लग्न न करता मूल दत्तक घेता येईल का?
मी ४५ वर्षांची अविवाहित महिला असून, मला मूल दत्तक घायचे आहे. माझ्या घरचे, तू या वयात लहान मूल दत्तक घेतल्यावर ते मोठे होईपर्यंत तुझेही आणखी वय होईल, त्यामुळे तुला त्याची योग्य देखभाल करता येणार नाही, असे म्हणून विरोध करीत आहेत. परंतु, मी आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर असून, मला आता एकटेपणा वाटू लागला आहे व मातृत्वाची कमतरता भासू लागली आहे. मला लग्नही करायचे नाही.
कायद्याने पालकांच्या वयानुसार दत्तक मुलाचे वय निश्चित केले आहे, त्यानुसार तुम्हाला वयाने थोडे मोठे मूल दत्तक घ्यावे लागेल. बहुतांश पालक अगदी लहान मूल दत्तक घेण्यालाच प्राधान्य देतात, त्यामुळे मोठी अनाथ मुले कायमस्वरूपी निराधार राहतात. त्यांनाही आई-वडिलांच्या प्रेमाची आणि आधाराची तितकीच गरज असते, याचा विचार तुम्ही करा. एकटी मुलगी मुलाची जबाबदारी पेलू शकणार नाही, एकल पालकत्वामुळे वडिलांच्या प्रेमापासून मूल वंचित राहील, असे अनेक प्रश्न तुमच्याही अथवा इतरांच्या मनात येऊ शकतात. तुम्ही पालक म्हणून दोघांचेही प्रेम त्याला देऊ शकाल, याचा तुम्हाला विश्वास असल्यास नक्कीच एखाद्या अनाथ मुलाच्या चांगल्या आयुष्यासाठी आणि स्वतःच्या आयुष्यातील कमतरता भरून काढण्यासाठी हा चांगला निर्णय आहे.
आपल्याकडे अजूनही पारंपरिक विचारधारेचा पगडा असल्याने तुमच्या घरच्यांना व आसपासच्या लोकांनाही तुमचा निर्णय पटायला अवधी लागेल; परंतु तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम असल्यास त्यांच्याशी बोलून त्यांची मानसिकताही बदलू शकता. तुम्ही मूल दत्तक घेतल्यावर आईच्या प्रेमाबरोबरच बाकी नात्यांचेही प्रेम त्याला मिळणे आवश्यक आहे. मग खऱ्या अर्थाने ते अनाथ मूल इतर सामान्य मुलांसारखे समाजधारेत येईल. मूल दत्तक घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पालकांसाठी केंद्र सरकारने ‘कारा’ ही संस्था स्थापन केली आहे. तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावर कायदेशीरपणे दत्तक प्रक्रियेची संपूर्ण माहिती व योग्य मार्गदर्शन मिळेल. (संकेतस्थळ : www.cara.nic.in). आवश्यक वाटल्यास तुम्ही कायदेतज्ज्ञाची मदतही घेऊ शकता.
नवरा डान्सबारमध्ये जातो
लग्नानंतर माझा नवरा व्यसनी असल्याचे मला समजले. मी व्यसनास विरोध केल्यावर सासरच्यांनीही त्यालाच साथ दिली. माझा नवरा उच्चपदावर असून मला लहान मुले आहेत. आता तो खूपच व्यसनाधीन झाला असून, डान्सबारमध्येही जातो. घरी माझ्यासमोर डान्सबारमधील मुलींशी फोनवर बोलून मला अपमानास्पद वागणूक देतो. आक्षेप घेतल्यावर मारहाण, शिवीगाळ करतो. माझ्या लहान मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मी आर्थिकदृष्ट्या सबळ नसल्याने माझ्यात घराबाहेर पडण्याचा आत्मविश्वास नाही. मी काय करू?
व्यसनाधीनता आणि डान्सबारला जाणारा घटक आजकाल सर्व वर्गांत दिसून येऊ लागला आहे. डान्सबारला जाणे म्हणजे आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन अशा चुकीची मनोधारणेत तरुणाई दिसते, त्यामुळे त्यांना समाजाचीही भीड राहिली नाहीये. प्रसंगी कधीतरी दारू पितो म्हणणारे सहजरीत्या त्यांच्याही नकळत व्यसनाच्या आहारी जातात. पुरुषांना सगळ्या चुकीच्या गोष्टी करण्याचे अधिकार आहेत अशी तुमच्या सासरच्यांसारखी सनातनी प्रवृती असणारा समाजाचा बराचसा भाग आहे, हे तुमच्यासारख्या स्त्रियांचे दुर्दैव आहे. तुमच्या पतीला क्षणिक मोह आणि व्यसनाधीनतेमुळे आपला संसार, मुलांचे भविष्य पणाला लावले आहे याचे तारतम्य राहिले नाही. स्त्रिया समाजाच्या भीतीने, हेच आपले नशीब किंवा कालांतराने सगळे सुरळीत होईल या भावनेने अत्याचार सहन करतात व परिणामी मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होऊन आत्मविश्वास व निर्णयक्षमताही गमावतात.
या सर्वांचा मुलांच्या मनावर व भविष्यावर खूप गंभीर दुष्परिणाम होत आहे, याची तुमच्या त्रासात तुम्हालाही जाणीव होत नसेल. मुलांना या वातावरणापासून दूर ठेवण्यासाठी, त्यांच्यावर चांगले संस्कार घडवण्यासाठी, तुमच्या आत्मसन्मानासाठी तुम्हाला कठोर पावले उचलावी लागतील. यासाठी घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याच्या मदतीने तुम्हाला पतीकडून पालनपोषणाचा खर्च, तसेच दुसरीकडे मुलांबरोबर राहण्यासाठी घरभाडे मिळवता येईल, किंवा आत्ताच्या राहत्या घरात यायला पतीलाच प्रतिबंध करण्याची, तुम्हाला व मुलांना भेटण्यापासून प्रतिबंध करण्याची तरतूद कायद्यात आहे. पतीपासून वेगळे व्हायचे की नाही, हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. अन्यथा, तुम्ही सध्या पतीपासून दूर राहून त्याचे व्यसन सोडवायला दारूमुक्ती केंद्र किंवा समुपदेशकाची मदत घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.