‘डॅंबिस’मध्ये बालकलाकारासह अभिनेता मकरंद अनासपुरे. 
सप्तरंग

देवालाही चष्मा आहे का?

अरविंद जगतापjarvindas30@gmail.com

शाळेत शिकणाऱ्या एका मुलाची गोष्ट. सातवी आठवीतच त्याला मातीतून किल्ले, बाहुल्या, पुतळे बनवायचा नाद लागला. जेव्हा बघावं तेव्हा आपला मुलगा मातीत खेळतो हे बघून आई-वडील वैतागून गेले होते. त्याचे मातीने भरलेले हात वही पुस्तक घेण्यासाठी कसे उत्सुक होतील हा त्यांचा प्रयत्न. पण मुलात बदल होत नव्हता. आई-वडील त्याला नेहमी रागवायचे. टाकून बोलायचे. अपमान करायचे. मुलाला मातीतच करिअर दिसत होतं. पण आई-वडील म्हणायचे, सारखा मातीत खेळत बसतो, तुझ्या करिअरची माती होईल वगैरे. एक दिवस वैतागून मुलाने आत्महत्या केली. एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात लिहिलं होतं मी आजोबाकडे चाललोय. स्वर्गात. फक्त त्यांनाच माझ्या मातीच्या खेळण्याचं कौतुक होतं. तिकडेच जातो. निदान ते तरी शाबासकी देतील. आजोबांची शाबासकी मिळवण्यासाठी त्याने किती टोकाचं पाऊल उचललं होतं. अशावेळी वाटतं देवाला हे दिसत नसेल का? त्यालाही दूरचा चष्मा आहे का? पण कधी कधी वाटतं खरे देव तर आजी-आजोबाच असतात घरात. ज्या घरात आजी-आजोबा असतात, त्या घरातल्या मुलांना खरंच एक मोठा आधार असतो. हमखास कौतुक करणारं माणूस असतं. आजी-आजोबा आणि नातवांचं नातं सगळ्यात खास आणि मजेशीर असतं. साठी ओलांडल्यावर माणूस पुन्हा मनानं लहान होत असतो. आणि त्याची नातवांशी छान ट्युनिंग जुळू लागते.

आजी-आजोबा नातवाला खास वाटण्याचं सगळ्यांत मोठं कारण असतं गोष्टी. आजी-आजोबांकडे असणाऱ्या भन्नाट गोष्टी. आणि त्या रंगवून सांगायची ताकद. आजकाल लेखकांसाठी खूप शिबिरं होतात. कोर्स असतात. पण माझ्या मते लिहायची आवड असणाऱ्या माणसानं आधी आपल्या आजी-आजोबांनी संगितलेल्या गोष्टी आठवून बघायला पाहिजेत. सगळ्यांत मोठे पटकथा लेखक असतात आजी-आजोबा,. नातवाच्या मूडप्रमाणं गोष्टी सांगत असतात. म्हणजे नातवाला झोप येत नसेल, तर त्यांची गोष्ट लांबत जाते. त्याला झोप येत असेल, तर ती अगदी चटकन क्लायमॅक्सकडे येते. राक्षसाची एन्ट्री कधी असणार, देव कधी येणार, परी कधी येणार हे सगळं नातवांच्या मूडवर अवलंबून. आणि गोष्टीत त्या त्या क्षणी बदल करणारे आजी-आजोबा. आपण पूर्वीपासून गोष्ट सांगणारे लोक आहोत. कागदावर लिहिणारे फार टिकले नाहीत लोकांच्या मनात. पण ज्ञानेश्वर तुकाराम आजही पाठ आहेत लोकांना. आजोबा असेच असतात. आठवणीत घट्ट. गोष्टीच्या रूपात. त्यांच्याकडून पुढच्या पिढीला कळणाऱ्या कितीतरी गोष्टी होत्या.

मिरगाचा पाऊस म्हणायचे आधी. तो मिरगाचा किडा आजोबालोक दाखवायचे. ठरावीक काळात दिसणारा तो किडा लहानपणी किती भुरळ घालायचा. पण तो दिसला की पाऊस येणार हे आजोबांनी सांगितलं. ते पुस्तकात नव्हतं. चातक पक्षी आजोबांमुळं कळत गेला आपल्याला. कितीतरी आजोबा पक्षी कुठं घरटं बांधतो ते बघून किती पाऊस होणार हे सांगायचे. हे सगळे अंदाज होते. पण मनाला उभारी देणारे. कष्ट करायला प्रेरणा देणारे. हे ज्ञान आता गायब होतंय. वेगवेगळे राहताना, कुटुंबातून आजोबा गायब होत गेले, तसतसे आपण अज्ञानी होत गेलो. डिजिटल ज्ञान खूप असेल, पण निसर्गाचं ज्ञान कमी होत गेलं. मुलांना पोकेमॉनची नावं जास्त माहिती आहेत आणि पक्ष्यांची कमी. मुलांना कार्टून जास्त माहिती आहेत आणि झाडं कमी. आजीचा बटवा गायब होऊन साध्या सर्दी, खोकल्यासाठी देखील दवाखाना आणि औषध सुरू झालं. निरगुडीचा पाला, लिंबाचा पाला, सागरगोटे, बिबवे, रिठे यांचा संबंध संपला. खरंतर हे आपलं अस्सल निसर्गभान होतं. ज्ञान होतं. आजी-आजोबा तळमळीनं सांगायचे ते कळत नव्हतं. पण डॉक्टरनं सांगितल्यावर लोकांना ज्वारीची, नाचणीची भाकरी किती महत्त्वाची आहे हे कळतं.

लहानपणी मात्र आपला आजी-आजोबावर विश्वास असतो. ते सांगतील तो आपला देव असतो. ते सांगतील तो आपला आदर्श असतो. त्यांनी विचारलेली कोडी आज कुणी विचारत नाही. आजकाल कितीतरी लोक म्हणतात, व्हिडिओ गेम खेळल्यानं मुलांचे मेंदू शार्प होतात. पण आपल्याला अजूनही आजोबांनी विचारलेल्या कोड्यांची उत्तरं शोधल्यावर मेंदू शार्प असल्यासारखा वाटायचा. कुणाचे आजोबा विचारायचे, तीन पायांची तिपाई, वर बसला शिपाई. सांगा कोण? त्यावर डोकं खाजवून ‘तवा’ असं उत्तर देताना नातवांना केवढा आनंद व्हायचा. किंवा वाजते पण ऐकू येत नाही .. असा साधा प्रश्न. पण त्यावर खूप वेळ केलेला विचार. आणि मग आजोबांनी उत्तर सांगितल्यावर आपल्या लक्षात यायचं, की उत्तर थंडी आहे. वाजते पण ऐकू येत नाही. अशा कितीतरी आठवणी. लोणच्याची फोड तास तासभर तोंडात ठेवून तिचा आनंद घ्यायचा हे आजोबांनी तर शिकवलेलं होतं. आजोबा जगात भारी असायचे, कारण आंब्याची कोय ते फेकू द्यायचे नाहीत. ती भाजून त्यातलं बी सुद्धा किती टेस्टी असते ते खायला घालून शिकवायचे. ते सगळं आता किती लोकांना समजत असणार? म्हणून ‘डॅंबिस’ चित्रपटाठी जगात नसलेल्या आजोबांवर गाणं लिहिताना ओळी सुचत गेल्या...

आजोबांनी जाण्यासारखं देवाघरी असतं काय?
एवढ्या लांबून त्यांना आमचं घर तरी दिसतं काय?
देवाघरी त्यांना तिथे कोण भेटत असेल?
देव बोलत नाही म्हणून एकट वाटत असेल.
त्यांच्यासारखं फनी देवा तुला सुचतं काय?

मला म्हणतात डँबीस, पण आजोबाही सेम आहेत.
बसले असतील लपून नक्की, त्यांचे फेवरेट गेम आहेत.
पण लाडक्या नातवावर असं कुणी रुसतं काय?
आजोबांनी जाण्यासारखं देवाघरी असतं काय?
एवढ्या लांबून त्यांना आमचं घर तरी दिसतं काय?
आजोबांनी जाण्यासारखं देवाघरी असतं काय?
एवढ्या लांबून त्यांना आमचं घर तरी दिसतं काय?

देवालाही चष्मा आहे का सांगा मला कुणी.
मग का दिसेना त्याला माझ्या डोळ्यामधलं पाणी.
मी एवढं रडल्यावर त्याला ऐकू गेलं नसेल काय?

नाहीतर जाउद्या आजोबा, येता येता थकाल तुम्ही.
अंधारात कुठेतरी उगीच वाट चुकाल तुम्ही.
मीच येतो देवाघरी, बघतो तुम्ही भेटताय काय.
आजोबांनी जाण्यासारखं देवाघरी असतं काय?
एवढ्या लांबून त्यांना आमचं घर तरी दिसतं काय?

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT