सप्तरंग

भविष्यवेध (आश्विनी देशपांडे)

आश्विनी देशपांडे

दहा-पंधरा वर्षांपूर्वी आपल्या कल्पनाविश्वातही नसलेल्या गोष्टी आणि सेवा आज अस्तित्वात आल्या आहेत आणि त्यांच्याशिवाय आपलं दैनंदिन जीवन पुढं सरकेनासं झालं आहे. स्मार्ट फोन, फेसबुक, व्हॉट्‌सॲप, नेटफ्लिक्‍स, उबेर, ओला, स्विगी, झोमॅटो, अमेझॉन, फ्लिपकार्ट...ही यादी मोठी आहे. ही सगळी प्रॉडक्‍ट्‌स आणि ॲप्स विकसित करणारे डिझायनर्स आणि तंत्रज्ञ यांनी भविष्यावर नजर ठेवून, त्यातल्या शक्‍याशक्‍य गोष्टींवर तर्क लढवूनच ही निर्मिती केली. थोडक्‍यात, भविष्याचा असा वेध डिझायनर्सना घ्यावाच लागतो.

गरज जाणवणं, त्यानंतर ती गरज पुरी करू शकेल अशी कल्पना आणि मग ती कल्पना वास्तवात आणण्याच्या तंत्रज्ञानाचा उपयोग किंवा प्रसंगी शोध ही क्रमवारी जरी तर्कशुद्ध वाटत असली तरी प्रत्यक्षात तसंच घडेल असं नाही! डिझाईन ही जाणीवपूर्वक राबवली जाणारी कार्यपद्धती असली तरी उत्स्फूर्तता आणि अनिश्‍चितता हेसुद्धा या क्रियेचे अनिवार्य भाग आहेत.

कधी नव्या मटेरिअलचा किंवा वापरातल्या मटेरिअलच्या पूर्वी लक्षात न आलेल्या गुणधर्माचा शोध लागतो आणि त्याचा उपयोग कसा करता येईल यावर कल्पना लढवल्या जातात. कधी वेगवेगळी तंत्रज्ञानं एकत्र करून काही नवीन साधता येईल असं लक्षात येतं आणि त्याचा कुठं उपयोग होऊ शकेल यावर डिझायनर्स विचार सुरू करतात, तर कधी नव्या प्रकारच्या जीवनशैलीमुळे नव्या गरजा पुढं येऊन त्यांच्यावर संशोधन केलं जातं. कधी जुन्या समस्या नवीन तंत्रज्ञानामुळे नव्या प्रकारे सोडवता येण्याच्या शक्‍यता पडताळल्या जातात. व्यावसायिक डिझायनर्सना या बदलत्या क्रमवारीमुळे वर्तमानाचं भान आणि भविष्याचा अंदाज या दोन्हींवर प्रभुत्व मिळवणं आवश्‍यक ठरतं. ‘शास्त्रोक्त भविष्यवेध’ हा यशस्वी डिझाईन-प्रक्रियेचा एक महत्त्वाचा टप्पाच म्हणावा लागेल. माणसाची सवय बदलणं ही एक अतिशय अवघड आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. नवे पर्याय कितीही सोईस्कर असले तरी ते जुन्या पद्धतींना आणि सवयींना आव्हान देणारे असतील तर त्यांचा स्वीकार व्हायला मानसिकतेत बदल घडावा लागतो. आश्‍चर्य म्हणजे, गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानात इतके बदल झाले आहेत की ते स्वीकारण्याच्या गतीलाही झपाट्यानं वेग आला आहे.

केवळ दहा-बारा वर्षं मागं जाऊन पाहिलं तर आज अगदी सर्रास वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू आणि सेवा तेव्हा अस्तित्वातही नव्हत्या. इतकंच नव्हे तर, त्यांची आपल्याला गरज आहे, असा शोधही तेव्हा लागला नव्हता! मात्र, आज त्यातल्या काही गोष्टींशिवाय दिवस घालवणं अशक्‍य वाटतं. ‘ब्लॅकबेरी’ आणि त्याही पूर्वी इतर काही जपानी फोन इंटरनेट-कनेक्‍टेड होते; पण पहिला सलग रंगीत स्क्रीन असलेला, इंटरनेट-कनेक्‍टेड मोबाईल iPhone सादर झाला तो तसा अगदी अलीकडं म्हणजे सन २००७ मध्ये, तोही फोनच्या व्यवसायाशी काहीही संबंध नसलेल्या ॲपल या कंपनीद्वारे. गेल्या दहा वर्षांत तंत्रज्ञान, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर डिझाईन यांत सातत्यानं पुढाकार घेतल्यामुळे आज जगात शंभर कोटी iPhone  खणखणत आहेत. त्यातले एक कोटी फोन भारतात आहेत. सन २००७ च्या यशस्वी पदार्पणानंतर प्रत्येक फोन कंपनीद्वारे स्मार्टफोन सादर झाले. भारतात तब्बल ४० कोटी लोक स्मार्टफोन वापरतात. इंटरनेट-सेवांचा विस्तार होऊन माहिती, चित्र, ध्वनी आणि व्हिडिओ प्रसारित करण्याची गरज वाढेल या शक्‍यतेचा विचार करून १०-१२ वर्षांपूर्वी जो iPhone डिझाईन केला गेला तो भविष्याचा वेध घेणाऱ्या प्रभावी दूरदृष्टीमुळेच. 

डायरी, नकाशे, म्युझिक प्लेअर, रेकॉर्डर, कॅमेरा, फ्लॅश, रेडिओ, टीव्ही आणि आता तर क्रेडिट कार्ड आणि पैसे... या सगळ्या गोष्टी स्वत:बरोबर बाळगण्याऐवजी एक स्मार्टफोन असला की काम झालं. या एका शोधामुळे, त्याच्या भविष्यवादी डिझाईनमुळे अनेक सवयी बदलल्या, अनेक गोष्टी अनावश्‍यक झाल्या. स्मार्टफोनशी निगडित इतरही काही गोष्टींनी आपल्या आयुष्यात प्रवेश केला. फोनवरून फोटो काढणं इतकं सोपं झालं की तो दूर धरून स्वत:चा फोटो काढणं आपसूकच आलं. सध्या कमालीचा प्रचलित झालेला आणि लोकप्रिय ठरलेला ‘सेल्फी’ हा शब्द या क्रियेसंदर्भातच अस्तित्वात आला. सेल्फी काढायला सोपी जावी यासाठी एक विलक्षण वस्तू डिझाईन करण्यात आली व ती म्हणजे  सेल्फी-स्टिक. आज ज्या स्वरूपात सेल्फी-स्टिक मिळते ते डिझाईन केवळ पाच-सहा वर्षांपूर्वी विकसित झालेलं आहे. ‘टाइम’ मॅगझिननं सन २०१४ च्या जागतिक पातळीवरच्या उत्तम शोधांच्या यादीत सेल्फी-स्टिकचा उल्लेख केला होता. त्याच वर्षी ‘न्यूयॉर्क पोस्ट’नं ‘सर्वात वादग्रस्त आणि अपायकारक वस्तू’ म्हणूनही सेल्फी-स्टिक’वर टीका केली होती! ब्लू टूथ टेक्‍नॉलॉजी विकसित होऊन २०-२२ वर्षं झाली असली तरी वायरलेस ब्लू टूथ स्पीकर हीसुद्धा गेल्या दहा वर्षांत विकसित झालेली, स्मार्टफोनच्या लोकप्रियतेमुळे पुढं आलेली वस्तू आहे. गेल्या दहा वर्षांत प्रदूषण वाढल्यामुळं आवश्‍यक झालेले हवा शुद्ध करणारे एअर प्युरिफायर, H१N१, सार्स सारख्या रोगांपासून संरक्षण मिळावं म्हणून वापरले जाणारे मास्क आणि हॅंड सॅनिटायझर, तसंच कित्येक तास घराबाहेर काढावे लागल्यामुळे सहज बरोबर नेता येण्यासारखे, एका व्यक्तीला पुरेसे होतील एवढ्या प्रमाणातले टिकाऊ आणि पौष्टिक खाद्यपदार्थ आणि पेयं, दिवसभर ताजे राहतील असे मेकअप आणि परफ्यूम्स, एकट्या व्यक्तीला सुविधा देणारे ‘उबेर’, ‘ओला’, ‘स्विगी’, ‘झोमॅटो’, सहज खरेदीसाठी ‘अमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, तर मनोरंजन आणि जनसंपर्क पुरवणारं ‘फेसबुक’, ‘व्हॉट्‌सॲप’, ‘नेटफ्लिक्‍स...’ विश्वास बसतोय का? १०-१२ वर्षांपूर्वी यातलं काहीसुद्धा नव्हतं! ही प्रॉडक्‍ट्‌स आणि ॲप्स विकसित करणारे डिझायनर्स आणि तंत्रज्ञ यांनी भविष्यावर नजर ठेवून, त्यातल्या शक्‍याशक्‍य गोष्टींवर तर्क लढवूनच ही निर्मिती केली. येत्या दहा वर्षांत काय बदल घडतील आपल्या आयुष्यात? चालकरहित गाड्या, ड्रोनद्वारे वितरण, थ्रीडी प्रिंटरवर जागच्या जागी तयार होऊ शकणारे कृत्रिम अवयव, वैयक्तिक पोषणाच्या गरजेनुसार तयार होणारे खाद्यपदार्थ...कल्पना करायला सुरवात करा. कारण, डिझायनर्स यावर केव्हाच कामाला लागलेले आहेत...!

(छायाचित्रे : ‘क्रिएटिव्ह कॉमन्स’ तत्त्वानुसार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections Result: महाराष्ट्राबाहेरची 'ही' जोडी ठरली भाजपची किंगमेकर...अशाप्रकारे मिळवून दिला महायुतीला बंपर विजय

IND vs AUS 1st Test : अपर कट अन् शतक! Yashasvi Jaiswal ची ऑस्ट्रेलियात सेंच्युरी; ४७ वर्षांपूर्वीच्या गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT