Ashok Patki writes about drama artisi music ramkrushna naik actor  sakal
सप्तरंग

नाटकवाल्यांशी घरोबा

दि गोवा हिंदूचे रामकृष्ण नाईक. म्हणजे नाटक मंडळींचे रामकृष्ण काका किंवा नाईक काका.

अशोक पत्की

दि गोवा हिंदूचे रामकृष्ण नाईक. म्हणजे नाटक मंडळींचे रामकृष्ण काका किंवा नाईक काका.

अशोक पत्की

संगीत क्षेत्रात काम करताना अनेक प्रकारची मित्रमंडळी मला भेटली. त्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले. मीदेखील त्यांच्यावर तितकेच प्रेम केले. हा मित्रपरिवार खूप मोठा आहे. नाटकांना संगीत देताना असंख्य नाटकवाल्यांसोबत माझा घरोबा झाला. माझ्यावर प्रेम करणाऱ्या गायक, संगीतकार, अॅरेंजर, वादक यांच्या मी आयुष्यभर ऋणातच राहीन.

दि गोवा हिंदूचे रामकृष्ण नाईक. म्हणजे नाटक मंडळींचे रामकृष्ण काका किंवा नाईक काका. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी दि गोवा हिंदू असोसिएशनच्या एका बालनाट्याला संगीत देण्यासाठी माझे नाव सुचविले. मला संगीतकार म्हणून ते पहिले बालनाट्य मिळाले. त्याचे नाव होते ‘आटपाट नगरची राजकन्या’. त्यानंतर अभिषेकी बुवांनी नाईक काकांना सांगितले की, यापुढील संगीत नाटकांना बॅकग्राऊंड म्युझिक असेल ते मी करणार नाही, ते अशोकला दे. त्यानंतर मी गोवा हिंदूची जवळपास वीसेक नाटके संगीतबद्ध केली. सभ्य गृहस्थ हो, दुर्गी, संध्या छाया, अखेरचा सवाल, दिसतं तसं नसतं वगैरे वगैरे.

नाटकांचा संगीतकार म्हणून मला लोक ओळखू लागले. त्यानंतर अन्य निर्मातेही माझ्याकडे येऊ लागले. मोहन तोंडवळकर, मोहन वाघ, चंद्रकांत कुलकर्णी, मच्छिंद्र कांबळी आणि माझे घनिष्ट मित्र सुधीर भट. सुधीर भट यांच्या जवळपास ऐंशी नाटकांना संगीत देण्याचे भाग्य मला लाभले. त्यातील ‘मोरूच्या मावशी’ या नाटकातील संगीत लोकांना प्रचंड आवडले. त्यातील ‘टांग टिक...’ या गाण्याने खूपच कहर केला.

देश-विदेशातील लोकांना विजय चव्हाण हा नट आवडू लागला. त्याने केलेली मावशीची भूमिका सगळ्यांना कमालीची भावली. ‘टांग टिंक...’ या गाण्याला प्रत्येक वेळी वन्स मोअर मिळू लागला. त्यात काम करणारे प्रशांत दामले आणि प्रदीप पटवर्धन हे कलाकारही लोकांना आवडू लागले. या नाटकाने दोन हजार प्रयोगांचा पल्ला पार केला. त्यानंतर ब्रह्मचारी, भ्रमाचा भोपळा, प्रीतिसंगम, लग्नाची बैडी, ती फुलराणी, जावई माझा भला, किरवंत, एका लग्नाची गोष्ट, असा मी असामी, नकळत सारे घडले, सुंदर मी होणार... अशा जवळजवळ ऐंशी नाटकांना मी संगीत दिले.

सुंदर मी होणार या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला पु. ल. देशपांडे स्वतः आले होते. मध्यांतराला त्यांनी सुधीरला विचारले की, अरे तुझा तो म्युझिक डिरेक्टर आलाय का...? सुधीरने त्यांना तो आला नाही, पण त्याची पत्नी आली आहे, असे सांगितले. मग पुलं म्हणाले, की बोलाव तिला. मला काही सांगायचे आहे.

माझी पत्नी त्यांना भेटली तेव्हा ते म्हणाले, की मुली तू खूप नशीबवान आहेस. तुला अशोक पत्कीसारखा नवरा मिळाला. घरी गेल्यानंतर त्याला सांग की खूप सुंदर म्युझिक दिले आहे. रात्री घरी आल्यानंतर तिने मला सांगितले, की आज पुलं भेटले होते आणि ते तुमची खूप स्तुती करीत होते. पुलंनी दिलेली ही पोचपावती ऐकून मला खूप बरे वाटले.

तेव्हा दामू केंकरे गोवा हिंदूचे दिग्दर्शक होते. त्यांच्याबरोबरही मी पुष्कळ नाटके केली आहेत. आमची सुरुवात ‘अखेरचा सवाल’ या नाटकापासून झाली आणि त्यानंतर ओळख वाढत गेली. त्यानंतर त्यांचा आणि माझा एक प्रकारचा घरोबा झाला होता. त्यांचा मुलगा विजय केंकरे दिग्दर्शक झाल्यानंतर तोही माझ्याकडे यायला लागला आणि आम्ही चाळीसेक नाटकं एकत्र केली. आता त्याचे आलेले नाटक ‘यू मस्ट डाय’ हे मी केले आहे.

दुसरे एक माझे मित्र दिलीप प्रभावळकर. आम्ही दोघेही सारस्वत असल्यामुळे आमची एकदम घट्ट मैत्री झाली. आम्ही कधीही भेटलो की मंगेशी, शांतादुर्गा या मंदिरांबाबतचा विषय हमखास निघणारच. मग तो देवळात गेला होतास का... असे विचारणारच. माझे ‘सप्तसूर माझे’ हे आत्मचरित्र आले त्या प्रकाशन सोहळ्याला तो पुण्याहून मुंबईत आला होता. त्याने त्याच्या शैलीमध्ये भाषण केले आणि मी धन्य झालो. आमच्या दोघांचा कॉमन मित्र बाळ कर्वे. दरवर्षी गणपतीला मी, माझी पत्नी आणि मुलगा त्यांच्या घरी जातो. त्याच्या घरी दोन्ही बाजूला दहा-दहा भटजी मंत्रांजली म्हणायचे. ते ऐकायला मी आवर्जून जायचो.

कारण मला ते ऐकायला खूप आवडायचे. बाळ कर्वे म्हणजे ‘चिमणराव गुंड्याभाऊ’मधील गुंड्याभाऊ. चिमणराव ही भूमिका दिलीप करायचा. त्यानंतर मला भेटलेले श्यामराव कांबळे. हा खूप मोठा संगीत अॅरेंजर. मला जेव्हा पहिला चित्रपट मिळाला ‘पैजेचा विडा’ तेव्हा मी श्यामराव यांना भेटायला राजकमल स्टुडिओमध्ये गेलो होतो. सुरुवातीला त्याने मला नकारच दिला. म्हणाला, की बाबूजी, जयदेवजी, रोशनजी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलालजी... यांची कामे करताना मला वेळच मिळत नाही. तरीही तू तुझा नंबर देऊन ठेव. कुणाचे काम एखाददिवशी रद्द झाले, तर तुझ्याकडे नक्कीच येईन. काही दिवसांनी ते माझ्याकडे आले आणि आम्ही बसून दोन गाणी केली. ते करता करता त्यांच्याकडून मी मला माहीत नसलेली माहिती जाणून घेतली. मला त्यांच्याकडूनही शिकायला मिळाले. आमच्यामध्ये छान मैत्री झाली.

त्यानंतर नट आणि गायक प्रशांत दामले. हा कलाकार माझा खास मित्र. दरवेळी तो सगळ्यांना सांगतो, की अशोक पत्की यांच्या गाण्यामुळे मला सगळे ओळखतात. हा त्याचा मोठेपणा झाला; परंतु खरे कारण म्हणजे तो चांगला कलाकार आहे आणि त्याचा आवाजही छान आहे. त्याच्या गायकीबद्दल मला माहीत असल्यामुळे मी त्याच्याकडून छान छान गाणी गाऊन घेतो. त्याच्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांचा वन्स मोअर असतो. प्रत्येक गाण्याला अशी दाद मिळणे, ही साधी बाब नाही. संगीतकार नरेंद्र भिडे हे आज आपल्यात नसले, तरी त्यांची आठवण मला नेहमी येत असते. त्यांच्या स्टुडिओत जाऊन मी गाणी केली आहेत. ते म्हणायचे की टीव्ही शोचे शीर्षकगीत करावे ते केवळ अशोक पत्कीनेच.

पुण्याचेच दुसरे संगीतकार आनंद मोडक. त्यांच्याबरोबर मी सहायक अॅरेंजर म्हणून काम करायचो. त्यांनी माझ्या ‘सप्तसूर माझे’ या आत्मचरित्रासाठी प्रस्तावना लिहिली होती. ती खूप सुंदर होती. आज तेही आपल्यात नाहीत याचे दुःख फार होते. त्यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे की, ‘‘सप्तसूर माझे ही कहाणी आहे अशोक पत्की नावाच्या एका सुंदर आणि सुरेल गाण्याची. वाया गेलेला मुलगा म्हणून सभोवतालच्या मंडळींनी अव्हेरले तरी एकलव्याच्या निष्ठेने आणि ध्यासाने केलेल्या संगीतसाधनेची. १९८० पासून माझी व त्यांची ओळख आहे आणि ती तशीच राहिली आहे. पॉलीडोअरमध्ये मी एका पॉप गाण्याचे रेकॉर्डिंग होते. संगीत संयोजक इनॉक डॅनियल याच्या वाद्यवृंदातील सिंथेसायझर वाजविणाऱ्या अशोकशी झालेली माझी पहिली भेट मला अजूनही आठवते. १९८३-८४ मध्ये ‘पडघम’ या नाटकाच्या गाण्याच्या व पार्श्वसंगीताच्या ध्वनिमुद्रणासाठी लिऑनबरोबर अशोक होताच. देखो मगर प्यार से या हिंदी मालिकेचे शीर्षक गीत करताना अशोक होताच. या साऱ्या निर्मितीतील अशोकचा सहवास, त्याच्या सहवासातील नितळपण आणि सृजनशील योगदानाची वृत्ती हे सारे मनभावन होते. त्यामुळे या अल्पशा सहवासात तो माझा चांगला मित्र झाला. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चाळीसहून अधिक वर्षे दररोज नवीन संगीत निर्मिती करण्याची अद्‌भूत प्रतिभा परमेश्वराने त्याला दिल्याबद्दल त्याच्या प्रतिभेला परमेश्वराने चिरयौवनाचा वरच दिला आहे जणू. त्याचं ‘सप्तसूर माझे’ वाचताना मी माझा उरलो नव्हतो, तर मी अशोक पत्कीच झालो होतो.’’ माझ्यावर प्रेम करणाऱ्या गायक, संगीतकार, अॅरेंजर, वादक यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT