Book sakal
सप्तरंग

संत कवयित्रींचा शोध आणि बोध

महाराष्ट्राची संतपरंपरा ही केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नसून ती साता समुद्रापारही पोचलेली आहे. महाराष्ट्रातील संतांचे विचार, साहित्य विश्‍वव्यापी असून, त्याची प्रचिती कोणत्या ना कोणत्या रूपातून येते.

अरविंद रेणापूरकर

महाराष्ट्राची संतपरंपरा ही केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नसून ती साता समुद्रापारही पोचलेली आहे. महाराष्ट्रातील संतांचे विचार, साहित्य विश्‍वव्यापी असून, त्याची प्रचिती कोणत्या ना कोणत्या रूपातून येते.

महाराष्ट्राची संतपरंपरा ही केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नसून ती साता समुद्रापारही पोचलेली आहे. महाराष्ट्रातील संतांचे विचार, साहित्य विश्‍वव्यापी असून, त्याची प्रचिती कोणत्या ना कोणत्या रूपातून येते. संतांनी रचलेले ग्रंथ, साहित्य, कविता, ओवी, भारूड आदी साहित्यसंपदा कालातीत असून, त्याची दखल वेळोवेळी साहित्यिकांनी घेतली आहे. संत कवी-कवयित्रींच्या कविता, अभंग, ओव्यांतून तत्कालीन सामाजिक, आर्थिक व्यवस्थेवर प्रकाश टाकला गेला. एकुणातच, समाजाच्या जडणघडणीत संतांचे, संतसाहित्याचे योगदान मोलाचे असून, त्याचे श्रेय केवळ ज्ञात संत कवी-कवयित्री, साहित्यिकांनाच नाही; तर अज्ञात, अप्रसिद्ध असलेल्या साहित्यिकांनादेखील जातं. अशाच अज्ञात कवींचा, विशेषतः कवयित्रींचा धांडोळा घेण्याचं महत्कार्य बीडच्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. अलका चिडगोपकर यांनी केलं आहे.

बीड येथे सुमारे तीन दशकांहून अधिक काळ अध्यापनाचं कार्य केलेल्या डॉ. चिडगोपकर यांच्या लेखनशैलीवर त्यांच्या आई डॉ. सुहासिनी इर्लेकर यांच्या प्रतिभेची छाप आहे. डॉ. इर्लेकर या प्राचीन मराठी संत साहित्याच्या अभ्यासक आणि समीक्षक. तीच परंपरा डॉ. चिडगोपकर यांनी सुरू ठेवली. इर्लेकर यांनी महादंबा, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई आणि वेण्णाबाई या पाच संत कवयित्रींचा सखोल अभ्यास केला आहे. या पाच संत कवयित्रींचा शोध घेत त्यांचा अभ्यास पुढे नेण्याचा प्रयत्न डॉ. चिडगोपकर यांनी ‘मध्ययुगीन मराठी ज्ञात-अज्ञात स्त्रीसंतांची काव्यधारा’ या ग्रंथाच्या माध्यमातून केला आहे. तब्बल दहा ते बारा वर्षांच्या सखोल, दीर्घ अभ्यासातून, संशोधनातून या ग्रंथाची निर्मिती झाली आहे. ६०० पानांचा ग्रंथ नुसता चाळला तरी मध्ययुगीन संत कवयित्रींच्या काव्यांची व्यापकता दिसून येते.

‘जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणजे जो आपुले । तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।।’ ही तुकोबांची मानवतावादी जीवनदृष्टी जेव्हा समाजाला रुजेल, तेव्हाच मध्ययुगीन संतसाहित्याच्या चिंतनाचं, मननाचं सार्थक झालं असं म्हणता येईल. मध्ययुगीन संत साहित्याने सामाजिक उत्कर्षाचं व्रत अखंड स्वीकारलं होतं आणि हे नजरेआड कसं राहिलं, याचं आकलन करताना विविध भूमिकांतून मध्ययुगीन ज्ञात आणि अज्ञात, तसंच अप्रकाशित संत कवयित्रींच्या काव्यांचं, ओव्यांचं संकलन करण्याचं काम लेखिकेने केलं आहे.

मध्ययुगीन काळात मराठी कवितेच्या विकासात व विस्तारात हातभार लागला. मध्ययुगीन मराठी कवयित्रींची कविता खरोखरच काव्यप्रवाहाहून वेगळी आहे काय? तिला स्वतःचं वेगळं काही करता आलं आहे काय? या कवयित्रींनी समकालीन काव्यात भर घातली आहे? असे अनेक प्रश्‍न निर्माण होत असताना याच प्रेरणेतून तत्कालीन कवयित्रींच्या काव्यांची रचना झाल्याचं लेखिकेला वाटतं. याच प्रेरणेतून लेखिकेने या ग्रंथाच्या निर्मितीचा ध्यास घेतला.

या ग्रंथात तेराव्या शतकापासून ते १९ व्या शतकाच्या पूर्वार्धातील नाथसंप्रदाय, महानुभाव, वारकरी, रामदासी संप्रदाय, तंजावर येथील कवयित्री व अन्य उर्वरित संतांनी रचलेल्या काव्यांचा समावेश आहे. प्रामुख्याने ५४ संत कवयित्रींच्या ओव्या, संतचरित्रं, आरती, आत्मचरित्र, भारूड, गवळण इत्यादीचा उल्लेख करता येईल.

या जोडीला अज्ञात कवयित्रींचा शोध घेतला गेला आहे. यात संत काशीबाई, संत ज्ञानाबाई, बायासराफ अशा कितीतरी अप्रकाशित संत कवयित्रींची नावं घेता येतील. याशिवाय संत साकाईसा, संत देमाईसा, संत साधा यांसारख्या अपरिचित संत कवयित्रींच्या एकेका ओवींची दखल या ग्रंथात घेतली आहे. या ग्रंथाला १५६ पानांचं दीर्घ प्रास्ताविक असून, त्यात काव्यांची वैशिष्ट्यं आणि मर्यादा नोंदविण्यात आली आहे. त्यांच्या कवितेमागची प्रेरणा, संतांचा प्रभाव याचंही आकलन होतं. या ग्रंथात विषयानुरूप काव्यांची विभागणी करण्यात आली आहे. याप्रमाणे ग्रंथात एकसूत्रता आणली असून, अभ्यासकांचा वाचन करताना गोंधळ उडत नाही.

संशोधनावर आधारित अभ्यासपूर्ण विवेचन व मांडणी करणारा मराठीतील हा पहिलाच ग्रंथ असावा. अध्यात्माची उभारणी ही सर्वधर्म समभावावरच झाली आहे. संत कवयित्रींच्या काव्यसंपदेचा अभ्यास करताना लेखिकेला या सर्वधर्म समभावाचा जागर दिसून आला आणि त्याची अनुभूती या ग्रंथात दिसून येते. मराठी वाङ्‍मयाच्या अभ्यासकांना अज्ञात कवयित्रींचा शोध या ग्रंथाच्या माध्यमातून घेता येणार आहे. या ग्रंथात काव्यसृष्टीचं मूल्यमापन हे काव्यानुसार केल्याचं दिसून येतं. एवढंच नाही, तर कठीण शब्दांचे अर्थ ग्रंथाच्या शेवटी असून ते ४२ पानी आहेत. एकुणातच, मराठी ज्ञात-अज्ञात संत कवयित्रींचा उल्लेख होईल, तेव्हा या ग्रंथाचा संदर्भ निश्‍चित हाताळला जाईल, यात शंका नाही.

पुस्तकाचं नाव : मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा

लेखिका : डॉ. अलका चिडगोपकर

प्रकाशन : स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे

(०२० - २४४७२५४९, ९४२३६४३१३१)

पृष्ठं : ५९२, मूल्य : ८०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजार तुफान वाढणार; महाराष्ट्रात भाजपच्या विजयाचा होणार परिणाम, एक्स्पर्टने सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates : हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

Maharasthra Vidansaha Election: ईव्हीएम गडबड नाही, निवडणुक आयोगाने फेटाळला आरोप

IND vs AUS 1st Test: अरे, आधी अम्पायरकडे बघ! Mohammed Siraj सेलिब्रेशन करत पळत सुटला, मग पुढे जे घडलं ते...; ड्रेसिंग रुममध्ये रोहितही दिसला

SCROLL FOR NEXT