Plane and Drone Sakal
सप्तरंग

युद्धनीती बदलणारं ‘ओटीएच’ तंत्रज्ञान

लष्करविषयक घडामोडींमध्ये मागील दोन दशकांचा विचार केला तर आमूलाग्र बदल झाल्याचं दिसून येतं.

अरुण तिवारी (tiwariarun@gmail.com)

लष्करविषयक घडामोडींमध्ये मागील दोन दशकांचा विचार केला तर आमूलाग्र बदल झाल्याचं दिसून येतं. तब्बल वीस वर्षांच्या संघर्षानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानातून घेतलेली माघार आणि इराणच्या सर्वोच्च जनरलचा क्रूरपणे केलेला खातमा या दोन घटना बरंच काही सांगून जातात. आता क्षितिजाच्याही पलीकडं असलेल्या लक्ष्याचा अचूकपणे वेध घेणारं नवं तंत्रज्ञान तयार झालं आहे. ‘ओव्हर दि होरायजन’ (ओटीएच) असं त्याचं नाव. देशाच्या बाहेरून प्रक्षेपित करण्यात आलेल्या ड्रोनच्या माध्यमातून दुसऱ्या देशात असलेल्या लक्ष्यावर सहज नजर ठेवता येते. हे लक्ष्य टप्प्यात येताच त्याचा खातमाही करता येतो. नव्या लष्करी आव्हानांना भिडण्यासाठी आता भारत आणि अमेरिका हे दोन देश हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी यावर्षीच्या १४ सप्टेंबरला काँग्रेसमधील चर्चेदरम्यान नेमकी हीच बाब बोलून दाखविली होती.

या अनुषंगाने आमची भारतासोबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी उघडपणे जाहीर केलं होतं. ही काही त्यांनी कुणा माध्यमाला दिलेली मुलाखत नाही किंवा राजकीय भाषणही नाही. ब्लिंकन हे अमेरिकी काँग्रेससमोर बोलत होते. अफगाणिस्तानातील अल - कायदा आणि अन्य दहशतवादी संघटनांच्या उदयावर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिका ‘ओटीएच’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या तयारीत आहे. यासाठीच त्यांना मित्र राष्ट्रांसोबत मैत्री हवी आहे.

दीर्घपल्ल्याच्या ओटीएच-शस्त्र प्रणालीमुळे जमिनीवरून जमिनीवरील अन्य देशांतील लक्ष्याचा सहज वेध घेता येऊ शकतो. जे रडारच्याही टप्प्यात येत नाही ते ही प्रणाली पाहू शकते. या प्रणालीशीच क्षेपणास्त्र डागू शकणारी यंत्रणा कनेक्टेड असते. ती हल्ल्यासाठी सदैव तत्पर असते. एअरबोर्न सेन्सर आणि अन्य उपकरणांच्या माध्यमातून ही यंत्रणा हल्ल्यासाठीचा डेटा संकलित करत असते. पुढे याच डेटाच्या आधारे लक्ष्याचा वेध घेतला जातो.

‘ओटीएच’ प्रणालीनं सगळ्याच विद्यमान शस्त्रप्रणालींना मोडीत काढलं आहे. यातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे हल्ला करणाऱ्याचं कमीत कमी नुकसान होतं, शिवाय समोरून होणाऱ्या हल्ल्याचा शत्रूला अंदाजही बांधता येत नाही. या तंत्रज्ञानामुळे प्रतिहल्ल्याचा वेळ देखील लक्षणीयरीत्या कमी होतो. अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून या शस्त्र प्रणालीला अटकाव करता येत नाही. वेगाने हालचाली करत शत्रूचा हल्लाही या माध्यमातून परतवून लावता येऊ शकतो.

‘क्वाड’ संघटनेचा उदय

मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियातील बड्या नेत्यांची भेट घेत त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. याच गटाला ‘क्वाड’ देशांचा समूह असंही म्हणतात. भारतीय महासागरात २००७ साली आलेल्या त्सुनामीच्या संकटानंतर जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेशी हातमिळवणी करत भारताने मदत आणि बचाव कार्याला सुरुवात केली होती. यासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनीच पुढाकार घेतला होता. ‘क्वाड’ला शह देण्यासाठी चीनने आशियात राजकीय गटबाजी सुरू केली होती. ‘क्वाड’ देश एकत्र आल्याने एका मोठ्या लष्करी शक्तीचा उदय झाला आहे. यामुळे भारताच्या लष्करी सामर्थ्यामध्ये वाढ झाली आहे. अर्थात प्रादेशिक सुरक्षेसाठी अशाप्रकारचे निर्णय घेणे गरजेचे होते.

चीनची सगळी संपत्ती ही किनारी भागामध्येच आहे. चीनच्या विकासाचं अवाढव्य इंजीन देखील निर्यातीतून मिळणाऱ्या इंधनातून धडधडत असतं. जपान आणि दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्था या देखील निर्यातीवर अवलंबून आहेत. त्यामुळे चीनवर नियंत्रण हे सागरी मार्गानेच ठेवलं जाऊ शकतं. जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारताची एकजूट ही म्हणूनच चीनची कोंडी करणारी आहे. या युतीला अमेरिकेच्या नौदलाचं पाठबळ मिळाल्यानं ती आणखीनच भक्कम होईल. यामाध्यमातून ड्रॅगनच्या हालचालींना वेसण घालता येऊ शकते. युद्धनीती ही शौर्य आणि चातुर्याचं मिश्रण असतं. एकाच वेळी ती कला आणि विज्ञान देखील असते.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तयार झालेली अण्वस्त्रे ही आज टाकाऊ यंत्रप्रणाली बनली आहे. ‘ओटीएच’ युद्धतंत्रामुळं दहशतवादाविरोधातील युद्धाचं स्वरूप देखील आमूलाग्र बदललं आहे. याआधी दहशतवादी शक्तिशाली अशा लष्कराला देखील नामोहरम करू शकत असत. पण भविष्यामध्ये ही स्थिती राहिलेली नसेल. जगातील बड्या लष्करी आस्थापनांकडे जी ताकद आहे ते सामर्थ्य दहशतवादी कधीच प्राप्त करू शकत नाही.

तरच परिस्थिती बदला येईल

डॉ. अब्दुल कलाम सांगत असत, वास्तवाकडं डोळेझाक करून तुम्हाला परिस्थिती बदलता येत नाही. एखादी गोष्ट तुम्हाला बदलायची असेल तर पूर्णपणे नवा आराखडाच तुम्हाला आखावा लागतो जो जुन्याची जागा घेऊ शकेल. भारताने विज्ञानाच्या आघाडीवर आतापर्यंतचा सर्वांत मोठा पल्ला गाठला आहे. यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालये, उद्योग आणि प्रयोगशाळा यांचं मोठं योगदान आहे. याबाबतीत आपण जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनलो नसलो तरीसुद्धा आपला समावेश या देशांच्या पंक्तीत होतो. भारताकडील मनुष्यबळ हे जगातील सर्वोत्तम मनुष्यबळापैकी एक आहे. आज गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि आयबीएमसारख्या बड्या आयटी कंपन्यांचं नेतृत्व हे भारतीय वंशाचे अभियंतेच करत आहेत. भारतातील हिंदू आणि बौद्धांच्या आध्यात्मिक परंपरांमध्ये ‘मंडला’ला महत्त्वाचं स्थान असतं. हे मंडल एक आध्यात्मिक प्रवास अधोरेखित करतं. आता नव्या जगामध्ये ‘क्वाड’ ही संघटना असंच एक मंडल बनावं. यामध्ये भारत नेतृत्व करणारा देश असावा तो केवळ घडामोडींचा अनुयायी बनता कामा नये.

(सदराचे लेखक ज्येष्ठ वैज्ञानिक तसेच विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत. )

(अनुवाद : गोपाळ कुलकर्णी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT