सप्तरंग

गोष्ट मुंबईतील चाळींची...

प्रत्येक शहरात काही तरी युनिक असते. तसे मुंबईमध्येही आहे. दहीहंडी, डबेवाले, वडापाव अशा विविध कल्पना मुंबईमध्ये जन्माला आल्या. याच नगरीत चाळीने जन्म घेतला.

अवतरण टीम

प्रत्येक शहरात काही तरी युनिक असते. तसे मुंबईमध्येही आहे. दहीहंडी, डबेवाले, वडापाव अशा विविध कल्पना मुंबईमध्ये जन्माला आल्या. याच नगरीत चाळीने जन्म घेतला.

- भरत गोठोसकर

प्रत्येक शहरात काही तरी युनिक असते. तसे मुंबईमध्येही आहे. दहीहंडी, डबेवाले, वडापाव अशा विविध कल्पना मुंबईमध्ये जन्माला आल्या. याच नगरीत चाळीने जन्म घेतला. लहान आकाराच्या पण गोडीगुलाबीने राहणाऱ्या चाळींमधील व्यक्तींनीच स्वातंत्र्य संग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा ते ‘भारतरत्न’सारखा सन्मान मिळवला. काळाच्या ओघात चाळी मोडकळीस येऊ लागल्याने यामधील रहिवाशांनाही पुनर्विकासाचे वेध लागलेत. नुकताच मुंबईतल्या ऐतिहासिक बीडीडी चाळीवर हातोडा पडलाय... या पार्श्वभूमीवर मुंबईतील चाळींचा जन्म ते चाळींचे जतन याविषयीचा हा आढावा.

चाळी फक्त मुंबईतच आहेत असे नाही. दुसऱ्या शहरांमध्येही होत्या; पण मुंबईमध्ये जेवढ्या चाळी आहेत, तेवढ्या इतर शहरांमध्ये नाहीत. मुंबईमध्ये सैनिक होते, त्यांच्यासाठी उभारलेल्या बॅरेकवरून प्रेरणा घेऊन इंग्रजांच्या काळात मुंबईत चाळी प्रथम उभारण्यात आल्या. मेट्रो सिनेमामागील परिसराला धोबीतलाव म्हणतो. तिथे सैन्याचे बॅरेक होते. ज्याला मरीन लाइन्स म्हणायचे. या बॅरेक पद्धतीची घरे मुंबईत बांधण्यास सुरुवात झाली असा एक समज आहे; पण कागदोपत्री याची कुठे नोंद नाही. ‘चालीस’ या पोर्तुगीज शब्दावरून मराठीमध्ये चाळ हा शब्द आला आहे, असा दावा डॉ. अमोल दिवकर यांनी केला. हा शब्द इंग्रज येण्याच्या पूर्वीपासूनच असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

चाळ संस्कृतीची सुरुवात

पूर्वी काळाघोडा परिसरापर्यंत मुंबईचा किल्ला होता. यामध्ये उच्चभ्रू वस्ती होती. ज्यांच्याकडे पैसे नव्हते, ते क्रॉफर्ड मार्केटच्या पुढील भागात राहत होते. तिकडे पहिल्या चाळी येण्यास सुरुवात झाली. तेव्हा चाळी म्हणजे मानवी गोडाऊन होते. एका लहानशा खोलीमध्ये पाच ते सहा लोक राहत असत. आतमध्ये अंघोळ करण्यास जागा आणि बाहेर शेअर टॉयलेट अशी त्याची रचना होती. त्या वेळी उच्चभ्रू व्यक्तींच्या घरातही टॉयलेट नसायचे. टॉयलेट घराबाहेर असायचे. त्याचे कारण असे, की टॉयलेट साफ करण्यास येणाऱ्या व्यक्तीला आपल्या घरात घ्यायचे नाही हा यामागील हेतू होता. चाळी बांधण्यास प्रथम सुरुवात केली तो समाज म्हणजे पारशी. त्यांनी त्यांच्या गावावरून येणाऱ्या गरीब लोकांच्या वास्तव्यासाठी चाळी बांधण्यास सुरुवात केली. त्यांनी विधवा महिलांसाठीही वेगळ्या चाळी बांधल्या. आजही क्रॉफर्ड मार्केट परिसरात पारशी चाळी आपल्याला दिसतात. शिक्षित आणि श्रीमंत असलेल्या पारशी समाजाने चाळीतून बाहेर पडत, पारसी बाग उभारल्या, अशा गेटेड कम्युनिटी कॉन्सेप्ट पारशी लोकांनी पहिल्यांदा आणली. नंतर खासगी चाळी येण्यास गिरगावपासून सुरुवात झाली. त्या वेळी गिरगाव हे शहराच्या एकदम टोकाला होते. कॉमन बाल्कनी आणि लाकडाचे स्ट्रक्चर, विटांच्या भिंती अशी या घरांची रचना होती.

अविवाहित पुरुष किंवा कोकणामधून आलेल्या लोकांसाठी गिरगावमध्ये चाळी उभारण्यात येऊ लागल्या. त्या काळात मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के लोकसंख्या ही कोकणातून आलेल्या लोकांची होती. १८६० दरम्यान मुंबईत सूतगिरण्या यायला लागल्या. तेव्हा तीन शिफ्टमध्ये काम सुरू झाल्याने कोकणातून कामगार मुंबईत यायला लागले. तेव्हापासूनच गिरगाव आणि गिरणगावमध्ये फरक आहे. जे लोक कारकून होते, ऑफिसमध्ये काम करणारे आणि उच्चवर्गीय लोक, ज्यांना लिहिता-वाचता येत होते असे लोक गिरगावमध्ये राहत होते. ज्या लोकांकडे पैसे नव्हते, गरीब होते, असे लोक परळ, लालबाग, शिवडी या परिसरात यायला लागले. बहुतांश लोक कोकणातील होते, परंतु शिक्षित आणि अशिक्षित अशी विभागणी येथे झाली. ज्यांच्याकडे पैसे होते, त्यांनी गुंतवणूक म्हणून चाळी बांधल्या. त्यातून भाडे वसूल करायचे.

त्या वेळी शिपिंग व्यवसाय होता. हिंदू लोक सातासमुद्रापार जात नसल्याने हा व्यवसाय मुस्लिम समाजाच्या हातात होता. हे बहुतांश कच्छकडून आलेले होते. शरिया कायद्यानुसार या समाजातील व्यक्तीने एखाद्यास कर्ज दिल्यास त्याचे व्याज घेता येत नव्हते; मात्र घरभाडे घेण्यास अडथळा नसल्याने त्यांनी चाळी बांधल्या. त्यामुळे आजही आपल्याला हाजी कासमप्रमाणे विविध नावाने चाळी दिसतात. चाळींचे मालक हे मुस्लिम असले, तरी भाडे देणारे हे कोकणी हिंदू आहेत. १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत असे चित्र होते.

प्लेग आणि बीआयटी चाळींची बांधणी

१८९६ मध्ये मुंबईमध्ये प्लेगची साथ आली. आठवड्याला पाच हजार लोक मरत होते. तत्कालीन सरकारने मुंबईची साफसफाई करायचे ठरवले. यासाठी त्यांनी बीआयटी म्हणजे सिटी ऑफ बॉम्बे इंप्रूव्हमेंट ट्रस्ट असा एक ट्रस्ट चालू केला. या माध्यमातून त्यांनी रस्ते, घरे आदीवर काम केले. घरांचे अत्यल्प, अल्प, उच्च उत्पन्न गट असे प्रकार केले. आताच्या चौपाट्यांच्या बाजूला लागून दिसणाऱ्या इमारती, गावदेवीमधील बंगले हे उच्च उत्पन्न गटातील लोकांकरिता. मध्यमवर्गीय लोकांसाठी त्यांनी हिंदू कॉलनी, शिवाजी पार्क, खार, चेंबूर अशा विविध ठिकाणी घरे बांधली. यापूर्वी घरबांधणीसाठी चुना आणि लाकडाचा वापर होत होता. पुढे सिमेंट आले.

गिरगावातील पहिल्या चाळीची रचना पाहिल्यास कमीत कमी जागेत अधिक घरे बांधलेली आढळतात. ही घरे कॉमन गॅलरीतून घरात जाता येणारी उभारली आहेत; तर परळमध्ये उभारलेल्या बीआयटी चाळी या कॉमन पॅसेजच्या दोन्ही बाजूला घरे बांधलेली दिसतात. या दोन्ही डिझार्इनमध्ये फरक आहे. त्या वेळी खेळती हवा, सूर्यप्रकाश असावा अशी घरे उभारली. मागासवर्गीय जमाती विशेषतः दलितांना त्या काळी चाळीत राहण्यास मिळत नव्हते. म्हणून ते कुठल्या तरी झोपडपट्टीत राहत होते. त्या काळात मुंबईत झोपडपट्टी बऱ्यापैकी वाढली होती. तिथेच प्लेगची साथ होती. त्यांना चांगली स्वच्छ जागा देण्यासाठी चाळी उभारण्यात आल्या.

बाबासाहेबांचे वास्तव्य

अशाच एका चाळीत रिटायर्ड सोल्जर आपले बिऱ्हाड घेऊन बीआयटी चाळीत आले. त्या माणसाच्या मुलाने भारताचे संविधान लिहिले. जर प्लेग आला नसता, बीआयटीने चाळी बांधल्या नसत्या, तर कदाचित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राहण्याकरता स्वच्छ, सुंदर जागा मिळाली नसती. त्यांची तब्येत चांगली राहिली नसती आणि कदाचित जे त्यांनी कार्य केले ते त्यांना करता आले नसते. या चाळीलगत दामोदर हॉलमध्ये डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा चालू केली. याच भागात दलित चळवळ वाढली.

असंख्य चळवळींचा साक्षीदार

१९१८ मध्ये मुंबईत स्पॅनिश फ्ल्यू आला. तेव्हा आणखी एक नवीन संस्था सरकारने स्थापन केली. या संस्थेचे नाव होते बीडीडी. अर्थात बॉम्बे डेव्हलपमेंट डायरेक्टोरेट. गिरणी कामगारांच्या गृहबांधणीसाठी ही संस्था निर्माण केली. या संस्थेने शिवडी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी येथे घरे बांधली. वरळीमध्ये सर्वाधिक जागा होती, या ठिकाणी मैदान निर्माण केले. सध्या असलेले जांबोरी मैदान हे त्यापैकी एक. याच मैदानातून महात्मा गांधींनी भाषण दिले आहे. या मैदानाच्या बाजूला ललित कला भवन, काम करणाऱ्या महिलांची लहान मुले ठेवण्यासाठी सुविधा निर्माण केली होती. आरोग्य क्षेत्राचाही प्राधान्याने विचार केला गेला. दोन इमारतींच्या मध्ये मोकळी जागा होती. त्यामध्ये मुले खेळू शकत होती. कालांतराने या जागी अनधिकृत बांधकामे झाली. १९३० च्या दशकात झालेल्या सत्याग्रहातील स्वातंत्र्य सैनिकांना पकडून या चाळीत बंदिस्त करून ठेवले. ही केवळ चाळ म्हणून नव्हे, तर जेल म्हणूनही तिचा वापर करण्यात आला.

दलित चळवळी आणि दहीहंडीचा जन्म

त्या काळात दलित साहित्याचा जन्म बीडीडी, बीआयटी चाळींमध्ये झालेला आहे. दलित पँथर, राजकीय कार्यकर्ते हे चाळीतून आले आहेत. या चाळी नसत्या तर या चळवळीला अधिक बळ मिळाले नसते. मुंबई स्वच्छ करण्यासाठी या चाळी उभ्या राहिल्या; पण या चाळींमधूनच मोठे सामाजिक अभिसरण झाले आहे. चाळीतील संस्कृती ही खुली होती. कोणाची दारं लॉक नसायची. कुणाचे पोर कुठेही जाऊन जेवायचे. सणाला सर्व जण एकत्रित यायचे. सार्वजनिक गणपतीचा जन्म याच चाळींत झाला आहे. दहीहंडीचा जन्म चाळीतील आहे, पण आता या चाळींकडे उभ्या झोपड्या म्हणून पाहण्यात येऊ लागले आहे. आता लोकांना स्वतंत्र घरे हवीत. शौचालय घरात असेल अशा घरांची मागणी आता आहे. चाळींमध्ये अपुऱ्या सुविधा, कुटुंबातील सदस्यांची वाढती संख्या आणि मुंबईत इतरत्र दुसरे घर घेणे परवडत नाही; त्यामुळे लोक नाइलाजाने मुंबईलगतच्या शहरात जाऊ लागले आहेत. जग बदलले आहे. आज ना उद्या चाळी जाणार; परंतु सरकारने जुन्या चाळी कशा होत्या याचे जतन केले पाहिजे. तिथली संस्कृती दाखवली पाहिजे. चाळीतील चळवळीचा इतिहास चित्र, पुस्तक रूपामध्ये लोकांपर्यंत पोचवला पाहिजे. सिंगापूर खूप विकसित झाले आहे, परंतु त्यांनी अगोदर असलेली काही ठिकाणे तशीच ठेवली आहेत. ही ठिकाणे लोक येऊन पाहतात. त्यावेळची खाद्य आणि पोशाख पद्धती कशी होती ते तसेच ठेवले आहे. तसेच आपण चाळीचे जतन केल्यास ते पुढील पिढीला कळेल.

स्वातंत्र्य आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा

चाळी जुन्या झाल्या आहेत. त्यामधील लोकांना चांगली घरे मिळाली पाहिजेत; पण काही भाग आपण म्युझियम म्हणून जतन केला पाहिजे. प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारखी मोठी माणसे चाळीत राहिली, वाढलेली आहेत. चाळींमधूनच स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली हे आपण विसरता कामा नये. हे लोकांनाही दाखवले पाहिजे. दोन चाळींच्या मधील मोकळ्या पटांगणात भाषणे होत असतं, गिरगावच्या शांताराम चाळीतील मोकळ्या जागेत कित्येकदा लोकमान्य टिळक, बॅरिस्टर जिन्ना यांची भाषणे रंगली आहे.

चाळीचा इतिहास जपण्याची आवश्यकता

मुंबईतील चाळींचा पुनर्विकास होताना मुंबई विद्यापीठाचा बहिःशाल विभाग, सरकारच्या पुरातत्त्व विभागाला सामावून घेणे गरजेचे आहे. बहिःशाल विभागातील विद्यार्थ्यांची मदत घेऊन काही वस्तूंचे जतन करायला हवे. हे अवशेष जतन करण्यासाठी म्युझियम तयार केले पाहिजे. बीडीडी चाळीचे जतन करायला हवे, पण त्याचा जीर्णोद्धार करायला नको. लोकांचे मेणाचे पुतळे तयार केले पाहिजेत. एका घरात इतके लोक कसे राहत होते हे दाखवणे आवश्यक आहे. चाळींनी मुंबईला काय दिले याचे जतन केले पाहिजे. केवळ देखावे न ठेवता येथे साहित्य, वाचन, भाषणे असे ठिकाण निर्माण करायला हवे.

(लेखक मुंबई शहराच्या संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

bhargo8@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: CRPF जवानाची बायको अन् टोल कर्मचाऱ्यामध्ये जुंपली! एकमेकांच्या झिंज्या पकडून फ्रीस्टाईल हाणामारी

Health Tips : टॉयलेट सीटवर बसून टाईमपास करणं महागात पडेल, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा, सवय बदला नाहीतर...

Latest Maharashtra News Updates : हुसैन दलवाईंविरोधात भाजप आक्रमक

Solapur Travel Place : हिवाळ्यात फिरायला जायचं प्लॅन करताय, हे ठिकाणे नक्की एक्सप्लोर करा

AUS vs PAK: ग्लेन मॅक्सवेलने पाकिस्तानला 'गर्रगर्र...' फिरून धुलते; नंतर गोलंदाजांनी नाक घासायला लावले, बिच्चारे वाईट हरले

SCROLL FOR NEXT