Clubhouse Sakal
सप्तरंग

‘क्लबहाऊस’बाबत गहजब कशाला?

‘आपल्याकडं हवंच’ असं एक नवीन सोशल नेटवर्किंग ॲप आलंय. ते म्हणजे ‘ क्लबहाऊस’. या ॲपबाबत लोकांमध्ये ओरड आणि गोंधळ आहे.

अरुण आनंद saptrang@esakal.com

‘आपल्याकडं हवंच’ असं एक नवीन सोशल नेटवर्किंग ॲप आलंय. ते म्हणजे ‘ क्लबहाऊस’. या ॲपबाबत लोकांमध्ये ओरड आणि गोंधळ आहे. तसं पाहिलं गेलं तर अनेक ‘ॲप’ येतात आणि जातात. पण, ‘क्लबहाऊस’ने मात्र आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. पोस्ट केलेल्या ब्लॉगमध्ये ‘क्लबहाऊस’ने म्हटलं आहे की, हे ‘ॲप’ म्हणजे फक्त एक आवाज आहे. आणि आवाज हे एक खास माध्यम आहे. यात कॅमेरा नाही, त्यामुळे डोळ्यांचा संपर्क, तुम्ही काय कपडे घातले आहेत, तुम्ही कोठे आहात? याचा विचार करण्याची गरज नाही.

कल्पना करा, की तुमच्या मोबाईलवर ‘ॲप’ आहे, ज्यावर तुम्ही इतरांचं परस्परांत सुरू असलेलं थेट संभाषण ऐकू शकता; पण तुम्ही ते ऐकत आहात, याचे दडपण त्यांच्यावर नाही. संभाषण करणाऱ्या व्यक्ती खूप प्रसिद्ध असू शकतील किंवा ज्ञानसंपन्न असू शकतील.( अर्थात तशी खात्री नाही.) तुम्हाला त्या संवादात सहभागी होण्याचीही संधी मिळू शकते. ‘ऑडिओ चॅट सोशल नेटवर्क’ असे त्याचे स्वरूप असेल. ‘क्लबहाऊस’ची स्थापना मार्च २०२० मध्ये आल्फा एक्सप्लोरेशनच्या पॉल डॅविसन आणि रोहन सेठ यांनी केली. वर्षभरातच सोशल मीडियावरील सर्वांत जास्त चर्चिलं जाणारं हे ॲप ठरलं व आज त्याचं चार अब्ज अमेरिकी डॉलर एवढं मूल्य झालं आहे. इलॉन मस्क यांनी केलेला ॲपचा वापर, तसेच जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी ट्विट केले की ‘मी चॅटसाठी क्लबहाऊसचा वापर केला’, आणि एका रात्रीत सर्वांत जास्त डाऊनलोड होणारे ॲप म्हणून क्लबहाऊस प्रसिद्ध झाले.

इतर सोशल मीडियापेक्षा या ‘ॲप’चे वैशिष्ट्य म्हणजे या ‘ॲप’ने आवाजावर दिलेलं लक्ष. व्हिडिओ नाही, मजकूर असलेले संदेश नाहीत, छायाचित्रे डाऊनलोड वा अपलोड करणे नाही. लोक फक्त बोलतात व मतांची देवाण-घेवाण करतात. फक्त वापरकर्त्याचे छायाचित्र असते. हीच महत्त्वाची कारणे आहेत, जास्तीत जास्त लोक क्लबहाउस ॲपचा वापर का करतात याची.

या ॲपचा नियमित वापर करणारे म्हणतात की, काही मोजक्याच अति महनीय व्यक्ती बोलतात व इतर ऐकतात, हे एकदम जिव्हाळ्याचं व आकर्षक वाटतं. शिवाय जे संभाषण होते ते कमी पाल्हाळिक आणि जास्त उत्पादक स्वरुपाचे असते. वक्त्यांचा आवाज बंद करणे किंवा चालू ठेवण्याचे पर्याय आयोजकांना असतात. सहभागी होणाऱ्यांनी बोलायचे असल्यास त्यांना हात वर करावा लागतो व आयोजकांनी मान्यता दिल्यानंतरच ते बोलू शकतात.

हे ‘ॲप’ प्रसिद्धीस आले, जेव्हा इलॉन मस्क, मार्क झुकर्बर्ग आणि आणि इतर अति महनीय व्यक्तींनी ‘ॲप’वर आपली हजेरी लावली. स्पेसएक्स आणि टेल्साचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी ‘गेमस्टॉप ट्रेडिंग’बाबत क्लबहाऊसवर मत व्यक्त केली. त्याचप्रमाणे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेर्बर्ग यांनी ‘भविष्यातील तंत्रज्ञान’ या विषयावर मतप्रदर्शन केलं. थोडक्यात सांगायचं झालं तर क्लबहाऊससारखं फेसबुकही स्वतःचं ‘ॲप’ तयार करत असल्याचं न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.

जर्मनीमध्ये, थुरिंजियाचे मंत्री बोडो रॅमलोव यांनी क्लबहाऊसवर बोलताना मान्य केलं होतं की, जर्मनीच्या चेंन्सलर अँजेला मर्केल यांच्याशी झालेल्या ऑनलाइन बैठकीत ते मोबाईलवर कॅण्डी क्रश खेळत होते. विनोदी कलाकार केवीन हर्ट यांचंही गेल्या वर्षीचं संभाषण चर्चेचा विषय ठरलं होतं.

चीनमध्ये बंदी

फेब्रुवारी २०२१ मध्ये चीन सरकारनं या ॲपवर बंदी घातली. हाँगकाँगमधील निषेध, सीनजीयांग येथे मुस्लिमांना ताब्यात घेण्याची घटना, कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात झालेली आंदोलने, तैवानचे स्वातंत्र्य व हाँगकाँगचा राष्ट्रीय सुरक्षा कायदा याबाबत झालेली संभाषणे ही त्यामागची कारणे होती. मात्र, ‘सायबरस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ चायना’ या इंटरनेटवर नियंत्रण ठेवणाऱ्या चीनच्या सर्वोच्च यंत्रणेने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. याशिवाय चीन, जॉर्डन आणि ओमान यांनीही कलबहाऊस ॲपवर वर बंदी घातली. इतर व्यासपीठ वापरकर्त्यांना चुकीच्या व गैरसमज पसरविणाऱ्या माहितीबाबत सावधान करते. मात्र, क्लबहाउस ॲपवर चुकीच्या माहितीवर प्रतिवाद करण्याची संधी नाही. मत व्यक्त करणारं जसं ‘लाइक’ हे बटन किंवा इतर बटन नाही जिथे प्रेक्षक आपली मतं व्यक्त करू शकतील. त्यामुळे बऱ्याच वेळा ते क्लबहाउसवर काय झालं यांवर मत व्यक्त करायला ट्विटरचा वापर करतात.

गोपनीयता

प्रत्येक गोष्टीची एक किंमत मोजावी लागते व ती म्हणजे गोपनीयता. क्लबहाऊसला जोडले जाण्यापूर्वी तुमचाच दूरध्वनी क्रमांक नाही तर तुमच्या फोन लिस्टमध्ये असलेल्या सर्वांचे नंबर मागितले जातात, जेणेकरून तुमचा सामाजिक संपर्क किती आहे, हे समजणे त्यांना सोपे जावे. तुम्ही क्लबहाऊला जोडले गेला असाल किंवा नाही, पण तुमच्या फोन लिस्टमधील ज्यांनी कुणी तुमच्याबद्दल माहिती शेअर केली आहे, ती क्लबहाऊस साठवत जाते. माहिती शेअर करण्यास तुमची मान्यता असो अथवा नसो, क्लबहाऊस तुमच्याबद्दलची माहिती साठवून ठेवत जाते. सद्यःस्थितीत ही माहिती काढून टाकण्याची कोणतीही सुविधा नाही. शिवाय क्लबहाऊसने स्पष्ट केलेले आहे की तुमच्या बद्दलची माहिती आता किंवा भविष्यात केव्हाही तुम्हाला न सांगता शेअर केली जाईल.

क्लबहाऊस त्यांच्या ॲपवर झालेली सर्व संभाषणे ध्वनिमुद्रित करून ठेवते. क्लबहाउस तुमच्या मागावर असते. क्लबहाऊस कदाचित एकमेवाद्वितीय असेल पण ते खासगी नाही. अर्थात लोक या ॲपच्या अर्थकारणाबाबत उत्सुक आहेत. ते क्लबहाऊस सर्व वापररकर्त्यांची माहिती सुरक्षा एजन्सींना किंवा फोन कंपन्यांना विकते का? हे मात्र कुणालाच माहिती नाही.

भारतामध्ये काय स्थिती आहे?

क्लबहाऊसवरील एक ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमावर फिरत आहे. त्यात हिंदू विचारसरणी मानणाऱ्या महिलांविषयी अश्लाघ्य शेरेबाजी करणाऱ्यांना समाज माध्यमांवर प्रभाव असणाऱ्या व्यक्ती प्रोत्साहन देताना दिसतात.

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व प्रशांत किशोर यांच्यातील निवडणूक डावपेचासंबंधीचे संभाषण उघड केल्याबद्दल क्लबहाऊस वादात सापडले होते. या संभाषणात प्रशांत किशोर यांनी म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता पाहता तणामूल काँग्रेसचा प्रतिस्पर्धी भाजप निवडणुकीत विजय होऊ शकतो.

(सदराचे लेखक दिल्लीतील ‘विचार विनिमय केंद्रा’चे संशोधन संचालक आहेत)

(अनुवाद : गणाधीश प्रभुदेसाई)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT