कमालीचं निरागस हास्य, सर्वांना आदर व प्रेम अर्पण करणारा हाडामासांचा माणूस असू शकतो! हे आत्मप्रेम व आत्मप्रक्षेपणाची महासाथ असणाऱ्या काळात समजून घेणं तसं अवघड आहे. कंठाळी व कर्कश्श वातावरणात मंद्र व आर्त स्वरांची कल्पना करता येणं कठीण आहे.
विज्ञानाचा अर्थ जाणून, त्याचे लाभ आर्थिक शिडीच्या तळाशी असणाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या विचारात मग्न कोणी असू शकतं, यावर विश्वास बसणं अशक्य आहे. अशी व्यक्ती आढळलीच तर असे गुण लक्षातही येऊ नयेत, अशा काळातून प्रो. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन निघून गेले आहेत.
स्वामीनाथन यांचं घर गांधी विचारांनी भारलेलं होतं. त्यांचे वडील पेशानं डॉक्टर होते. ते व्यवसाय करताना कधीही मोबदला मागत नसत. त्यांची आई घरकाम करूनही तीन तास सूत कातत असे. त्यावेळी स्वदेशीची चळवळ देशभर पसरली होती. गांधीजी लोकांना सोन्याचे दागिने मागत व त्यांचा लिलाव करून येणारा पैसा चळवळीसाठी वापरत.
सांबशिवन यांच्या घरी गांधीजी उतरले तेव्हा संपूर्ण कुटुंबानं अंगावरचे सगळे दागिने देऊन टाकले. लहानग्या स्वामीनाथननंही सोन्याची साखळी व भीकबाळी दिली आणि त्यानंतर कधीही सुवर्ण नामक धातूला स्पर्श केला नाही. ‘पैसा साठवायचा नाही. आपलं भागून उरेल तो जनतेचा. तो त्यांना देऊन टाकायचा,’ हे गांधीतत्त्व त्यांनी आयुष्यभर आचरणात आणलं.
त्यांचं नेमकं वर्णन त्यांच्या ७८ वर्षांच्या सहचारिणी, शिक्षणतज्ज्ञ मीना स्वामीनाथन करत, ‘‘स्वामीनाथन म्हणजे सदैव फक्त शेती आणि शेती हाच विचार!’ आपल्याप्रमाणं डॉक्टर व्हावं, ही वडिलांची इच्छा नम्रपणे बाजूला सारत त्यांनी शेतीशास्त्राची वाट धरली. गांधीजींच्या सूचनेनुसार पोलिस अधिकाऱ्याची चालून आलेली संधी नाकारून उच्च शिक्षणासाठी इंग्लंड व अमेरिकेत गेले.
तिकडील अगडबंब वेतनाच्या प्रस्तावाचा विचारसुद्धा न करता ते भारतीय शेती संशोधन संस्थेत रुजू झाले आणि त्या संस्थेचा कायापालट केला. त्यांनी १९५५ मध्ये शेती संशोधन करताना विकिरणांच्या साहाय्यानं उत्परिवर्तन (म्युटेशन) घडवण्यास आरंभ करून विकिरण जीवशास्र विभाग स्थापन केला. तुर्भे येथील अणुतंत्रज्ञान संस्थेमध्ये जाऊन क्ष-किरण, गॅमा किरण व न्यूट्रॉन यांचा उपयोग करून नवीन बियाणं निर्माण करण्यासाठी मदत घेतली.
अणुऊर्जेचा शेतीसाठी उपयोग पाहून डॉ. होमी भाभा थक्क झाले. त्यामुळंच त्यांनी स्वामीनाथन यांना १९५८ मध्ये जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अणुऊर्जेचा शांततेसाठी उपयोग’ या जागतिक परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून पाठवलं. १९६८ च्या सुमारास अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांना सांगून उपग्रहांतून छायाचित्रांचा उपयोग शेतीवरील किडीचा प्रसार पाहण्यासाठी केला. त्यांनी ‘शेती व गरिबांच्या उपयोगी येते तेच खरे विज्ञान,’ ही उक्ती अनेकवेळा वास्तवात आणून दाखवली आहे.
आपल्या देशाची ‘भिकेचं वाडगं घेऊन हिंडणारा,’ ‘जहाजातून ताटात घेणारा’ अशी संभावना होत असे. तेव्हा नेते, वैज्ञानिक, अधिकारी व विस्तारक यांच्यात अद्वितीय समन्वय घडवून सर्वांना शेताशेतात नेलं आणि एक साधी सरकारी योजना हरितक्रांतीत रूपांतरित केली.
जगप्रसिद्ध ‘टाइम’ साप्ताहिकानं विविध खंडांच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या वीस महनीय व्यक्तींच्या कार्याची महती सांगणारे विशेषांक काढले. २३ ऑगस्ट १९९९ ला आशिया खंडावरील अंक निघाला. ‘टाइम’नं आशिया खंडाच्या प्रवासातील तीन भारतीय व्यक्तींच्या लक्षणीय कार्याचा आदरानं उल्लेख केला होता. यात त्यांनी महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यानंतर स्वामीनाथन यांचा गौरव केला होता.
त्यावेळी त्यांनी ‘हरितक्रांतीच्या जनकानं, दुष्काळाला पराभूत करण्याचा अविरत ध्यास आणि जनुक अभियांत्रिकीमधील त्यांचा गाढा व्यासंग यांची सांगड घालून आशिया खंडामधून दुष्काळाला चीत करण्यात यश मिळवलं. विसावं शतक त्यांचं सदैव ऋणी राहील.’ अशी कृतज्ञता व्यक्त केली होती.
भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना ते म्हणाले होते. ‘‘हरितक्रांतीमुळं शेतीतील उत्पादन वाढलं. आता शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं अत्यावश्यक आहे.’’ त्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत अनेक प्रयत्न केले. कमालीच्या मृदू भाषेतून आर्जवाने स्वामीनाथन वेळोवेळी सांगत, ‘‘नोकरशहा त्यांच्या अहवालात शेतकऱ्यांचा उल्लेख नेहमीच ‘लाभार्थी’ असा करतात.
वास्तविक आजपर्यंत शेतकऱ्यांना लाभ कधी झाला आहे? सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा मदमस्त लाभ उठवतात ते अस्सल लाभ-आर्थी! यच्चयावत जग हे शेतकरी व वनस्पतींच्या आधारावर जगत आहे. दोघांनाही काळजीपूर्वक जपणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची उपेक्षा करणारा देश अधोगतीच्या वाटेवर असतो.’
शेती इतका अत्यल्प परतावा इतर कोणत्याही व्यवसायाला मिळत नाही. त्यामुळं एकमेव भांडवल असणारी जमीन विकून वा स्वत:चा अंत घडवून शेतीला ‘सोडचिठ्ठी’ देणाऱ्यांच्या प्रमाणात होणारी वाढ पाहून ते विषण्णपणे म्हणत, ‘देशाचं भविष्य हे बंदुकांवर नसून, ते धान्यावर अवलंबून आहे. छोट्या व अत्यल्प भूधारकांचं हित सांभाळणं हे आपल्या सर्वांचं आद्यकर्तव्य आहे.’
मी ज्यावेळी त्यांना विचारलं? ‘‘शेतकरी आयोगाच्या अंमलबजावणीत कोणते अडथळे आहेत?’ त्यावर ते म्हणावे होते, ‘अंमलबजावणी न करण्यामागची नेमकी कारणं मला माहीत नाहीत. कदाचित अधिकारी वर्ग नाखूष झाला असेल. शेती विभागाचा कारभार शास्त्रज्ञांवर सोपवला जावा. अनुभवी, जाणकार, शेतकऱ्यांच्या नवनवीन समस्यांची व ग्रामीण भागाची बारकाईनं जाण असणारे शेतकरी हेच महत्त्वाच्या पदांवर नेमले जावेत.
अशा सूचना आयोगानं केल्या होत्या. सार्वजनिक क्षेत्रांनीच शेती संशोधन व विस्तार करण्यासाठी अग्रभागी असलं पाहिजे, असं माझं मत आहे. त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रांना मजबूत करून त्यांना वाव दिला जावा. परंतु शासनातील मुख्य प्रवाह हा खासगी क्षेत्रांकडं कललेला आहे. वैयक्तिक नफा हाच व्यवसायाचा उद्देश असल्यावर गरिबांचा विसर पडणारच.’
शेतकरी आयोगाची अंमलबजावणी झाली असती तर भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचा चेहरा बदलून गेला असता, याची स्वामीनाथन यांना खात्री वाटत होती. ‘सध्याच्या राजकीय वर्गाला ते नको आहे. नेहरू, शास्त्री, सुब्रमण्यम यांना हवं होतं तसं उमदं, उदार राजकारण सध्याच्या राजकीय वर्गाला नको आहे.
राजकारण विज्ञान आणि प्रगती यांचा पाठीराखा होऊ शकतं, तसंच अडथळादेखील! शहरी व ग्रामीण, शेती, उद्योग व सेवा यांच्यातील तफावत कायम ठेवण्यातच राजकीय (व आर्थिक) हित गुंतलं असावं, असं वाटतं.’ असं ते विषादानं म्हणत.
२०२१-२२ मध्ये भारतातील धान्यआयात ही दोन लाख चाळीस हजार कोटी रुपये एवढी झाली. तेल, तेलबिया, फळं, कडधान्य इतकंच काय मसाल्याचे पदार्थ आयात होऊ लागले. ही बाब वेदनादायक आहे. यातून धान्याबाबत स्वावलंबन या राष्ट्रीय उद्दिष्टालाच अघोषित तिलांजली दिली जात आहे. यासंबंधी ते बजावत, ‘धान्यआयात करून चलनवाढ रोखा हा नवा मंत्र झाला आहे. परंतु, धान्यआयात म्हणजे देशाच्या शेतीचं कंत्राट बाहेरच्या देशांना देणं, बेकारी आयात करणं आणि धान्य सुरक्षितता सार्वभौमत्व गहाण टाकणं आहे.’
शेतकरी बियाणांच्या बाबत स्वावलंबीच असले पाहिजेत, याकडं स्वामीनाथन यांचा कटाक्ष होता. हरितक्रांतीच्या काळात जगातील आणि देशातील सार्वजनिक संस्थांनी नवीन बियाणी तयार केली. या संस्थांचा नफा कमावणं हा उद्देश कधीच नव्हता. त्या सार्वजनिक हिताकरिता कार्यरत होत्या व आहेत. शेतकऱ्यांना दरवर्षी नव्यानं बियाणं विकत घेण्याची गरज पडू नये, यासाठी त्यांनी सरळ व सुधारित बियाणी विकसित केली.
खासगी कंपन्यांनी संकरित बियाणी तयार केली. ती मात्र दरवर्षी विकत घ्यावी लागतात. ‘जेनेटिकली मॉडिफाइड’ बियाणे शेतकरीसुद्धा तयार करू शकतात. त्यात अगम्य अथवा रहस्यमय काहीच नाही,’ असं ते म्हणत. जीएम बियाणे निर्माण करताना अग्रक्रमाचा प्रश्न आहे. संपूर्ण जगाच्या डोक्यावर समुद्रांच्या पाणीपातळीत होणाऱ्या वाढीचा धोका आहे.
‘स्वामीनाथन फाउंडेशन’ला खारफुटीचं (मॅंग्रोव्ह) जनुक काढून तांदळात घालण्यात यश आलं आणि खाऱ्या पाण्यात तगून राहील, असा तांदूळ त्यांनी तयार केला. हे संशोधन खासगी कंपन्यांच्या हाती पडून त्याचा केवळ त्यांच्या फायद्यासाठी वापर होऊ नये, याकरिता त्यावेळी स्वामीनाथन यांनी संरक्षित स्वामित्व हक्क (डिफेन्सिव्ह पेटंट राइट) घेतले. (कॉर्पोरेट कंपन्या या नेहमी आक्रमक स्वामित्व हक्क प्रस्थापित करून स्पर्धाच नष्ट करून टाकतात. यातूनच त्यांची एकाधिकारशाही तयार होते.) इतकंच नाही तर स्वामीनाथन फाउंडेशननं ते स्वामित्व शेतकऱ्यांसाठी खुलं केलं.
त्यामुळं शेतकऱ्यांचा गटसुद्धा खारेपण सहन करणारं जनुक घेऊन कुठल्याही पिकाचं नवीन वाण तयार करू शकतो. ‘प्रत्येक शेतकरी हा वैज्ञानिक असतो,’ हे स्वामीनाथन मनापासून मानत व तसंच वागत. खासगी कंपन्यांची वांगी व मसूर यांना तत्परतेने परवानगी देणाऱ्या शासकीय यंत्रणेनं खाऱ्या पाण्यात टिकणाऱ्या तांदळाला मात्र दहा वर्षांपासून अडवून धरलं आहे.
स्वामीनाथन यांच्या अंतर्बाह्य निर्मळपणामुळं आणि ‘गुरुत्व’ आकर्षणामुळं भिन्न विचारांच्या लोकांना एकत्र आणण्याची किमया त्यांना सहज साध्य होती. जनुकीय तंत्रज्ञान, मोठी धरणं, अणुऊर्जा, जागतिकीकरण या विविध मुद्यांचे कट्टर समर्थक आणि विरोधक, तसेच मध्यममार्गी, एरवी कधीही एकमेकांचा चेहरा न पाहणाऱ्यांचं ‘स्वामीनाथन’ या एका विषयावर मात्र एकमत होत. अशी ही मंडळी स्वामीनाथन यांनी सुचवलेल्या कृतीसाठी एकत्र येऊन हातभार लावत. त्यांच्या आवाहनावरून देशाच्या व जगाच्या कानाकोपऱ्यांतून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व वैज्ञानिक चेन्नईच्या ‘एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन’मध्ये अनेक वेळा जमत.
प्रत्येकाशी तेवढ्याच आपुलकीनं भेटून समोरच्या व्यक्तीस मनापासून ऐकणं आणि मग त्याला सुयोग्य व अर्थपूर्ण कृती सुचवणं हा गांधीजींचा दुर्मीळ गुण स्वामीनाथन यांनी मनोभावे जपला होता. यातून हजारो तरुण कृतीप्रवण झाले आहेत. त्यांनी माहितीतंत्रज्ञांना, ‘‘कोळ्यांसाठी मोबाईल हा संकटकाळात बाहेर पडण्याचा मार्ग ठरावा,’ असं सुचवलं.
‘क्वॅलकॉम,’ ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,’ राष्ट्रीय सागरी माहिती यंत्रणा आणि स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ‘कोळीमित्र मोबाईल’ हे अफलातून जीवरक्षक उपकरण तयार झालं आहे. अँडॉइड प्रणालीवर चालणारा हा मोबाईल तमीळ, तेलुगू व इंग्रजी भाषेत चालतो. पाऊस-तापमान ही हवामानाची माहिती, भरती-ओहोटीच्या वेळा, चक्रीवादळाचा अंदाज त्यावर समजतो.
आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत असल्याचा इशारा मिळतो. वैश्विक स्थान निश्चितीकरण यंत्रणा (जीपीएस) उपलब्ध असल्यामुळं अद्ययावत मोटारीप्रमाणं नावाड्यांना नावेचं मार्गक्रमण समजतं. पाण्याची खोली, खडक अथवा बुडालेली नाव याबाबतची माहिती मिळते. अडचण अथवा आणीबाणीच्या प्रसंगी हेल्पलाइनशी संपर्क होऊन संकटाची माहिती थेट जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच स्वामीनाथन फाउंडेशनपर्यंत पोहोचते.
८००० किलोमीटर लांबीच्या सागर किनाऱ्यावरील सुमारे ५० लाख लोकांचा उदरनिर्वाह मासेमारीवर होत असून, त्यापैकी ६० टक्के जनता ही दारिद्र्यरेषेखाली आयुष्य जगते. सध्या हा बहुगुणी मोबाईल ५,००० खेड्यांमधील कोळ्यांचा खरा साथी झाला आहे. ‘वंचितांपर्यंत पोहोचते तेच खरे तंत्रज्ञान,’ ही उक्ती पुन्हा एकदा प्रत्यक्षात उतरवण्याची किमया स्वामीनाथन यांनी साधून दाखवली आहे.
स्वामीनाथन दांपत्याच्या तीन कन्या! जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य वैज्ञानिक व कोविड काळात संपूर्ण जगातील आरोग्यव्यवस्थेला सहकार्य करणाऱ्या डॉ. सौम्या या सध्या स्वामीनाथन फाउंडेशनची धुरा सांभाळत आहेत. ‘शेती, अन्नसुरक्षा आणि ग्रामीण विकास’ या विषयावर ऑक्सफर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवलेल्या अर्थशास्त्रज्ज्ञ डॉ. मधुरा या बंगळूर येथील ‘भारतीय संख्याशास्त्र संस्थे’त आर्थिक विश्लेषण विभागात अध्यापन व संशोधन करत आहेत.
धाकट्या समाजशास्त्रज्ञ डॉ. नित्या यांची डॉक्टरेट ‘लिंगभेद, जमीन व उदरनिर्वाह’ या विषयातील असून, त्या इंग्लंडमधील ईस्ट अँग्लिया विद्यापीठात अध्यापन करतात. त्या झारखंडपासून महाराष्ट्रापर्यंतच्या आदिवासी भागांत राहून ‘आदिवासी, महिला व ग्रामीण विकास’ यावर संशोधन करत आहेत. पालकांचा विचार व कार्याचा विस्तार करणारी ही ‘त्रिवेणी’ आपल्या सर्वांसाठी आश्वासक आहे.
विज्ञानाआधी माणुसकीला प्राधान्य देणारे अनेक वैज्ञानिक स्वामीनाथन यांचे घनिष्ठ मित्र होते. विज्ञानाच्या इतिहासातील अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या ‘डीएनए’च्या संरचनेचे संशोधक जेम्स वॅटसन व फ्रान्सिस क्रिक हे केंब्रिजमध्ये स्वामीनाथन यांचे सहाध्यायी होते.
जागतिक पटलावर वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रांतील अग्रगण्य मंडळी विविध कारणांमुळे त्यांच्या संपर्कात येत. डॉ. होमी भाभा, विक्रम साराभाई, शांतिस्वरूप भटनागर, वर्गिस कुरियन, अमर्त्य सेन, मेहबूब उल हक, जोसेफ स्टिगलिट्झ, पॉल क्रुगमन व जेम्स हॅन्सन आदी त्यांचे निकटवर्तीय होते.
एका परिषदेत, लेबेनॉन येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन ड्राय लॅंड एरियाज (इकार्डा) या संस्थेचे महासंचालक डॉ. महंमद सोल म्हणाले होते, ‘‘संयुक्त राष्ट्राला दशकाचे अग्रक्रम ठरवून देणं, त्यामधील संशोधन व कृती ठरवणं, शास्रज्ञ, नेते, अधिकारी व चळवळीतील कार्यकर्ते या सर्वांना कृती देणं हे ऐतिहासिक कार्य गेल्या साठ वर्षांपासून प्रा. स्वामीनाथन करत राहिले.
एखाद्या राष्ट्रप्रमुखाच्या आमंत्रणाला मान देऊनही इतके लोक एकत्र येतील, असं वाटत नाही. संपूर्ण जगात ‘शास्रज्ञांचे तत्त्वज्ञ’ असा सन्मान लाभलेल्या ‘भारतरत्ना’स भारतीय सर्वोच्च बहुमान न देणे, हा बहुपक्षीय करंटेपणा आपल्याकडंच होऊ शकतो.
पं. कुमारगंधर्व यांनी गांधी मल्हार रागातील
तुम में सब रूप
एकहि पथ, एक मंत्र
समता साकार
या बंदिशीत नेमक्या शब्दांतून आणि विलक्षण स्वरांतून गांधीजी अभिव्यक्त केले होते. गांधीमय जीवन जगलेल्या स्वामीनाथन यांच्याबाततही तेच सार्थ आहे.
(लेखक ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.