच म्हणाले होते, या पुस्तकात, प्रवासातल्या `मी`चं वर्णन असल्याने हे काहीसं आत्मचरित्रपरच झालंय! ...यातली गंमत द्या सोडून, पण) त्यांच्या पुस्तकातून, भाषणातून आणि त्यांच्या पत्रलेखनातूनच त्यांच्या बहुरंगीपणाची चकीत करणारी माहिती मिळत जाते. पुलं एक साठवणमध्ये जयवंत दळवींनी त्यांचे हे सारे चकीत करणारे रंग टिपले जातील याची काळजी घेतली होतीच. त्यातून पुलंचं थोरपण नीटच उभं राहीलं होतं.
या पुस्तकानंतर काही वर्षांनी सुनिताबाईंचं `आहे मनोहर तरी` आलं. प्रांजळपणे आपल्या पतीबद्दल, (आणि स्वतःबद्दलही) लिहिल्या गेलेल्या या पुस्तकाने पुलं भक्तांना मोठा धक्का दिला असला तरी खुद्द पुलंनी ते फार ग्रेसफुली स्वीकारलं होतं.
कधी वाटतं हे पुस्तक, `पुलं एक साठवण` पुर्वी आलं असतं, तर साठवणमध्ये पुलंचं हे माणूसपणही उतरलं असतं? किंवा सुनिताबाईंनी स्वतःच `साठवण` मध्ये पुलंबद्दल लिहिलं असतं तर ते असंच असलं असतं?
हे सगळं मनात आलं ते `भाई` हा महेश मांजरेकरांचा सिनेमा पाहून. पुलं एक साठवणं ने पुलंचं सारे गुणं, त्यांचं बहुआयामी असणं नीटच मांडल होतं. या चित्रपटातही ते काही प्रमाणात जाणवतात पण त्याहीपेक्षा ते एक माणूस प्राधान्याने येतात समोर. सिनेमा मांडताना त्याला सुरुवात-मध्य-शेवट असणं अपेक्षित असतं. भाईमध्ये रुढार्थाने ते नाही. अनपेक्षित कलाटणी नाही. (आयुष्य खुली किताब असल्याने !)
यापुर्वीचे काही चरितपट पाहिले तर थोडी-फार (खरंतर फारच) सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली जाणवली होती. पण भाईच्या पुर्वाधामध्ये तरी, `जे आहे, जसं आहे` तसं मांडण्याचा प्रयत्न जाणवला. पुलं या नावामुळे खो खो हसण्याच्या तयारीने आलेल्यांचा हा सिनेमा कदाचित काहीसा विरस करेल, पण पुलंना एक वल्ली नव्हे तर व्यक्ती म्हणून जाणणाऱ्यांचा अपेक्षाभंग नाही करणार.
एका मोठ्या व्यक्तीमत्वाला दोन अडीज तासात पेश करणं ही खरंच कठीण गोष्ट. त्यातून लोकप्रिय आणि अलिकडच्या इतिहासातला नायक असेल तर त्याच्यासोबत इतर व्यक्तित्वांची मांडणी ही आणखी कौशल्याची गोष्ट. पण भाई ही मुख्य भुमिका करणारा सागर देशमुख सोडला तर इतर कलाकारांतून (कॅरिकेचर, किंवा अगदी काॅपी टू काॅपी व्यक्तिमत्व उभं न करता) त्या त्या व्यक्तिमत्वाचा भास व्हावा इतपतच त्या व्यक्तिरेखा दिग्दर्शकानं मांडल्यात.
महाराष्ट्राच्या एका लाडक्या व्यक्तिमत्वाचा हा जीवनपट पडद्यावर नीट दिसण्याचं श्रेय दिग्दर्शक महेश मांजरेकरांबरोबर पटकथा-संवाद लिहिणाऱ्या गणेश मतकरी आणि रत्नाकर मतकरी या पितापुत्रांना जातं. इतका मोठा आवाका काही सिन्समध्ये आवरणं आणि पुलंच्या खऱ्या-खोट्या कोट्या खपवण्याचा मोह टाळणं त्यांनी शक्य करून दाखवलंय.
त्यामुळेच पुलं आवडणाऱ्यांनी हा सिनेमा आवर्जून पहावाच, पण त्यांचं साहित्यिक असणं नाकारणाऱ्यांनीही मुद्दाम पहावा... कारण त्यांचं लेखक असणं नाकारता येईलही हो तुम्हाला, पण त्यांच्यातला आसूसून जगण्याची आस असलेला एका मध्यमवर्गीय सच्चा माणूस आणि उत्तम गुणग्राहक डोळे, कान आणि गाता गळा असलेला गुणवंत सच्चा रसिक नाकारूच शकणार नाही तुम्ही...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.