Marathi Language Sakal
सप्तरंग

बालभारती वाद : ती कविता पाठ्यपुस्तकात राहिली हे कोणाच्या तरी दबावानंच झालं का?

सकाळ वृत्तसेवा

- माधव राजगुरू, saptrang@esakal.com

सध्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील एका कवितेवरून समाजमाध्यमांमध्ये वाद सुरू आहे. त्या कवितेनं वाचकांसमोर अनेक प्रश्न उभे केले आहेत. त्यातला एक प्रश्न मराठी भाषेच्या भवितव्याच्या संदर्भातील आहे. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणं आवश्यक आहे.

ज्या कवितेवरून मुळात वाद सुरू झाला, ती पूर्वी भावे यांची कविता अशी आहे -

जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल

अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल

तबल्यावर होती कोल्होबाची साथ

वाघोबा म्हणाले, नाही ना बात?

पेटी मी किती वाजवतो सुंदर

हसत हसत म्हणाले साळींदर

गुंडू-पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस

संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस

मुंगीने लावला वरचा सा

आवाज आवाज ओरडला ससा

ठुमकत नाचत आला मोर

वन्समोअर, वन्समोअर झाला शोर

या कवितेबाबत मी एका ठिकाणी माझं मत व्यक्त केलं होतं. ते वाचून त्या दिवशी बालभारतीच्या संचालकांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलवून माझ्याशी चर्चा केली. दीर्घकाळ बालभारतीत काम केल्यानंतरही बालभारतीच्या विरोधात तुम्ही कसे काय बोलू शकता, असा जाब मला विचारला गेला.

इतकंच नाही तर मी बालभारतीच्या ग्रंथालयात पुस्तक घेण्यासाठी वारंवार जातो, हे बरोबर नाही, असंही मला सुनावण्यात आले. केवळ मी पूर्वी बालभारतीत काम केलं होतं, म्हणून मी बाल‌भारतीच्या बाजूनंच लिहावं किंवा बोलावं, ही त्यांची अपेक्षा चुकीची आहे. योग्य बाजू असेल, तेव्हा मी यापूर्वी बालभारतीची बाजू घेतली आहे, हेही खरे आहे.

माझ्याशी बोलताना त्यांनी एक गोष्ट चांगली केली, ती म्हणजे, समोर बसलेल्या त्यांच्या सह‌काऱ्यांसमोर ती कविता त्यांनी स्वतःच वाचून दाखवली. एकेक ओळ ते वाचत होते. त्यावर भाष्यही करत होते. कवितेत लय नाही, यमक नाही, असे माझंच मत ते नोंदवत होते. मग ती कविता सुमार दर्जाची आहे, असे मी बोललो, त्यात काय चूक आहे? मी म्हणालो होतो, की ती कविता सुमार आहे, यावर त्यांचा आक्षेप होता.

पुढं ते म्हणाले, 'तुम्हाला माहीत आहेच, की कविता निवडण्याचं काम समिती तज्ज्ञ करत असतात, तो त्यांचा अधिकार असतो.' वास्तविक ही जबाबदारी अंतिमतः बालभारतीची असते. निवड समितीवर जबाबदारी ढकलून मोकळे होता येत नाही. पाठ्यपुस्तकं तयार करण्यासाठी विषय समित्या असतात.

विषय समितीमध्ये सदस्य-सचिव म्हणून बालभारतीचे विशेष अधिकारी काम करत असतात. समितीतील सर्व सदस्य बाहेरचे असल्यामुळं त्यांना शासनाच्या ध्येय-धोरणाची माहिती देऊन उत्तम पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यासाठी दिशा देण्याचं काम सदस्य-सचिवांनी करणं अपेक्षित असतं.

पाठ्यपुस्तकात एखादा आक्षेपार्ह शब्द वा मजकूर आला असेल, तर तो वगळण्याची आणि त्या ठिकाणी पर्यायी चांगल्या आशयाचा मजकूर समितीपुढं ठेवून तो निवडण्याची शिफारस बालभारतीच्या विशेषाधिकाऱ्यांनी सदस्य-सचिव या नात्यानं केली पाहिजे. ही कविता समितीपुढं आली, त्याचवेळी ती बाजूला काढायला हवी होती. तशी सूचना विशेषाधिकार्‍यांनी केली असेलही, तरीही ती कविता पाठ्यपुस्तकात राहिली. हे कोणाच्या तरी दबावानंच झालं असावं.

मुळातच ही कविता दुसरी-तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यानं लिहिली असावी, असा त्याचा दर्जा आहे. ही कविता पहिलीच्या पाठ्यपुस्तकात असेल, तर जी मुलं पहिल्यांदाच वाचन-लेखन शिकणार असतात, ज्यांना अद्याप अक्षरओळख झालेली नसते, ती मुलं ही कविता वाचू शकत नाहीत.

ती केवळ ऐकण्यासाठी असेल, तर या कवितेऐवजी ज्यात शब्दांचं लालित्य आहे, ताल-लय आहे, अशी दुसरी सुंदर कविता देता आली असती. बाजारात उत्तम आणि सकस बालसाहित्याहून सुमार दर्जाचेच बालसाहित्य विपुल प्रमाणात आहे; म्हणून असं सुमार दर्जाचे साहित्य मुलांच्या माथी मारणं योग्य नाही.

एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, की भाषाविषयक पाठ्यपुस्तकं तयार करणं म्हणजे एक आव्हान असतं. त्यात पहिलीचं पाठ्यपुस्तक तयार करणं, हे एखाद्या पीएच.डी.च्या प्रबंधाचं लेखन करण्यासारखं असतं. मुलांचा वयोगट, त्यांचं भावविश्व, त्यांची आकलनक्षमता, मजकुराची काठिण्यपातळी, मुलांचं मानसशास्त्र या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पाठ्यविषयाची निवड करणे आणि सोप्या भाषेत त्यांचं लेखन करणं हे अत्यंत जिकिरीचं काम असतं.

वरील सर्व निकषांच्या कसोटीला उतरणारे बाजारातील उपलब्ध तयार साहित्य फारसं उपयुक्त नसतं. जे साहित्य हाती लागतं, त्यावर संपादकीय संस्कार करणं आवश्यक असते. संस्करण करताना मूळ लेखनात केलेले बदल कवी व लेखकांना मान्य नसतात. ही एक मोठी अडचण असते. अशावेळी बदलाचे कारण, पाठ्यपुस्तकाची गरज संबंधित कवी-लेखकांना पटवून देता आली पाहिजे. काही लेखक मुलांसाठी म्हणून मान्यता देतात.

याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्‌ध संगीतकार, कवी यशवंत देव यांचं आहे. त्यांची एक सुंदर कविता सहावीच्या अमराठी मुलांच्या पाठ्यपुस्तकात घेतली होती. काठिण्यपातळीच्या दृष्टीने एक शब्द बदलायचा होता. तो बदलून अनुमतीसाठी देव यांच्याकडे कविता पाठवली, तेव्हा त्यांनी फोनवरून चर्चा करून नवीन शब्द सुचवला. याउलट अनुभव विंदा करंदीकरांच्या बाबतीत आला.

विंदा करंदीकरांच्या कवितेतील बदललेल्या शब्दास त्यांनी अनुमती दिली नाही. ‘‘ माझी कविता पाठ्यपुस्तकात घेतली नाही, तरी चालेल; पण कवितेतील शब्द बदलायचा नाही." असे त्यांनी ठणकावून सांगितलं. अशा प्रसंगात प्रतिभावंतांकडून नव्यानं लिहून घेण्याशिवाय पर्याय असतो. मी बालभारतीत मराठी विभागप्रमुख असताना असा प्रयोग केला होता.

सन २००५- ०६ मध्ये बालभारती मराठी समितीच्या संपाद‌क मंडळात प्रसि‌द्ध कवी विठ्ठल वाघ होते. पहिली आणि दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील बहुतांश कविता वाघ यांनी लिहिल्या आहेत. कवितेत कोणते शब्द हवेत, कवितेचा आशय कसा असावा, हे सांगितल्यानंतर कविता तयार होत असे. त्यात काही त्रुटी दाखवताच तत्काळ त्यात बदल करून ते पुन्हा नवी कविता लिहून देत. कधीकधी एका कवितेसाठी पूर्ण दिवस जात असे. पुनःपुन्हा बदल सुचवले, तरी ते न चिडता लहान मुलांसाठी आपण हे करत आहोत, या भावनेनं त्यांनी काम केलं.

मुलांमध्ये अंगभूत लय, ताल या गोष्टी असतात. लालित्यपूर्ण सहज सोप्या शब्दांची कविता त्यांच्या कानांवर पडली, तर मुलं आनंदानं ती कविता हावभावांसह म्हणू लागतात; म्हणून अशा कवितेची निवड आवश्यक असतं. या कवितेच्या निमित्ताने सर्व समाजमाध्यमांमध्ये विविध अंगानं जी चर्चा सुरू आहे, त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी भाषेच्या ऱ्हासाचा. मराठी भाषेचा ऱ्हास होतोय का ? तर याचे उत्तर ''होय'' असेच आहे. मराठी भाषेच्या ऱ्हासाची कारणे अनेक आहेत.

ज्या भावी पिढीच्या खांद्यावर आपण मराठी भाषासंवर्धनाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी टाकत आहोत, त्या मुलांपुढं अशी साधारण कविता ठेवत असू, तर ही चिंतेची बाब तर आहेच. अशा कवितेमुळं मुलांना मराठी भाषेची गोडी लागेल? मुलं मराठी वाचनाकडे वळतील? अजिबात नाही. एका बाजूनं मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत.

पालकांचा इंग्रजी माध्यमाकडं ओढा वाढत आहे. शासन मराठी शाळा समृद्ध आणि सक्षम करण्यासाठी पुढं येत नाही आणि दुसऱ्या बाजूनं इंग्रजीसह अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवण्यासाठी उत्तम मराठी शिक्षक नेमत नाही. अशा परिस्थितीत मराठी भाषेचे जतन-संवर्धन कसं होईल? हेच शासन पन्नास कोटी रुपये खर्चून वाचनचळवळीसाठी अभिनेते अभिताभ बच्चन यांना ब्रँड ॲम्बॅसिडर (सदिच्छादूत) बनवत आहे.

यापेक्षा मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांच्या संवर्धनाचे आणि मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचं काम करणाऱ्या संस्थांना असा भरघोस निधी दिल्यास वाचनचळवळ अधिक गतिमान होऊ शकेल, याचा शासनाने जरूर विचार करावा.

आता शेवटचा मुद्दा. कवितेत ''वन्समोअर'' हा इंग्रजी शब्द वापरला आहे. याबद्दलही अनेकांनी आक्षेप घेतला आहे. खरं तर मराठी भाषेत इंग्रजी शब्दांसह इतर अनेक देशी-विदेशी शब्द वापरले जातात. अशा प्रकारे शब्दांच्या देवाण-घेवाणीतून भाषा समृद्ध होत असते. अनेक शब्दांना मराठी पर्यायी शब्द उपलब्ध नाहीत.

अपरिहार्यता म्हणून असे शब्द वापरणे गैर नाही, असे असलं, तरी मराठीत अनेक अर्थपूर्ण शब्द असूनही गरज नसताना काही लोक जाणीवपूर्वक इंग्रजी शब्दांचा वापर करतात, ही बाब मराठीसाठी हानिकारक ठरते. मराठी भाषा समृद्ध करायची असेल, तर परभाषेतील शब्द मराठीत वापरून रूढ करण्यापेक्षा अशा अमराठी शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्द तयार करून तो रुजवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

सध्या दूरदर्शनवरील विविध वृत्तवाहिन्यांमध्ये बातम्यांचे प्रसारण करताना ‘ठळक बातम्या’ हा मराठी शब्दाचा पर्याय असताना 'हेड लाइन' किंवा दूरदर्शनवरील उर्वरित बातम्या विश्रांतीनंतर ऐवजी 'ब्रेक' नंतर असे इंग्रजी शब्द वापरले जातात. त्याचा परिणाम बातम्या ऐकणार्‍यांच्या किंवा मालिका पाहणार्‍यांच्या मनावर होऊन ती माणसे व्यवहारात एकमेकांशी बोलताना असेच शब्दप्रयोग करू लागतात,.

त्यामुळे मूळ मराठी भाषेतील शब्द हळूहळू लुप्त होऊ लागतात आणि मराठी भाषेचा डौलही हरवून जातो, याचा परिणाम म्हणून पाठ्यपुस्तकातल्या कवितांमध्ये किंवा गद्य पाठांमध्ये अनावश्यक इंग्रजी शब्दांचा वापर होऊ लागला, तर ही गंभीर बाब आहे; कारण मराठी भाषेची पाठ्यपुस्तके मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांच्या संवर्धनासाठी तयार केली जावीत,.

नाहीतर हा उद्देश मागे पडून मुलांवर भाषेच्या विकृतीकरणाचे संस्कार होतील आणि भाषासंवर्धन, वाचनसंस्कृती यांची जोपासना न होता, ही मुलं मराठी भाषेपासून दूर जाण्याचा धोका आहे, असं होऊ नये म्हणून मराठीची पाठ्यपुस्तकं शुद्ध मराठीतच असली पाहिजेत, याची काळजी यापुढं तरी बालभारतीनं जरूर घ्यावी.

(लेखक हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामधील मराठी विशेषाधिकारी पदावरून निवृत्त झाले असून साहित्य आणि भाषाविषयक विविध उपक्रम राबवत असतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'प्रकाश आंबेडकरांची राज्यात एखादी तरी जागा निवडून आली असती, तर आम्ही त्याची दखल घेतली असती' - शरद पवार

Mumbai Crime: CSMT स्टेशन येथे सामूहिक बलात्कार झालेली 29 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

Latest Marathi News Updates : पुण्यात वंचितच्या नऊ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल...

Morning Routine: दिवसभर स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल उत्साही

Bigg Boss 18 House: मातीच्या वस्तू अन् दगडाच्या खुर्च्या; कसं आहे सलमानच्या बिग बॉस १८ चं घर? पाहा inside video

SCROLL FOR NEXT