व्यापार sakal
सप्तरंग

ब्रिटिशांच्या लुटीचा धडा

भारताशी व्यापार सुरू करण्याच्या आधी पोर्तुगीज, ब्रिटिश यांनी प्रचंड साहस

प्रतापराव पवार

भारताशी व्यापार सुरू करण्याच्या आधी पोर्तुगीज, ब्रिटिश यांनी प्रचंड साहस, धैर्य, चिकाटी यांतून शोध घेतला. व्यापार सुरू करण्यासाठी परवानग्या मिळवण्यातसुद्धा त्यांना अनेक गोष्टींचा अवलंब करावा लागला. त्यात लाचलुचपत हा एक भाग होताच. आपल्या व्यापाराचा माल ठेवण्यासाठी ज्या वखारी त्यांनी स्थापन केल्या, त्या मालाचं संरक्षण करण्यासाठी त्यांना सैन्य बाळगण्याची आवश्यकता वाटली आणि ती त्यांच्या सरकारनं त्यांना दिली.

व्यापार करताना धूर्तपणे अनेक गोष्टींचा ते अभ्यासही करत होते. हळूहळू इथल्या अंतर्गत भांडणांमध्ये त्यांनी - शस्त्रपुरवठा करणं, तोफा पुरवणं वगैरे गोष्टींद्वारे - शिरकाव करण्यास सुरुवात केली. अर्थात्, हे त्यांच्या व्यापाराला धक्का लागणार नाही अशा बेतानं जेवढं करणं शक्य होतं तेवढं ते निश्चितपणे करत होते. या सगळ्या गोष्टींमध्ये ब्रिटिशांनी जगभर आघाडी घेतली. शस्त्रास्त्रांचं आधुनिकीकरण (बंदुका, तोफा), अत्यंत हुशार व्यापारीवृत्ती, धूर्तपणा, व्यवस्थापन आणि देशभक्ती यांतून त्यांनी प्रगतीला सुरुवात केली. रॉबर्ट क्लाईव्ह यानं बंगाल प्रदेशाचा सहजपणे ताबा घेतला. यात त्यांना दोन गोष्टी मिळाल्या. एक तर सर्व करांचं उत्पन्न त्यांच्याकडे यायला लागलं; शिवाय, व्यापारातील फायदा होताच.

याच जमलेल्या कररूपी पैशातून त्यांना स्थानिक लोकांकडून अन्न-धान्य, मसाले वगैरे गोष्टी फुकटात मिळायला सुरुवात झाली. कारण, पैसेही तुमचेच आणि मालही तुमचाच. ब्रिटिशांना खर्च शून्य. पैसे फेकल्यावर हिंदी माणूस इमाने-इतबारे सैन्यात सहभागी होतो आणि मरायलाही तयार होतो हेही त्यांच्या ध्यानात आलं. त्यांना ही ‘दुभती गाय’ मिळाल्यामुळे व्यापार आणि लष्करी बळ वाढवणं शक्य होऊ लागलं.

यातून भारतातील राजे, संस्थानिक यांचे हेवे-दावे, त्यांचा अंतर्गत कलह यांत ब्रिटिशांनी सक्रिय लक्ष घालायला सुरुवात केली. मग ते मराठे विरुद्ध टिपू सुलतान युद्ध असो किंवा अन्यत्र अंतर्गत कलहातून आपसात लढणारे शासक असोत. आपण जर ‘कलकत्ता (कोलकता) रीजन’प्रमाणे राज्य वाढवलं तर आपला अत्यंत फायदा होऊ शकतो, हे इथं त्यांच्या लक्षात आलं. त्याला अत्यंत पोषक वातावरण, मोगल साम्राज्याचा ऱ्हास, मराठ्यांमधील अंतर्गत कलह यांतून त्यांना संधी चालून येत गेल्या. त्यातून आपला राज्यकारभार संपूर्ण भारतभर पसरवण्यात ते यशस्वी झाले. एकेक भाग ते पादाक्रान्त करत जाऊ लागले. जणू काही त्यांना भारताच्या रूपानं घबाडच सापडलं. याचा त्यांनी पुरेपूर उपयोग दुसऱ्या महायुद्धापर्यंत केला. कररूपातील पैसे आपले, नोकरीत ठेवलेलं सैन्य आणि नोकरशाही आपली...असं सगळं भारताचंच; पण राज्यकारभार मात्र ब्रिटिशांचा. त्यांच्या हुकमाचं निष्ठेनं पालन करणारी आपलीच मंडळी होती.

मग ते पहिल्या-दुसऱ्या महायुद्धात परदेशात लढणं असो किंवा जालियनवाला बागेत जनरल डायरच्या अधिकारात नि:शस्त्र लोकांना गोळ्या घातल्या जाणं असो... आपली मंडळी हे सगळं ‘निष्ठे’नं पार पाडत होती. या सगळ्याचा खर्च आपल्या पैशातून होत होता. संस्थानिक मुजरा करण्यात धन्यता मानत होते. व्यापाराच्या लुटीतून सामान्य जनता ही गरीब होत गेली. आमच्यातल्या कर्मकांडांमध्ये किंवा एकमेकांच्या जातिद्वेषामध्ये कुठंही ‘कमतरता’ नव्हती. ती वाढवण्यात आणि धर्माधर्मात फूट पाडण्यात (हिंदू-मुसलमान) ब्रिटिश शंभर टक्के यशस्वी झाले. इतका सुपीक प्रदेश जगात त्यांना कुठंही सापडला नसावा. चर्चिलसारख्या निष्ठूर पंतप्रधानानं बंगाल प्रांतातील सर्व धान्य इंग्लंडला नेलं आणि बंगालची जनता भुकेनं तडफडून मेली, त्याचंही कुणाला काही वाटलं नाही. आम्ही आमच्या समाजाच्या पुढं, आमच्या भागाच्या पुढं पाहायला तयार नव्हतो. आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय राजकारण याचा आम्हाला गंधही नव्हता. ब्रिटिशांपासून भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळताच पाकिस्ताननं काश्मीरवर हल्ला करून दोन तृतीयांश काश्मीर काबीज केला, त्यातला काही भाग आपण मिळवला ही गोष्ट वेगळी.

ब्रिटिश साम्राज्याचा पराभव करून दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर हिटलरसारख्या युद्धपिपासू लोकांना भारतासारख्या ‘दुभत्या गाई’ हव्या होत्या. आपल्या सुदैवानं आपल्याकडे झालेली जागृती आणि महायुद्धांमुळे युरोपीय लोकांचा मोडलेला आर्थिक कणा हा आपल्या नशिबानं धावून आला. माझ्या मते, हिटलरसारख्या माणसानं भारताचा ताबा घेतला असता तर पुढची शंभर वर्षंही आपल्याला पारतंत्र्यातच राहावं लागलं असतं.

ब्रिटिशांनी आपलं लक्ष्य भारतापुरतंच मर्यादित न ठेवता अमेरिका (भारताच्या साडेतीन पट भूप्रदेश), कॅनडा (भारताच्या साडेसात पट भूप्रदेश), ऑस्ट्रेलिया (भारताच्या साडेतीन पट भूप्रदेश), न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका असे अनेक देश, खंड त्यांनी जिंकले. यशस्वीपणे तिथं राज्ये स्थापली. सत्तर लाख ब्रिटिश लोकसंख्या असलेलं इंग्लंड. त्यांनी शंभरेक वर्षांत राज्य करण्यासाठी एक कोटी चाळीस लाख लोक जगभर पाठवले. भारतासारख्या अवाढव्य देशावर केवळ एक लाख ब्रिटिश राज्य करत होते;

तेही आमच्याच पैशावर, आमच्याच लोकांच्या मदतीनं. त्यांनी केलेली लूट ही अन्नधान्य, खनिजं यांतून तर केलीच; पण इथले उद्योगधंदे संपवले, शिक्षणप्रणाली संपवली आणि इथं भारतात पिकवलेल्या कापसापासून तयार केलेलं कापड पुन्हा इथं आणून आपल्या देशातच विकलं. अशी अनेक वेगवेगळी उदाहरणं सांगता येतील. या सर्व बाबतींत युरोपीय देश हे अत्यंत निष्ठूर होते. अमेरिकेतले आफ्रिकी गुलाम हे त्याचंच एक उहाहरण होय. त्यामुळे हे लोक जेव्हा मानवतेबद्दल बोलतात तेव्हा ते किती हास्यास्पद आहे हे आपल्या ध्यानात येतं. आजही अमेरिकेनं चार देशांची (इराक, लीबिया, सीरिया, व्हिएतनाम इत्यादी) पूर्णपणे राखरांगोळी केली आहे. अनेक देशांमध्ये त्यांच्या गुप्तपणे कारवाया सुरूच आहेत, हे ऐतिहासिक सत्य आहे (उदाहरणार्थ : युक्रेन).

इंग्लंडमधील एक जवळचे इंग्लिश मित्र सहज बोलून गेले : ‘तुमच्या देशात पैसा फेकला की काहीही खरीदता येतं. अगदी तुमचं जीवनसुद्धा.’ याचमुळे आपलं भारतीय सैन्य, भारतीय पोलीस, भारतीय नोकरशाही ब्रिटिशांसाठी ‘निष्ठे’नं काम करत होती; भारताच्या हिताशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. कारण, पैसा फेकणारा ब्रिटिश होता. त्या इंग्लिश मित्राचं हे विश्लेषण मनाला अतिशय बोचणारं होतं; पण ते वस्तुनिष्ठही होतं. आजही आपण खोकेशाहीबद्दल ऐकतो.

आपण बदललोत कुठं...? आपण इतिहासातून शिकलोत काय...? हे विचार मनात येतात. तरीसुद्धा भारत जगातील प्रमुख राष्ट्रांमध्ये गणला जात आहे...प्रगती करत आहे...कारण, भारतातही अनेक लोक, अनेक संस्था यासाठी कायम प्रयत्नशील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT