Book dam it sakal
सप्तरंग

प्रांजळ आत्मकथन

प्रत्येक अडचणीवर मात करत ‘डॅम इट’ म्हणून ‘थरथराट’ उडवणारे अभिनेते महेश कोठारे यांना आपण पडद्यावर पाहिलंच असेल. असेच अनुभव त्यांनी ‘डॅम इट आणि बरंच काही’ या आत्मचरित्रात मांडले आहेत.

अरुण सुर्वे

प्रत्येक अडचणीवर मात करत ‘डॅम इट’ म्हणून ‘थरथराट’ उडवणारे अभिनेते महेश कोठारे यांना आपण पडद्यावर पाहिलंच असेल. असेच अनुभव त्यांनी ‘डॅम इट आणि बरंच काही’ या आत्मचरित्रात मांडले आहेत.

प्रत्येक अडचणीवर मात करत ‘डॅम इट’ म्हणून ‘थरथराट’ उडवणारे अभिनेते महेश कोठारे यांना आपण पडद्यावर पाहिलंच असेल. असेच अनुभव त्यांनी ‘डॅम इट आणि बरंच काही’ या आत्मचरित्रात मांडले आहेत. हे पुस्तक वाचताना रसिक त्यात बुडून जातात. खरंतर ही किमया साधली आहे शब्दांकन करताना मंदार जोशी यांनी. कोठारे नावाचं एक प्रयोगशील, धाडसी आणि त्याच वेळी खट्याळ, बिनधास्त असं व्यक्तिमत्त्व या पुस्तकातून आपल्यासमोर उभं राहतं. काहीही हातचं न राखता कोठारे यांनी त्यांच्या खास शैलीत कथन केलं आहे. त्यांनी सांगितलेले एकेक किस्से, त्यांची खास निरीक्षणं, वेगवेगळ्या गोष्टींवर व्यक्त केलेले विचार, त्यांनी केलेले प्रयोग, धाडस यांचं वर्णन या सगळ्या गोष्टी वाचून आपल्यासमोर काळाच मोठा पटच उभा राहतो. नैतिक मूल्यांशी तडजोड न करणं, स्वाभिमान गहाण न ठेवणं, आपल्या निर्णयाशी तडजोड न करणं, ही स्वभाववैशिष्ट्यं त्यांनी अडचणीच्या काळातही जपली. त्याचं प्रतिबिंब पुस्तकात उमटलं आहे.

आई-वडिलांनी केलेले संस्कार, त्यांच्यामुळे लागलेली वाचनाची गोडी, शाळेतली मस्ती, बेस्टचा प्रवास, सण-उत्सवांमध्ये केलेली धमाल... अशा सर्व गोष्टींना कोठारे उजाळा देतात. आई-वडील नाटकांमध्ये काम करत असल्यामुळे त्यांना अभिनयाची गोडी लागली अन् ‘छोटा जवान’ या चित्रपटाने कलाक्षेत्रात ओळख मिळवून दिली. ‘मेरे लाल’, ‘छोटा भाई’ या चित्रपटांच्या आठवणी सांगताना सुलोचनादीदी, नूतन, आशा काळे अशा कलाकारांविषयीही ते त्यांच्या भावना व्यक्त करतात. ‘उपकार’च्या निर्मितीसाठी मनोजकुमार यांनी घेतलेले कष्ट पाहून आपणही भविष्यात अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका साकारण्याची त्यांची इच्छा भविष्यात खरी ठरली.

तरुणपणी अभिनय करतानाच त्यांची वकिलीही सुरू होती. त्याचदरम्यान नीलिमा देसाई यांच्याशी लग्न कसं झालं, याचा किस्सा ‘नजरे मिली दिल धडका’ या भागात सांगितला आहे. ‘लेक चालली सासरला’ हा चित्रपट त्यांच्या कारकीर्दीमधला टर्निंग पॉइंट ठरला. इथून पुढं त्यांच्या यशाचा धूमधडाका सुरू झाला. ‘प्यार किये जा’ चित्रपट पाहत असतानाच त्यांना ‘धूमधडाका’चं कास्टिंग सुचलं. हा चित्रपट करताना आलेले अनुभव त्यांनी उत्तमरीतीने मांडले आहेत. या चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवी यशानंतर त्यांनी वकिलीला कसा रामराम ठोकला याचा पुस्तकात उल्लेख आहे.

‘दे दणादण’ हा चित्रपट २५ दिवसांमध्ये कसा पूर्ण केला, त्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटात कसं घेतलं, पुढे ‘थरथराट’ची निर्मिती स्वतःच्या बॅनरखाली करून टकलू हैवान या व्यक्तिरेखेसाठी राहुल सोलापूरकर यांची निवड कशी केली अशा गोष्टी कोठारे रंजकपणे मांडत जातात. मराठीतील पहिला सिनेमास्कोप चित्रपट करण्याचं वेड ‘धडाकेबाज’द्वारे पूर्ण करण्यात आलेलं यश, बाटलीतील गंगारामचे प्रसंग चित्रित करण्यासाठी मराठीत पहिल्यांदाच ‘ब्लू कर्टन’चा केलेला वापर आदी गोष्टींचा उलगडा आत्मचरित्रात केला आहे. ‘झपाटलेला’ चित्रपटासाठी रामदास पाध्ये यांनी बनवलेला तब्बल ९९ वा बाहुला त्यांना आवडला, अशीही आठवण ते सांगतात.

‘माझा छकुला’ हा चित्रपट आदिनाथच्या सुट्टीमध्ये केला. या चित्रपटाला व्यावसायिक अपयश आलं असलं, तरी महेशजी खचले नाहीत. त्यांनी ‘मासूम’ हा चित्रपट हिंदीमध्ये केला, त्याला मोठं यश मिळालं. त्यामुळे त्यांनी ‘लो मै आ गया’ हा चित्रपट केला; मात्र तो पूर्णतः फसल्याचंही ते मोकळेपणाने सांगतात. ‘धांगडधिंगा’, ‘खतरनाक’, ‘चिमणी पाखरं’, ‘पछाडलेला’, ‘खबरदार’, ‘शुभमंगल सावधान’, ‘जबरदस्त’ अशा अनेक ‘आयकॉनिक’ चित्रपटांच्या पडद्यामागच्या कितीतरी कहाण्या महेश कोठारे उलगडतात. अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि महेशजी यांना एकत्र आणणारा ‘आयडियाची कल्पना’ या चित्रपटापासून मराठीमधील पहिला थ्री-डी चित्रपट ‘झपाटलेला-टू’पर्यंत अनेक चित्रपटांशी संबंधित किश्शांचा पुस्तकात खजिनाच आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची मैत्री किती घट्ट होती, याची प्रचिती पुस्तकातील अनेक पानांतून येते. ‘खांद्यावरील लक्ष्मीकांतचा हात हा माझ्यासाठी भक्कम आधार होता. हयात असेपर्यंत तो माझ्या प्रत्येक कलाकृतीचा एक अविभाज्य भाग होता,’ असं कोठारे यांनी नमूद केलं आहे. लक्ष्या हे जग सोडून गेला, तेव्हाची कोठारे यांची वाटचाल आणि त्यांच्यावरील संकटांच्या मालिका यांच्याविषयीही त्यांनी लिहिलं आहे.

भरपूर यश बघितलेले कोठारे यांना एकेकाळी डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी दादरचं घर विकण्याचीही वेळ आली होती. चित्रपटनिर्मितीत भरपूर कष्ट घेऊनही यश मिळत नसल्याने त्यांनी शेवटी टीव्ही मालिका निर्मितीत येण्याचा निर्णय घेतला आणि इथून त्यांचा ‘बॅड पॅच’ संपण्याचा प्रवास सुरू झाला. याला निमित्त ठरली त्यांची पत्नी. मराठी मालिकांमध्ये पाऊल ठेवल्यानंतर ‘जय मल्हार’ मालिकेचं प्रक्षेपण तब्बल तीन वर्षं चाललं. ही मालिका मराठी टीव्हीविश्वात गेमचेंजर ठरली. ‘गणपती बाप्पा मोरया’ साठी वापरलेलं सीजी तंत्रज्ञान, ‘विठू माउली’ला अचानक वाढू लागलेल्या टीआरपीमुळे मिळालेलं बळ, कोल्हापुरातील बंद पडलेल्या चित्रनगरीत चित्रीकरण करून तिथल्या व्यवसायाला चालना देणाऱ्या ‘जोतिबा’ मालिकेविषयीही कोठारे पुस्तकात लिहितात.

बालकलाकार, नायक, खलनायक, लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि वितरक अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी निभावल्या असल्या, तरी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहण्याची त्यांची इच्छा आहे. जीवनप्रवासात त्यांना साथ दिली ती त्यांचे ‘डॅडी’, आई जेनमा आणि पत्नी नीलिमा यांनी. मुलगा आदिनाथ, सून ऊर्मिला आणि आता त्यांचा जीव की प्राण बनलेली नात जिजा यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे. समर्पक छायाचित्रांमुळे पुस्तक आणखी उठावदार झालं आहे.

पुस्तकाचं नाव : डॅम इट आणि बरंच काही

लेखक : महेश कोठारे

संपादन आणि शब्दांकन : मंदार जोशी

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस प्रा. लि., पुणे (०२० - २४४७६९२४)

पृष्ठं : २८६, मूल्य : ८९९ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT