Satya Movie Sakal
सप्तरंग

Satya 25 Years: राजकारण आणि अंडरवर्ल्डचा सामना.. विदारक ‘सत्या’चे दर्शन !

‘सत्या’ने एक नवीन उदाहरण उभे केले. ही कथा केवळ सत्ता आणि पैशाविषयी नव्हती. ही अस्तित्व टिकवण्याची गोष्ट होती. जिथे हिंसाचार हा हिंसाचाराचा सामना करण्याची गरज म्हणून येतो.

अवतरण टीम

- बालाजी विट्टल, sakal.avtaran@gmail.com

‘सत्या’ने एक नवीन उदाहरण उभे केले. ही कथा केवळ सत्ता आणि पैशाविषयी नव्हती. ही अस्तित्व टिकवण्याची गोष्ट होती. जिथे हिंसाचार हा हिंसाचाराचा सामना करण्याची गरज म्हणून येतो. ‘सत्या’ राजकारण आणि अंडरवर्ल्डमधील संबंध अतिशय विदारकपणे दाखवतो. ‘सत्या’ चित्रपट प्रदर्शित होऊन नुकतीच २५ वर्षे झाली. त्यानिमित्त या आगळ्या चित्रपटाविषयी...

समोरच्या घरात राहायला आलेला अभ्यासू वाटावा असा दाढीधारी अविवाहित तरुण काहीसा लाजाळू, मृदुभाषी आणि ज्येष्ठांची मदत करणारा आहे. त्याचे नाव ‘सत्या’ आहे. एवढी माहिती सगळ्यांना आहे; पण या लोकांना माहीत नाही की तो मुंबईतील अंडरवर्ल्डसाठी काम करतो आणि त्याच्यावर सतरा जणांची हत्या केल्याचा आरोप आहे.

मुंबई माफियाचे सत्य रामगोपाल वर्मा यांनी त्यांच्या ‘सत्या’ (१९९८) या सिनेमात दाखवले. सत्या हा मुंबईत स्थलांतरित आहे आणि एका बारमध्ये नोकर म्हणून तो कामाला सुरुवात करतो. जग्गा नावाचा एक उर्मट ग्राहक त्याचा अपमान करतो, तिथून गोष्ट सुरू होते. पुढच्या वेळी आणखी कुणीतरी त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो त्याचा बदला घेतो. परिणामी त्याला अटक होते. तिथे त्याची भिकू म्हात्रेशी गाठ पडते.

भिकू हा अंडरवर्ल्डसाठी काम करत असतो. खंडणी उकळणे, चित्रपट निर्मितीसाठी वित्तपुरवठा करणे आणि जुगार अशा धंद्यांत तो सामील असतो. सत्या भिकूच्या टोळीसाठी काम करायला सुरुवात करतो. थोड्याच काळात तो भिकूचा अत्यंत विश्वासू तर बनतोच; पण त्याचा रणनीतीकारही बनतो. भिकूच्या अगदी उलट सत्याचा स्वभाव आहे. तो भावनाशून्य आहे, म्हणूनच जास्तच बेदरकार आहे.

पण ही गोष्ट एकट्या सत्याची नाही. सत्याच्या भोवताली विविध पात्रांची गुंफण आहे. यात भिकूचा बॉस आणि गुरू, एक मोठा अंडरवर्ल्ड डॉन भाऊ ठाकूरदास जावळे आहे. भाऊला महापालिकेची निवडणूक लढवायची आहे. भिकूला भाऊबद्दल प्रचंड आदर आहे. ज्या गोष्टीने भाऊ नाराज होईल, अशी कुठलीही गोष्ट भिकू करत नाही.

सत्याला भाऊबद्दल काही देणेघेणे नाही. त्याला पटकन् समजते की भाऊ निवडणुकीसाठी भिकूचा वापर करून घेत आहे. भिकू धोरणे ठरवण्यासाठी दिवसेंदिवस सत्यावर अवलंबून राहत आहे, ही गोष्ट भाऊला खटकते. सत्याच्या सांगण्यावरून भाऊच्या आदेशाचे उल्लंघन करून भिकू आपला प्रतिस्पर्धी गँगस्टर गुरू नारायणची हत्या करतो. यामुळे भाऊ भिकूवर रागावतो.

एका बाजूने हे दोन टोळ्यांतील युद्ध आहे आणि दुसऱ्या बाजूने पोलिस कमिश्नर आमोद शुक्ला माफिया टोळ्यांवर संपूर्ण ताकदीने तुटून पडला आहे. शहरात बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव होत आहे आणि पावसाच्या पाण्यासोबत गटारात माणसांचे रक्त वाहत आहे. गँगस्टर कोठडीत पोलिसांच्या छळाचा सामना करत आहेत आणि एखाद्या बोकडाने दयेची याचना करावी, तसे आर्जव करत आहेत. ‘सत्या’मधील प्रत्येक बुलेट कुणाचा तरी बळी घेत आहे.

भाऊ जावळेची भूमिका केलेल्या गोविंद नामदेव यांच्या कारकिर्दीतील पहिल्या पाच भूमिकांतील ही भूमिका आहे. प्रस्तुत लेखकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, ‘‘जेव्हा या सिनेमाची गोष्ट आणि भूमिकेविषयी सांगितले गेले, तेव्हा मी या भूमिकेचे एक ढोबळ चित्र माझ्या मनात तयार केले. उदाहरणार्थ ही व्यक्ती कितपत वाईट असेल, किती निर्दयी असेल, कदाचित तिला मिशा असतील वगैरे वगैरे.

दिग्दर्शक वर्मा यांच्याशी झालेल्या चर्चेतून या गोष्टी अधिक स्पष्ट झाल्या. त्यानंतर अशा प्रकारच्या व्यक्तीचा मी शोध घेऊ लागलो. तोपर्यंत मी कुठल्याही अंडरवर्ल्डमधील गुन्हेगाराला भेटलो नव्हतो. त्यामुळे मी काही नवी-जुनी गुन्हेगारी जगतावरील मासिके गोळा केली. भाऊच्या व्यक्तिरेखेसाठीच्या माझ्या तयारीचा तो भाग होता. ती सर्व छायाचित्रे मी रामगोपाल वर्मा यांना दाखवली.

ती सर्व छायाचित्रे मी जेव्हा टेबलवर ठेवली तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, त्यातील पन्नास टक्के व्यक्तींच्या मिशांच्या मधोमध एक फट आहे. भाऊच्या व्यक्तिरेखेसाठी मी त्यातील एकाची मिशी निवडली आणि दुसऱ्याच्या भुवया निवडल्या. त्यानंतर माझ्या निरीक्षणानुसार आम्ही भाऊच्या बोलण्याची लकब उचलली. एक मराठी भाषक व्यक्ती जशी हिंदी बोलते तशी ती होती. त्यानंतर मी वास्तवातील उद्योगपती, राजकारणी, पोलिस यांच्यावरील मासिके घेतली आणि माझ्या भूमिकेसाठी त्यांच्या छायाचित्रांचा अभ्यास केला.’’

दाक्षिणात्य अभिनेता जे. डी. चक्रवर्तीला सोडून ‘सत्या’मधील सर्व कलाकार नवीन होते. ‘सिवा’मधून (१९९०) पदार्पण केल्यानंतर जे. डी. चक्रवर्तीला तमिळ आणि तेलुगू सिनेमात चांगलीच ओळख मिळाली होती. त्यानंतर त्याची प्रमुख भूमिका असलेला ‘सत्या’ हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. सिनेमाबद्दल बोलताना त्याचा सहलेखक अनुराग कश्यप सांगतो, ‘‘चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी सर्व कलाकार अतिशय उत्साही होते; पण हा सिनेमा लोक कसे स्वीकारणार आहेत, याबद्दल कुणालाच काही कल्पना नव्हती.’’

‘सत्या’मध्ये काही चांगली पात्रेसुद्धा होती. भिकू म्हात्रेच्या टोळीतील एक गूढ वाटणारा सदस्य कल्लू मामाचे पात्र साकारणारे सौरभ शुक्ला प्रस्तुत लेखकाला म्हणाले, ‘‘माझ्या भूमिकेत अनेक महान भूमिकांचे आणि अभिनेत्यांचे प्रतिबिंब आहे, हे मला माहीत होते. त्यात गॉडफादरमधील लुका ब्रासी किंवा गुडफेलासमधील पॉली सिसेरो यासांरख्या अभिनेत्यांची झलक होती.’’

या पात्रांचा दुतोंडीपणा त्यांना अविस्मरणीय बनवतो. शुक्ला त्याबद्दल सांगतात, ‘‘गोली मार... या गाण्यानंतर टोळीतील एक सदस्य बाल्कनीतून बाहेर बिअरची बॉटल फेकतो. त्यामुळे मी त्याच्यावर ओरडतो. ही बॉटल कुणालातरी लागेल एवढीही अक्कल तुला नाही का, असे म्हणतो.

इतरांना मारणारे लोक ‘सामाजिक जाणिवे’विषयी बोलतात हाच एक विरोधाभास आहे!’’ त्यांच्या नावातही विरोधाभास होता. भिकू म्हात्रे किंवा कल्लू मामा या दोघांचीही नावे त्यांच्या धंद्याला साजेशी नाहीत. सम्राट नावाचा माणूस इमारतीत काम करणारा मजूर आहे आणि गरीबचंद नावाचा माणूस इमारतीचा विकसक (बिल्डर) आहे.

भिकू म्हात्रे ही स्वतःबद्दल न्यूनगंड असणारी व्यक्ती आहे. ही भूमिका करणाऱ्या मनोज वाजपेयी यांनी प्रस्तुत लेखकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘‘भिकू हा एखाद्या लहान मुलासारखा आहे. तसाच अस्थिर, भावनिक. तो एक चांगला पिता आणि पती आहे.

भिकूची पत्नी त्याला सतत टोमणे मारत असते आणि घरातून बाहेर राहिल्यामुळे ओरडत असते. त्याची एक विशेष गोष्ट म्हणजे तो कधीच कुणाला फसवत नाही. त्याच्या बोलण्यातून आणि उदास हसण्यातून त्याच्यातील लहान मूल डोकावते. तो सत्ता गाजवतो; पण तो कमनशिबी माणूस आहे.’’ मनोज वाजपेयींचे उदास हसणे हा केवळ अभिनय नव्हता.

अनुराग कश्यप एका मुलाखतीत सांगतो, ‘आपल्याला एक मोठी भूमिका मिळाली आहे, या जाणिवेने मनोज वाजपेयी चित्रीकरणादरम्यान उदास हसत असे. त्याच्या उदास हास्याने त्या पात्राला जिवंत केले. तिथे कोणीही कोरिओग्राफर नव्हता. रामूने (रामगोपाल वर्मा) त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते.’’ आणखी एक मजेशीर गोष्ट अनुराग कश्यपने सांगितली, ती म्हणजे भिकू हे रामगोपाल वर्मा यांच्या घरकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते. तेच नाव त्यांनी या पात्राला देण्याचे ठरवले.

‘सत्या’ने एक नवीन उदाहरण उभे केले. ही कथा केवळ सत्ता आणि पैशाविषयी नव्हती. ही अस्तित्व टिकवण्याची गोष्ट होती. जिथे हिंसाचार हा हिंसाचाराचा सामना करण्याची गरज म्हणून येतो. ‘सत्या’ राजकारण आणि अंडरवर्ल्डमधील संबंध अतिशय विदारकपणे दाखवतो.

(प्रस्तुत लेख हा बालाजी विट्टल लिखित 'प्युअर इव्हील- द बॅड मेन इन बॉलिवूड' या हार्पर कॉलीन्सने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील अंश आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT