Chandragupta Maurya brave and ambitious warlord art sculpture indica Sakal
सप्तरंग

मौर्य-कला (भाग १)

भारतात प्रवेश करताना वायव्येकडच्या छोट्या छोट्या गणराज्यांशी आणि पुरू राजाशी लढून थकल्यानंतर, जिंकलेल्या प्रदेशावर राज्यपाल नेमून ॲलेक्झांडर परत फिरला.

सकाळ वृत्तसेवा

- अजेय दळवी

खरं तर जग जिंकायला निघालेलं ग्रीक सैन्य, भारताच्या पूर्वेपर्यंत धडक मारून नंद वंशाचं मगध राज्य जिंकण्याची अभिलाषा बाळगून होतं. भारतात प्रवेश करताना वायव्येकडच्या छोट्या छोट्या गणराज्यांशी आणि पुरू राजाशी लढून थकल्यानंतर, जिंकलेल्या प्रदेशावर राज्यपाल नेमून ॲलेक्झांडर परत फिरला.

मगधचा नंदवंशीय राजा सामर्थ्यवान असला तरी जुलमी होता. त्या असंतोषाचा फायदा घेत चंद्रगुप्त मौर्य या शूर आणि महत्त्वाकांक्षी सरदारानं विष्णुगुप्त चाणक्यांच्या मदतीनं पंजाबमध्ये सैन्याची जमवाजमव करून लहान-मोठी राज्ये आणि ग्रीक सत्तेखालील प्रदेश जिंकला...मगधावर स्वारी करून नंद राजाची हत्या केली व पाटलीपुत्र इथं - म्हणजे सध्याचं पाटणा - मौर्य राजसत्तेची स्थापना केली.

मौर्य साम्राज्यावर मोठ्या सैन्यानिशी चढाई करणारा ग्रीक सत्ताधीश सेल्युकस निकेटरचा चंद्रगुप्तानं पूर्ण पराभव केला व अशा प्रकारे प्राचीन भारताच्या इतिहासातलं हिमालयापासून म्हैसूरपर्यंत आणि कलिंगवगळता काबूल-कंदाहारपासून बंगालपर्यंत एक विस्तीर्ण असं पहिलं एकछत्री अंमल असलेलं साम्राज्य प्रस्थापित झालं.

त्यादरम्यान चंद्रगुप्ताच्या दरबारास भेट देणारा ग्रीक सत्ताधीश सेल्युकस निकेटरचा वकील (उच्चाधिकारी) मेगॅस्थेनिसलिखित ‘इंडिका’ या दस्तऐवजात चंद्रगुप्ताच्या भव्य आणि सुंदर राजवाड्याचं वर्णन आहे, तसंच इसवीसन ४०० मध्ये आलेल्या फाहियान या चिनी प्रवाशानंही ‘या प्रासादाच्या भिंती, दरवाज्यावरील कोरीव काम, तसंच शिल्पकाम मानवानं केलेलं आहे असं वाटत नाही’ असं नमूद करून ठेवलं आहे.

चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदुसार यानं २५ वर्षं शांततेत राज्य केलं. त्यानंतर आलेला त्याचा पुत्र सम्राट अशोक यांची महत्त्वपूर्ण राजवट सुरू झाली. साम्राज्य मोठं असलं तरी कलिंग देश - म्हणजे सध्याचं ओडिशा हे राज्य - मात्र स्वतंत्र होतं. तेव्हा, कलिंग देशावर स्वारी करून ते आपल्या साम्राज्याला जोडताना झालेल्या युद्धात साधारणतः एक लाख लोक मारले गेले. दीड लाखापेक्षा जास्त युद्धकैदी झाले.

त्यानंतर उद्भवलेली रोगराई आणि पडलेला दुष्काळ यांमुळे लाखो लोक मरण पावले. या मानवसंहाराचा सम्राट अशोक यांना पश्चात्ताप झाला. कलिंगयुद्ध शेवटचं ठरलं. त्यानंतर सम्राट अशोक यांनी अहिंसाप्रधान बौद्ध धर्माचा स्वीकार करत उर्वरित आयुष्य धर्मप्रसारात व्यतीत केलं.

या काळात शत्रुरहित असं एकसंध बलशाली मौर्य साम्राज्य अस्तित्वात आल्यामुळे शांतता आणि संपन्नता आली. परकीय संस्कृतीशी सलोख्याचे संबंध आल्यामुळे कलेला नवचैतन्य लाभून तिचा उत्कर्ष झाला. शांतता, एकांतवास, ध्यानधारणा, आध्यात्मिक चिंतन यासाठी ऋषी-मुनी, भिक्षू हे अनेकदा डोंगरांत नैसर्गिकपणे निर्माण झालेल्या गुहांमध्ये राहत असत.

सम्राट अशोक यांच्या काळात डोंगराळ खडक मुद्दाम फोडून गुहा निर्माण करण्याची प्रथा सुरू झाली आणि एक खास भारतीय वास्तुकला जन्माला आली.

बिहारमध्ये असलेली लोमश/लोमस ऋषींची गुहा ही तत्कालीन लाकडी बांधणीच्या सुंदर वास्तूची हुबेहूब नक्कल असल्याचं जाणवतं.

सध्याच्या जहानाबाद जिल्ह्यात डोंगराळ भागात ही गुहा आहे. तिच्या दर्शनी भागावर अश्वनालाकृत कमान कोरलेली आहे. तिच्या आतील अर्धवर्तुळाकार पट्टीत उथळ उठावात दोन्ही बाजूंनी मध्याकडं येणाऱ्या हत्तींच्या रांगा कोरलेल्या आहेत. आतील भागात आलंकरण नसलं तरी दगडी भिंतीला दगड घासून हा भाग मौर्य पद्धतीनं आरशासारखा गुळगुळीत करण्यात आला आहे.

सम्राट अशोक यांनी सर्वसामान्य माणसाला सदाचार शिकवण्यासाठी स्तंभलेख, गुहालेख आणि गिरिलेख हे पाली भाषेत कोरून बौद्ध धर्माज्ञा पोहोचवण्याचं मोठं कार्य केलं. असेच सुमारे ३४ शिलालेख देशाच्या चारही भागांत सापडले आहेत. मौर्यकाळातल्या कलाकृती अभ्यासताना काही मोजकी शिल्पं आणि त्यातही काही अत्यंत महत्त्वपूर्ण असे स्तंभशीर्ष उपलब्ध आहेत.

सम्राट अशोक यांनी साधारणतः चाळीस फूट उंचीचे सुमारे ३० स्तंभ राजमार्गांवर, राज्याच्या सीमेवर आणि महत्त्वाच्या धार्मिक ठिकाणी उभारले. हे स्तंभ चुनारच्या खाणीतल्या पिवळ्या वालुकाश्मात आहेत. या स्तंभांपैकी तेरा स्तंभ आजही उपलब्ध आहेत.

त्यावरील एक किंवा अनेक प्राण्यांच्या शिल्पांनी बनवलेले स्तंभशीर्ष हे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जातात. सर्व स्तंभांवर अशोक यांच्या १४ आज्ञा कोरलेल्या आहेत. या स्तंभांसारखी झिलई मौर्यकाळापूर्वी आणि नंतर कोणत्याही शिल्पात आढळत नाही. यांपैकी लौरिया-नंदनगडचा सिंहस्तंभ बिहारच्या चंपारण जिल्ह्यात आज दोन हजार वर्षांनंतरही सुस्थितीत पाहायला मिळतो.

बिहारमधील रामपूर इथं सापडलेलं वृषभ स्तंभशीर्ष हे वालुकाश्म दगडात एकसंध घडवलेलं आहे. आखूड शिंगं, उभारलेले कान, मोठ्या आकाराचं वशिंड...असा हा धष्टपुष्ट वृषभ आहे. मात्र, या शिल्पात बैलाच्या उन्मादाचा लवलेशही आहे. उलट, हे वृषभशिल्प पाहताना सौम्यताच अनुभवाला येते. सर जॉन मार्शल यांनी तर ‘भारतात निर्माण झालेल्या प्राचीन शिल्पांमधलं सर्वोत्कृष्ट शिल्प’ अशी या शिल्पाची प्रशंसा केली आहे.

(लेखक हे चित्रकार आणि कलाभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI ने पोस्ट केलेला स्पेशल Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT