shiv pind esakal
सप्तरंग

सुख-शांती, समृद्धीचा राजमार्ग : शिव उपासना!

सकाळ डिजिटल टीम

नरेंद्र धारणे (लेखक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

भगवान शंकर म्हणजेच खरे निर्गुण, निराकार परब्रह्म होय. अशा या मोक्षकारी महादेवाला प्रसन्न करण्याचा महिना म्हणजे श्रावण. जो कोणी शिवाची उपासना करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. एकूणच या महिन्यात केलेली उपासना ही मानवी जीवनाला सुख-शांती व समृद्धी देण्याचा एक राजमार्ग आहे, अशी ही फलदायी उपासना आहे.


सृष्टीचा निर्माणकर्ता श्री ब्रह्मदेव, पालनकर्ता श्री विष्णुदेव आणि संहारकर्ता श्री महादेव हे आहेत. म्हणूनच मृत्यू किंवा मोक्ष यावर श्री महादेवाचा अंकुश आहे, असे म्हटले जाते. तसेच गतजन्मातील संचित पातकांमुळे आपणास या जन्मात आकस्मिक मृत्यू , गतिमंदत्व, मानसिक व शारीरिक असाध्य आजार, दुःखे, संकटे, हालअपेष्टा किंवा दारिद्र्य भोगावे लागते. या सर्वांपासून मुक्ती देण्याचे कार्य श्री महादेव करतात, अशी सनातन आध्यात्मिक धारणा आहे.

उपासना कशी करतात?
ज्या कोणाला आपल्या जीवनात सुखशांती प्राप्त करावयाची आहे, मग तो कोणत्याही जातीचा असो व धर्माचा असो त्याने ही उपासना करणे आवश्यक आहे. श्री महादेव म्हणजे सर्वांत लवकर व साध्या पूजेनेसुद्धा अतिप्रसन्न होणारे दैवत आहे. म्हणूनच या देवाला भोळा शंकर असेही म्हटले जाते. एवढेच नाही तर आपल्या हातून अगदी अजाणतेपणी जरी शिवपूजा घडली तरी हा भोळा शंकर लगेच प्रसन्न होतो.





ज्याप्रमाणे आपण आपल्या प्रिय व्यक्तीस प्रसन्न करण्यासाठी किंवा खूश करण्यासाठी त्या व्यक्तीला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करतो किंवा त्या व्यक्तीला आवडणाऱ्या वस्तू आपण भेट देतो त्याचप्रमाणे आपण ज्या देवतेची उपासना करतो, त्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करणे किंवा त्या देवतेला त्या गोष्टी अर्पण करणे किंवा भेट देणे म्हणजेच त्या देवतेची उपासना करणे असे होय.

महादेवास प्रसन्न करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात, त्याने ते प्रसन्न होतात. महादेवांना कोणत्या गोष्टी आवडतात हे आपण बघू या.

१) अभिषेक ः महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने भोळा शंकर लवकर प्रसन्न होतात. मग तो अभिषेक तुम्ही साधे पाणी, दूध, दही किंवा उसाचा रस यांपैकी कोणत्याही द्रव्याने केला तरी चालतो.

२) फुले ः महादेवास पांढरी फुले अर्पण केल्यास ते लगेच प्रसन्न होतात. मग आपण पांढरी फुले मुख्यत्वे धोतऱ्याची फुले अर्पण करून महादेवाला प्रसन्न करू शकता.३) वृक्ष ः महादेवास बेलाचा वृक्ष तसेच चंदनाचा वृक्ष सर्वांत प्रिय आहे मग तुम्ही बेलाची पाने किंवा फळे अर्पण करू शकता. तसेच तुम्ही एखादे बेलाच्या झाडाचे किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करून ते जरी वाढविले आणि त्याची पूजा केली तरी त्याचे पुण्य अपार आहे. म्हणून या दिवशी बेलाच्या किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करावे किंवा ही झाडे दान द्यावीत. त्याने भोळे शंकर प्रसन्न होतात.

४) फळे, धान्य किंवा वस्त्र ः कवठ हे फळ महादेवास अतिप्रिय आहे, तसेच बेल फळ किंवा नारळदेखील प्रिय आहे. महादेवास मूठभर तांदूळ अर्पण करावेत किंवा केळीचे फळ महादेवाला अर्पण करावे किंवा अगदीच काही नसेल तर खडीसाखर अर्पण करावी. तसेच शुभ्र वस्त्र महादेवाला प्रिय असल्याने तेदेखील तुम्ही अर्पण करू शकता.

५) स्तोत्रे ः अष्टाध्यायी रुद्रपाठ, शिवस्तुतीचा पाठ वाचावा. याने महादेव लगेच प्रसन्न होतात. तसेच शिवकवच पठण हेदेखील अत्यंत उपयुक्त आहे.

६) उपासना मंत्र ः ।।ओम नम: शिवाय।। हा अतिशय प्रभावी मंत्र
असून, त्याच्या सततच्या जपाने श्री महादेव लगेच प्रसन्न होतात. साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या मंत्राची शक्ती अद्‍भुत आहे. या मंत्रासाठी दीक्षा, होम, संस्कार, मुहूर्त, गुरुमुखाने उपदेश इत्यादी कसलीही आवश्यकता नसते. या मंत्रात सर्व वेद व उपनिषद यांचे सार सामावले आहे.

७) दानधर्म ः सध्या कलियुग सुरू असून, त्यात दान देणे अनन्यसाधारण पुण्यकर्म समजले जाते, म्हणूनच श्री महादेवास ज्या वस्तू प्रिय आहेत त्यांपैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही गोरगरिबांना दान केली तर त्याचेही फळ लाखो पटीने वाढते. यामध्ये तुम्ही दूध, तांदूळ, केळी, खडीसाखर, पांढरे वस्त्र, नारळ, बेलाचे व चंदनाच्या झाडांची रोपे या गोष्टी दान देऊ शकता. त्याने पुण्यसंचय वाढून जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते यात शंकाच नाही.

८) ध्यान आणि शांतता ः शंभू महादेवाला ध्यान व शांतता या दोन गोष्टी अत्यंत प्रिय आहेत. ज्या घरात रोज ध्यानधारणा होते व ज्या घरात कलह नसतो त्या घरावर महादेवाची अपार कृपा असते. म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी अंघोळीनंतर दहा मिनिटे व रात्री झोपताना दहा मिनिटे महादेवाचे ध्यान करावे. या वेळी घरात शांतता ठेवावी व चंदनाचा धूप लावावा, त्याने अपार मानसिक व शारीरिक शक्ती प्राप्त होतात व घरात बरकत होते. दारिद्र्य दूर होते.

९) मनातली इच्छा बोलणे : ज्याप्रमाणे मूल रडल्यावर त्याची आई त्याला दूध पाजते म्हणजेच मुलाच्या इच्छेला आई लगेच प्रतिसाद देते त्याचप्रमाणे आपण महादेवाची उपासना केल्यावर भोळे शंकर नक्कीच प्रसन्न होतात. प्रसन्न झाल्यावर आपण आपल्या मनातील इच्छा या देवतेस बोलून दाखवली तर ती नक्कीच पूर्ण होते असा अनुभव आहे. ही इच्छा आपण आपल्या मनात सतत घोळवावी, त्याने फलप्राप्ती लवकर होते.

खाली दिलेली इच्छा एका कागदावर लिहून काढावी व रोज म्हणावी, त्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशीदेखील आध्यात्मिक धारणा आहे.

‘हे शंकरा, मी तुला शरण आलो आहे. साक्षात तूच माझा आत्मा असून, माझी बुद्धी म्हणजे पार्वती माता होय. माझे प्राण म्हणजे शिवगण आणि देह म्हणजे शिवालय आहे. सारे विषयभोग म्हणजेच तुमची पूजा असून, झोप ही समाधी होय. माझे चालणे म्हणजे तुमची प्रदक्षिणा करणे, बोलणे म्हणजे तुमची स्तुती करणे असून, मी जी जी कर्मे करतो ती सारी तुमची आराधनाच करतो आहे. माझ्या हात, पाय, वाणी, कान, डोळे, मन, देह यापैकी कशानेही जी पातके जाणतेपणी किंवा अजाणतेपणी घडली असतील त्या सर्वांना तू क्षमा कर. कारण तू दयेचा सागर आहेस. हे महादेवा, तुझा जय जयकार असो... ओम नमः शिवाय।’

(लेखक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT