फ्रांका रामेचे अस्वस्थ करणारे दीर्घाक sakal
सप्तरंग

फ्रांका रामेचे अस्वस्थ करणारे दीर्घाक

विसाव्या शतकातील अतिशय महत्त्वाची घटना म्हणून दुसऱ्या महायुद्धाकडे (१९३९-१९४५) बोट दाखवले जाते. त्यानंतर राजकारण, कला, साहित्य, समाजशास्त्र वगैरे अनेक क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाले.

अवतरण टीम

कलाविश्वाची सफर

प्रा. अविनाश कोल्हे

nashkohl@gmail.com

विविध कलाविष्कारांत समाजजाणिवांचे प्रतिबिंब उमटत असते. अशाच काही वेगळ्या रंगाविष्कारांविषयी प्रसिद्ध लेखक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलासंस्कृतीच्या घडामोडींचे अभ्यासक आणि राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक अविनाश कोल्हे लिहिताहेत ‘कलाविश्वाची सफर’ हे पाक्षिक सदर...

विसाव्या शतकातील अतिशय महत्त्वाची घटना म्हणून दुसऱ्या महायुद्धाकडे (१९३९-१९४५) बोट दाखवले जाते. त्यानंतर राजकारण, कला, साहित्य, समाजशास्त्र वगैरे अनेक क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाले. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि इटलीचा दारुण पराभव झाला. युद्ध संपल्यानंतर आता काय करायचे, देशाची आणि समाजाची पुनर्रचना कशी करायची, हा यक्षप्रश्न होता. या काळात जन्मलेली आणि वाढलेली एक महत्त्वाची इटलीतील लेखिका म्हणून श्रीमती फ्रांका रामे (१९२९-२०१३) हिचा उल्लेख करावा लागतो. अलीकडे मुंबईत या लेखिकेचे दोन दीर्घांक बघायला मिळाले. एक होता ‘द रेप’ आणि दुसरा होता ‘कडेकोट-कडेलोट’...

नाटककार फ्रांका रामे हिच्या दोन दीर्घांकांची चर्चा करण्याअगोदर तिचे बालपण, तिचा काळ, तिच्यावरचे संस्कार याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. फ्रांका रामेचा जन्म १८ जुलै १९२९ रोजी इटलीतील लोंबार्डी येथे झाला. तिच्या घरात रंगकर्मींची मोठी परंपरा होती. तिने १९५१ मध्ये रंगभूमीवर पदार्पण केले. १९५४ मध्ये तिचे लग्न नामवंत इटालियन लेखक-नाटककार दारिया फो यांच्याशी झाले. दारिया डाव्या विचारांचे समर्थक. त्यांना १९९७ सालचा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. दोघांनी १९५८ मध्ये ‘दारिया फो-फ्रांका रामे’ नाट्यसंस्था स्थापन केली. रामेने १९६७ मध्ये इटालियन कम्युनिस्ट पक्षाचे सभासदत्व घेतले. तिने १९७०च्या दशकात नाट्यलेखन सुरू केले आणि अनेक दीर्घांक लिहिले. तिच्या लेखनात स्त्रीवादाचे, पुरोगामी विचारांचे प्रतिबिंब दिसते.

रामेच्या सादर झालेल्या दोन दीर्घांकांत आधीची चर्चा... ‘द रेप’ हा दीर्घांक सत्यघटनेवर आधारित आहे. एवढेच नव्हे; तर हा बलात्कार तिच्यावरच झाला होता. ९ मार्च १९७३ रोजी इटलीतील मिलान शहरातल्या फॅसिस्ट विचारांच्या उच्च पदस्थ पोलिसांनी गुंडांना रामेचे अपहरण करण्यास सांगितले. पाच गुंडांनी तिचे अपहरण केले. (या दीर्घांकाचे सादरीकरण समजून घेण्यासाठी ‘पाच गुंड’ हा तपशील लक्षात ठेवला पाहिजे). या गुंडांनी तिच्यावर चालत्या व्हॅनमध्ये बलात्कार केला, तिला सिगारेटचे चटके दिले, तिचे अनेक प्रकारे हाल केले आणि नंतर तिला रस्त्यावर फेकून दिले. पुरोगामी विचारांवर ठाम श्रद्धा असलेली फ्रांका दोन महिन्यांत रंगभूमीवर हजर झाली! स्वतःवर झालेल्या बलात्काराच्या अनुभवावर तिने १९७५ साली ‘द रेप’ हा एकपात्री दीर्घांक लिहिला आणि फॅसिस्ट विचारांवर हल्ला केला. फ्रांका रामेला २०१३ मध्ये म्हणजे वयाच्या ८३व्या वर्षी मृत्यूने गाठले. जेव्हा तिच्या दीर्घांकाचे मंचन इटलीत झाले तेव्हा त्यातील भयानक वास्तव पाहून काही प्रेक्षकांना घेरी आली. या दीर्घांकाची सुरुवात प्रश्नोत्तरांनी होते. हे प्रश्न बलात्कार झालेल्या स्त्रीला पोलिस, डॉक्टर, वकील कोर्टात विचारत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. डॉक्टर विचारतात, ‘Tell me, Miss I''m sorry, are you married? during the incident, did you only feel disgust or did you also feel a certain pleasure... an unconscious satisfaction?’ पोलिस अधिकारी विचारतो, ‘Didn''t you feel flattered that so many men, four in all, I believe, felt such a powerful desire for you, felt such a HARD passion? ...Did you experience sexual gratification?’ स्वतः न्यायमूर्ती विचारतात, ‘Did you remain passive throughout or did you, at a certain point, participate?’ ही प्रश्नोत्तरं आधुनिक इटलीत सुरू आहेत, भारतातल्या बिहार किंवा उत्तर प्रदेशमध्ये नाही हे कृपया लक्षात घ्या. याचा अर्थ साधा असा, की देश कोणताही असो, संस्कृती कोणतीही असो, काळ कोणताही असो, आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक प्रगतीची पातळी कितीही वरची असो, जगभर महिलांवर लैंगिक अत्याचार होत असतात.

रामेचा दीर्घांक पुण्याच्या ‘नाटक दहा बाय वीस’ या नाट्यसंस्थेने सादर केला होता. त्याचे दिग्दर्शन पुण्याचा तरुण रंगकर्मी महेश खंदारे याने केले आहे. शिवाय नेपथ्य आणि प्रकाश योजना त्याचीच आहे. या एकपात्री दीर्घांकातील स्त्रीची भूमिका धनश्री साठेने साकारली आहे. नेपथ्य, पार्श्वसंगीत, प्रकाश योजना आणि अभिनय एवढा जबरदस्त आहे, की नाटकाचा भयानक आशय प्रेक्षकांपर्यंत विनासायास पोहोचतो. दीर्घांक सुरू होतो तेव्हा बुजगावण्याच्या डोक्याच्या जागी एक मोठा आकाराचा फुगा असतो. जेव्हा गुंड तिच्या चेहऱ्यावर चाकूने वार करतात, तेव्हा ती तो फुगा चाकूने फोडते... या कृतीतून प्रेक्षकांना त्यातील भयानकता अनुभवास येते. या दीर्घांकात असे अनेक प्रसंग अतिशय कल्पकेतेने सादर केले गेले आहेत. हा प्रभावी दीर्घांक प्रेक्षकांच्या मनात विचारांचे भुंगे सोडून देतो. ‘स्त्रीवर बलात्कार’ ही घटना काही नवीन नाही. मानवी इतिहासाच्या टप्प्यांवर स्त्रीवर बलात्कार, तिचे अपहरण वगैरे प्रकार होत आलेले आहेत. (ते अर्थातच समर्थनीय नाहीत). मात्र, या दीर्घांकातला बलात्कार वेगळ्या प्रकारातला आहे. आधीचे बलात्कार एकटीदुकटी स्त्री तावडीत सापडली म्हणून केला अशा प्रकारातील... लग्नाला नकार दिला म्हणून मग चिडून केलेला बलात्कार, सूड म्हणून केलेला बलात्कार वगैरे. या दीर्घांकातला बलात्कार हा पुरोगामी राजकीय विचारांचा विरोध करण्यासाठी केलेला आहे. फ्रांका रामे सरळ भाषेत सांगून ऐकत नाही, म्हणून मग तिच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी तिचे आधी अपहरण करायचे आणि नंतर बलात्कार करायचा, असा हा कट आहे. प्रत्यक्ष जीवनात फ्रांका रामे या प्रकाराने यत्किंचितही घाबरली नाही आणि नंतरसुद्धा तिने अनेक वर्षे समाजकार्य अन् रंगभूमीची सेवा केली. म्हणूनच हा दीर्घांक महत्त्वाचा ठरतो.

१९६०च्या दशकात जगात, त्यातही युरोप-अमेरिकेतील समाजव्यवस्थेत मोठे बदल झाले. त्यातील एक बदल म्हणजे, स्त्रीमुक्तीची चळवळ. स्त्रीमुक्ती चळवळीच्या अभ्यासकांच्या मते तिचा दुसरा टप्पा १९६०च्या दशकात अमेरिका-युरोपात सुरू झाला. यामागे अमेरिकेत सुरू झालेली नागरी हक्कांच्या चळवळीची प्रेरणा होती. १९६३ मध्ये श्रीमती बेट्टी फ्रिडनचे ‘द फेमिनाईन मिस्टीक’ पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकामुळे स्त्रीवादी चळवळीला सैद्धांतिक अधिष्ठान मिळाले. यातून स्त्रीकडे, तिच्या समस्यांकडे, तिला मिळत नसलेल्या स्वातंत्र्याबद्दल वृत्तपत्रांतून, साहित्य-कलांतून चर्चा सुरू झाल्या. याचा एक आविष्कार म्हणजे दारिया फो आणि त्यांची पत्नी फ्रांका रामे यांनी १९७७ साली लिहिलेले ‘अ वुमन अलोन’ हे नाटक. अलीकडे या नाटकाचा मराठी आविष्कार ‘कडेकोट-कडेलोट’ बघितला. सुमारे तासभर चालणारा हा एकपात्री प्रयोग पुण्याच्या तरुण रंगकर्मींनी स्थापन केलेल्या ‘टायनी टेल्स थिएटर कंपनी’ या नाट्यसंस्थेतर्फे सादर करण्यात येतो. या नाट्यसंस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे ते ‘फिरतं नाटक’ ही कल्पना रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच या एकपात्री नाटकाचे प्रयोग मुंबई-पुण्याप्रमाणेच गावोगावी होत आहेत. मुंबईत १४ जुलै रोजी मंचित झालेला प्रयोग पन्नासावा होता.

‘कडेकोट-कडेलोट’मध्ये प्रेक्षकांसमोर एक विवाहित, दोन मुलं असलेल्या आणि नोकरी न करणाऱ्या अशिक्षित महिलेची कहाणी आहे. कथानक प्रथमपुरुषी एकवचनी आहे. हे कथानक दूरदर्शनपूर्व; पण घरात लॅण्डलाईनचा फोन, फ्रीज, वॉशिंग मशीन वगैरे वस्तू असण्याच्या काळात घडते. त्या काळातल्या असंख्य महिलांप्रमाणे ‘कडेकोट-कडेलोट’ची नायिकाही एकदा सकाळी नवरा कामावर, मुले शाळेत गेल्यावर दिवसभर घरातील छोटी-मोठी कामे करण्यात व्यग्र असते. तिच्या आयुष्यात फक्त एक बदल आहे. तो म्हणजे, तिचा तरुण दीर एका भयंकर अपघातात सापडल्यामुळे जायबंदी होऊन पडलेला असतो. त्याला बोलतासुद्धा येत नाही. त्याला काही हवं असल्यास तो हातातील घंटी वाजवतो. मात्र, तो घरात असूनही रंगमंचावर कधी येत नाही. थोडक्यात म्हणजे हे नाटक म्हणजे एका घरात बंद (की कैद?) असलेल्या बाईची कथा आहे. तिचा नवरा तिला दररोज घरात बंद करून जातो. मग ती त्या बंद घरात स्वतःचे विश्व निर्माण करते. यात तिला तिच्यापेक्षा वयाने तरुण असलेला प्रियकर भेटतो. हा एकपात्री दीर्घांक भूमिका सादरकर्त्या कलाकाराकडून फार मागणी करणारा आहे. प्रतीक्षा खासनिसने भूमिकेत अनेक बारकावे भरत भूमिकेला न्याय दिला आहे. तिच्यातील ऊर्जेमुळे प्रयोग एक सेकंदही रेंगाळत नाही. क्षणाक्षणाला नवनवे भावदर्शन कराव्या लागणाऱ्या या पात्राच्या भावविश्वातील चढ-उतार, तिच्या आनंदाच्या आणि वैफल्याच्या जागा, तिचा त्रागा, तसेच तिची स्वप्ने वगैरे ताकदीने व्यक्त करणे गरजेचे होते. कल्पेश समेळने योग्य दिग्दर्शन केले आहे. अमोल पाटीलने मूळ नाटकावरून रंगावृत्ती तयार करताना भाषेवर विशेष मेहनत घेतली आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे मयूरेश माळवदे याचे आटोपशीर नेपथ्य.

फ्रांका रामेचे हे दीर्घांक आपले मनोरंजन करत नाहीत; तर आपल्या डोळ्यांत अंजन घालतात, अस्वस्थ करतात... दर्जेदार कलाकृतीचे लक्षण!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT