book shakakarte shivray sakal
सप्तरंग

छत्रपती शिवरायांचं प्रेरणादायी जीवनदर्शन

सकाळ वृत्तसेवा

- रोहित वाळिंबे, saptrang@esakal.com

छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तिमत्त्वात महाराष्ट्राची अस्मिता, देदीप्यमान इतिहास आणि उज्ज्वल भविष्याचे बीज सामावले आहे. अशा या लोकोत्तर महापुरुषाच्या चरित्राचे कथन करणं हे शिवधनुष्य उचलण्याइतकं कठीण कार्य आहे. हे कार्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी ‘शककर्ते शिवराय’ या ग्रंथाच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पाडलं आहे.

छत्रपती शिवरायांचं कार्य हे उत्तुंग आणि चिरकाल टिकणारं आहे, त्यामुळंच शिवचरित्राच्या प्रामाणिक आणि चिकित्सक अभ्यासकाला शिवचरित्रातून शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू गवसतात. हे पैलू लोकांसमोर मांडण्याच्या तीव्र ऊर्मीतूनच आजपावेतो अनेक इतिहासकारांनी शिवचरित्राचं लेखन केलं आहे.

विजयराव देशमुखांनाही शिवचरित्रामध्ये अशाच काही अलौकिक आणि वेगळ्या पैलूंचे दर्शन झाल्याचे ‘शककर्ते शिवराय’ वाचल्यावर प्रकर्षाने जाणवते. त्यामुळेच हे शिवचरित्र म्हणजे इतिहास साहित्यात केवळ संख्यात्मक भर न ठरता गुणात्मक भर घालणारे आहे. या ग्रंथाच्या आतापर्यंत निघालेल्या सहा आवृत्त्या आणि सातवे पुनर्मुद्रण, ही वाचकांनीही या शिवचरित्राला पसंती दिल्याची साक्षच आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष झाल्याबद्दल त्यांनी ही शिवआवृत्ती काढली आहे.

इतिहासाचं लेखन करत असताना स्वतःची मतं, विचारसरणी आणि इतिहासातील घटनांबद्दलचे पूर्वग्रह बाजूस ठेवून, अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांना प्रमाण मानणं अत्यावश्‍यक असतं. हे पथ्य देशमुख यांनी ‘शककर्ते शिवराय’ लिहिताना पाळलं असल्याचं ग्रंथातील संदर्भसूचीवरून आणि ठिकठिकाणी दिलेल्या तळटिपांवरून लक्षात येते.

मध्ययुगीन इतिहासाकडं आजच्या समाजरचनेतील नीतिमूल्यांच्या दुर्बिणीतून पाहिल्यास इतिहासातील घटनांचे चुकीचे आकलन आणि त्यातून त्या घटनांचे सदोष लेखन होऊ शकते, ही चूक देखील देशमुख यांनीअजिबात होऊ दिलेली नाही. ही सर्व पथ्यं पाळत असताना लेखनात कोरडेपणा येऊ शकतो, तो कोरडेपणा लेखनात उतरलेला नाही हे या ग्रंथाचं आणखी एक वैशिष्ट्य.

यामागील कारणही लेखकानं, या द्विखंडात्मक शिवचरित्राच्या पहिल्या खंडात सुरुवातीला दुर्गदुर्गेश्‍वर रायगडाला लिहिलेल्या एका हृद्य पत्रात दिलं आहे. त्यात ते म्हणतात, की मला झालेलं शिवरायांचं दर्शन मी या ग्रंथाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळंच लेखकाच्या भाषेत कोरडेपणा नसून जिवंतपणा आणि शिवप्रेमाचा ओलावा आहे.

शिवरायांची जन्मतिथी, आग्रा येथील भेट, राज्याभिषेक यांसारख्या विभिन्न मतं असणाऱ्या घटनांवर देशमुख यांनी अभ्यासपूर्ण आणि ठामपणे विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे शिवचरित्रातील अनेक घटनांबाबत असणाऱ्या संदिग्धता अस्सल पुराव्यांच्या आधारे दूर करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नही त्यांनी केला आहे.

हे करत असताना लेखकाला पूर्वसुरींच्या काही मतांचं खंडन करणे किंवा त्यांच्याशी असहमती दर्शवणे भाग पडलं आहे. मात्र, असे करताना लेखकाच्या शब्दांना अहंकाराचा स्पर्श झालेला नाही. त्याचप्रमाणे, ‘मी केलेले लेखन हेच अंतिम’ असा दुराग्रहही या ग्रंथात अजिबात दिसून येत नाही.

देशमुख हे इतिहास संशोधकाआधीही छत्रपती शिवरायांवर निस्सीम श्रद्धा असलेले शिवभक्त असल्याचं त्यांच्या शब्दाशब्दांतून जाणवतं. त्यामुळं त्या आदरातून या ग्रंथाचं लेखन केलं गेलं आहे. असं असलं तरी शिवरायांच्या कर्तृत्वाला किंवा पराक्रमाला चमत्काराचं स्वरूप देऊन शिवरायांच्या अफाट प्रयत्नांना आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी त्यांनी उपसलेल्या अफाट कष्टाला कमी लेखण्याचा प्रयत्न देशमुख यांनी केलेला नाही.

शिवकालाशी संबंधित अनेक चित्रे, वास्तू, मूर्ती यांची छायाचित्रे या ग्रंथात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. मात्र, ग्रंथाची शब्दशैली पाहता त्याला अनुसरून शिवचरित्रातील काही प्रसंगाचे चित्रण असलेली रेखाचित्रे या ग्रंथात समाविष्ट केल्यास हा ग्रंथ अधिक देखणा होईल.

इतिहासलेखन हे कधी परिपूर्ण आणि अंतिम असू शकत नाही, त्यामुळं हा शिवचरित्र ग्रंथच अंतिम अथवा सर्वार्थाने परिपूर्ण आहे, असे म्हणणे धाडसाचे होईल आणि देशमुख यांनी संपूर्ण ग्रंथामध्ये असा दावा कुठेही केलेला नाही. मात्र उपलब्ध साधनांच्या आधाराने आतापर्यंत लिहिण्यात आलेल्या शिवचरित्रांमध्ये शिवरायांच्या जीवनाचे यथार्थ दर्शन घडविणारा ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे स्थान असेल यात शंका नाही.

पुस्तकाचं नाव :

शककर्ते शिवराय - खंड १ आणि खंड २

लेखक : विजयराव देशमुख

प्रकाशन : छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर - पुणे

( संपर्क : ९९२१२३७९९९, ९८२०९५०९३२ )

पृष्ठं : १२५० (दोन्ही खंड मिळून)

मूल्य : ५०० (शिवआवृत्ती)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT