atul parchure 
सप्तरंग

सर शिरीष कणेकर! (अतुल परचुरे)

अतुल परचुरे atulparchure@gmail.com

पत्रकार, एकपात्री कलाकार, विनोदी आणि गंभीर असं दोन्ही तितक्‍याच ताकदीनं लिहिणारा साहित्यिक, ...अशा अनेकानेक विशेषणांशिवाय शिरीष कणेकर यांची ओळख पूर्ण होऊ शकत नाही. कणेकर येत्या बुधवारी पंचाहत्तरी (6 जून 1943) पूर्ण करत आहेत. या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कणेकर यांचे सुहृद असलेले अभिनेता अतुल परचुरे यांनी रेखाटलेलं त्यांचं व्यक्तिचित्र...

To get back my youth I would do anything in the world, except take exercise, get up early, or be respectable. - Oscar Wilde

साहित्याच्या क्षेत्रात शिरीष कणेकर हे नाव आदरमिश्रित कौतुकानं घेतलं जातं, त्यालाही आता कैक वर्षं लोटली. त्यामुळं वर उद्‌धृत केलेल्या कणेकरांच्याच लाडक्‍या ऑस्कर वाइल्डच्या वचनातली रिस्पेक्‍टेबल न राहण्याची अट त्यांना लागू नसली तरी व्यायाम आणि लवकर उठण्याच्या दोन अटींशी ते इमान राखून आहेत. गेली पाचेक दशकं त्यांची लेखणी मराठी वाचकांना चांगलंचुंगलं खाद्य अव्याहत पुरवते आहे. कलावंतांच्या कलाकृती पाहून मन रिझवावं, त्याच्या खासगी आयुष्यात डोकवायला जाऊ नये, असं एक व्यावहारिक वचन आहे. नाचरा मोर पुढून पाहावा, मागून पाहण्यात हशील नाही, एवढाच त्याचा अर्थ. कणेकरांच्या बाबतीत मला त्यांचं सर्वांगदर्शन नियमित होत असतं आणि अजून तरी माझा भ्रमनिरास झालेला नाही, हे मान्य करावं लागेल. आपला आवडता लेखक आपल्या कट्ट्यावरल्या दोस्तान्यात समाविष्ट व्हावा, यापरतं दुसरं सौभाग्य नाही. माझ्या वाट्याला ते आपापत: आलं. त्यासाठी मला काही प्रयत्न करावे लागले नाहीत. निव्वळ भौगोलिक अनुकूल परिस्थितीमुळं कणेकर नावाचे मित्र माझ्या वाट्याला आले.

आठवतंय, मी सातवी-आठवीत असेन. शाळा अर्थातच बालमोहन. शाळेतल्या स्पर्धाबिर्धांमध्ये बक्षिसाऐवजी आम्हाला पुस्तकखरेदीची कुपनं मिळत. ही कुपनं घेऊन दादरमधल्याच पुस्तकांच्या दुकानात जाऊन आपल्या आवडीची पुस्तकं विद्यार्थ्यांनी घ्यावीत, अशी कल्पना होती. माझ्या वाट्याला काही कुपनं आली. दुकानात मला एक पुस्तक दिसलं. नाव होतं ः क्रिकेटवेध! मी तत्काळ उचललं.
शिवाजी पार्काच्या आसपास वाढलेल्या कुठल्याही अर्भकाला क्रिकेटचं बाळकडू मिळतंच. कांगा लीगचे ते भारलेले दिवस होते. तुफान गर्दी असायची. आमच्या पिढीचा नायक संदीप पाटील खांदा वाकवून बाजूनं पार्काकडं चालत जायचा. जिमखान्यावर कधी कधी सुनील गावसकर दिसायचा. पलीकडच्या बाजूला अशोक मंकड दिसायचा. "क्रिकेटवेध'च्या पानापानातून भेटलेले व्हिक्‍टर ट्रम्पर, नेव्हिल कार्डस वगैरे मंडळी आमच्या आयुष्यात एरवी आलीच नसती. कशाला येतील? मराठी मीडियममध्ये शिकणाऱ्या पोरांना ही साहेबमंडळी भेटणं तसं दुरापास्तच. इंग्लिशशी जवळीक वाढायला बराच अवकाश होता. तशी क्रिकेटच्या लढतींची वार्तांकनं वर्तमानपत्रात तपशीलवार येत असत; पण त्यातले फलंदाजी, गोलंदाजी, षटकार, चौकार, पंच वगैरे शब्द काही जिभेवर चढायला तयार नव्हते. अजूनही नाहीत. क्रिकेट हा रसाळ पद्धतीनं कथन करण्याचा प्रकार आहे, हे "क्रिकेटवेध'नं पहिल्यांदा जाणवून दिलं. मराठीत तरी ते सगळं नवं होतं. कुणीतरी रसीला मित्र क्रिकेटचे किस्से आणखीच रंगतदार करून सांगतोय, या जाणिवेनं समृद्ध केलं ते आयुष्यभरासाठी. क्रिकेटचं वेड त्या पुस्तकानं आणखीच वाढवलं. ही कणेकरांची आणि माझी झालेली पहिली ओळख.

तसं त्यांना दोन-चारदा लांबून पाहिलं होतं; पण परिचय नव्हता. तो पुढं झाला. सन 1987-88 च्या सुमाराला माझं "नातीगोती' नाटक चाललं होतं. ते बघायला कणेकर आलेले मला स्पष्ट आठवतात. तोवर ते मराठी साहित्यात तळपत होते. त्यांचे लेख वर्तमानपत्रात गाजू लागले होते. पुस्तकंही बाजारात आली होती. पत्रकारितेची कारकीर्द गुंडाळून त्यांनी लेखनाला वाहून घेतलं होतं. त्यांचे "स्टॅंडअप टॉक शोज' हे चर्चेचा विषय झाले होते.

कणेकरांची फिल्लमबाजी आणि क्रिकेटचे किस्से धमाल आणत. क्रिकेट आणि सिनेमा हे त्यांनी आपलं खास दालन निवडलं होतं. या दोन गोष्टींच्या जोरावर तुम्ही कुठल्याही मुंबईकराला खिशात टाकू शकता. मी तर स्वत:हून कणेकरांच्या (प्राय: रिकाम्या) खिशात जाऊन बसलो होतो. बुटबैंगण मूर्ती, अंगात बुशकोट, चेहऱ्यावर सतत "कठीण आहे बुवा' असे भाव. किंचित बसका आवाज...प्रथमदर्शनी खडूस वाटणारा हा सद्‌गृहस्थ ध्वनिक्षेपकासमोर उभा राहून श्रोत्यांना-प्रेक्षकांना दोन दोन तास बांधून ठेवत असे. नर्म स्मितापासून सातमजली हास्यापर्यंत सगळं काही त्या शोमध्ये होतं.

आमच्या शिवाजी पार्कावरच्या कट्ट्यात त्यांची जिम्मा झाल्यावर उरलीसुरली इस्तरीदेखील मोडली. कुठल्याही प्रसंगाचं किश्‍शात रूपांतर करण्याचं अफलातून कसब कणेकरांमध्ये आहे. मुंबईचं ट्रॅफिक असो किंवा काहीही, त्याचा ताबडतोब किस्सा सांगण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडं आहे. सिनेमा आणि क्रिकेटबद्दल बोलताना तर त्यांना नुसतं ऐकत राहावं. अर्थात जग इतकं बदललं; पण कणेकर तेच आहेत. त्यांचे कितीतरी लेख "व्हॉट्‌सऍप' किंवा तत्सम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (हे वाक्‍य मराठीत कसं लिहावं?). लता मंगेशकर त्यांच्याकडं एकदा रेकॉर्डिंग आटोपून मटण कटलेट का काहीतरी खायला कशा आल्या, याबद्दल त्यांनी एक मनोज्ञ लेख लिहिला आहे. तो वाचून असूया वाटलीच; पण विषादही वाटला. साक्षात लतादीदी घरी येऊन कटलेट खातायत हे चित्र रंगवावं तर कणेकरांनीच. लतादीदींच्या भक्‍तांच्या लोंढ्यात आम्हीही आहोत; किंबहुना "प्रभुकुंज'वरून जाताना गाडीतून पायउतार होऊन नमस्कार करण्याचा आमचा पूर्वापार प्रघात होता. त्यादृष्टीनं लतादीदींचे आणि माझे कणेकर हे कॉमन फ्रेंड आहेत, एवढंच एक समाधान मनाला आहे आणि इतकी वर्ष आमचं मैत्र असून आमच्या मुखाशी मात्र तो कटलेटचा तुकडाही कधी आला नाही, हा विषाद.

क्रिकेटमध्येही तसंच. त्यांनी पाहिलेलं क्रिकेटही चिक्‍कार बदललं आहे; पण कणेकरांच्या दुनियेत अजूनही फ्लॅनेलवालं जंटलमन लोकांचं लालित्यपूर्ण क्रिकेट सुरू असतं. क्रिकेटबद्दल बोलताना त्यांची रसवंती थेट नेव्हिल कार्डस यांची आठवण करून देते. सर नेव्हिल कार्डस हेसुद्धा क्रिकेटचे आणि संगीताचे भोक्‍ते आणि भक्‍त होते. आपल्या कणेकरांसारखेच. त्यादृष्टीनं कणेकर हे महाराष्ट्राचे सर नेव्हिल कार्डस आहेत किंवा कार्डस यांना आंग्लभाषेचे सर शिरीष कणेकर म्हणायचीही माझी तयारी आहे.

जग बदललं, मुंबई बदलली; पण कणेकर आहेत तस्सेच आहेत. लता मंगेशकर आणि दिलीपकुमार यांच्या युगातून ते आजही बाहेर यायला तयार नाहीत. खरंतर मला कधी कधी ते पुलंच्या हरितात्यासारखे वाटतात. हा माणूस वर्तमानात जगायलाच तयार नाही. मध्यंतरी मी त्यांना म्हटलं ः ""माझी एक मालिका अमुक अमुक वाहिनीवर सुरू झालीये. जरा बघा आणि कळवा!'' आठवड्याभरात कणेकरांचा फोन आला.
""गेले आठ दिवस मालिका बघितली. उद्यापासून बघणार नाही. अशक्‍य आहे...''
""बरं...पण त्या टाइम स्लॉटमध्ये तिला सर्वाधिक टीआरपी आहे कणेकर!'' मी म्हणालो.
""अरेच्चा, हो?...इतक्‍या लवकर मी कालबाह्य ठरेन असं वाटलं नव्हतं; पण ते जाऊ दे. मालिका बघणार नाही, म्हणजे नाही...'' कणेकर म्हणाले.
कणेकरांशी जरा जास्त बोललं की कळतं की हे पाणी खोल आहे. बायकोवर केलेले विनोद, फिल्मी खरे-खोटे किस्से, क्रिकेटच्या बाता याच्याही पलीकडं जाणारं त्यांचं व्यक्‍तिमत्त्व आहे. त्यांचं इंग्लिशमधलं वाचन तर ग्रेट असावं. अन्यथा नेव्हिल कार्डस किंवा ऑस्कर वाइल्डच्या वनलायनर्सचं इतकं चपखल मराठीकरण करता येणं अशक्‍यच; पण आपला हा पैलू लोकांना अजिबात समजू नये, असं काहीतरी ते करत असतात. कधी कधी वाटतं, आपल्या मैत्रकातला हा गृहस्थ अनेक विरोधाभासांचा गुंडाळा आहे. हजारो वाचक-प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा मनुष्य इतक्‍या खडूस चेहऱ्यानं का वावरतो? निष्कारण फटकळपणा दाखवून मनं का दुखावतो? ज्याच्या शब्दाशब्दातून उमदेपणा ठिबकतो, त्याच्या स्वभावात तो उमदेपणा कधी दिसणार? इतक्‍या उत्फुल्लतेनं वाचकांना वर्षानुवर्षं रिझविणारा हा माणूस अचानक आयुष्याची संध्याकाळ झाल्यासारखा का बोलतो?

कणेकरांची पंचाहत्तरी ही एका अर्थानं रसिकतेची पंचाहत्तरी आहे. पाऊणशे वयमानाच्या या आमच्या मित्राकडं तूर्त एक मागणं आहे आणि एक सांगणं : मागणं एवढंच की फोन करायचाच झाला तर थेट करा...व्हॉट्‌सऍप कॉलमुळं तुमचा डेटा वाचत असला तरी आमचा संपतो!
आणि सांगणं एवढंच की, पंचाहत्तर सहज झाल्या. आणखी पंचवीस काही जड नाहीत, तुमच्या बॅटीला! बॅटिंग जारी रख्खो! शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT