भेटीसाठी बंगल्याबाहेर उभे राहूनही ती नाकारणारे व्ही.पी. सिंह आणि तरीही उदार मनाने त्यांचा हा निर्णय ‘बरोबर’ असल्याची पावती देणारे बाळासाहेब ठाकरे; अमिताभ बच्चन यांच्या आचरणाबद्दल त्यांना ‘साप’ म्हणणारे राजीव गांधी आणि आपापले पक्ष सोडून एका नव्या पक्षाच्या झेंड्याखाली देशात जागृती करण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी व शरद पवार यांना आवाहन करणारे चंद्रशेखर! या घडामोडींची माहिती कधी बाहेर आली आहे का? या सर्व प्रसंगांचे साक्षीदार असलेले वरिष्ठ पत्रकार व माजी खासदार संतोष भारतीय यांच्या ‘व्ही. पी. सिंह, चंद्रशेखर, सोनिया गांधी और मैं’ या पुस्तकात गेल्या तीन दशकांतील राजकारणातील उलथापालथ आणि त्याचे तरंग यांचा आढावा तर आहेच; परंतु आतापर्यंत प्रकाशित न झालेल्या अनेक घडामोडींचे संदर्भही आहेत.
राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलेल्या विश्वनाथ प्रतापसिंह यांनी भ्रष्टाचाराच्या प्रश्नासह प्रमुख मुद्द्यांवर जनसंवाद दौरा आखला होता. त्याचा प्रारंभ मुंबईहून होणार होता. व्हीपींचे विमानतळावर भव्य स्वागत आयोजिण्यात आले. वरिष्ठ पत्रकार (कै.) दिनू रणदिवे यांनीही त्यात प्रमुख भूमिका बजावली होती. या आयोजनात दत्ता सामंत यांचा प्रमुख सहभाग असला तरी आयत्यावेळी काही गडबड होऊ नये म्हणून अभिनेते राज बब्बर यांना पर्यायी व्यवस्था करण्यास सांगण्यात आले होते. बब्बर आणि ठाकरे यांची मैत्री होती. बब्बर यांनी विमानतळावरील स्वागतासाठी ठाकरे यांची मदत मागितली. मात्र शिवसैनिक त्यांची टोपी आणि झेंड्यासह नसावेत. ते साध्या वेशातील असावेत, अशी अट घातली. प्रथम ठाकरे यांनी ही अट मान्य केली नाही, तेव्हा बब्बर यांनी नम्रपणे त्यांना ‘मग मला तुमचे कार्यकर्ते नकोत’ असे सांगितले. परंतु ठाकरे दिलदार. त्यांनी बब्बर यांना हसत सांगितले, ‘‘तुझ्या मनासारखे होईल. माझे कार्यकर्ते येतील, टोप्या व झेंडे न घेता.’’
हे सांगताना ठाकरे यांनीही एक अट घातली. सिंग यांची मिरवणूक ‘कलानगर’वरूनच जाणार असल्याने त्यांनी माझ्या घरापाशी थांबून माझ्या स्वागताचा स्वीकार करावा.'' बब्बर यांनी परस्पर ती मान्य करुन टाकली. स्वागतप्रसंगी बाळासाहेबांनी शब्द पाळला होता. बब्बर खूष होते. मिरवणूक निघाली. बांद्रा येथे ‘कलानगर’पाशी पोहोचल्यावर राज बब्बर यांनी व्हीपींना बाळासाहेबांबरोबरच्या संभाषणाची माहिती देऊन त्यांच्या घरी जाऊया, असे सुचविले. सिंग काही बोलले नाहीत. बब्बर अस्वस्थ. त्यांनी पुन्हा आठवण दिली. सिंग यांनी सांगितले, "गर्दीचे कारण द्या आणि गाडी न थांबवता पुढे दामटा!'' आता मात्र बब्बर यांना घाम फुटला. बाळासाहेबांना न भेटता सिंग यांचा काफिला पुढे गेला. बब्बर यांना घाम फुटला.
हॉटेलात गेल्यावर व्हीपींनी किमान फोनवर तरी बाळासाहेबांशी बोलावे, असे त्यांनी सुचवले. व्हीपींनी त्यांना सजावणीच्या सुरात सांगितले, ‘मी येथे राजकीय दौऱ्यावर नव्हे तर कामगारप्रश्नी मेळाव्यासाठी आलो आहे. त्यामुळे दौऱ्यात राजकीय भेटीगाठी उचित वाटत नाहीत. त्याचे वेगळे अर्थ लावले जातील.’बब्बर यांना ते म्हणणे पटले खरे; परंतु आता ठाकरे यांची समजूत कशी घालायची, या विवंचनेत ते पडले. ते तडक बाळासाहेबांच्या घरी गेले. बाळासाहेब नाराज होतेच. परंतु राज बब्बर यांनी त्यांना सिंग यांचे म्हणणे तपशीलाने सांगितले. बाळासाहेबांनी ते शांतपणे ऐकूनही घेतले. ठाकरे एवढेच म्हणाले, "व्ही. पी. सिंग ठीक कह रहे है!'' बब्बर यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांची पाठही त्यांनी थोपटली.
या पुस्तकात असे अनेक राजकीय किस्से आहेत आणि ते पडद्यामागील असल्याने पुस्तकाची रंजकता वाढलेली आहे. राजीव गांधी प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर विरोधी गोटांत अक्षरशः सामसूम होती. हे चित्र बदलण्यासाठी चंद्रशेखर यांनी पुढाकार घेऊन अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार यांना आपापले पक्ष सोडून एकत्र येण्याचे आवाहन केले. तेव्हा वाजपेयींनी असमर्थता व्यक्त करताना चंद्रशेखर यांना दिलेले उत्तर आणि त्यांनी त्यावेळी रा. स्व. संघाविषयी काढलेले उद्गार हे वाजपेयी यांना संघाविषयी वाटणारे प्रेम नव्हे तर धास्ती दर्शवितात, असे संतोष भारतीय यांनी नमूद केलेल्या प्रसंगावरून दिसते.
अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी
अमिताभ बच्चन, राजीव गांधी व सोनिया गांधी यांच्या संबंधांमध्ये वितुष्ट कसे निर्माण झाले याचे काही किस्सेही या पुस्तकात आहेत. बच्चन यांचा राजीव गांधी यांच्यावर प्रभाव होता आणि संतोष भारतीय यांच्या माहितीनुसार, विश्वनाथ प्रतापसिंग यांची अर्थमंत्रिपदावरून झालेली उचलबांगडी बच्चन यांच्या सांगण्यावरून झाली. भारताला भेट देणाऱ्या राष्ट्रप्रमुखांबरोबरच्या मेजवानीसही बच्चन उपस्थित असत. राजीव गांधी त्यांची ओळख करून देताना ‘भारतीय चित्रसृष्टीतील महानायक’ अशी ते करून देत. परंतु बोफोर्स प्रकरणात अमिताभ व बंधू अजिताभ यांची नावे गोवली जाऊ लागल्यानंतर अमिताभ यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याबाबत राजीव गांधी यांना सांगितले.
राजीव गांधी यांनी त्यास नकार दिला. असे केल्यास विनाकारण संशय वाढेल, शिवाय अलाहाबादला पोटनिवडणूक झाल्यास व्हीपी ती जिंकतील, असे गांधी म्हणाले. परंतु बच्चन यांनी राजीव गांधी यांचा सल्ला मानला नाही. राजीनामा देण्यापूर्वी एक दिवस बच्चन त्यांच्या मातुःश्री तेजी बच्चन यांच्यासह राजीव गांधी यांना भेटण्यास गेले. या पुस्तकातील माहितीप्रमाणे तेजी बच्चन यांनी राजीव गांधी यांना सांगितले, की अमिताभ बच्चन यांना परराष्ट्रमंत्री करा. राजीव गांधी अक्षरशः अवाक् झाले. हे दोघे तिथून बाहेर पडले. बच्चन यांनी परस्पर खासदारकीचा राजीनामा दिला. या प्रसंगानंतर त्यांचे संबंध खालावत गेले. १९८९ मध्ये राजीव गांधी यांचा पराभव झाला. ते १० जनपथ या बंगल्यात राहण्यास गेले. त्यावेळी बच्चन त्यांना काही कारणांसाठी भेटायला गेले. दहा मिनिटातच ते बाहेर पडले आणि निघून गेले.
त्यानंतर लगेचच राजीव गांधी यांच्या खोलीत शिरलेल्या व्यक्तीने राजीव गांधी यांच्या चेहऱ्याकडे पाहिले तर ते अतिशय संतप्त दिसले आणि पुटपुटले, "ही इज स्नेक'' (तो साप आहे). राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांना राहूल गांधी यांच्या शिक्षणाबद्दल चिंता निर्माण झाली होती. ते लंडनमध्ये शिकत होते. त्यांच्या फीचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यांनी बच्चन यांना बोलावून मदतीची मागणी केल्यावर त्यांनी असमर्थता व्यक्त केली आणि मागाहून एक हजार डॉलरचा चेक पाठविला. पण सोनिया गांधी यांनी तो परत पाठवला. त्यानंतर दोन्ही कुटुंबांतील संबंध संपुष्टात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.