पोलिस खात्यावरून महाराष्ट्रात रोज गदारोळ सुरू असताना एक मराठी पोलिस अधिकारी ईशान्य भारतामध्ये सकारात्मक चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. महाराष्ट्राने आणि तमाम मराठी तरुण-तरुणींनी दखल घेण्याजोगी ही बाब...
‘पायाला गोळी लागली होती, प्रचंड वेदना होत होत्या. बॉडीगार्ड शेजारी मृतावस्थेत पडला होता. मन शांत ठेवत सूचना देत होतो. कारण मीच खचलो तर त्याचा सर्व कारवाईवर परिणाम झाला असता. पंचेचाळीस मिनिटे घटनास्थळी तशाच अवस्थेत होतो. आजही ती गोळी पायात आहे. ती यथावकाश निघेल, परंतु मनातील खंबीरतेची गोळी मात्र कायम राहणार आहे....’’ आसाममधील कछरचे पोलिस अधीक्षक वैभव निंबाळकर सांगत होते.
आसाम आणि मिझोराम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कछर जिल्ह्यातील गोळीबाराच्या घटनेबाबत त्यांनी प्रथमच माहिती दिली. निंबाळकर यांच्यावर पुण्यात उपचार सुरू असून काही शस्त्रक्रियाही झाल्या आहेत. त्यांना भेटलो त्यावेळी ते अत्यंत उत्साहित होते. गेल्या १२ वर्षांपासून ईशान्य भारतातील अनेक जिल्ह्यांतून त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. या घटनेबद्दल आणि बारा वर्षाच्या कारकिर्दीबद्दल निंबाळकर यांनी ‘सकाळ’बरोबर आठवणी जागविल्या.
“गोळीबार का आणि कोणी सुरू केला हेच समजले नाही,” असे सांगत निंबाळकर म्हणाले, “अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू होती. जिल्हाधिकारी, जिल्हा वन अधिकारी यांना याबाबत सूचित करण्याचे काम सुरू होते. हळूहळू लोक जमा व्हायला लागले. अचानक दुसऱ्या बाजूने गोळीबार सुरू झाला. त्यामध्ये माझ्या गनमनसह सहाजणांचा जीव गेला. गोळीबार का सुरू झाला हेही समजत नव्हते. माझ्या पायात गोळी घुसली. परंतु टिमलीडर म्हणून धैर्य गमावून बसणे त्याक्षणी योग्य नव्हते. त्याही परिस्थितीत टिमला सूचना देत होतो. सुमारे पंचेचाळीस मिनिटे गोळीबार सुरू होता. त्यानंतर सीआरपीएफची बुलेट प्रूफ व्हॅन आली आणि माझ्यासह अन्य जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. सुमारे अडीच तासांनंतर उपचारास सुरुवात झाली.”
ते म्हणाले, “गोळी लागली त्यावेळी जिवाचे काय होईल या चिंतेपेक्षा सहकाऱ्यांना काय झाले असेल का याची काळजी अधिक होती. घटनास्थळी सेनापतीने असणे गरजेचे होते, याची जाणीव होती. मनात छत्रपती शिवाजी महाराजांचे भाव प्रकट झाले. सकारात्मक विचार केल्यामुळे त्या प्रसंगातून निभावून जाता आले. आत्तापर्यंत एकूण दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. गोळी अजूनही पायात आहे.’’ निंबाळकर सांगत होते.
‘ईशान्य भारत खरोखरच निसर्गसंपन्न आहे,’’ असे सांगत निंबाळकर म्हणाले, ‘‘याठिकाणी अनेक चालीरिती आहेत. अनेक वेगवेगळी आव्हानांना सामोरे जावे लागते. या ठिकाणच्या लोकांची स्वीकारार्ह शक्ती मोठी आहे. येथील समाज जीवनात महिलांचे स्थान मोठे आहे. या भागात चांगल्या अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. लोकाभिमुख प्रशासन दिल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.’’
निंबाळकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात ईशान्य भारतातून झाली. मराठी साहित्य हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय होता. ईशान्य भारतात गेल्यावर त्यांनी प्रथम आसामी भाषा शिकून घेतली. ते आसामी भाषेत सहजतेने संवाद साधतात. त्याचा कामकाजावर वेगळाच परिमाण दिसतो, असेही ते नोंदवतात.
सल्ला स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना!
स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी अगदी किरकोळ समस्यांनी वैफल्यग्रस्त होतात, ते टाळले पाहिजे. परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणींहूनही मोठ्या अडचणी प्रत्यक्ष नोकरीत येत असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत चित्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. एककल्ली विचार करणे टाळता यायला हवं. लोकहितासाठी सेवेत येणार असल्याची जाणीव कायम असायला हवी. केवळ परीक्षेसाठी अभ्यास न करता अभ्यासाचा आनंद घेत जगण्याचे प्रश्न सोडविण्याची उत्तरं शोधण्यासाठी अभ्यास करायला हवा, असेही निंबाळकर यांनी सांगितले.
आदर्श निर्माण करणारी कार्यसूत्री
अंधश्रद्धेचा प्रचंड पगड्यामुळे आसाममध्ये चेटकीण, तिच्या कारवाया यावर लोक विश्वास ठेवतात. लोकांमधील अंधश्रद्धा कमी होण्यासाठी निंबाळकर चक्क चेटकीण ठरवून बहिष्कृत केलेल्या महिलेच्या घरात गेले. तिच्या हातचा चहा पीत समाजाचे प्रबोधन केले. कायदेशीर कारवाईपेक्षा याचा सकारात्मक परिणाम झाला, असा त्यांचा अनुभव आहे.
सामान्य माणूस पोलिस ठाण्यात येण्यास कचरतो. हे लक्षात घेऊन निंबाळकरांनी ओपन ऑफिस प्रक्रिया (मुक्त प्रवेश) राबविली. सामान्य माणूस कोणत्याही पूर्वपरवानगी, चिठ्ठीशिवाय जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटू शकत असल्याचा चांगला परिणाम झाला.
बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करत व्हॉटसअॅद्वारे सामान्य नागरिकांशी थेट संपर्क साधायला त्यांनी सुरुवात केली.
व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी करण्यासाठी गांजा तस्करांवर थेट कारवाई. सीमावर्ती भाग असल्याने गांजा तस्करीचे प्रमाणही या परिसरात विलक्षण आहे. शिक्षणाचा प्रसार नसल्याने अमली पदार्थांच्या जाळ्यात युवक सापडतात. जोहाडसह अन्य जिल्ह्यातून व्यसनाधीनतेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. गांजा तस्करीवर कारवाई केल्यास त्याचा गुन्हेगारी थोपविण्यावरही परिणाम होणार होता, हे गृहित धरून कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यातून विविध ठिकाणी छापे टाकून सुमारे ८ कोटींपेक्षा अधिक किमतीचा गांजा जप्त केला. त्याचा परिणाम चांगला झाला. एका जिल्ह्यात झालेल्या छापासत्राचे लोण शेजारच्या अन्य जिल्ह्यात पसरले. पोलिसांच्या थेट कारवाईमुळे तस्करीला आळा बसला.
आस्था आणि रक्षक या भरारी पथकांची निर्मिती. त्याद्वारे बेकायदेशीर दारू व्यवसायावर कारवाई. व्यसनमुक्तीसाठी या दोन्ही पथकांचा वापर. जोहाद जिल्ह्यात गांजा तस्करीबरोबर व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक होते. बेकायदेशीर दारू व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ‘आस्था’ पथकाची निर्मिती केली. सामान्य नागरिकांकडून आलेल्या माहितीच्या आधारावर बेकायदेशीररित्या दारू तयार होत असलेल्या ठिकाणांवर छापे मारले. अनेकदा ही ठिकाणी जंगलात असत. त्यांची माहिती मिळविण्यासाठी ‘आस्था’ पथकाची खूप मदत व्हायची. ‘आस्था’ आणि ‘रक्षक’ पथकात काही प्रमाणात स्थानिक सहभाग घेतल्याने त्याचा अचूक माहिती मिळविण्यासाठी खूप मदत व्हायची.
प्रोटेक्शन, डिटेक्शन आणि प्रिव्हेंशनवर भर थेट उपाययोजनेवर भर दिला. सामान्य नागरिकांना पोलिस प्रशासन आपले वाटले पाहिजे, तर योग्य परिणाम साधला जातो या भावनेतून काम सुरू केले. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला. व्हॉट्सॲपचे वेगवेगळे ग्रुप तयार केले. जनतेच्या तक्रारी समजून घेण्यासाठी तो मोठा स्त्रोत होता. अनेक छोट्या-मोठ्या तक्रारी त्यावर येत. अगदी आमची अमूक अमूक तक्रार असून पोलिस ठाण्यातील ती नोंदवून घेतली जात नाही, अशी याचना असायची. त्यावर स्वतः उत्तर देत संबंधित पोलिस ठाण्यात फोन करायचो. अर्थात त्याचा दुहेरी फायदा झाला, चुकीची तक्रार असल्यास त्यावर जागेवरच निपटारा व्हायचा. नागरिकांचे प्रोटेक्शन, तक्रारीचे डिटेक्शन आणि चुकीच्या गोष्टींचे तसेच नागरिकांच्या हक्कांचे प्रिव्हेंशन या त्रिसुत्रीच्या आधारे जनताभिमुख प्रशासन देण्यावर भर दिला.
कार्यकाळातल्या ठळक घटना
काझिरंगा अभयारण्यातील एकशिंगी गेंड्याच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या ‘केपीएलसी’ संघटनेचा बंदोबस्त. बोकाखारमध्ये पोस्टींग होते. या कार्यक्षेत्रात काझिरंगा अभयारण्याचा भाग येतो. या ठिकाणी गेंड्याच्या शिंगांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत होती. यासाठी तिथली स्थानिक ‘केपीएलसी’ ही संघटना कार्यरत होती. शिंगांसाठी गेड्यांची हत्या होत होती. यावर कारवाईसाठी धोरण आखले. संघटनेचा बंदोबस्त केल्यास शिंगांची तस्करी थांबेल त्यातून गेंड्याची हत्या होणार नाही हा मुख्य उद्देश होता. या संघटनेवरच कारवाई केल्याने तस्करीला आळा बसला.
रायनोहॉर्नच्या चोचीची तस्करी रोखली. ईशान्य भारतातील हा अत्यंत देखणा पक्षी. अंधश्रद्धेपोटी त्याची हत्या केली जाते. त्याची चोच टोपीत वापरल्यास कोणताही त्रास होत नाही असा समज या भागात आहे. यासाठी आधी नागरिकांचे प्रबोधन केले. त्या प्राण्याबाबत आणि तो याच परिसरात का व कसा आढळतो याची माहिती वेगवेगळ्या माध्यमांतून सामान्यांपर्यत पोचवली. त्याचा परिणामही चांगला झाला.
ईशान्य भारतात अंधश्रद्धेचे प्रमाण लक्षणीय आहे. ते कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या. केवळ कारवाईपेक्षा कधी प्रबोधनातून, कधी थेट कृतीतून वस्तुस्थिती नागरिकांना समजून सांगत आहे. एकदम ती कमी होणार नाही. शिक्षणाचा प्रसार वाढेल तसा अंधश्रद्धेचा विळखाही कमी होईल.
(शब्दांकन : आशिष तागडे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.