Shri Shivray Books Sakal
सप्तरंग

शिवरायांच्या कर्तृत्वाचा वेगळ्या नजरेतून वेध...

छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त देशवासीयांचे प्रेरणास्थान आहे. शिवरायांच्या चरित्रातून अनेकांना विविध कामांमध्ये स्फूर्ती मिळाली आहे.

प्रतिनिधी saptrang@esakal.com

छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त देशवासीयांचे प्रेरणास्थान आहे. शिवरायांच्या चरित्रातून अनेकांना विविध कामांमध्ये स्फूर्ती मिळाली आहे. शिवरायांबद्दल विविध ठिकाणी संशोधन सुरू आहे. शिवरायांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात इतक्‍या विविध क्षेत्रांमध्ये मूलभूत काम केले, की आजही त्या कामांची माहिती घेतली तरी मन थक्क होते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ युद्ध किंवा ऐतिहासिक विविध घटनांचा मागोवा असे नाही.

डॉ. अजित वामन आपटे यांनी छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा वेगळ्याच पद्धतीने शोध घेतला आहे. शिवरायांच्या विविध पैलूंचा अभ्यास करताना त्यांनी तीन पुस्तके लिहिली आहेत. त्यामध्ये शिवराय एखाद्या कंपनीचे व्यवस्थापक आणि मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख असते तर त्यांनी काय केले असते, असा विचार करून त्यांनी लेखन केले आहे. या पुस्तकापूर्वी त्यांनी मुलकी व्यवस्थापनामध्ये शिवरायांनी प्रशासकीय कामकाजाच्या वेगवेगळ्या पद्धती कशा विकसित केल्या याबद्दल विस्ताराने एक पुस्तक लिहिले आहे. या दोन गोष्टींबरोबरच आपटे यांनी शिवरायांचे अर्थकारण कसे होते याचा वेध घेणारे अर्थव्यवहाराबद्दलचे वेगळे पुस्तक लिहिले आहे. केवळ वेगवेगळ्या मोहिमा किंवा मोगली सत्तेला केवळ रणांगणात आव्हान न देता, योग्य असे राज्य उभे करणे याला शिवरायांनी प्राधान्य दिले. राज्याचे आर्थिक गणित योग्य असेल तर राज्य पुढे टिकू शकते हे त्यांनी ओळखलेले होते. त्यामुळे त्यावर त्यांनी भर दिला.

वतनदारी पद्धत त्यांनी मोडून काढली. शिवाजी महाराजांनी जी अर्थव्यवस्था उभारली ती आजही अनेकांना प्रेरणा देणारी व त्यातून बरेच काही शिकता येणारी अशी आहे. दहा प्रकरणांमध्ये आपटे यांनी या अर्थव्यवस्थेची योग्य प्रकारे ओळख करून दिली आहे. शिवरायांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी जेव्हा सूत्रे स्वीकारली त्या वेळी मराठी राज्याच्या तिजोरीत नऊ कोटी रुपयांची चांदीची नाणी, ५१ हजार तोळे सोने होते. माणिक, मोती, हिरे यांचाही साठा मोठ्या प्रमाणात होता. त्याचबरोबर विविध गडांवर कापड, शस्त्रास्त्रे आणि अन्नधान्यदेखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. महाराजांनी ज्या पद्धतीने कारभार केला होता त्यामुळे ही सुबत्ता निर्माण झालेली होती. महाराजांनी राज्याच्या उत्पन्नासाठी प्रत्येकाला कर भरावा लागेल अशी व्यवस्था केलेली होती. त्याचबरोबर राज्यकारभारात पैशाची बचत कशी करता येईल याकडेही त्यांनी लक्ष दिलेले होते. विविध ठिकाणच्या मोहिमांतून मिळालेल्या पैशांचा साठा त्यांनी राज्यकारभारासाठी अत्यंत कसोशीने वापरला. महाराजांनी आपल्या राज्यकारभारात राजकारण व अर्थकारण हे हातात हात घालून चालेल याकडे लक्ष दिले. व्यापारवृद्धीशिवाय राज्य भरभराटीला येणार नाही याची त्यांना खात्री होती.

त्यासाठी त्यांनी व्यापाऱ्यांना अनेक सोयी-सवलती व जकातीत सूट दिल्याची उदाहरणे आढळतात. त्यांनी आपल्या हाताखालच्या कारभाऱ्यांशी जो पत्रव्यवहार केला आहे त्यामध्ये त्यांची ही दृष्टी जाणवते. सागरी मार्गावरदेखील वर्चस्वासाठी आणि सागरी व्यापाराचे महत्त्व त्यांना पटल्यामुळे त्यांनी बुलंद असे आरमार उभे केले होते. महाराजांनी राज्यात जे-जे किल्ले उभारले तेथेदेखील आर्थिक बाबी परिपूर्ण असतील याकडे लक्ष दिले. त्यामुळे गडावर बाजारपेठ उभारण्यास किंवा गडाच्या पायथ्याशी परिसरातल्या नागरिकांसाठी बाजारपेठ कशी विकसित होईल याकडेही लक्ष दिले. मोहिमांमधून आलेल्या पैशांचा काटेकोर हिशेब व उत्पन्नाचा मेळ घालत त्याच्या वापरामध्ये नेमकेपणा हे महाराजांनी कायम पथ्य पाळले. शेती असो किंवा व्यापाराचे व्यवस्थापन असो, महाराजांनी त्याकडे जाणीवपूर्वक नेमके लक्ष दिले. त्याचबरोबर अर्थव्यवस्थापनेला त्यांनी मानवी चेहरा दिला होता. त्यांच्या रयतेला त्रास न होता राज्याच्या तिजोरीत उत्पन्न योग्यप्रमाणे येईल याकडे त्यांचे लक्ष असे. त्यामुळे विशेष कामगिरीकरिता विशेष बक्षीस किंवा जखमी झालेल्यांना तातडीने मदत अशा गोष्टी त्या काळात त्यांनी राबविल्या. इंग्रजांबरोबर राजकीय वितुष्ट असले, तरी त्यांच्याबरोबर व्यापार करूनही त्यांनी राज्याचा फायदा करून दिला.

महाराजांनी केवळ अर्थविषयक बाबींकडे लक्ष दिले असे नाही, तर स्वराज्याच्या मोठ्या कार्यात जास्तीत जास्त लोक कसे जोडले जातील याकडे बघितले. महाराजांच्या कारकिर्दीत आदर्श प्रशासन कसे असावे याचा मोठा नमुना तयार झाला. जमीन महसूल असो किंवा विविध पदांवरची वेगवेगळी माणसे असोत, महाराजांनी योग्य त्या पद्धतीने माणसांची नियुक्ती केली आणि त्यांच्याकडून काम करून घेतले. आपल्या अडचणी, दुःख हे त्यावेळी त्यांनी बाजूला ठेवले.

आपटे यांनी महाराजांचे मुलकी व्यवस्थापन कसे होते हे बारा प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या उदाहरणांतून स्पष्ट केले आहे. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जनतेला जाणवले पाहिजे यासाठी शिवरायांनी प्रचंड मेहनत घेतली. जनतेची काळजी कशी घ्यायची यासाठी त्यांनी जी आज्ञापत्रे लिहिली आहेत, ती आजही मार्गदर्शक ठरतील अशी आहेत. या आज्ञापत्रांचा तसेच विविध दप्तरांचा अभ्यास करून महाराजांनी मुलकी व्यवस्था कशी केली होती याची तपशीलवार माहिती आपटे यांनी दिली आहे.

श्री शिवराय VP HRD या पुस्तकात महाराजांनी माणसे हेरणे, पारखणे व जोडणे हे कसे केले त्याची अनेक उदाहरणे दिली आहेत. राज्याभिषेकाच्या तयारीवेळी सरनौबत प्रतापराव गुजर मारले गेले त्या वेळी महाराजांच्या एका पत्नीचेही निधन झाले होते. राज्यकारभारात आणि कौटुंबिक पातळीवर अशा दुःखद घटना घडलेल्या असतानाही महाराजांनी नव्या सरनौबतपदाची वस्त्रे हंसाजी मोहिते यांना देऊन त्यांचे हंबीरराव असे नामकरण केले. हंबीररावांची अचूक निवड त्यांनी अत्यंत तणावग्रस्त परिस्थिती असताना केली हे लक्षात घेतल्यावर महाराजांनी मनुष्यबळ व्यवस्थापन कसे केले हे लक्षात येते. नेताजी पालकरांना त्यांनी स्वराज्याशी किती योग्य पद्धतीने जोडून घेतले होते त्यावरून महाराज मानवी गुणांना किती महत्त्व देत होते आणि त्याचे व्यवस्थापन करताना योग्य तिथे लवचिक धोरण कसे स्वीकारत होते ते लक्षात येते. कडक शिस्त आणि आदर्श मूल्य व्यवस्था यांचा समन्वय त्यांनी नेमकेपणाने सांभाळलेला होता.

आपटे यांच्या या तीन पुस्तकांमध्ये छत्रपती शिवरायांना एखाद्या दैवताप्रमाणे मानलेले नाही. शिवरायांचे कर्तृत्व इतके मोठे होते, की ते आपोआपच दैवताच्या पातळीवर गेले; पण ते मुत्सद्दी राजकारणी होते, धुरंधर सेनानी होते आणि रयतेचे अपत्यवत पालन करणारे राज्यकर्ते होते. महाराजांच्या ठायी असलेल्या या गुणांचाच मागोवा आपटे यांनी या तीन पुस्तकांमधून घेतला आहे. एखाद्या व्यक्तीचे दैवतीकरण केले, की त्यांचे गुण आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात कसे आचरणात येतील याबद्दलची विचारप्रक्रिया बंद होते. ही विचारप्रक्रिया थांबू नये यासाठी ही तिन्ही पुस्तके प्रेरणा देतात आणि महाराजांच्या बुलंद कर्तृत्ववान अशा आयुष्यातून आपल्याला काय घेता येईल याबद्दल नेमकेपणाने सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wardha Vidhan Sabha Voting: वर्ध्यात निलेश कराळे मास्तरांना मारहाण; Video Viral

Assembly Election: मतदानासाठी केंद्रावर आले, मतपेटीवरील बटन दाबताच... गावात हळहळ, काय घडलं?

Stock Market: महाराष्ट्र विधानसभा निकालांचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? बाजार वाढणार की कोसळणार?

Beed Election Voting: बीडमध्ये उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू; अपक्ष उमेदवाराच्या मृत्यूने हळहळ

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: ऐरोली विधानसभेत कोपरखैरणे विभागात मोठा राडा

SCROLL FOR NEXT