दैनंदिन मानवी जीवन आपल्या आभासी मिठीत कैद करणाऱ्या दूरचित्रवाणी संचानं (टीव्ही) सर्वसामान्यांच्या आयुष्यात जाहिरातींचा महापूर आणला आहे. लोकांच्या चांगले जीवन जगण्याच्या आकांक्षांना उभारी देण्याचं काम या जाहिराती करत असतात. आर्थिक सुबत्तापूर्ण जीवनशैलीचं प्रत्येकालाच आकर्षण असतं. आपल्या देशातील प्रत्येक माणूस झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहात असतो. या स्वप्नांच्या दुनियेत अग्रेसर असते ती तरुणाई. याच यूथ फोर्सला झुलवण्याचं काम विविध शक्ती करत असतात. आताही त्यांनीच आभासी चलनाचा (डिजिटल करन्सी) प्रचार करायला सुरूवात केली आहे. या अशा प्रकरणामध्ये भारत अधिकच सहनशील देश आहे असे म्हणावं लागेल. आपल्याकडे काही सेलिब्रिटी मंडळी महागड्या दारूसोबत सोडा वॉटर देखील विकण्याचे काम करत असतात.
या सगळ्या मंडळींचं सगळं व्यवस्थित चालत असतं. आता या क्रिप्टोकरन्सीचे खरे प्रवर्तक कोण आहे? याचा विचार आपण करायला हवा. या आभासी चलनाच्या जगामध्ये थोडं डोकावलं तर वेगळं चित्र दिसून येतं. या चलनाला कोणताही संस्थात्मक आधार नाही. तुम्ही तुमचे प्रत्यक्षातील चलन हे आभासी संपत्तीमध्ये गुंतवत असता. कमी श्रमामध्ये अधिक पैसे गुंतविण्याचे आमिष या माध्यमातून दाखविलं जातं. या सगळ्यामध्ये चलनाची विक्री करणारा आणि ते चलन खरेदी करणारे अशी दोघांची ओळख गोपनीय ठेवण्यात येते. या सगळ्या गोष्टींमधून पारंपरिक वित्तीय संस्थांचे अस्तित्व निकाली काढण्यात येतं. येथे नियामक व्यवस्थाच अस्तित्वात नसते. या आभासी चलनावर लक्ष ठेवणारी कोणतीही दृश्य शक्ती नसल्याने त्याचं भवितव्य अधांतरी असल्याचं दिसून येतं. या सगळ्या चलन व्यवस्थेमध्ये कोठेही मध्यवर्ती व्यवस्था नसते. या सगळ्या व्यवहारांमागे काही सुप्त शक्ती वावरत असतात. सर्वांमध्ये विभागल्या गेलेला एक अदृश्य असा विश्वास या सगळ्याचे मूलस्थान असतो. सायबर जगातील अज्ञात हात आणि मेंदू हे चलन तयार करत असतात, पुढे त्याचाच व्यवहार देखील होतो. सगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार तुम्ही या माध्यमातून करू शकत असला तरीसुद्धा तुम्ही हे चलन पाहू शकत नाही किंवा त्याला स्पर्शही करता येत नाही.
तर त्या सुधारणांचे काय?
आपण चीनकडे शत्रू राष्ट्र म्हणून पाहतो पण आपल्याच उद्योगपतींनी कधी चिनी पैसे आणि गुंतवणूक यांचा अव्हेर केला आहे का? अनेक बड्या कंपन्यांचे समभाग आणि आयपीओच्या माध्यमातून अब्जावधी डॉलरची गुंतवणूक चीनमध्ये जात असते. ऑनलाइन गेमिंग आणि सट्ट्यामध्ये लोकांनी पैसे गमावल्याच्या बातम्या आता रोज माध्यमांत झळकू लागल्या आहेत. हे सगळे देशाच्या बाहेरून ऑपरेट होते आहे. लाखो लोकांनी त्यांचे पैसे आभासी चलनामध्ये गुंतविले तर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक काही क्षणांत अदृश्य होऊन जाते. या सगळ्या उद्योगाचा नेमका कोणाला लाभ होतो आहे? देशातील सरकारला हे नेमके कोठून समजेल? नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या ज्या सुधारणा आपण घडवून आणल्या आहेत त्याची आपण चेष्टा करणार आहोत का? भारताने नेहमीच संपत्ती आणि धनाची पूजा केली असून आपण त्याला एक वेगळा आदर दिला आहे. लोकांच्या कल्याणाचे मोठे सामर्थ्य धनात असते. पण नव्या तांत्रिक शक्तीमुळे ही संपत्ती काही क्षणांत अदृश्य केली जात आहे. हे असेच होत राहिले तर यातून केवळ विनाशच संभवतो. देशाचं सगळं अर्थकारण थंडावलं असताना रोखे बाजार अचानक कशी काय हजारो कोटींची उड्डाणे घेऊ शकतो? याचे विश्लेषण अर्थतज्ज्ञ आणि विचारवंतांनी करणे गरजेचे आहे. आता ही सगळी श्रीमंत मंडळी दुबईमध्ये जाऊन का स्थिरावू लागली आहेत? क्रिकेटमधील सट्टेबाजीला नेमके कोण प्रोत्साहन देतो आहे? या सगळ्यासाठी काही सेलेब्रिटी मंडळी कशासाठी पुढाकार घेताना दिसतात? खेळ हा आमच्यासाठी नवा बाजार बनला आहे का?
चीनकडून आपण काय शिकणार
जगातील आभासी चलनाची सर्वांत मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या ड्रॅगनने आता त्यांच्या देशातील आभासी चलनातील सर्वच व्यवहार बेकायदा ठरविले आहेत. या आभासी जगात मायनिंग करणाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले असून मध्यस्थांच्या व्यवहारांना देखील चाप लावण्यात आला आहे. चिनी सरकारला हे नेमकेपणानं ठावूक आहे की ज्या दिवशी आपली अर्थव्यवस्थेवरील पकड ढिली होईल त्या दिवशी आपलं काही खरं नाही. पैसा आणि राजकीय ताकद या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्याकडे ताकद देखील असते आणि ज्यांच्याकडे राजकीय ताकद असते त्यांच्याचकडे पैसा देखील येतो. चिनी राजकीय नेते हुशार आहेत त्यांनी हे आभासी चलनाचं शेत याआधीच कापून टाकलंय.
आव्हानांचा विचार हवा
या आभासी चलनाच्या व्यवहारामध्ये सहभागी झालेली मंडळी आता त्यांचे बस्तान देशाबाहेर हालवू लागली आहेत का? मागील काही दिवसांमध्ये देशात बहरलेल्या डिजिटल अर्थव्यवस्थेला आव्हान देण्याचं काम या सायबर जगतातून होते आहे. ज्या काळ्या पैशाला अर्थव्यवस्थेतून हद्दपार करण्यासाठी आपण युद्धपातळीवर प्रयत्न केले ते सगळेच मातीमोल ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. काही अज्ञात शक्तींसमोर देशाचे सार्वभौमत्व गहाण टाकता कामा नये. आज याबाबत कोणी बोलायला लागले तर काही मंडळी लांडगा आला रे आला अशी हाळी देऊ नका असे ज्ञान पाजळताना दिसतात. यात तथ्य नसेल तर आभासी चलनाला नेमके कोण प्रोत्साहन देते आहे. या बेकायदा व्यवहारांमुळे निर्माण होणाऱ्या संकटाचा कोणालाही अंदाज घेता येणार नाही. या सगळ्या व्यवहारातील बाबी या परस्परांशी संबंधित आहेत. बाहेरच्या व्यक्तीच्या पाठिंब्याशिवाय कोणतीही गोष्ट घडू शकत नाही. आपण जे अन्न खातो आणि पाणी पितो. आपण घेत असलेली औषधी, शिक्षण अशा प्रत्येक गोष्टींवर बाहेरच्या व्यक्तीचे लक्ष असते. त्यामुळे आपल्याला सभोवतालचं वातावरण अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी ठेवावं लागेल. मुलांना चांगलं रचनात्मक शिक्षण मिळालं नाही तर त्यांचाही विकास होणार नाही. या सायबर आव्हानांचं भान देखील आपल्याला त्यांना करून द्यावं लागेल. केवळ आठवडाभरामध्ये कोट्यवधी रुपयांची उड्डाणं घेण्याची आणि गर्भश्रीमंत होण्याचं स्वप्न पाहणं हे एखाद्या जादुई दुनियेचा पाठलाग करण्यासारखं आहे. आपण अशा भूलथापांना बळी न पडण्याचा संकल्प करू यात.
(सदराचे लेखक ज्येष्ठ वैज्ञानिक असून विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत . )
( अनुवाद : गोपाळ कुलकर्णी )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.