- अपूर्वा जोशी apurvapj@gmail.com, मयूर जोशी joshimayur@gmail.com
विजय नुकताच दुपारचं जेवण करून बसलेला, त्याच्या डोक्यात आता व्यवसाय वाढीचे विचार घोळत होते, त्यासाठी त्याला थोड्या भांडवलाची गरज होती पण त्याच्याकडं तारण ठेवायला काही नसल्यानं एखाद्या गुंतवणूकदाराला गाठावं का? असा त्याचा विचार चालला होता, तेवढ्यात त्याचा मोबाइल फोन वाजला, समोरून गोड आवाजात एक मुलगी बोलत होती, ‘सर, तुम्हाला ५० लाखांचं कर्ज आमच्या बँकेनं मंजूर केलं आहे, तेसुद्धा विनातारण आणि केवळ आठ टक्के व्याज दरानं.’
एरवी असे फोन आले तर विजय थेट बंद करायचा पण आता त्याला या कर्जाची गरज होती, त्यानं त्या मुलीनं सांगितल्यानुसार त्याचं पॅन, आधार आणि बँकेचे स्टेटमेंट्स त्या व्हाॅट्सअप नंबर वर पाठवले. बरेच दिवस झाले तरीसुद्धा कर्जाची रक्कम त्याच्या खात्यात आली नाही, कदाचित कर्ज मंजूर झालं नसावं, इतर ठिकाणी देखील त्याचे प्रयत्न चालूच होते.
३१ जुलै जवळ आलेली म्हणून आयकर विवरणपत्र भरण्यासाठी तो त्याच्या ‘सीए’कडं गेला. जेव्हा सीएनं त्याला त्याच्या व्यवहारांबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा तो चक्कर येऊन पडायचाच बाकी होता.
त्याच्या नावावर पाच कोटी रुपयांच्या मालमत्तेची विक्री झाली होती आणि ती देखील कोलकात्यात. त्यावर विजयनं कर भरला नव्हता, विजयच्या 'एआयएस' मध्ये ती माहिती दिसत होती. 'एआयएस' म्हणजे ‘ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट’ हे एक आयकर खात्यानं बनवलेलं नवीन साधन आहे.
आयकर खात्याकडं विविध स्रोतांमधून माहिती जमा होत असते. बँक, क्रेडिट कार्ड कंपन्या, शेअर बाजार किंवा मालमत्तेचे व्यवहार नोंदवणारे रजिस्ट्रार आदी संस्था तुमचा पॅन क्रमांक नोंदवून घेऊन अनेक व्यवहारांची माहिती आयकर खात्याला देत असतात, याच माहितीचे वर्गीकरण करून ‘एआयएस’ मध्ये तुमच्या पॅन क्रमांकासमोर ही माहिती मांडली जात असते.
पॅन क्रमांक हा आपल्या देशात एक खूप महत्त्वाचं आर्थिक साधन आहे. जवळपास सत्तर कोटी लोकांना हा क्रमांक देण्यात आला आहे. पॅन चा दहा आकडी क्रमांक तुमची आर्थिक व्यवहारात ओळख म्हणून ग्राह्य धरला जातो, पॅन क्रमांक इतर कोणाच्या हाती जाणं म्हणजे तुमची ओळख वापरायचा अधिकार इतर कोणाच्या हातात जाणं होय.
‘आयडेंटिटी थेफ्ट’ हा पॅनच्या माहितीच्या दुरुपयोग करून केलेला केवळ एक प्रकार आहे. पॅनचा दुरुपयोग करण्याचे प्रकार भारतात सर्रास घडत असतात. प्रत्यक्षात भाडेकरू नसलेल्या नोकरदार मंडळींनी केवळ आपल्याला कर भरावा लागू नये म्हणून कपोलकल्पित पॅन क्रमांकाचा वापर करून घरभाडे भत्त्याची सवलत बेकायदेशीरपणे लाटल्याची असंख्य प्रकरणं आयकर खात्याला नियमितपणे आढळून येत असतात. प्रत्यक्षात ज्याचा पॅन घरमालकाचा म्हणून दिलेला असतो त्याला कल्पना देखील नसते, की आपले कोणते घर आहे आणि ते आपण कधी भाड्यानं कुणाला दिलेलं आहे.
अनेकदा तर निधन पावलेल्या माणसाच्या पॅनचा उपयोग करून बँकेत खाते उघडण्याचे प्रकार घडतात तर कधी पॅन कार्डवरचा फोटो बदलून मूळ नावानेच बँकेत खाते उघडले जातं.
एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा विद्यार्थ्यांच्या नावानं त्याला माहीत नसताना कुणामार्फत तरी बँकेत खातं उघडलं जातं, त्यावर हॅकिंगद्वारे किंवा इतर घोटाळ्यांद्वारे येणारी रक्कम जमा केली जाते आणि आयकर खात्याला त्या व्यवहारांची माहिती बँकेतर्फे मिळत राहते, आयकर खातं त्या करदात्यापर्यंत पोचायचं प्रयत्न करत राहते, त्याला दंड कर, व्याज लाव, पत्र लिही असे अनेक प्रयत्न करत असते, पण ज्यानं हे व्यवहार केलेच नसतात त्याच्याकडं काहीच माहिती नसते आणि त्यामागचा सूत्रधार कायमच गुपित राहतो.
कोलकात्यासारख्या ठिकाणी तर अशा बनावट पॅन आणि आधारचा वापर करून डझनावारी कंपन्या उघडल्या जातात, त्याद्वारे बेकायदेशीर व्यवहार केले जातात. या कंपन्यांकडून आर्थिक घोटाळ्यांच्या व्यवहारांच्या साखळीत अनेक फायदे करून घेतले जातात..
कधी या कंपन्यांचा उपयोग भांडवल बाजारात समभागांच्या किमतींमध्ये फेरफार करण्यासाठी केला जातो तर कधी जीएसटीचा कर भरणा चुकवायला खोट्या पावत्या दिल्या जातात, ती अशाच प्रकारच्या बनावट पॅन कार्डवर उघडलेल्या कंपन्यांवर. भ्रष्टाचाराचा रोख पैसा वळवला जातो तो अशाच कंपन्यांमध्ये.
विनातारण कर्ज देतो असं सांगून विजयची आर्थिक ओळख सांगणारी माहिती कुणी तरी चोरली होती, किंवा ती कागदपत्रं कोणत्यातरी टोळीला विकली होती. त्याच्या नावानं बँकेत खातं देखील उघडलं गेलं होतं, त्याच्या नावावर कुणी तरी कर्ज देखील घेतलं होतं, साहजिकच आता ते भरलं जाणार नव्हतं. कर्ज वेळेत भरले गेलं नाही तर त्याच्या सिबिल स्कोरवर पण परिणाम होणार आणि मग व्यवसायासाठी लागणारं कर्ज मिळणं त्याला अतिशय दुरापास्त होणार.
आता या सगळ्या गोष्टी विजयला त्याच्या ‘एआयएस’ मध्ये दिसत होत्या. पण सी. ए. म्हणाला, ‘घाबरू नकोस जर तू हे व्यवहार केले नसतील, तर आपण तशी माहिती आयकर विभागाला कळवू आणि हे व्यवहार आपल्या अकाउंट समोरून काढायला सांगू.’ ‘आपण सांगू ते ठीक आहे पण आयकर खात्यानं हे व्यवहार काढायला नकार दिला तर काय करायचं?’ विजयचा प्रश्न रास्त होता. अशा परिस्थितीमध्ये पोलिस ठाण्यात जाऊन याची रीतसर तक्रार नोंदवणं भाग असतं.
पोलिसांकडे तक्रार केली असेल तर आयकर खात्याकडून भविष्यात होणारा त्रास पण वाचवता येतो. विजय हे एक प्रातिनिधिक उदाहरण होतं. आपल्यापैकी देखील अनेकांनी हा अनुभव घेतला असणार आहे, त्यामुळं यातून एक गोष्ट आपण शिकायला पाहिजे ती म्हणजे ‘एआयएस’ या रिपोर्टचं महत्त्व.
हा अत्यंत उपयुक्त ठरणारा रिपोर्ट आहे आणि प्रत्येक करदात्यानं तो नियमित अंतरानं तपासत राहणं आवश्यक आहे. तुम्ही न केलेला एखादा व्यवहार तिथं दिसत असेल तर त्याची माहिती आयकर खात्याला, सिबिल किंवा इतर तत्सम यंत्रणांना वेळेत देत राहणं हाच तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर टाळायचा रास्त मार्ग आहे.
(लेखिका ह्या सर्टिफाइड अँटीमनी लॉंडरिंगविषयक तज्ज्ञ आणि सर्टिफाइड बॅंक फॉरेन्सिक अकाउन्टंट आहेत, तर लेखक हे चार्टर्ड अकाउन्टंट आणि सर्टिफाइड फॉरेन्सिक अकाउंटिंग तज्ज्ञ आहेत. )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.