Briton Musician sakal
सप्तरंग

बदलत्या सुरांच्या देशा!

ब्रिटनमध्ये बनवलं जाणारं संगीत मनोरंजन क्षेत्रातील मोठा पैलू आहे. ब्रिटनमधील विविध शहरांमधून आलेल्या लहान-मोठ्या संगीतकारांनी बाजी मारली.

अवतरण टीम

- वैभव वाळुंज

ब्रिटनमध्ये बनवलं जाणारं संगीत मनोरंजन क्षेत्रातील मोठा पैलू आहे. ब्रिटनमधील विविध शहरांमधून आलेल्या लहान-मोठ्या संगीतकारांनी बाजी मारली आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात जगभरातील श्रोतृवर्गावर अधिराज्य गाजवलं...

जागतिक पातळीवर ब्रिटनची ओळख वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक कारणांसाठी आहे. तरीही युद्धोत्तर काळानंतर बदललेल्या जगाच्या नकाशात करमणूक आणि मनोरंजन क्षेत्राला आलेल्या अपार महत्त्वानंतर अशा ओळखीचा एक सर्वात मोठा पैलू होता तो म्हणजे, ब्रिटनमध्ये बनवलं जाणारं संगीत.

देशप्रेम किंवा धर्मापेक्षा तुम्ही कोणतं संगीत ऐकता आणि कोणत्या फुटबॉल टीमला पाठिंबा देता या गोष्टींना महत्त्व येण्याचा जो काळ होता, त्यात ब्रिटनमधील वेगवेगळ्या शहरांमधून आलेल्या लहान-मोठ्या संगीतकारांनी बाजी मारली आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात जगभरातील श्रोतृवर्गावर अधिराज्य गाजवलं. या बदललेल्या जगाचे पैलू तातडीने हेरण्यात आणि जगभरातील समकालीन तरुणाईला आपली व्यथा सांगणारं वाटेल असं संगीत बनवण्यात येथील वेगवेगळ्या संगीत गटांनी हातखंडा मिळवला.

जगभर पसरलेल्या संगीतावरील प्रभावाचं सर्वात प्रबळ उदाहरण म्हणजे, अर्थातच बीटल्स या संगीत गटाच्या वेगवेगळ्या गाण्यांनी पृथ्वीतलावरील प्रत्येक देशात मिळवलेली प्रचंड कीर्ती म्हणता येईल. इंग्लंडमधील एका शहरामधून काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्या चार-एक पोरवजा मुलांच्या गटाने आपल्या लेखणीच्या आणि सुरांच्या माध्यमातून ६० व ७० च्या बदलत्या जगाची नस बरोबर पकडली.

बरमिंगहमसारख्या ‘जिथे करायला जास्त काहीच नाही’ अशा शहरांमधून वैतागून आलेल्या तरुणांनी सुरू केलेल्या ब्लॅक सॅबथ या बँडने रॉकच्या जगामधील मेटल या प्रकारात गाजवलेल्या प्रभावाची तुलना आता फक्त मेटालिकाशीच करता येईल. ‘द रोलिंग स्टोन’ या बँडने पन्नाशी व साठीच्या काळात जगभरात बीटल्सच्या बरोबरीने ब्रिटनच्या काही शहरांपुरता मर्यादित असणारा पॉप म्युझिक हा नवा प्रकार जगाच्या प्रत्येक संस्कृतीत रोवून टाकला.

ज्याचे पडघम आजही प्रत्येक दुसऱ्या गाण्यात आपल्या कानी पडत असतात. पॉपच्या बरोबरीनेच बीट, ब्लूज, मेटल, रॉक ॲण्ड रोल, सायकेडेलिक असे विविध संगीतांचे प्रकार हाताळण्यामध्ये ब्रिटनने हातखंडा मिळवला व त्यांपैकी अनेक संगीत प्रकारांची तर निर्मितीच या देशामध्ये झाली.

विविध देशांमधून ब्रिटनमध्ये गेलेल्या नवनव्या सुरांनी ही आपली जादू पेरायला सुरुवात केली आणि रेगेसारखे भारतीय, जमैकन असे वेगवेगळे संगीतप्रकार प्रसिद्ध झाले. भारतात वाढलेल्या फ्रेडी मर्क्युरी याने चालवलेला क्वीन बँड हा काळाच्या ओघात अधिकाधिक प्रसिद्ध झाला.

शीतयुद्धाच्या काळात जगाच्या पातळीवर घडणाऱ्या राजकारणाचा एकूण तरुणाईवर असणारा मानसिक दबाव आणि राजकीय सामाजिक क्षेत्रात होणाऱ्या उलथापालथी यांच्या बरोबरीने जगभरात पसरलेल्या युद्धांच्या विरोधात उभं राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंडखोर जगाचे आवाज त्यांच्या संगीतातून घुमू लागले.

जगभरात ही ओळख वेगवेगळ्या बँडमुळे झालेली असली, तरी स्थानिक पातळीवर ब्रिटनमध्ये संगीत बनवणे हा जवळपास प्रत्येक तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनीचा छंद बनला होता. कॉलेजात वेगवेगळे बँड ग्रुप असणे ही चैनीऐवजी एक सामान्य बाब समजली जाऊ लागली होती; कारण आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी संगीताचे नवनवे प्रकार शोधून त्याच्या माध्यमातून आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत काहीतरी नवं बनवण्याचा प्रयत्न करणे, हा ब्रिटिश युवा वर्गाचा ‘लसावि’ झाला होता.

म्हणून अनेक क्षेत्रांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या विविध लोकांनीही आपापले बँड बनवले आणि थिरकायला सुरुवात केली. म्हणूनच ६० च्या दशकामध्ये जगभरात पसरलेल्या संगीतातील या प्रभावाची मांडणी करण्यासाठी त्याला ब्रिटिश आक्रमण असंच नाव देण्यात आलं होतं; कारण पृथ्वीतलावरील बहुतांश तरुणांच्या कानांमध्ये कुठल्यातरी एका ब्रिटिश संगीतकाराने आपली जादू पेरली होती.

९० च्या दशकातही हा परिणाम कायम राहिला आणि यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी सुरू केलेल्या वेगवेगळ्या बँड्सची चलती आली. स्पाइस गर्ल्स या चौकडीने विविध गाण्यांमधून स्त्रीच्या बदलत्या जगाचे कंगोरे सुरात्मक पद्धतीने रचायला सुरुवात केली आणि त्याच्या प्रभावातून अगदी रोजच्या बोलण्यातही अनेक गोष्टी अनायासे स्त्रीवर्गाच्या तोंडी आल्या.

एमी व्हाईटहाऊस, योनो, डफी अशा अनेक महिला संगीतकारांनी आपल्या संगीतातून जागतिक पातळीवर आपल्या आवाजातून स्वातंत्र्याची नवी द्वाही उठवली. अगदी अलीकडच्या काळातही नव्याने ‘एड शिरॅन’ आणि ‘वन डायरेक्शन’ अशा प्रसिद्ध जोड्यांनी व कलाकारांनी पुन्हा ही ख्याती ब्रिटनमध्ये खेचून आणली आहे. म्हणूनच जोवर पृथ्वीतलावर संगीत राहील, तोवर ब्रिटिश सुरांचा चंद्र त्यावर मावळणार नाही, असे म्हणतात त्यात अतिशयोक्ती नाही.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्ती अंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT