Father And Son sakal
सप्तरंग

चक दे इंजिनिअर!

आयुष्यात मागे वळून बघताना, सकारात्मकतेचे अनेक पंख उंच अवकाशात भरारी घेताना आज जेव्हा दिसतात तेव्हा मनस्वी खूप समाधान वाटते

सकाळ वृत्तसेवा

आयुष्यात मागे वळून बघताना, सकारात्मकतेचे अनेक पंख उंच अवकाशात भरारी घेताना आज जेव्हा दिसतात तेव्हा मनस्वी खूप समाधान वाटते. मला खास करून आठवतेय २००५-०६ मध्ये माझा अत्यंत जवळच्या मित्राचा मुलगा लहानपणापासून अभ्यासापासून सर्व बाबतीत अत्यंत हुशार. दहावीला ८६ टक्क्यांहून जास्त मार्क्स. वडील डॉक्टर आणि वडिलांचे पहिल्या दिवसांपासूनचे स्वप्न, की माझ्या प्रवीणने डॉक्टरच बनावे. त्यासाठी वाटेल ते करण्याची माझ्या डॉक्टर मित्राची तयारी. त्यामुळे जसा प्रवीण दहावी पास झाला, त्या वेळेपासूनच प्रवीणच्या पप्पांची प्रवीणला डॉक्टर बनविण्याची तयारी सुरू झाली.

नाशिकमधील नामवंत क्लासेसला प्रचंड फी भरून प्रवीणला पाठविण्यात आले. याबरोबरीने मुंबईतील करस्पॉन्डस कोर्सेसदेखील लावण्यात आले. येता-जाता प्रत्येक क्षणी प्रवीणवर बिंबविण्यात येत होते, की त्याला कसं डॉक्टर व्हायचं आहे. शिवाय, नुसता साधासुधा डॉक्टर नाही, स्पेशालिस्टदेखील नाही, तर थेट विदेशात जाऊन सुपर स्पेशालिस्ट करण्याची तयारी प्रवीण वगळता अन्य सगळ्यांनी केली होती. हे स्वप्न साकारण्यासाठी प्रवीणच्या पप्पांची शारीरिक, आर्थिक, मानसिक कितीही मेहनत करण्याची तयारी होती. त्यासाठी गावाकडील शेती विकण्याची वेळ त्यांच्यावर आली, तर गरज पडल्यास प्रसंगी सगळी मालमत्ता विकण्याची त्यांनी तयारी केली होती. म्हणता म्हणता २००४ मध्ये बारावीचा मेडिकल सीईटीचा निकाल आला आणि प्रवीणने आयुष्यात पहिल्यांदाच सर्वांचा मोठा ‘भ्रमनिरास’ केला. प्रवीणला बारावीसह सीईटीत खूपच कमी मार्क्स मिळाले होते.

तरीदेखील त्यास बीएएमएस, बीएचएमएसला सहज प्रवेश मिळू शकत होता. परंतु, प्रवीणच्या वडिलांना एमबीबीएसच करायचे ठरविले होते. पुढे प्रवीणच्याच वडिलांनी ठरविले, की यंदा गॅप घेऊन टाकूया. त्यासाठी प्रवीणने सोडाच; परंतु त्याच्या वडिलांनीच पूर्ण ताकद लावून टाकली होती. सुदैवाने प्रवीणचे चार मित्रदेखील गॅप घेऊन मेडिकलची तयारी करणार होते. अशारीतीने सुरू झाली प्रवीणची मेडिकलची लढाई. पुनःश्‍च एकदा नाशिक-मुंबईचे क्लासेसदेखील सुरू झालेत. एकंदरीत तयारी खूपच चांगली चालू होती. शेवटचे तीन महिने तर अजून चांगल्या तयारीकरिता प्रवीणला ठाणे, मुंबईला पाठविण्यात आले. याबरोबरच दर दोन-चार दिवसांआड प्रवीणचे वडीलदेखील मुंबई- ठाण्याच्या चकरा मारू लागले. प्रवीणचे खाण्या-पिण्याचे हाल होऊ नयेत म्हणून ते जाताना मोठा टीफीन नेऊ लागले. बघता बघता सगळ्यांची खात्री पटली, की यंदा नक्कीच किल्ला सर होणार म्हणजे होणार आणि बघता बघता सीईटी पार पडली. आम्ही सगळे मोठ्या उत्सुकतेने निकालाची वाट पाहू लागलो. नाही मुंबई, तर निदान पुण्याच्या कॉलेजला तरी प्रवेश मिळेल, असे वाटत होते. सगळ्यांच्याच अपेक्षा शिगेला पोचल्या होत्या

आणि पुन्हा नेमके नको तेच अघटित घडले! पुनःश्‍च हरी-ओम. नुसते हरी-ओम नव्हे, तर मागच्या वेळेपेक्षाही कमी मार्क्स. अरे देवा!! सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे ज्यांच्याबरोबर प्रवीण अभ्यास करीत होता, सीईटीची तयारी करत होता, ते सर्वच्या सर्व चारही मुले अत्यंत चांगल्या मार्काने सीईटी उत्तीर्ण झालेत आणि आमचा प्रवीण मात्र अपयशी ठरला.

आमच्या डॉक्टर मित्रांसह सगळेच सुन्न झाले. कोणाला काहीच सुचत नव्हते. दरम्यान, आमच्या एका कॉमन डॉक्टर मित्राशी माझ्या गप्पा झाल्या. आमच्या बोलण्याचा निष्कर्ष असा निघाला, की यामध्ये काहीतरी वेगळेच गौडबंगाल आहे. कारण प्रवीण तर हुशार मुलगा आहे. मग, असं काय होतंय? आणि मग मी प्रवीणशी बोलायचं ठरवले. सर्वांसमक्ष न बोलता मी आणि प्रवीण खूप छान अशा लॉन्ग ड्राइव्हवर निघालो. या वेळी बराच वेळ प्रवीणचे समुपदेशन केले. मनसोक्त गप्पा मारल्या आणि त्यात अचानक प्रवीणच्या अश्रूंचा बांध फुटला. घळाघळा अश्रूंच्या धारा लागल्या. बराच वेळ प्रवीण रडत होता. थोडा शांत झाल्यावर तो बोलता झाला. नंतर बराच वेळ बोलत राहिला. त्यातून उलगडले प्रवीणच्या कमी मार्कांचे रहस्य.प्रवीणला मुळात वैद्यकीयशास्त्र अजिबात आवडत नव्हते. काही केल्या त्याला डॉक्टर व्हायचे नव्हते. संगणकतज्ज्ञ होण्याचे त्याचे स्वप्न होते. संगणक हा त्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता.

संगणकशास्त्र त्याला मनापासून आवडतदेखील होते. अरे मग, एवढी सोपी गोष्ट सांगायची ना आधीच, मी म्हणालो! तसा तो लागलीच उत्तरला, अहो काका, तेवढं सोप्पं आहे का ते? आमचे पप्पा कधी ऐकतात का कुणाचे? त्यांना डॉक्टर या शब्दापलीकडे काहीच ऐकायचे नव्हते. प्रवीण बोलत होता... हे मात्र शंभर टक्के खरे होते, आमचे मित्र हे कधीच कोणाचेही ऐकत नव्हते. खास करून प्रवीणने सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर बनावे, हे तर त्यांचे जवळपास १५-१७ वर्षांपासूनचे स्वप्न होते.

आता या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी मी स्वीकारली. सर्वांत पहिल्यांदा प्रवीणला आश्‍वस्त केले, की तुझी (प्रवीणची) संगणकशास्त्राला प्रवेश मिळून देण्याची जबाबदारी माझी. अर्थातच, प्रवीणच्या वडिलांना समजावून सांगणेदेखील त्यात आले. विचार करा, आयुष्यभर बघितलेली स्वप्ने बाजूला ठेवायची होती.

पहिला टप्पा तर पार पडला होता. पुढचा टप्पा मात्र फारच अवघड होता. सगळ्यांसमोर बोलण्यात काहीही अर्थ नव्हता म्हणून या वेळी मी आणि प्रवीणचे वडील लॉन्ग ड्राइव्हला निघालो. सुरवातीला तर प्रवीणहून जास्त बिकट परिस्थिती होती. मोठ्या मुश्‍किलीने मित्राला यशस्वीरीत्या समजावून सांगितले, की त्याला जर डॉक्टरकीत रसच नाही, तर तो कसा काय डॉक्टर होऊ शकतो? आणि त्याला स्वतःलाही स्वप्ने बघण्याचा आणि आवडेल ते शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. प्रवीणची अर्थात‌च दुसरी बाजूपण डॉक्टर मित्राच्या लक्षात आणून दिली. आपण कितीही प्रयत्न केलेत तरी प्रवीणला डॉक्टर करण्यात आपल्याला यश येणार नाही. केवळ पैसा आणि वेळ वाया जाईल. सरतेशेवटी मनस्तापाशिवाय काहीही हाती लागणार नाही. थोडक्यात, मित्र तयार झाला. तेथून तडक निघून आम्ही एका मित्राच्या सहाय्याने प्रवीणचा संगणकशास्त्राला प्रवेश निश्‍चित करून पेढ्यांचा बॉक्स घेऊनच घरी पोचलो.

सध्या आमचा प्रवीण एक प्रथितयश संगणकतज्ज्ञ आहे. आंतरराष्ट्रीय संगणक कंपन्यांमध्ये तो कार्यरत होता. आज त्याची सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्यात ५० हून जास्त अभियंते काम करतात. आज अत्यंत यशस्वीरीत्या सुख-समाधानाने व आनंदात आमचा मित्र, प्रवीण आणि कुटुंबीय जीवनाचा आनंद घेत आहेत. कथा वाचायला हे छान नक्कीच वाटेल. परंतु असे का घडत होते? याचा जर खोलवर विचार केला, तर त्यातील मर्म समजू शकेल. आपापल्या घरांमध्ये आपापल्या पाल्यांबरोबर नाते कसे दृढ असावे? हे आज शिकण्यासारखे आहे. किंबहुना सध्याच्या काळातील देखील हा ज्वलंत प्रश्‍न आहे. पालकांची भीती जरूर असावी; पण ती आदरयुक्त असली पाहिजे. इतकीही नसावी, की ज्याने आपला पाल्य आपल्याशी संवादही साधू शकणार नाही. या घटनेमध्ये सगळे असेच होते. संवादाची एवढी सगळी माध्यमे उपलब्ध असताना समाज तर दूर, पण घराघरांमध्ये विसंवाद का वाढतोय? यावर समाजधुरिणांना आता मंथन नक्कीच करावे लागणार आहे.

लेखक - डॉ. हेमंत ओस्तवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT