पितळ sakal
सप्तरंग

पितळ-उद्योगाचं माहेर !

पितळी भांडी तयार करण्यासाठी प्रसिद्ध अशा भंडारा शहराला पितळी भांड्यांचं माहेर म्हणावं

दीपक फुलबांधे - सकाळ वृत्तसेवा

पितळी भांडी तयार करण्यासाठी प्रसिद्ध अशा भंडारा शहराला पितळी भांड्यांचं माहेर म्हणावं लागेल. इथे पितळ, कांसे, तांब्यापासून तयार करण्यात येणाऱ्या भांड्यांचा इतिहास फार जुना आहे. भटक्या अवस्थेनंतर नद्यांच्या काठांवर मानवी जीवन स्थिरावलं. त्यानंतर अनेक संसाधनांची गरजेनुसार निर्मिती सुरू झाली. भौगोलिक परिस्थिती व सामाजिक प्रघात, परंपरा यानुसार मानवाने अनेक वस्तूंचा शोध सुरू केला.

मानवाने मातीच्या भांड्यांचा वापर सुरू केल्यानंतरच त्यापेक्षा टिकावू आणि मजबूत धातूची भांडी तयार केली. यात वेगवेगळ्या भागांतून आलेल्या लोकांचं कौशल्य आणि परंपरांमधून अधिक चांगल्या प्रकारे धातूपासून विविध प्रकारची भांडी तयार केली असावीत असं समजलं जातं.

भंडारा हा भाग पूर्वी वाकाटक साम्राज्याचा भाग होता. भंडारा शहराच्या जवळचं गावं नंदीवर्धन (नगरधन) इथं वाकाटक राजा रुद्रसेन (इ.स. ४०० ते ४५०) द्वितीय याचा विवाह मगधचा सम्राट चंद्रगुप्त द्वितीय याची मुलगी प्रभावती गुप्त हिच्यासोबत झाला. तेव्हापासून या भागात उत्तर-पूर्व भारतातील लोकांसोबतचा संपर्क वाढला. रुद्रसेनच्या अकाली मृत्यूनंतर मुलं लहान असल्यामुळे राणी प्रभावती यांनीच राज्यकारभार सांभाळला. तिच्या मदतीसाठी गुप्त राजांनी पंडित कालिदास यांना पाठवलं होतं. या काळापासून पूर्व विदर्भाचा संपर्क पाटलीपुत्र राजधानीसोबत आल्यामुळे धातूपासून शस्त्रं व भांडी तयार करण्याच्या उद्योगाचा अधिक विकास होत गेला. त्यानंतरच्या काळात रजनपूर (बिलासपूर, छत्तीसगड) येथील रतनदेव राजाने या भागावर स्वारी केली, तेव्हा पितळी भांड्यांपेक्षा श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या कांस्य धातूपासून भांडी तयार करण्याची पद्धत सुरू झाली. याचप्रकारे इतर प्रांतांतील लोकांकडून होणाऱ्या मागणीनुसार पितळ, कांसे, तांबे आणि भरत (मिश्रधातू)ची भांडी भंडारा इथं तयार केली जात होती.

पितळी प्लेटला ठोकून ठोकून भांड्यांचा आकार दिला जातो, त्या भांड्यांना पिटीव भांडी म्हणून ओळखलं जातं. नागपूरकर भोसलेंच्या काळात भंडारा इथं तयार होणारी पिटीव भांडी बैलगाडीने विक्रीसाठी माहूर, बालाघाट, देवगड (मध्य प्रदेश), रायपूर, भद्रावती, कौंडिण्यपूर, मार्कंडा आदी महत्त्वाच्या व यात्रेच्या ठिकाणी पाठवली जात होती. त्या वेळी येथील महात्मा फुले वॉर्ड, संताजी वॉर्डात घरोघरी धातुकामाचे लहान स्वरूपातील कारखाने होते.

शहरातील व परिसरातील ग्रामीण कामगार त्यात काम करत होते. इंग्रजाच्या काळात या कामाबाबत भंडारा गॅझेटियरमधील नोंदीनुसार, ‘पूर्वी उत्तरेकडून आलेले कासार आणि दक्षिणेकडून आलेले पांचाळ इथं पितळी भांडी तयार करत. त्यासाठी मुंबईवरून पितळी प्लेट मागवली जात असे, किंवा जुनी मोडीची भांडी (अर्ध्या किमतीत घेतलेली) वितळवून नवीन भांडी तयार करतात. यात गुंड, कप, प्लेट, घंगाळ आदी भांडी इथं बनविली जातात. तसंच, कांसे व भरत या धातूपासूनही भांडी तयार केली जात होती. त्यावेळी लग्नसमारंभ व इतर सामाजिक कार्यक्रमांत धातूची भांडी भेट देण्याची प्रथा रूढ झाली होती.’ मोठ्या घरातील लोक कांस्याचं ताट व वाट्यांचा वापर करत होते. समाजातील सर्वसाधारण लोक नेहमीसाठी पत्रावळींचाच वापर करत होते. मात्र, पितळी धातूची भांडी ही चांगली गुंतवणूक समजली जात असल्याने मुलीच्या लग्नात पितळ, तांबे व कांस्य धातूची पाच तरी भांडी देण्याचा प्रघात रूढ झाला होता. त्यामुळे बाजारातील किमती वाढल्या तरी ही भांडी विकली जातील, अशी आशा येथील कारखानदारांमध्ये होती.

सुमारे ५० ते ५५ वर्षांपूर्वी श्रीमंत उद्योजकांनी इथं पितळेच्या प्लेट तयार करण्यासाठी यंत्रांवर आधारित कारखाने सुरू केले. यामध्ये उत्पादनाचा वेग वाढल्याने भंडाऱ्याच्या पितळी भांड्यांची झळाळी संपूर्ण मध्य भारतात पसरली होती. मोटारी व रेल्वेद्वारे मालवाहतूक होत असल्याने दररोज परराज्यांतील व्यापारी इथं माल खरेदीसाठी येत होते. शहरातील गांधी चौकापासून मोठ्या बाजारापर्यंत गल्लीबोळांत पितळी भांड्यांची दुकानं होती. ३० ते ३५ वर्षांपूर्वी शहरात लहान-मोठे सुमारे २० ते २५ कारखाने होते. पावसाळ्याचे तीन महिने सोडले तर वर्षभर पितळी भांड्यांची निर्मिती होत होती. त्या वेळी उच्चशिक्षित असलेले उद्योजक रंगनाथजी धूत, रामविलास सारडा, श्‍यामसुंदर सारडा, सुरेंद्र चड्डा, राधाकिसन काबरा आणि मराठी उद्योजक केशवराव निर्वाण हे येथील पितळ उद्योगाचा आधार होते. त्या वेळी पंजाब, रेवाडी, हरियाना येथून कुशल कामगारांना बोलावलं जात होतं. त्यांना दैनंदिन मजुरीसोबत उद्योजकाकडून राहण्याची व्यवस्था केली जात होती.

कालांतराने दैनंदिन वापरात असलेल्या पितळ धातूच्या सतत वाढत गेलेल्या किमती आणि उपलब्ध झालेले पर्याय यामुळे पितळी भांड्यांची मागणी कमी होत गेली. त्याऐवजी ॲल्युमिनिअम, स्टीलच्या भांड्यांची मागणी वाढत गेली. १९९० च्या दशकात आलेल्या प्लास्टिकने सर्वच क्षेत्रांत जारदार मुसंडी मारल्याने अन्य धातूंसह पितळ, तांबे आदींच्या भांड्यांची विक्री कमी झाली. त्यासोबतच कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वाढलेली मजुरी आणि कुशल कामगारांचा अभाव यामुळे पितळनिर्मितीवर बंधनं आलीत.

कधीकाळी मोठेपणाचं प्रतीक असलेले कांसं खरेदी करणं सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर गेलं. साधा गुंड खरेदी करण्यासाठी दीड ते दोन हजार रुपये लागतात, त्यापेक्षा प्लास्टिकची बकेट स्वस्त व वापरास हलकी पडते. याच कारणामुळे पितळी भांड्यांचा बाजार अन्य धातूंसह प्लास्टिकनं मोठ्या प्रमाणात काबीज केला आहे. आता वर्षभरातून फक्त पाच ते सहा महिनेच कारखाने सुरू असतात. पितळी कारखान्यात काम करताना अधिक परिश्रम करावे लागतात. त्या तुलनेत मजुरीचं प्रमाण शेतातील कामासोबतच असतं. तसंच, कामगारांसाठी शासनाकडून अधिक सोयी-सुविधा दिल्या जात असल्याने कारखान्यात काम करण्यास मजुर मिळेनासे झाले आहेत. तसंच, परप्रांतातून येणारे कुशल कामगारही अधिक मोबदल्याची मागणी करत आहेत. या उत्पादनावर स्टीलपेक्षा अधिक जीएसटी आकारला जातो. वाढत्या उत्पादन खर्चामुळे उद्योजकांची ओढाताण होत आहे, त्यातही बाजारात मागणी नसल्याने अडचणींत वाढ होत आहे.

कोरोनाचा फटका

गेल्या दोन वर्षांतील कोरोनाकाळापासून पितळ व अन्य धातूंची विक्री ५० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. लोकांजवळ खरेदीसाठी पैसे नाहीत. शिवाय, सर्वच उद्योग बंद झाल्याने अनेकांचा रोजगार गेला. अशावेळी पितळेसारख्या महागड्या धातूच्या खरेदीचाही कोणी विचार करू शकत नाही. याशिवाय वाढलेले विजेचे दर, जळाऊ लाकडांच्या किमती या सगळ्यांचा परिणाम पितळ उद्योगावर झाला आहे. बाजारात मागणी कमी होत असताना पितळनिर्मितीतही अनेक समस्या निर्माण झाल्यात, त्यामुळे दरवर्षी येथील एक कारखाना बंद होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पितळ उद्योग हळूहळू बंद होत जाणार, अशी चिंता दामोदर सारडा यांनी व्यक्त केली आहे.

युवकांनी शोधल्या नव्या वाटा

येथील कवकुमार सिंग या उद्योजकाने ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी इथं मागणी असलेली प्रसादाची प्लेट तयार करून पुरवठा करणं सुरू केलं आहे. सुरेंद्रकुमार आनंद आणि भावंडांनी लेथ मशिनचा वापर करून गुंड तयार करण्याचं कसब प्राप्त केलं आहे. एका कारखान्यात गॅस सिलिंडरचे व्हॉल्व्ह तयार केले जात आहेत. याप्रमाणे तांत्रिक माहितीच्या आधारे नवनवीन उत्पादनं तयार करण्यावर युवा उद्योजकांचा भर आहे. त्यातून मंदिरांच्या कळसांपासून बैलांच्या गळ्यातील घंटांपर्यंतचे प्रयोग दररोज सुरू आहेत. मात्र, सध्या तरी घरगुती वापरातून पितळ व तांब्याची भांडी हद्दपार झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT