ashwini deshpande write article in saptarang 
सप्तरंग

कालचक्र (आश्‍विनी देशपांडे)

आश्विनी देशपांडे

मोबाईल फोनची कार्यक्षमता आणि लोकप्रियता वाढत गेली, त्याबरोबर मनगटी घड्याळांचा आता काय उपयोग, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. "अचूक वेळ दाखवणारी, हातावर सहज चढवता येणारी वस्तू म्हणजे मनगटी घड्याळ' असा सर्वमान्य अर्थ असलेली ही वस्तू प्रत्येक फोनअंतर्गत असलेल्या टाइमकीपरमुळं अनावश्‍यक होऊन लुप्त पावणार काय, असंही वाटायला लागलं होतं. मात्र, आजच्या स्थितीत असं काहीही झालेलं नाही. उलट मोठमोठ्या जागतिक कंपन्याही वैशिष्ट्यपूर्ण घड्याळं तयार करायला लागल्या आहेत. मनगटी घड्याळाच्या इतिहासाचा मागोवा घेतला, तर तंत्रज्ञान आणि डिझाईनमुळं त्या त्या वेळी रूढ असलेल्या कल्पनांना आव्हान देणारे काही महत्त्वाचे टप्पे स्पष्ट होतात. तो प्रत्येक टप्पा "घड्याळ' या संकल्पनेसाठी दीर्घायुषी ठरला.

गरज आणि आकांक्षा यातून उगम झालेल्या ज्या ज्या नवीनतम कल्पना जगण्याची पद्धत बदलून टाकण्याइतक्‍या प्रभावी असतात, त्यांचं एक पाऊल तांत्रिक प्रगती आणि दुसरं डिझाईन अभिव्यक्तीनुसार पुढं जात असतं. याचं उत्कृष्ट उदाहरण घड्याळाच्या उत्क्रांतीत सापडतं. मोबाईल फोनची कार्यक्षमता आणि लोकप्रियता वाढत गेली, त्याबरोबर मनगटी घड्याळांचा आता काय उपयोग, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. "अचूक वेळ दाखवणारी, हातावर सहज चढवता येणारी वस्तू म्हणजे मनगटी घड्याळ' असा सर्वमान्य अर्थ असलेली ही वस्तू प्रत्येक फोनअंतर्गत असलेल्या टाइमकीपरमुळं अनावश्‍यक होऊन लुप्त पावणार काय, असंही वाटायला लागलं होतं. सीडी आल्यानंतर कॅसेट गायब झाल्या, तसंच घड्याळांचं होऊ शकलं असतं; पण आजच्या स्थितीत असं काहीही झालेलं नाही. उलट "ऍपल', "नाईकी'सारख्या वेगळ्या क्षेत्रांतल्या जागतिक कंपन्याही वैशिष्ट्यपूर्ण घड्याळं तयार करायला लागल्या आहेत.
मनगटी घड्याळाच्या इतिहासाचा मागोवा घेतला, तर तंत्रज्ञान आणि डिझाईनमुळं त्या त्या वेळी रूढ असलेल्या कल्पनांना आव्हान देणारे काही महत्त्वाचे टप्पे स्पष्ट होतात. तो प्रत्येक टप्पा "घड्याळ' या संकल्पनेसाठी दीर्घायुषी ठरला. मागच्या शतकाच्या सुरवातीला मनगटी घड्याळांचा सार्वजनिक वापर लष्करातर्फे सुरू झाला. त्यापूर्वी पुरुष खिशात ठेवण्याची घड्याळं वापरत. महिलांत घड्याळ वापरण्याची पद्धत कमीच होती; पण गंमत म्हणजे काही महिला ब्रेसलेटसारखी घड्याळं घालायच्या. पहिल्या महायुद्धात लष्कराच्या सोयीसाठी पुरुषी मनगटी घड्याळं तयार करण्यात आली. पुढं तीच लोकप्रिय होऊन त्यांचा सर्रास वापर सुरू झाला. ही घड्याळं मेकॅनिकल हालचालींवर आधारित होती आणि स्प्रिंगद्वारे ती चालती ठेवली जायची. आतल्या हालचाली अचूक आणि सुरक्षित राहण्यासाठी ती प्रामुख्यानं स्टीलचीच बनवलेली असायची. मान्यवर व्यक्ती घड्याळ हे त्यांच्या प्रतिष्ठेचं आणि समृद्धीचं लक्षण म्हणून मिरवत असत. त्यांची निवड अतिशय चोखंदळ असे. त्यामुळं साहजिकच वेगवेगळ्या आकाराच्या डायलवरचे काटे, आकडे, खुणा, रंग आणि तितक्‍याच प्रकारचं स्टील किंवा कातडी पट्टे अशी बहुविध डिझाईन तयार होऊ लागली. या काळात बहुतेक घड्याळं कुशल तंत्रज्ञान आणि कारागिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये तयार होत असत.

1960 च्या दशकात घड्याळांच्या तंत्रज्ञानात एक मोठा बदल झाला. क्वार्टझ क्रिस्टलच्या स्पंदनावर अचूक हालचाल करणारी घड्याळं विकसित करण्यात जपानच्या सिको कंपनीला यश आलं. क्वार्टझद्वारे होणाऱ्या हालचालींवर तापमान अथवा आघाताचा परिणाम कमी होत असल्यामुळं ही घड्याळं जास्त अचूक होती. 1964 च्या उन्हाळी ऑलिंपिक्‍समध्ये जगाला साक्षी ठेवून ही घड्याळं किती निर्दोष आहेत ते सिको कंपनी सिद्ध करू शकली. यानंतर स्वित्झर्लंडचे पारंपरिक वॉचमेकर सोडता जगभर क्वार्टझ घड्याळंच तयार व्हायला लागली. जपान आणि अमेरिकेनं यात खास पुढाकार घेतला आणि डिझाईनमध्ये काही नावीन्यपूर्ण सुधारणा घडवून आणल्या. या काळात घड्याळं वेळेबरोबरच वार आणि दिवसही दाखवायला लागली. त्यामुळं अर्थातच त्यांची उपयुक्तता वाढली आणि डायलच्या डिझाईनमध्येही काही बदल शक्‍य झाले.

यानंतर कॅसिओ या कॅल्क्‍युलेटरसाठी प्रसिद्ध असलेल्या जपानी कंपनीनं डिजिटल घड्याळं आणली. वजनदार स्टीलच्या पट्टयांऐवजी रबर आणि प्लॅस्टिकचे पट्टे आणि पेटी, बारा आकडे आणि काट्यांच्या डायलऐवजी थेट वेळ दाखवणारे डिजिटल आकडे असा मोठा बदल असलेली, अगदी वेगळाच नूर असलेली ही घड्याळं बहुतांशी बॅटरीवर चालणारी होती. काही मॉडेल्स केवळ हाताच्या हालचालींवर चार्ज होणारी आणि सर्वांत आश्‍चर्य म्हणजे सुमारे चाळीस वर्षांपूर्वी, 1980 च्या दशकात काही मॉडेल्स सोलर पॉवरवर चालणारी होती. जवळजवळ शंभर वर्षं बाह्यरूपात बदल न झालेल्या घड्याळाचा चेहरामोहरा डिजिटल झाल्यावर पार बदलून गेला. या प्रकारच्या घड्याळांनी बाजारपेठ आणि मनं काबीज करून टाकली.

मात्र, जुन्या आणि महागड्या तंत्रज्ञानाला चिकटून राहिल्यामुळं 1970 च्या दशकात जागतिक पातळीवर विक्रीचा पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक हिस्सा असलेल्या स्विस कंपन्यांच्या घड्याळांची मागणी आटत केवळ दहा वर्षांत 15 टक्‍क्‍यांवर घसरली होती. स्वित्झर्लंडमधल्या अनेक पारंपरिक कंपन्या बंद पडल्या किंवा त्यांचं एकत्रीकरण झालं. याच लाटेमध्ये दोन कंपन्या एकत्र होऊन SMH नावाचा समूह उभा राहिला. छोटे बदल करून विक्रीतली घसरगुंडी थांबणं शक्‍यच नव्हतं. त्यामुळं अतिशय वेगळा, क्रांतिकारी विचार करण्याची गरज होती. स्विस घड्याळं उत्तम कारागिरी, राजसी आणि महाग म्हणून प्रसिद्ध, तर अमेरिकी किंवा जपानी घड्याळं स्वस्त किंमत आणि कुशल तंत्रज्ञानाबद्दल ख्याती असलेली असं त्यावेळचं समीकरण होतं. नोशिअल्स हायेक हा घड्याळांशी काहीही संबंध नसलेला संचालक आणि अर्न्स्ट टॉमके हा डिझाईन इंजिनिअर या दोघांनी मिळून सगळ्या प्रस्थापित कल्पनांना काट मारायचं ठरवलं. नवीनतम क्वार्टझ तंत्रज्ञान, स्विस कसब, अतिशय कलात्मक, रंगीबेरंगी, प्रसंगी पारदर्शक डायल्स आणि फॅशनेबल पट्टे, शिवाय जपानी घड्याळांशी बरोबरी करू शकणारी रास्त किंमत असं पूर्वी कधीही न जुळलेलं समीकरण 1983 मध्ये "स्वॉच' या नावाखाली सादर करण्यात आलं. स्वॉच हे नाव second watch (दुसरं घड्याळ) या दोन शब्दांपासून तयार करण्यात आलं होतं. आकर्षक किंमत आणि मोहक डिझाईनमुळे एकावरच न थांबता अनेक घड्याळं आपलीशी करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या या कल्पनेचं अतिशय उत्तम स्वागत झालं. "स्वॉच'ला जागतिक बाजारपेठांत अमाप लोकप्रियता आणि अफाट व्यावसायिक यश मिळालं. लुप्त होत असलेल्या स्विस वॉच उद्योगांना या यशामुळं नवीन दिशा मिळाली.

पुढच्या काही दशकांत मोबाईल फोन तंत्रज्ञान विकसित झालं, इंटरनेटचा उगम झाला. वेळ समजण्यासाठी फोन हजर असल्यामुळं हळूहळू घड्याळ म्हणजे वेळ दाखवणारं यंत्र नसून ते व्यक्तिमत्त्व व्यक्त करण्याचं साधन म्हणून स्वीकारलं गेलं. घड्याळाचा आकार, रंग, रूप याला असाधारण महत्त्व आलं. यामुळं अतिशय मजबूत गोरिला ग्लास, मिश्र धातू, इलेक्‍ट्रॉनिक्‍सची कार्यक्षमता यांचा समावेश घड्याळाच्या डिझाईन्समध्ये झाला.

घड्याळाची गणना फॅशनमध्ये झाली असल्यामुळं ते हलकं आणि सुडौल करण्याची जणू जागतिक स्पर्धाच सुरू झाली. यात बाजी मारली "टायटन' या भारतीय कंपनीनं. उत्तम डिझाईनमुळं भारतात वर्चस्व स्थापित करू शकलेला हा ब्रॅंड कायम काहीतरी नवीन करण्यास उत्सुक होता. टायटनच्या डिझाईन आणि इंजिनिअरिंग टीम्सनं जगातलं सर्वांत thin (पातळ) घड्याळ तयार करायचा पण घेतला. यात घड्याळातली अंतर्गत रचना आणि बॅटरी या दोन्ही गोष्टी वेफरइतक्‍या पातळ करता आल्या तरच हे शक्‍य होणार होतं. ते जमवण्यात त्यांना चक्क यश आलं. 2002 मध्ये "टायटन एज' हे केवळ 3.5 मिलिमीटर जाडीचं घड्याळ बाजारात आलं आणि या भारतीय इनोव्हेशनद्वारे एक इतिहासच घडला.

आजच्या काळात घड्याळांचा उपयोग काय, हे विचारताविचारता 2007 मध्ये "फिटबिट' हे वायरलेस इंटरनेट कनेक्‍टेड घड्याळ आलं. किती वेळात किती अंतर चाललं/ पळलं गेलं, त्यावेळी हृदयाच्या ठोक्‍यांचा वेग काय होता, किती कॅलरी वापरल्या गेल्या असतील अशी माहिती मिळवणं या फिटबीटच्या साह्यानं सहज शक्‍य झालं. फिटनेस आणि त्याचं वाढतं महत्त्व केंद्रभागी ठेवूनच "फिटबिट'ची योजना झाली आहे. आज त्यासारखी अनेक मनगटी यंत्रं बाजारात लोकप्रिय आहेत. घड्याळाचं सगळ्यात अलीकडचं क्रांतिकारी रूप म्हणजे 2015 मध्ये सादर झालेलं ऍपल वॉच. कॉंप्युटर लहान होतहोत ते मोबाईल फोनमध्येच सामावले; पण आता तर त्याहीपुढं जाऊन ऍपल कंपनीनं कॉंप्युटर, मोबाईल फोन आणि घड्याळ या सगळ्या सुविधा एका छोट्याशा पातळ डबीत सामावल्या आहेत. डायलचं रूप आपल्याला हवं तसं बदलता येतं, हवी ती ऍप्स.. अगदी व्हॉट्‌सऍप किंवा फोनही या डायलद्वारे वापरता येतो.

...घड्याळाच्या कालचक्राचं पुढचं स्वरूप काय असेल ते सांगणं अवघड आहे; पण जे असेल ते नक्कीच कौतुकास्पद असणार.

(छायाचित्रं: क्रिएटिव कॉमन्स तत्त्वानुसार अथवा निर्मात्याच्या मालकीची.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections Result: महाराष्ट्राबाहेरची 'ही' जोडी ठरली भाजपची किंगमेकर...अशाप्रकारे मिळवून दिला महायुतीला बंपर विजय

IND vs AUS 1st Test : अपर कट अन् शतक! Yashasvi Jaiswal ची ऑस्ट्रेलियात सेंच्युरी; ४७ वर्षांपूर्वीच्या गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT