Dr Sudhir
सप्तरंग

पक्षीदर्शन : ब्रेकफास्ट विथ ओडीकेएफ

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

तिबोटी खंड्या कुठेही दिसला की आपसूकच कॅमेऱ्याचे ट्रिगर दाबले जाते. या खंड्याच्या छायाचित्रणासाठी खास चिपळूणमध्ये गेलो. तिथे जाताक्षणीच तो फांदीवर येऊन बसला; पण बॅगेतून कॅमेरा काढण्याआधीच तो उडून गेला... तेव्हापासून खंड्याने लावलेला लळा आजही कायम आहे...जूनच्या पहिल्या आठवड्यात समाधानचा फोन आला... ‘सर ओडीकेएफ आलाय,’ हे सांगण्यासाठी. समाधानने या ओडीकेएफचे नाव घेतले आणि या पक्ष्यासाठी कुठे आणि कसा फिरलो, या आठवणीत रमलो.


२०१३ ची गोष्ट असेल. पक्षी छायाचित्रणामध्ये नवखाच होतो. पावसाळ्यात प्रथमच या ‘ओडीकेएफ’चा फोटो सोशल मीडियावर पाहिला आणि अक्षरशः पाहातच राहिलो. लाल, निळा, किरमिजी, पिवळा, पांढरा, गुलाबी, जांभळा असे एकाहून एक सरस रंग परमेश्वराने याच्यावर उधळले होते. त्यानंतरही पुढचे दोन-तीन महिने हा अधून-मधून सोशल मीडियावर येत राहिला अन्‌ पावसाळा संपला तसा तोही गायब झाला, सोशल मीडियावरूनसुद्धा!


त्यानंतर इतर ‘बर्ड फोटोग्राफी’ टूर्स सुरू झाल्या; पण ओडीकेएफची ओढ काही कमी होत नव्हती. ओडीकेएफ म्हणजे ‘ओरिएण्टल ड्वार्फ किंगफिशर.’ मराठीत वामन खंड्या, तिबोटी खंड्या नावाने प्रसिद्ध आहे. भारतात आढळणाऱ्या १२ प्रजातींच्या खंड्या पक्ष्यांपैकी हा सर्वात लहान. तळहातावर मावणारा. १४ सेमी आकाराचा; परंतु सर्वात सुंदर!

पुढच्या पावसाळ्यापर्यंत थोडीफार माहिती घेतल्यावर कळले की, चिपळूण येथील नंदू तांबे यांच्या शेतात हा तिबोटी खंड्या येतो. आपल्यालाही खंड्याचे फोटो शूट करण्याची संधी मिळेल, या आनंदात हरकून जाण्याआधीच पुढील माहितीने चकित केले होते. नंदू यांच्या शेतात येणाऱ्या खंड्याला बघण्याची संधी मिळते; पण त्यासाठी आगाऊ बुकिंग करावी लागते. नाहीतर तारखा मिळत नाहीत. जराही वेळ न दवडता पुढील एक रविवार बुक केला आणि वेळ मिळालेल्या दिवशी रेल्वेने चिपळूण गाठले. त्याला पाहण्याची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली होती.


मुंबईहून इतके लांब आलोय; पण तो दिसेल की नाही याची हुरहूर होती. चिपळूणला पोहोचताच नंदू यांच्या शेतात तयार केलेल्या लापणात गेलो. तिथे जाताच खंड्या फांदीवर बसलेला दिसला आणि बॅगेतून कॅमेरा काढायलाही उसंत न देता तो उडूनही गेला..! क्षणभर काहीच सूचत नव्हते. इथवर येऊन संधी गमावल्याची खंत मन अस्वस्थ करणारी होती. पण काही वेळातच हा पुन्हा समोरच्या फांदीवर येऊन बसला. आधी त्याला कॅमेऱ्यात कैद करून घेतले. त्याचे जाणे-येणे दर अर्ध्या-पाऊण तासाने सुरूच होते. काही क्षण फांदीवर बसून इकडे तिकडे पाहून, मान मजेशीरपणे वर-खाली करून विजेच्या चपळाईने तो बिळात शिरायचा. नंतर कळले हा एकच नसून नर, मादी दोघेही आलटून पालटून येत होते. दोघेही दिसायला सारखेच. अगदी डोळेभरून पाहून घेतले व मनसोक्त छायाचित्रण केले. तिबोटी खंड्याने माझ्यातील तेव्हाच्या नवख्या पक्षी छायाचित्रकाराला एक धडा शिकवला, तो म्हणजे संयम ठेवण्याचा. त्यानंतर या खंड्याला पाहण्याचा छंदच जडला. दरवर्षी पावसाळ्यात याच्या छायाचित्रणाच्या ओढीने चिपळूण गाठू लागलो.


उन्हाळ्याच्या शेवटी किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला नर डोके उंचावून मादीला प्रणयी साद घालतो. मादीने त्याला प्रतिसाद दिला की त्यांची जोडी जमते. नर-मादीचा प्रणय म्हणजे नर मादीकरिता विविध प्रकारचे खाऊचे आमिष आणतो. सरडा, बेडूक, खेकडा इ. त्यानंतर मऊसर ठिसूळ माती असलेल्या शेताच्या पांदीवर किंवा डोंगराळ भिंतीत हे जोडपे आपल्या चोचीची जोरदार धडक देऊन बीळ खणण्यास सुरुवात करतात. दहा दिवसांत बीळ तयार झाले की मादी तीन-सहा अंडी देते. त्यातून १७-१८ दिवसांत पिल्ले बाहेर पडतात. अंड्यातून पिल्ले बाहेर आली की मग मात्र आई-बाबांची धावपळ सुरू होते. पिल्लांचे संगोपन करून २०-२१ दिवसांतच त्यांना स्वावलंबी करून त्यांना स्वतंत्र करायचे असते. मग त्याकरिता सुरुवातीच्या आठ-दहा दिवसांत कोळी, बेडकाची पिल्ले, नाकतोडे असे छोटे खाद्य व नंतरच्या दहा-अकरा दिवसांत सरडा, खेकडा, सापसुरळी, बेडूक असे मोठे खाद्य आणून पिल्लांना भरवायची लगबग सुरू होते.

पावसाळा हा जसा या तिबोटी खंड्याचा सीझन, तसाच आम्हा डॉक्टरांचा कामाचा सीझन. पण रोजच्या धावपळीतही हा मनात घर करून राहतो. एके दिवशी आमचा मित्र मयुरेश खटावकरचा फोन आला. कर्नाळ्यानजीकच्या काल्हे येथे समाधान पवार यांच्याकडे तिबोटी खंड्या दिसतोय, हे सांगणारा. मयुरेश हाडाचा पक्षिनिरीक्षक, कुठे काही विशेष पक्षी दिसले तर आवर्जून सांगणारा. काल्हे तर ठाण्यापासून केवळ दीड तासावर. पुढचे तीन रविवार पहाटे उठून आम्ही समाधान यांच्याकडे जात राहिलो. त्यानंतर मात्र पनवेल-कर्नाळा परिसरात प्रचंड पाऊस पडल्याने जाता आले नाही. कोरोनामुळे गतवर्षीदेखील संधी हुकली. त्यामुळे खंड्यासह समाधानकडचे गरमागरम कांदे-पोहे व चहाचा नाश्ता चुकला होता.

या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात समाधानचा फोन आला... त्याने खंड्या आल्याचे सांगितले आणि या वर्षी आजवर खंड्याला पाहण्यासाठी तीन फेऱ्या झाल्या. माझ्या हार्ड डिस्कमध्ये या खंड्याची किमान आठ-दहा हजार छायाचित्रे असतील; परंतु आजही हा दिसला की बोटाने आपसूकच कॅमेऱ्याचे ट्रिगर दाबले जाते. दिवसभर याच्यासमोर बसून निरीक्षण व छायाचित्र काढत बसलो तरी कंटाळा येत नाही. पहाटे उठून काल्हे गाठून समाधानने तयार केलेल्या लापणात बसून समोरच्या फांदीवर येऊन बसणाऱ्या तिबोटी खंड्याचे छायाचित्रण करता-करताच गरमागरम कांदे-पोह्यांचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच...
sudhir_gaikwad03@yahoo.co.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT