जे म्स बाँडच्या मध्यवर्ती भूमिकेत सीन कॉनरी यांचा ‘डॉ. नो’ हा पहिला बाँडपट होता
- बालाजी विट्टल
जगभरातील सिनेरसिकांना बाँडपटांनी वेड लावले. जेम्स बाँडच्या मध्यवर्ती भूमिकेत सीन कॉनरी यांचा ‘डॉ. नो’ हा पहिला बाँडपट १९६२ मध्ये जगभरातील अनेक देशांत प्रदर्शित झाला. तो भारतात ३ जून १९६३ ला आला आणि बॉलीवूडवर त्याचा प्रभाव कसा पडत गेला, त्याविषयी...
जे म्स बाँडच्या मध्यवर्ती भूमिकेत सीन कॉनरी यांचा ‘डॉ. नो’ हा पहिला बाँडपट होता. १९६२ मध्ये हा चित्रपट जगभरातील अनेक देशांत प्रदर्शित झाला आणि भारतात ३ जून १९६३ ला आला. १९४० आणि ५०च्या दशकात हिंदी सिनेमात रोमँटिक नायक, भावनिक नायक, विनोदी नायक, न-नायक जो बेरोजगारीशी झगडत आहे किंवा कुठेतरी दुखावला गेला आहे किंवा वैचारिक संघर्षरत आहे किंवा या सर्वांचाच अंतर्भाव असणारा होता.
अर्थात समाधी (१९५०), सलाम मेमसाब (१९६१) आणि चायना टाऊन (१९६२) यांसारखे स्पाय थ्रिलरसुद्धा होते. तथापी ‘डॉ. नो’ने हिंदी सिनेमाला हे दाखवून दिले की, एक नायक स्वतःच्या वैयक्तिक अडचणीतून बाहेर पडून मोठमोठ्या समस्या सोडवत आहे.
यासाठी तळहातावर प्राण घेऊन चालत आहे. हजरजबाबीपणा, बुद्धिमत्ता, धैर्य, आकर्षक व्यक्तिमत्त्व, वचनबद्धता असणाऱ्या अशा तरुणांची आपल्याला गरज होती. आणि मग नंतर स्पाय इन गोवा (१९६८), सीआयडी ९०९ (१९६७), फर्ज (१९६७), स्पाय इन रोम (१९६८), पुरस्कार (१९७०), इन्स्पेक्टर (१९७०) अशा चित्रपटांची रांग लागली.
यातील कर्तव्यदक्ष मुख्य पात्र हे सीआयडी, सीबीआय किंवा यांसारख्या इतर भारतीय गुप्तचर यंत्रणांसाठी काम करताना दाखवले गेले. आँखे (१९६८)मधील सुनील आणि मीनाक्षी यात अपवाद होता. कारण यात एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील अशासकीय गट दाखवला गेला होता.
ते कशाविरोधात लढत होते?
बाँडपटातील खलनायक विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनाच्या आधारे फोर्ट नॉक्स लुटणे किंवा चंद्रावर ताबा मिळवण्यासारख्या योजना आखत होते. हिंदी सिनेमांनी शास्त्रज्ञ किंवा प्राध्यपकांना खलनायक म्हणून सादर केले.
त्यांच्या संशोधनातून परकीय देशाला फायदा मिळवून दिला जात असे. म्हणून परकीय खलनायक निर्माण झाला. ‘पुरस्कार’मधील शास्त्रज्ञ अशा गॅजेटचा शोध लावतो ज्याचा वापर करून हजारो मैलांवरील शस्त्रे नष्ट केली जाऊ शकतात. काही दहशतवादी परकीय गुप्तहेरांशी हातमिळवणी करून हे गॅजेट चोरण्याचा प्रयत्न करतात.
‘फर्ज’मध्ये परकीय शक्तींचा वरदहस्त असणारे हेर भारतात घातपात करण्याचे षड्यंत्र आखतात. ‘सीआयडी ९०९’मध्ये ‘अमन आणि शांती’ स्थापित करण्यासाठी एका शास्त्रज्ञाने शोधून काढलेले ‘सूत्र’ परकीय शक्ती चोरण्याचा प्रयत्न करतात.
त्याचप्रमाणे इन्स्पेक्टरमध्ये (१९७०) एक धूर्त प्राध्यापक लोकांना स्तब्ध करण्यासाठी नर्व्ह गॅसची निर्मिती करतो. परकीय शक्ती या प्राध्यापकालाच विकत घेतात, त्यामुळे भारताला धोका निर्माण होतो. ‘आँखे’मध्ये, एक आंतरराष्ट्रीय संघटना आसाममधील रेल्वेपूल उडवण्यासाठी भारतीय दहशतवाद्यांना प्राणघातक शस्त्रे पुरवते. त्यांची जबाबदारी घेण्यासाठी एजंट सुनीलवर दबाव आणला जातो.
बाँडपटातील अवकाश हा विशेषतः शीतयुद्धाचा होता. अर्थात भारतीय संदर्भात याचा काही उपयोग नव्हता. त्यामुळे सुप्रिमो आणि डॉक्टर एक्स यांसारखे मंगोलवंशीय खलनायक फर्ज आणि आँखेमध्ये आणले गेले. ते शेजारील देशाचे असल्याचे दाखवले गेले. सीआयडी ९०९ मध्ये वाँग हा हाँगकाँगहून आल्याचे दाखवले गेले. (अर्थात तो पूर्णतः भारतीय दिसत होता!). यातून असे दाखवायचे होत की हे खलनायक मोठ्या षड्यंत्राचा भाग असणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संघटनांचे भाग होते, कुण्या टोळीचे गुंड नाही!
हिंदी सिनेमाचे पटकथाकार हे जगातील इतर लाखो लोकांप्रमाणेच जेम्स बाँडच्या नावाशी जोडल्या गेलेल्या तीन अंकांनी (००७) फार प्रभावित झालेले होते. सीआयडी ९०९ यातील ९०९ हा अंक त्यांचा स्वतःचाच होता; पण गोल्डन आय सिक्रेट एजंट ०७७ (१९६८) मधील हे आकडे इयान फ्लेमिंगच्या ०७७ वरून घेतलेले होते.
फर्जमध्ये सीआयडी एजंट ११६ आणि इन्स्पेक्टरमध्ये एजंट ७०७ होता. काहींनी अक्षर आणि आकड्यांचा वापर केला. उदा. स्पाय इन रोममध्ये एजंट xx७. त्यानंतरच्या दशकात बाँड आणि त्याच्या नावासमोरचा आकडा अनेक भारतीय भाषांतील सिनेमात वापरला गेला. उदा. जेम्स बाँड ७७७, एसओएस जासूस ००७, बाँड ३०३, मी.बाँड, तसेच लेडी जेम्स बाँड.
१९७० मध्ये जेम्स बाँडची भूमिका सीन कॉनरी यांच्याकडून रॉजर मूर यांच्याकडे आली. बाँडपटाची ही परंपरा हिंदी सिनेमाने अधिक जोमाने पुढे नेली. सुटाबुटाचा व्यवस्थित पेहराव करणे, बंदूक बाळगणे आणि सुंदर तरुणींचा गराडा असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणे, यांसारख्या गोष्टींचा वापर करून त्यांना बाँडसारखे करण्यात आले.
भारतीय सिनेमात मूळ सिनेमातील पात्रे आणि प्रसंग जशास तसे उचलले गेले. ‘एम’ (बाँडचा बॉस) या पात्रासारखेच पात्र इफ्तेकार, डेव्हिड, के. एन. सिंग, हिरालाल आणि इतरांकडून वठवण्यात आले. एजंट विनोद आपल्या बॉसच्या सेक्रेटरीकडे टोपी फेकतो आणि तिच्याशी प्रणयचेष्टा करतो, हे ‘००७’च्या ‘मनीपेनी’शी असणाऱ्या संबंधांशी तंतोतंत साधर्म्य साधणारे आहे.
त्याचप्रमाणे ‘९०९’चे त्याची सेक्रेटरी आणि टायपिस्ट नलिनीशी असलेले संबंध. ‘इन्स्पेक्टर’मधील सुरुवातीचा भाग हा कोणत्याही बाँडपटातून जशास तसा उचललेला होता. आपला हिरो बॉसचा अत्यंत महत्त्वाचा मेसेज येताच अगदी बाँडप्रमाणेच महिलेशी सुरू असलेला प्रणयप्रसंग अर्धवट टाकून निघतो.
स्पाय हू लव्हड मी (१९७७) सिनेमात लोखंडी दातांचा ‘जॉज’ होता. तोच ‘रक्षा’मध्ये ‘गोरिल्ला’ झाला. ज्याची भूमिका ६.८ फूट उंच ऑलिम्पिक आणि आशियाई चॅम्पियन प्रवीण कुमार यांनी केली होती. ‘सीआयडी ९०९’मधील सोफिया ही गोल्डफिंगरमधील ‘पुसी गलोर’चेच रूप.
१९६०च्या दशकात हिंदी सिनेसृष्टी अशा प्रकारच्या जॉनरसाठी नवखी होती. यातील खलनायकांच्या पात्रातील अवघडलेपण आणि सेट्स व गॅजेटवरून हे दिसून येते. संशोधन आणि विज्ञान हे कधीच बॉलीवूडचे शक्तिस्थान नव्हते.
याच्या अनुकरणाने विनोदनिर्मितीच व्हायची. उदाहरणार्थ पुरस्कारमधील एका दृश्यात एका कार्यालयावर सीबीआयचा नामफलक आहे; पण वास्तवात सिनेमा पुरस्कार सीआयडी एजंट असा आहे! कमजोर कथानक, निकृष्ट पटकथा, निकृष्ट निर्मितीमूल्ये यामुळे बाँडच्या भारतीय अनुकरणाची गुणवत्ता यथातथाच राहिली.
जेम्स बाँडची ऐट काही प्रमाणात फक्त रमेश सिप्पी यांच्या ‘शान’मध्ये (१९८०) आली. ज्यात टक्कल असलेला खलनायक ‘शाकाल’ होता. हिरवळीवरून धावत, लोळत ‘मस्त बहारों का मै आशिक’ असे गाणे किंवा निरस कपडे परिधान केलेल्या महिलेसोबत ‘मौसम है गाने का’ म्हणत बागडणे. हे पाहून सीन कॉनरी आणि रॉजर मूर हादरून गेले असतील!
(लेखक प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.