shantaram nandgaonkar sakal
सप्तरंग

एकजीव झालो गाण्यांसाठी...

शांताराम एक शीघ्र कवी म्हणूनही प्रसिद्ध होते. गाण्याची चाल आणि सिच्युएशन यांतील दुवा हे शब्द असतात. शांताराम यांना ते शब्द पटकन सापडायचे.

अशोक पत्की

शांताराम एक शीघ्र कवी म्हणूनही प्रसिद्ध होते. गाण्याची चाल आणि सिच्युएशन यांतील दुवा हे शब्द असतात. शांताराम यांना ते शब्द पटकन सापडायचे.

गीतकार व कवी शांताराम नांदगावकर हे माझे जवळचे मित्र. त्यांच्याबरोबर मी खूप काम केलं आहे. शब्द आणि सूर जसे एकजीव होतात आणि गाणं तयार होतं तसंच मी आणि शांताराम एकजीव होऊन काम करीत होतो... गाणी बनवित होतो...

शांताराम एक शीघ्र कवी म्हणूनही प्रसिद्ध होते. गाण्याची चाल आणि सिच्युएशन यांतील दुवा हे शब्द असतात. शांताराम यांना ते शब्द पटकन सापडायचे. त्यांच्या शीघ्र कवितेची प्रचिती भावगीत असो वा चित्रपट संगीत, त्या त्या वेळी होत असे. चालीवर गाणं लिहिणं हा तर त्यांचा हातखंडा होता.

गुरुपौर्णिमेचा दिवस होता. शिवाजी मंदिर येथे गाण्याचा कार्यक्रम होता. मला आणि शांताराम यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविले होते. सात्री साडेआठ ते अकरा अशी वेळ होती. अकरा वाजता आम्ही शिवाजी मंदिरच्या बाहेर आलो. टॅक्सी पकडली आणि खारच्या दिशेने निघालो. मी खार स्टेशनला राहात होतो, तर शांताराम खारदांडा परिसरात. त्यांना पहिल्यांदा मी सोडायचो आणि मग मी घरी जायचो. आमचे असे ठरलेले असायचे. टॅक्सी खारच्या दिशेने जात असताना आम्ही वांद्रे येथे पोहोचलो आणि रस्त्यावरील दिवे तसेच आजूबाजूचे दिवे अचानक बंद झाले. अक्षरशः ब्लॅकआऊट झाला. आम्ही हसता हसता गप्प झालो, सगळीकडे अंधार पसरलेला होता. एवढ्यात शांताराम म्हणाले, ‘अशोक, चार ओळी सुचल्या आहेत... ऐकवू का?’ मी म्हटलं, ‘ऐकव ना.’ तो म्हणाला, काळोख दाटूनी आला... पालखी उतरूनी ठेवा... बदलून जरा घ्या खांदा... जायचे दूरच्या गावा...’ मी म्हटलं, ‘‘व्वा... शांताराम क्या बात है...’ आता त्यांचे घर जवळ येत चाललेले होते. ते उतरणार तोच मी त्यांना म्हटलं की, ‘‘तुम्हाला याची चाल ऐकवू का...?’ ते म्हणाले, ‘ऐकव.’ चाल ऐकविताच ते भारावून गेले. खूप मेलोडियस चाल आहे... उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत ये.. आपण हे गाणे करू या.’

हे गाणे म्हणजे त्या अंधाराचा सगळा इफेक्ट होता. आम्ही हे एक गाणे आणि दुसरे एक गाणे दोन दिवसांनी केले. ‘दूरच्या रानातल्या बकुळीच्या तळी प्रीतीची गीते किती प्रिये रंगली...’ मी शांताराम यांना म्हटलं, ‘‘हे गाणे गाणार कोण?’’ ते म्हणाले, ‘‘तो साऊथचा आहे... तो इथे कधी येणार आणि गाणार?’ शांताराम म्हणाले, ‘‘तो माझ्या ओळखीचा आहे. रवींद्र जैन यांची गाणी गाण्यासाठी तो येथे येतो.’ मग शांताराम आणि मी त्याला घेऊन ती दोन्ही गाणी तयार केली. एका टीव्ही शोमध्ये ती गाणी गायली असता सगळ्यांना धक्का बसला. कारण येसूदास हा साऊथचा खूप मोठा गायक आणि तो अशोक पत्की आणि शांताराम नांदगावकर यांच्याकडे गातो याचा सगळ्यांना धक्का बसला होता. मात्र आम्ही खूप आनंदात होतो.

‘तू सप्तसूर माझे’ हा सुरेश वाडकर यांचा अल्बम करण्याची वेळ आली. त्यावेळी आम्ही तीच दोन गाणी आणि अन्य सहा गाणी सुरेश वाडकर यांच्या आवाजात केली. आता ती गाणी त्यांच्याच आवाजात तुम्हाला ऐकायला मिळतील. असाच एक प्रसंग मी फार पूर्वी पंडित जितेंद्र अभिषेकींबरोबर काम करताना झाला होता. अभिषेकी बुवांचे शिष्य देवकी पंडित, राजा काळे, अजित कडकडे असे चार ते पाच जण होते. मला अजित कडकडे यांचा आवाज खूप आवडायचा. त्यांची स्टाईल मला आवडायची. मग मी शांताराम यांना सहजच बोलून गेलो की, ‘अजितची चार गाणी आपण करू या.’ त्यांना माझी ती कल्पना आवडली. मला एक डायरी दिली आणि यातील तुला कोणती आवडतात ते तू पाहा म्हणाला. चाळता चाळता त्यातील एक गाणे मला खूप आवडले. ‘सजल नयन मित धार बसरती...’ हे ते गाणे.

पंधरा ते वीस मिनिटांत मी त्यांना चाल लावली. शांताराम मला म्हणाले, ‘‘आजचा दिवस चांगला आहे.. अजितला आजच फोन कर आणि सांग. मी अजितबरोबर बोललो. त्याला सगळे सांगितले. तो तयार झाला रिहर्सलला यायला. संध्याकाळी चार वाजता तो शांतारामच्या घरी आला. त्याने गाण्याची चाल ऐकली आणि खुश झाला. दुसरी दोन-तीन गाणी होती. ती ललिता बापट, राम जाधव आणि किरण चित्रे यांच्याकडून लिहून घेण्यात आली. शांताराम यांचा हा एक गुण चांगला होता की, ‘‘ते नवोदित कवींना प्रोत्साहन द्यायचे आणि संधीही द्यायचे. त्यांनाही आनंद व्हायचा. कित्येक जणांना त्यांनी मदत केली आहे. आज ‘सजल नयन मित धार बरसती’ची चर्चा होते तेव्हा लोक खुश होतातच; पण अजित स्वतः सगळ्यांना सांगतो की आज मला लोक ओळखतात ते अशोक पत्कींच्या या गाण्यामुळे!

एकदा अनुराधा पौडवालची चार गाणी ध्वनिमुद्रित करायची होती. इनरिको नावाची कंपनी होती. तेथे श्री. रेळे नावाचे गृहस्थ मुख्य होते. त्यांचा फोन आला की, ‘चार गाणी अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात करायची आहेत. मग काय आम्ही कामाला लागलो. अनुराधाला चारही गाणी शिकवली. मात्र घरी गेल्यानंतर तिच्या लक्षात आले की दोन गाणी एकाच सुरावटीची आहेत. एकाच ठेक्याची आहेत. त्यामध्ये नावीन्य असे काही नाही. तिने शांताराम यांना फोन करून सांगितले. दुसऱ्या दिवशी रेकार्डिंग होते. आम्हा कुणाकडे गाडी नव्हती. आम्ही टॅक्सीने निघालो, तर शांताराम हळूच म्हणाले, ‘‘ही दोन गाणी एकाच ठेक्याची आहेत.

आपण नवीन करूया का...’ मी म्हणालो, ‘मलाही तस्सेच वाटत आहे. मग तुम्ही लिहून द्या... मी पटकन चाल लावतो.’ तेव्हा बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. तो पाऊस आणि समोरचा खवळलेला समुद्र पाहून माझ्या मनात एक चाल तयार झाली. ती चाल त्याला ऐकविली. ती सगळ्यांना आवडली. लगेच शांताराम यांनी शब्द लिहिले... ‘अनुरागाचे थेंब झेलती प्रीत लतेची पाने, तुझ्या नि माझ्या भेटी मधुनी फुलती धुंद तराणे...’ म्हटलं व्वा क्या बात है. मग ढोलकीवादक लाला गंगावणेने वाजवावयास सुरुवात केली. त्याने ‘घर आया मेरा परदेसी...’ या गाण्यासाठी ढोलकी वाजविली होती.

अशा पद्धतीने ते गाणे अर्ध्या तासात तयार झाले. त्या गाण्यामुळेच तो अल्बम लोकांना फार आवडला. तो अल्बम हिट झाला. या अल्बमवरून आम्ही किती वेगाने चांगले काम करू शकतो याची कल्पना येते.

(लेखक ज्येष्ठ संगीतकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT