सन १९७५ ते २००० पर्यंत छान छान मेलोडियस जिंगल्स ऐकायला मिळायच्या. तेव्हाचे संगीतकार महान होते आणि जाणकारही होते.
मला जर कुणी विचारले की तुमची आवडती जिंगल्स कोणती, तर मी ‘पुरब से सूर्य उगा...’ हीच सांगतो. कविताने आणि सुरेशजींनी ही मनापासून गायलेली आहे. अलीकडेच संगीतकार व गायक ए. आर. रेहमान यांनी कुठेतरी बोलून दाखविले आहे की, ती जिंगल्स मला खूप आवडली. आतापर्यंत अनेक प्रकारच्या जिंगल्स मी केल्या; परंतु ‘पुरब से सूर्य उगा...’ या जिंगल्समुळे मला वेगळी प्रतिष्ठा मिळाली. त्या जिंगल्सची जन्मकथा...
सन १९७५ ते २००० पर्यंत छान छान मेलोडियस जिंगल्स ऐकायला मिळायच्या. तेव्हाचे संगीतकार महान होते आणि जाणकारही होते. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास व्हायचा. वारंवार मीटिंग्ज व्हायच्या. तासन् तास चर्चा व्हायची. लिंटास, चैत्रा, फार प्रॉडक्शन अशा नामांकित कंपन्या काम करीत होत्या. ओअॅनएम (O ‘n’ M) कंपनीची एक आठवण सांगतो, पियूष पांडे कंपनीचे सर्वेसर्वा. ते मला वेस्टर्न आउटडोअरला भेटले. म्हणाले, मला उद्या सकाळी एक गाणे प्रेझेंट करायचे आहे. आताच्या आता मला ते कंपोझ करून हवे. ती वेळ रात्री साडेनऊची होती. मी, सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती सकाळी दहापासून काम करीत होतो. त्यामुळे खूप थकलेले होतो. साहजिकच मी पियूष यांना म्हणालो, की मी काम करू शकतो; परंतु तुम्ही या मंडळींना विचारा... असे सांगून मी मुखडा पाहिला आणि कॉफी घ्यायला बाहेर आलो.
कॉफी पिता पिता माझ्या डोक्यात चाल रचली जात होती. तेवढ्यात पियूष बाहेर आले आणि म्हणाले की, ती मंडळी तयार आहे. लगेच मी आत गेलो आणि सकाळच्या सत्रातील उरलेले काम संपवले. त्यानंतर त्यांचे गाणे तयार करायला घेतले. ते गाणे होते ‘पुरब से सूर्य उगा फैला उजीयारा... जागी हर दिशा दिशा जागा जग सारा...’ त्या दिवशी तासाभरात ते गाणे आम्ही संपविले. त्यानंतर आठ वर्षे पियूष पांडे यांचा फोन वगैरे कधी आलेला नाही. मात्र आठ वर्षांनी त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. साक्षरता प्रसारणाची ती जिंगल्स होती. ती मी, सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्याच आवाजात पुन्हा करून घेतली. ती जिंगल्स जेव्हा टीव्हीवर लागली तेव्हा मला अनेकांचे फोन आले. त्यांनी अशोक ही जिंगल्स तूच बनविली असणार आणि आम्हाला ती खूप आवडलेली आहे. मला जर कुणी विचारले की तुमची आवडती जिंगल्स कोणती... तर मी ‘पुरब से सूर्य उगा...’ हीच सांगतो.
कविताने आणि सुरेशजींनी ही मनापासून गायलेली आहे. अलीकडेच संगीतकार व गायक ए. आर. रेहमान यांनी कुठे तरी बोलून दाखविले आहे की, ती जिंगल्स मला खूप आवडली. त्यांनी या जिंगल्सची स्तुती केल्यामुळे माझे मन तृप्त झाले. आतापर्यंत अनेक प्रकारच्या जिंगल्स मी केल्या; परंतु ‘पुरब से सूर्य उगा...’ या जिंगल्समुळे मला वेगळी प्रतिष्ठा मिळाली.
कविताने एके दिवशी आजीवासन स्टुडिओमध्ये तिच्या मिस्टरांशी माझी ओळख करून दिली. त्यांच्या भाषेत म्हणजेच दक्षिणात्य भाषेत ती त्यांना सांगू लागली ‘पुरब से सूर्य उगा’ या जिंगलचे संगीतकार हे आहेत अशोक पत्की.’ अशा प्रकारे माझी ओळख झाली. आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांनी या जिंगलचे खूप कौतुक केले होते आणि कविताजवळ मला भेटण्याची इच्छादेखील व्यक्त केली होती. मग त्यांनी भेटून माझं कौतुक केलं. त्यामुळे हा आनंद काही वेगळाच होता.
‘त्यांच्याशी बोलता बोलता मला नाथन साहेबांची आठवण झाली. नाथन साहेब मलबार हिलच्या पायथ्याशी राहत असत. त्यांनी एक वेगळाच छंद जोपासला होता. जसं आपण आपल्या घरांमध्ये मांजर किंवा कुत्रे पाळतो अगदी त्याचप्रमाणे त्यांच्या घरात त्यांनी पाच-सहा माकडे पाळली होती. त्या प्रत्येक माकडासाठी एक वेगळा पिंजरादेखील त्यांनी ठेवला होता. ज्या ज्या वेळेस त्यांच्या घरी आमची बैठक असायची त्यावेळेस या माकडांपासून सावरत आम्हाला काम करावे लागत असे. नाथनजी बऱ्याच वेळा त्या माकडांसोबत चेष्टा करण्यात व्यग्र असायचे. कधीकाळी नाथनजी त्यांच्या घरी आम्हाला पेमेंट करायचे... त्यावेळेची मज्जा म्हणजे त्या पगाराचे पैसे मोजता मोजता मागून हळूच एखादा हात यायचा आणि त्यातली एक नोट गायब व्हायची. मागे पाहिल्यानंतर एखादे माकड ती नोट चावत किंवा तिच्याशी खेळत असायचं असं ते वेगळंच वातावरण असायचं. कधी-कधी ती माकडे पिंजरा गदागदा हलवत असायची. नाथन उठून आत जायचे. दोन पेल्यांमध्ये काहीतरी आणायचे आणि त्या माकडांसमोर ठेवायचे. ती माकडे एक मिनिटात ते फस्त करायची.
एके दिवशी नाथनजी वैतागले आणि म्हणाले, ‘आता हे सगळं सोडून देतो आणि माझ्या गावी त्रिवेंद्रमला जातो. आता हे काम मला झेपत नाही. सगळं काही तूच करत असलास तरीदेखील हा व्याप मला नकोसा वाटायला लागलाय. हे मुंबईचे घर वगैरे विकतो आणि कायमचा गावी निघून जातो.’ जेव्हा ते मला असं म्हणाले, तेव्हा त्यांच्याकडे एक माकड राहिले होते. ते त्यांनी प्राणिसंग्रहालयात पाठवले आणि ते गावी निघून गेले. गावी गेल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस अधूनमधून सणासुदीला विचारपूस करण्यासाठी त्यांचा फोन असायचा. त्यानंतर काही दिवसांनी हे प्रमाणदेखील कमी झाले.
काही वर्षांनी कविता कृष्णमूर्ती त्रिवेंद्रमला एका कार्यक्रमासाठी गेली होती. तो कार्यक्रम आटोपल्यानंतर त्रिवेंद्रमपासून जवळपास ४० किलोमीटर दूर ती नाथनजींना भेटण्यासाठी गेली; पण दुर्दैवाने त्यांची भेट होणं काही शक्य झालं नाही. कारण ती जाण्याच्या पंधरा दिवसांपूर्वी नाथनजींनी या जगाचा निरोप घेतला होता. तिने मला फोन केला आणि दबलेल्या स्वरात तिने सर्व घटना सांगितली. क्षणार्धात नाथनजींसोबतचा सर्व प्रवास माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेला. त्यांच्याबरोबर काम केल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आणि मी क्षणार्धात फोन ठेवून दिला.
वनराज भाटियांचं वेगळं होतं. ते अय्याशीत वाढलेले होते. त्यांचं घर आलिशान आणि भारदस्त होतं. लंडनला जशी घरं वा बंगले असतात तसं. त्यांचं खाणंही तस्संच होतं. बर्गर, चीज, पास्ता वगैरे. ते आपल्यासारखा डाळ-भात खायचे नाहीत. त्यांचे सगळे कसे इम्पोर्टेड... इम्पोर्टेड... इम्पोर्टेड... दररोज पार्ट्यांना जायचे. एकदा वनराज यांना अर्जंट स्टुडिओ हवा होता. त्यांनी कित्येक ठिकाणी शोध घेतला; परंतु तो काही मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले, ‘‘अशोक, मला ताबडतोब स्टुडिओ हवा आहे. तुझी ओळख भरपूर आहे. कर ना...’’ मी वांद्रे येथील एक स्टुडिओ सांगितला. दुसऱ्या दिवशी तिथे रेकॉर्डिंग करायचं ठरलं; परंतु वनराज म्हणाले, ‘‘मी येतो आज संध्याकाळी तो स्टुडिओ पाहायला आणि ते संध्याकाळी आले. स्टुडिओ पाहिल्यानंतर त्यांनी काहीसे नाक मुरडले आणि स्टुडिओच्या मालकासमोरच यापेक्षा चांगले माझे बाथरूम आहे, असं म्हणाले. ही बाब मला खटकली होती, पण करणार काय... कारण उद्या काम करायचं होतं. अखेर दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग झालं. वनराज खुश झाले, असे हे आमचे वनराज भाटिया. दिलदार आणि हुशार व्यक्तिमत्त्व.
इंग्लिश नोटेशन, इंग्लिश ऑर्केस्ट्रा, इंग्लिश सिंफनी याबाबतीत ते माहीर होते. याबाबतीत लेक्चर द्यायला त्यांना परदेशातून बोलावणे यायचे. अनेक ठिकाणी ते लेक्चर द्यायचे. हल्लीच त्यांचेही निधन झाले. खूप वाईट वाटले. हळूहळू पाने गळू लागली होती.
(लेखक ज्येष्ठ संगीतकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.