Indian Art sakal
सप्तरंग

Indian Art : स्वतंत्र प्रतिभावंत

Indian Art : भारतीय कला आणि ब्रिटिश वास्तववादाचा प्रभाव यावर चर्चा करणारा लेख. भिवा सुतार आणि अन्य कलाकारांनी भारतीय कलाक्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

श्रीराम खाडिलकर

ब्रिटिशांच्या राजवटीत भारतातली कलानिर्मिती ब्रिटिश तंत्रानं प्रभावित व्हायला सुरुवात झाली होती. ज्या वेळी तेव्हाचं मद्रास (चेन्नई), तेव्हाचं कलकत्ता (कोलकाता) आणि तेव्हाचं बॉम्बे (मुंबई) या शहरांमध्ये ब्रिटिश वळण असलेलं चित्रकलेचं शिक्षण दिलं जायला लागलं त्या वेळी ब्रिटिशांची वास्तववादी चित्रणाची पद्धत आणि भारतीयांचं आदर्शवादी पारंपरिक चित्रण यांतला फरक स्पष्ट दिसायला लागला.

नावीन्याची ओढ प्रत्येकालाच असते. कलाक्षेत्रातही तसंच चित्र दिसायला लागलं. कलकत्त्यात तर कंपनी-शैलीला पर्याय म्हणून ‘बंगाल स्कूल ऑफ आर्ट’नं कलाचळवळ सुरू केली. मद्रासला हॅवेल यांनी भारतीय कलेचा गौरव करणारी भूमिका घेतली. याच वेळी आपल्या स्वतःच्या प्रतिभेवर अढळ विश्वास ठेवलेल्या मोजक्याच ज्ञात आणि अनेक अज्ञात कलावंतांनी भारतीय कला जिवंत ठेवण्याचं मोलाचं काम केलं; एवढंच नव्हे तर, भारतीय संस्कृतीसुद्धा जपण्याची जबाबदारी कौशल्यानं पार पाडली. यातलंच एक नाव म्हणजे भिवा सुतार.

सन १८२० मध्ये सांगलीजवळच्या लहानशा गावात जन्मलेल्या भिवा सुतार या कलाकाराला चित्रनिर्मितीचं आणि शिल्पनिर्मितीचं ज्ञान उपजतच होतं. वास्तववादी पद्धतीनं चित्रण करण्यात ते विलक्षण वाकबगार होते. विशेष म्हणजे, मुंबईत ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ची स्थापना होण्याच्या आधीच सुतार हे एका युरोपीय कलाकाराकडून जुजबी मार्गदर्शन घेऊन त्याआधारे चित्रं काढायला लागले होते.

सुतार यांच्या कलानिर्मितीचं वैशिष्ट्य असं की, त्यांचं चित्रण अत्यंत प्रमाणबद्ध आणि वास्तववादी शैलीतलं होतं. त्यांच्या चित्रातल्या रेषेला एक लय होती. त्यामुळं चित्र डौलदार दिसेल याची काळजी नकळतच घेतली जात होती. चित्रकलेबरोबरच शिल्पकलेतही ते पारंगत होते. सांगलीच्या आणि इचलकरंजीच्या संस्थानिकांसाठी सुतार यांनी गणपतीसह आणखीही काही प्रतिमा संगमरवरात घडवून दिल्या होत्या. साताऱ्याजवळच्या औंध इथल्या संस्थानात तिथल्या पंतप्रतिनिधींच्या आग्रहाखातर ‘रामपंचायतना’चं चित्रण त्यांनी करून दिलं होतं.

सुतार हे औंध संस्थानात येण्याच्या काही वर्षं आधी बंडोबा चितारी तिथं काम करत होते.उत्तम नक्षीकाम करण्यात वाकबगार असलेल्या बंडोबांना एकदा पाहिलेली गोष्ट काही काळानंतरही आठवणीच्या आधारे काढण्याचं कौशल्य अवगत होतं. औंधचे पंतप्रतिनिधी श्रीनिवासराव यांचे वडील थोटेपंत यांच्या निधनानंतर काही वर्षांनी त्यांचं चित्र काढण्यासाठी बंडोबांना सांगण्यात आलं. बंडोबांनी त्यांना बऱ्याच वर्षांपूर्वी, तेही एक-दोन वेळाच, पाहिलं होतं. त्याआधारे बंडोबांनी चित्र काढल्यावर त्यांच्याकडं काम करणाऱ्या वृद्ध स्त्रीनं ‘माझं महाराज’ असं म्हटलं. त्यामुळं ते हुबेहूब जमलंय याची पक्की खात्री पटली.

बंडोबा कलेचं ज्ञान उपजतच घेऊन आले होते. त्यांची सुरुवातीची चित्रं पारंपरिक भारतीय पद्धतीची होती, तर नंतरची चित्रं काही प्रमाणात विदेशी प्रभाव असलेली आहेत. कोणत्याही आर्ट स्कूलमध्ये न जाता त्यांनी केलेली ही कामगिरी चमकदार आहे असंच म्हणावं लागेल.

पेशवाईत, म्हणजे राजा रविवर्मा यांच्या साठेक वर्षं आधीच्या काळात, गंगाराम नवगिरे आणि बखतराम अशी नावं असलेल्यांना, शनिवारवाड्यात पाश्चिमात्य शैलीतलं कलाशिक्षण देणाऱ्या पहिल्या आर्ट स्कूलमध्ये जेम्स वेल्स यांनी शिकवलं खरं; मात्र त्याच्याही आधीपासूनच ते उत्तम कलाकारी करत असल्यानंच त्यांची निवड केली गेली होती हे लक्षात घेतलं पाहिजे.

महत्त्वाचं म्हणजे, वेरुळलेण्यांची चित्रं काढायला वेल्स यांनी गंगाराम यांना सोबत नेलं होतं. यावरून गंगाराम यांच्या कामाचा दर्जा सहज लक्षात येतो. सांगण्याचा मुद्दा असा की, चित्रकारिता भारतात आणि भारतीय कलाकारांना नवीन नव्हती. मात्र, अधिक उत्तम तंत्रकौशल्य ब्रिटिशांच्या माध्यमातून मिळत असल्यानं ते साहजिकच तत्परतेनं आत्मसात केलं गेलं.

यानंतरच्या काळात १८०० च्या दरम्यान जन्मलेले बंडोबा चितारी, १८२० च्या सुमाराला जन्मलेले भिवा सुतार असे दोघंही विलक्षण प्रतिभावान होते हे मान्य करावंच लागेल. एकीकडं कंपनी-शैलीत चित्रं निर्माण होत असूनही त्यांच्याकडं ते फारसे आकर्षित झाले नाहीत, हे विशेष म्हणावं लागेल.भारतात आर्ट स्कूल सुरू झाल्यावर ब्रिटिश ॲकॅडमिक तंत्राचं शिक्षण घेऊन त्याचा वापर भारतातले प्रशिक्षित कलाकार करायला लागले.

कलाकारांच्या या पहिल्या फळीत कोल्हापूरचे चित्रकार आबालाल रहिमान हे होते. पावडर शेडिंगवर आणि रेषेवर कमालीचं प्रभुत्व असलेल्या आबालाल यांना चित्रकलेचं ज्ञान जन्मतःच लाभलं होतं. विशेष म्हणजे, सुरुवातीपासूनच आबालाल वास्तववादी चित्रं काढत असत. नंतर ‘जे. जे.’ मध्ये शिष्यवृत्तीवर त्यांचं शिक्षण झालं. विद्यार्थी असतानाच सर्वोत्तम चित्रणासाठी असलेलं व्हाईसरॉयचं सुवर्णपदक त्यांनी दोनदा मिळवलं. ब्रिटिश तंत्र विलक्षण सफाईनं त्यांनी आत्मसात केलं. छत्रपती शाहूमहाराजांनी नंतर त्यांची नेमणूक ‘दरबारी चित्रकार’ म्हणून करत त्यांचा गौरव केला.

जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेच्या आधी म्हणजे, १८५१ मध्ये, जन्मलेले पेस्तनजी बोमनजी वयाच्या तेराव्या वर्षी ‘जे. जे.’मध्ये शिकू लागले. ग्रिफिथ यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. त्यांच्याच बरोबर अजिंठाचित्रांच्या प्रतिकृती करायची संधी त्यांना मिळाली. व्हिक्टोरिया राणीच्या मर्जीतले चित्रकार प्रिन्सेप यांना मदत करायला पेस्तनजींची निवड झाली. या संधीचं त्यांनी सोनं केलं.

अत्यंत बारीकसारीक तपशील चित्रात दाखवण्याची त्यांची पद्धत होती. याशिवाय, त्यांच्या स्वभावातला हळुवारपणा त्यांच्या चित्रातल्या रंगलेपनातही उतरला होता. सन १८६७ मध्ये जन्मलेले चित्रकार आणि वेदशास्त्रसंपन्न श्री. दा. सातवळेकर यांनीही ‘जे. जे.’मध्ये चित्रकलेचं रीतसर शिक्षण घेतलं. सर्वोत्तम कलानिर्मिती करणाऱ्याला ‘जे.जे.’मध्ये ‘मेयो मेडल’ दिलं जात असे. ते त्यांनी मिळवलं. त्यांची चित्रं आज पंतप्रतिनिधींच्या औंध इथल्या संग्रहालयात पाहायला मिळतात.

सन १८७२ मध्ये जन्मलेले एम. एफ. पिठावाला यांनी ‘जे. जे.’मध्ये कलाशिक्षण घेतलं. ब्रिटिशतंत्र आत्मसात करून १९११ मध्ये लंडनच्या आर्ट गॅलरीत कलाप्रदर्शन भरवणारा पहिला भारतीय चित्रकार म्हणून ते ओळखले गेले. या कलाकारानं पारशी समाजातल्या प्रतिष्ठित मान्यवरांची उत्तम व्यक्तिचित्रणं केली. या सगळ्यांनी आपापल्या परीनं कलादेवतेची पालखी पुढं नेण्याचं काम केलं.

(लेखक हे कलासमीक्षक, दृश्यकला-अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT